mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार दिनांक २३ मे २०२५       

मान्सूनपूर्व चा दणका…
आंबोलीत दरड कोसळली... आजऱ्यात तेरा तास वीज पुरवठा खंडित

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मान्सूनपूर्व पावसाच्या दणक्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून पावसामुळे आंबोली येथे दरड कोसळल्याने आंबोली-सावंतवाडी मार्ग दीड तास ठप्प झाला होता तर आजरा शहरासह परिसरात तब्बल तेरा तास वीज पुरवठा खंडित झाला. अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले आहेत.

       बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. काल गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आंबोली सावंतवाडी मार्गावरील मुख्य धबधब्याच्या अलीकडे दरड कोसळल्याने सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.

        आजरा तालुक्यातील काल जोरदार पाऊस झाला. बुधवारी रात्री दहा वाजता खंडीत झालेला वीज पुरवठा तब्बल तेरा तासांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता सुरू झाला.

         दिवसभराच्या जोरदार पावसामुळे आग्रा येथील बाजारपेठेसह आर्थिक संस्थांच्या व्यवहारावर मोठा परिणाम झाल्याचे दिसत होते. बहुतांशी तालुकावासीयांनी दिवसभर घरीच राहणे पसंत केल्याने आर्थिक संस्थांमध्ये फारसे व्यवहार झाले नसल्याचे सांगण्यात येते.

       एकंदर मान्सूमान्सूनपूर्ववसाने लावलेली जोरदार हजेरी बळीराजासह नागरिकांना अडचणीची ठरू लागली आहे.

सर्व श्रमिकच्या वतीने रविवारी पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा येथे कॉ. अतुल दिघे व कॉ. शांताराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या गिरणी कामगार वारसदारांच्या बैठकीत १५ मार्च २०२४ रोजीचा जीआर रद्द करून गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरी जाऊन पुनर्वसन करावे या मागणीसाठी रविवार दिनांक २५ मे रोजी पालकमंत्र्यांच्या गारगोटी येथील निवासस्थानावर मोर्चा काढण्याचे ठरले.

       यावेळी बोलताना कॉ. अतुल दिले म्हणाले, जे गिरणी कामगार अपात्र झाले आहेत त्यांना कागदपत्रे मिळविणे बाबत मदत करण्यासाठी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात व ESI कार्यालयात मदत करण्यासाठी मदत करावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगरविकासमंत्री आहेत त्यांनी व पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांनी १५ मार्च २०२४ रोजी जीआर रद्द करून आणावा अशी मागणी केली. पालकमंत्री आबिटकर यांनी गिरणी कामगारांच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करावा व गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरे मिळावीत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पाठपुरावा करावा असेही ते म्हणाले.

      बैठकीस निवृत्ती मिसाळ, गणपत ढोणुक्षे, दौलत राणे, शांताराम हरेर, मनापा बोलके, दत्तात्रय होडगे, जानबा सावंत, हिंदूराव कांबळे, अनिता बागवे, सुरेखा बागवे, नंदा वाकर, विठाबाई परीट, केरूबाई शिंदे हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

      महादेव होडगे यांनी आभार मानले.

ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा २०२५ मध्ये व्यंकटरावच्या सौश्रुती पुंडपळची निवड

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच लागला यामध्ये आमच्या व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील इयत्ता आठवी मध्ये शिकणारी कु. सौश्रुती अमित पुंडपळ पात्र ठरली.

      या विद्यार्थिनीला व्यंकटराव प्रशालेतील सौ. ए. डी. पाटील, श्री. पी. एस. गुरव व श्री. व्ही.ए. चौगुले व श्रीम. एम. व्ही. बिल्ले यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष मा श्री जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ, प्राचार्य श्री आर जी कुंभार, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.

पाच हजार शेअर्स धारकांना साखर कधी मिळणार ?
सिरसंगी वाटंगी किणे येथील आजरा सभासदांचा प्रश्न

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा साखर कारखान्याकडून दहा हजार रुपये शेअर्स व पंधरा हजार रुपये शेअर्स असणाऱ्या सभासदांना अनुक्रमे २५ व ५० किलो साखर वाटप सुरू आहे. पण सध्या पाच हजार रुपये शेअर्स असलेल्या सभासदांची संख्या जास्त असून वाटंगी, शिरसंगी परिसरातील सभासदांनी ५००० शेअर्स धारकांना साखर कधी मिळणार ? असा प्रश्न उपस्थित केला आहे जर सदर सभासदांना साखर दिली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही सभासदानी दिला आहे.

          आजरा साखर कारखाना सहकार तत्वावर स्थापन करताना तालुक्यातील खेडोपाड्यातील शेतकऱ्यांनी पै -पै गोळा करून प्रसंगी सेवा संस्था, बँकेतून कर्ज घेऊन सभासद रक्कम भरली आहे. या सभासदामुळेच कारखाना उभा राहिला असल्याचे मत शिरसंगीचे माजी उपसरपंच अशोक चौगुले यांनी मांडले ‌. कारखान्याच्या निवडणुकीसाठी ५००० रु.चे शेअर्स धारक चालत असतील तर साखर देण्यासाठी का चालत नाहीत ? असा सवालही चौगुले यांनी केला आहे. तरी त्वरित चेअरमन मुकुंदराव देसाई व्हा. चेअरमन सुभाषराव देसाई यांनी ५००० रुपये शेअर्सधारकांना साखर द्यावी अशी मागणी ही केली आहे.

आजऱ्यात वळीव पावसामुळे उन्हाळी पिकांना फटका… तर शहरात गल्ली बोळात चिखल

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यात गेले चार-पाच दिवस वळीव पावसाने धुमाकुळ घातला आहे. काल गुरुवारी तर दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. उन्हाळी भुईमुग, मटकी पिकाला फटका बसला आहे. उन्हाळी भुईमुग काढणीच्या वेळी वळीव पाऊस सुरु झाल्याने भुईमुगाला कोंब फुटू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

        गेले दहा दिवस तालुक्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. वळीव पाऊस सुरु आहे. काल दिवसभर तर पावसाची संततधार सुरु होती. तालुक्यात जून महीन्यासारखे वातावरण तयार झाले होते. पावसाने शेती मशागतीची कामे ठप्प झाली आहे. जमिन तयार करणे, बांध बंदिस्ती, सड गोळा करणे या कामाला वेग आला होता. या कामांना ब्रेक लागला आहे.

उन्हाळी सुट्टीत पावसाळी पर्यटन…

      सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने वातावरणात प्रचंड बदल झाला आहे. यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीतच पावसाळी पर्यटनाचा आनंद बच्चे कंपनीसह पालक वर्ग लुटताना दिसत आहेत.

लग्न समारंभ अडचणीत

      मे महीनाअखेरीस लग्नाचे व वास्तुशांतीचे मुहुर्त आहेत. पावसामुळे लग्न समारंभ व वास्तुशांतीचे मुहूर्त अडचणीत आले आहेत.

नवीन पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा…

      आजरा शहरांमध्ये तर नवीन पाणीपुरवठा योजनेकरीता केलेली खुदाई शहरवासीयांच्या दृष्टीने डोकेदुखीची ठरत आहे. झक मारली तुमची पाणीपुरवठा योजना… अशी म्हणण्याची वेळ आता शहरवासीयांवर आली आहे.   

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा मार्गे वर्षा पर्यटकांची संख्या रोडावली…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुका खरेदी-विक्री संघात दुरंगी लढत

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

एरंडोळ येथे महिलेची आत्महत्या…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!