mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार  दि.२० जानेवारी २०२६

सुधीर देसाई यांचा विजय निश्चित : माजी आमदार राजेश पाटील
शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक सुधीर देसाई हे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातून दोन्ही राष्ट्रवादीसह शिवसेना उबाठाच्या वतीने निवडणुकीला सामोरे जात असून त्यांच्या उमेदवारीला मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केला. देसाई यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी माजी आमदार पाटील बोलत होते.

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुधीर देसाई व समर्थक मंडळी एकत्रितरित्या आजरा तहसील कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी आली होती.

यावेळी बोलताना माजी आमदार पाटील म्हणाले, स्व. राजारामबापू देसाई , स्व. बळीरामदादा देसाई यांच्या कार्याची पोहोच म्हणून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सर्वांशी चर्चा करून सुधीर यांना उमेदवारी देण्याचा घेतलेला निर्णय मतदारांनी त्यांच्या पाठीशी राहून सार्थ ठरवावा असे आवाहन केले.

यावेळी अनिल फडके, मुकुंदराव देसाई, युवराज पोवार, दिगंबर देसाई,माजी उपसभापती निवृत्ती कांबळे यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली.

अर्ज दाखल करताना आजरा कारखाना उपाध्यक्ष सुभाष देसाई, अल्बर्ट डिसोझा, वसंतराव धुरे, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील,उदय पवार, जयसिंग नित्तवडेकर, राघव सरदेसाई, राजू होलम, राजू मुरकुटे, संभाजी पाटील/शिवसेना, संभाजी पाटील/ हात्तिवडे, विठ्ठलराव देसाई, रणजीत देसाई, एम.के. देसाई, विक्रम देसाई, अनिकेत कवळेकर, जोतिबा चाळके, सुरेश होडगे,सोमनाथ होडगे, निवृत्ती केसरकर, जनार्दन बामणे, विजय देसाई, धनाजी दळवी, शंकर कुराडे, भीमराव वांद्रे, महादेव हेब्बाळकर, अंकुश पाटील, रवी देसाई, देवदास बोलके, संजय गुरव, आप्पा पावले, दिनेश कांबळे, तानाजी राजाराम, तुकाराम प्रभू , सुरेश पाटील, अमित गुरव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

नवनिर्वाचित नगरसेविकांच्या पुढाकाराने अखेर गांधीनगरचा कचरा हालू लागला


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

क्रीडा संकुलाच्या शेजारीच असणाऱ्या गांधीनगर येथील कचरा डेपोत जमा करण्यात आलेल्या कचऱ्याला वारंवार आग लावण्याचे प्रकार वाढल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. या जळालेल्या कचऱ्यामुळे निर्माण होणारा धूर शेजारील खेळाच्या मैदानात खेळणारी मुले, सकाळी धावणे, व्यायाम व फिरण्यासाठी येणारे नागरिक यांच्यासाठी मोठा त्रासदायक ठरत होता. याबाबत खेळाडूंसह आवंडी वसाहतीतील नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. मुळात सदर कचरा डेपो इतरत्र हलवावा अशी मागणीही होत आहे. यासाठी अन्याय निवारण समितीचा पाठपुरावाही जोरदार सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर गांधीनगरच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. आसावरी खेडेकर व त्यांचे पती महेश खेडेकर यांनी अग्निशामक गाडी व उपनगराध्यक्षा सौ. पूजा डोंगरे यांनी पुरवलेल्या जेसीबीच्या सहाय्याने नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी जाऊन जळत असलेला कचरा विझवण्याचे व तो तेथून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. काल दिवसभर आग विझवणे व कचरा हटवण्याचे काम सुरू होते.

हे काम एका दिवसात पूर्ण होणार नसून संपूर्ण कचरा हटवण्यासाठी पुढील तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे नगरसेविका सौ. आसावरी खेडेकर यांनी सांगितले.

एकंदर स्थानिक नगरसेविका सौ. खेडेकर यांच्या प्रयत्नातून हा कचरा प्रश्न संपुष्टात येईल असे दिसू लागले आहे.

टाटा मॅरेथॉनमध्ये चिमणेच्या सुनिल शिवणे यांची उल्लेखनीय कामगिरी.


उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

चिमणे (ता. आजरा) गावचे रहिवासी श्री. सुनिल ईश्वर शिवणे यांनी दि. १८ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथे पार पडलेल्या प्रतिष्ठित टाटा मॅरेथॉन स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत चिमणे गावाचा नावलौकिक वाढवला आहे.

या मॅरेथॉन स्पर्धेत संपूर्ण भारतातून १२,६४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ४० ते ४५ वयोगटात १,८६९ स्पर्धक सहभागी झाले होते. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत सुनिल शिवणे यांनी द्वितीय क्रमांक पटकावत विजय मिळवला.
सुनिल शिवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून मॅरेथॉन क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून त्यांनी आजपर्यंत ६०० हून अधिक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यापैकी अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी विजेतेपद व मानांकन मिळवले आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासून धावण्यास सुरुवात केलेल्या सुनिल यांनी कोणत्याही मोठ्या सुविधा नसतानाही केवळ मेहनत, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

त्यांच्या या क्रीडा प्रवासात श्री. संभाजी पाटील अध्यक्ष – दि. महाराष्ट्र  पतसंस्था लि., मुंबई यांचे सहकार्य लाभत असून, त्यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे सुनिल शिवणे यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होता आले आहे.सुनिल शिवणे यांच्या या यशाबद्दल चिमणे गावासह आजरा तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाकरीता दोन अर्ज

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

काल सोमवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे संचालक सुधीर राजाराम देसाई यांनी पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाकरिता राष्ट्रवादी /अजित पवार गटातून एक व अपक्ष एक असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

आज मंगळवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपातर्फे जयवंत सुतार यांची उमेदवारी निश्चित झाले आहे असे समजते. पेरणोली जिल्हा परिषदे करीता उद्या बुधवारी आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उत्तूर जिल्हा परिषदेकरीता शिरीष देसाई, उमेश आपटे, विठ्ठल उत्तूरकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल होतील असे चित्र आहे.

उत्तूरसह पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघामध्ये तिरंगी लढती होणार असे दिसत आहे.

अग्निविरांचा सत्कार…


आजरा : मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा

‘सुप्रभात’ ग्रुपच्या वतीने अग्निवीर निवड झालेल्यांचा सत्कार समारंभ सेवानिवृत्त जवान कुलदीप मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत व सुधीर चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

सुप्रभात ग्रुपचे स आनंदा पोवार/ वेळवट्टी, प्रभाकर बागडी/ देवर्डे, सागर पाटील /साळगाव, दीपक सुतार/आजरा, रावसाहेब पाटील / आजरा, प्रशांत खाटकी/ आजरा, तानाजी कांबळे/ साळगाव, सुधाकर कळेकर/ वेळवट्टी, रमेश निकम/ पारेवाडी, आनंदा पाटील /देवर्डे, डॉ.विनायक सरदेसाई/ आजरा यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

व्यंकटराव हायस्कूलचे भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेत घवघवीत यश…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी भूगोल अभ्यास व परीक्षा केंद्र नवी मुंबई यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या भूगोल प्रज्ञाशोध परीक्षे मध्ये उज्जवल असे यश संपादन केले.

भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेसाठी एकूण १६४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यातील कु. स्वरा मोहन मोटे, कु. विराज बाळकृष्ण नातवेकर कु. परिणीता विक्रम जावळे या तीनही विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय गोल्ड सिल्व्हर, ब्रॉन्झ पदक व प्रशस्तीपत्र प्राप्त झाले तसेच सर्वच विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत असे यश संपादन केले.

प्राचार्य श्री एम. एन. नागुर्डेकर व पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे.शेलार यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम, नियोजनबद्ध अभ्यास, योग्य मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांचे आयोजन या उल्लेखनीय कार्याबद्दल भूगोल परीक्षा केंद्र, नवी मुंबई यांच्यातर्फे मिळालेल्या ‘उपक्रमशील भूगोल शिक्षक’ या पुरस्काराने श्रीमती एम.व्ही.बिल्ले यांना सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व भूगोल विषय शिक्षकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

छायावृत्त 

श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट यांच्या पादुका पालखीचा आगमन सोहळा आजरा येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यासह महाप्रसादास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली

 

संबंधित पोस्ट

अशोकअण्णा चराटी यांच्या रहात्या घरास आग.. प्रापंचिक साहित्याचे नुकसान

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

प्रा. संजय मंडलिक हेच योग्य उमेदवार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!