mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार  दि.१९ जानेवारी २०२६

बेपत्ता वृद्धाचा मृतदेह शेततळ्यात आढळला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

२५ जानेवारीपासून चांदेवाडी ता.आजरा येथून बेपत्ता असणाऱ्या कृष्णा जोती गुंजकर या ८२ वर्षीय वृद्धाचा पारेवाडी येथील घोळ नावाच्या शेतातील शेततळ्यामध्ये मृतदेह आढळून आला आहे.

गुंजकर हे २५ डिसेंबर रोजी सकाळी घरातून बाहेर पडले होते. त्यांचा गेले तीन आठवडे शोध सुरू होता. दरम्यान काल १८ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बबन संतु अर्दाळकर यांच्या पारेवाडी येथील घोळ नावाच्या शेतातील शेततळ्यामध्ये पाण्यात तरंगत असलेला त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबतची वर्दी सचिन कृष्णा गुंजकर यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

गुंजकर यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, सून, जावई,नातवंडे असा परिवार आहे.

शिंपी गटाची राजकीय गुगली…
अनेकांच्या सावध भूमिका

ज्योतिप्रसाद सावंत/मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्याच्या राजकीय पटलावर नेहमी चर्चेत असणारे नाव म्हणजे जयवंतराव शिंपी व त्यांचा गट. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गटाने शिवसेना शिंदे गटाशी संधान बांधण्याचा धक्कादायक निर्णय घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केलेल्या आहेत. या गटाच्या या तर राजकीय गुगलीने अनेकांनी सावध भूमिका घेतल्या आहेत.

तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक व आमदार नरसिंगराव पाटील यांनी शिंपी गटाला हेतू पुरस्सर राजकीय बळ देऊन शिंपी गटाला उभारी देण्याचे काम केले.

हे दोन्ही नेते हयात असेपर्यंत या गटाला फारशा अडचणी आल्या नाहीत. मात्र अलीकडील दहा-पंधरा वर्षांमध्ये देशासह राज्यातील राजकीय घडामोडी बदलत गेल्या. त्याचे पडसाद अगदी तालुका पातळीपर्यंत पोहोचले. याचा फटका या गटाला बसत गेला. बदलते राजकीय वातावरण, इतर स्थानिक मंडळींनी घेतलेल्या सोयीच्या भूमिका व यातून होणारी राजकीय कोंडी यामुळे या गटाला मोठा संघर्ष करावा लागला. त्यातूनही आपली वाटचाल चालू ठेवत कधी राष्ट्रवादी तर कधी राष्ट्रीय काँग्रेसच्या मदतीच्या जोरावर हा गट तग धरून राहिला.

राज्यात महाविकास आघाडीचे एकत्रित काम सुरू असताना आजरा तालुक्यात मात्र घटक पक्षांच्या भूमिका बदलत राहिल्या. नगरपंचायत निवडणूकीत तर घटक पक्षातील अनेक मंडळींनी वेगवेगळ्या निर्णयात खोडा घालण्याचे काम करून हाता तोंडाशी आलेली सत्ता गमावण्यास हातभार लावला हे वास्तव नाकारता येत नाही. नगरपंचायती पाठोपाठ होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये तर महाविकास आघाडी व आपला काही संबंध नाही अशा अविर्भावात अनेक मंडळी वावरू लागली.

राजकीय मुत्सद्दीपणा असणाऱ्या जयवंतराव शिंपी यांनी काल तातडीने आपल्या गटाचा मेळावा घेत जी आपण भूमिका घेऊन त्याला कार्यकर्त्यांची संमती मिळवली आहे. ही भूमिका दुसरी तिसरी कोणतीही नसून थेट शिंदे गटाशी संधान बांधण्याचा त्यांचा निर्णय असल्याचे पुढे येत आहे.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना देखील शिंदे गटाचे लेबल असणारा एक नेटका पहिल्या फळीतील नेता आवश्यक आहे. सध्या त्यांची मदार पूर्णपणे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांच्यावर आहे. शिंपी यांनी शिंदे गटाबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास शिंपी यांना राजकीय बळ तर मिळणार आहेत परंतु शिंपी यांची ताकद पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे. गोकुळसह जिल्हा बँक निवडणुकीचे नगारेही वाजू लागले आहेत. या निवडणुकांमध्येही शिंपी यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे याबाबत आज अंतिम निर्णय होईल असे दिसते.

या शिंपी यांच्या एका निर्णयामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती राजकारणाचे सगळे संदर्भ बदलत जाणार आहेत. ताराराणी आघाडीचा प्रयोग संपुष्टात येण्याची शक्यताही आहे.

भाजपा, शिवसेना (शिंदे गट),अशोक चराटी गट व जयवंतराव शिंपी गट अशी ही मोट बांधण्याचा प्रयत्न वरिष्ठांचा सुरू आहे. शिंपी गटाच्या कालच्या मेळाव्यानंतर अनेकांनी सावध भूमीका घेतल्या आहेत.

केवळ पेरणोलीच नाही तर उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघातही उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे उमेश आपटे व अशोकअण्णा चराटी यांच्या आघाडीला तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंपी यांच्या या निर्णयाचे नगरपंचायत राजकारणावरही पडसाद उमटणार आहेत.

एकंदर शिंपी यांनी ऐनवेळी टाकलेली राजकीय गुगली तालुक्याचा राजकारणाचे राजकीय संदर्भ बदलणारी ठरणार हे निश्चित.

साहेब घेतील त्या निर्णयाशी बांधिल…
शिंपी गटाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

महाविकास आघाडीतील घटक पक्ष सोयीच्या भूमिका घेत आहेत. त्यामुळे राजकीय वाटचालीत अनेक अडथळे निर्माण होत आहेत. महाविकास आघाडीच्या या घटक पक्षांना आघाडीची काळजी नसेल तर आपणही आपल्या सोयीचा निर्णय घेऊन रिकामे व्हा आणि तुमच्या पाठीशी आहोत असे स्पष्ट करत शिंपी गटाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसह आगामी राजकीय वाटचाली गटाचे नेते जयवंतराव शिंदे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी बांधणी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. आजरा येथे शिंपी गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.

यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले, पक्ष आणि संघटनेसाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी बऱ्या- वाईट वेळेमध्ये दिलेली साथ याची जाणीव ठेवून माझ्या दुसऱ्या फळीतील विश्वासू व कार्यक्षम कार्यकर्त्यांना तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या कामात बळ देण्याचा निर्णय आपण घेतला आहे.

मनोगतामध्ये पं. स. माजी सभापती श्री. भिकाजी गुरव यांनी सध्या देशात व राज्यात चालू असणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता योग्य तो निर्णय घ्यावा असे मत व्यक्त केले, त्यानंतर नगरसेवक अभिषेक शिंपी म्हणाले, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) या दोन्ही महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीत व निवडणुकीनंतरही महाविकास आघाडीच्या विचारांची प्रतारणा केली आणि त्याचीच पुनरावृत्ती जि. प. व पं.स.च्या निवडणुकीतसुद्धा करत असल्याने, आम्हाला आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी या दोघांपासून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यावा लागतोय. यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी आहे असे सांगून त्यांना पाठबळ देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

के.जी. पटेकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांची मते आजमावून घेतली.यामध्ये कार्यकर्त्यांनी जयवंतराव शिंपी जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी बांधील राहून गटाला विजयापर्यंत नेऊ असे आश्वासित केले.

याप्रसंगी लहू पाटील, आनंदराव कुंभार ,मुकुंद तानवडे ,विष्णू पाटील , शिवाजी लाड, सहदेव नेवगे, दत्ता पाटील यांनी आपले विचार मांडले

या कार्यकर्ता मेळाव्यासाठी सदाशिव डेळेकर, अप्पासाहेब सरदेसाई, तुकाराम पाटील ,धनाजी सावंत, दौलत कांबळे, दिगंबर पाटील, तानाजी पोवार, सतीश फडके, जोतिबा खामकर, विलास कुंभार , शामराव खामकर (पोळगाव), विष्णू कांबळे, कृष्णा डेळेकर, श्रावण कांबळे, मनोहर जगदाळे , बाळासाहेब चव्हाण आणि भागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री.प्रकाश पाटील- अर्दाळकर यांनी केले. उपस्थितांचे आभार श्री. विलास पाटील यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पी.व्ही. पाटील यांनी केले.

मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे – डॉ. अशोक बाचुळकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, आता मराठी भाषा ज्ञानभाषा झाली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. अशोक बाचुळकर यांनी नुकतेच येथे केले.आजरा महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त डॉ. बाचुळकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी डॉ. रणजित पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

डॉ. बाचुळकर पुढे म्हणाले, मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक आहे. महाराष्ट्रातील सण-उत्सव, लोककला आणि खाद्यसंस्कृती या सर्वांचे मूळ मराठी भाषेतच आहे. भाषेमुळेच आपण आपल्या परंपरांशी जोडले गेलो आहोत. ​आज मराठी भाषा केवळ घरापुरती मर्यादित नसून ती प्रशासन, न्यायालय आणि शिक्षणाची भाषा म्हणूनही विकसित होत आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे या भाषेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. यामुळे संशोधनाला आणि भाषेच्या संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रा. विनायक चव्हाण, डॉ. एम. बी. जाधव, डॉ. सुनील पाटील आदी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आप्पासो बुडके यांनी तर मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

छायावृत्त…


आजरा शहरांमध्ये घंटागाडीचा अनियमितपणा सर्वसामान्यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरु लागला आहे. दोन-चार दिवसातून एकदा घंटागाडी येत असल्याने कचरा काटोकाठ भरून जाणाऱ्या या गाड्यांमधून कचरा खाली पडून पुन्हा या डोकेदुखीत वाढच होताना दिसत आहे.

 

संबंधित पोस्ट

अण्णाभाऊ समूहाचा शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा जाहीर…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उमेश आपटे यांच्या निर्णयाकडे कागल विधानसभा मतदारसंघासह तालुकावासीयांचे लक्ष

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जाहीर आघाडीशी आमचा कोणताही संबंध नाही…. शिंदे गटाचा खुलासा

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!