मंगळवार १२ मे २०२६

नाश्ता महागला…
चाकरमान्यांचे हाल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे हॉटेल व्यवसायिकांनी नाश्त्याचे दर वाढवले आहेत. यामुळे दैनंदिन कामातील दुपारपर्यंत सत्र नाश्त्यावर घालवणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल होऊ लागले असून आर्थिक बजेटही कोलमडू लागले आहे.
अमेरिका – इराण युद्धाचे पडसाद गावगाड्यातील सर्वसामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबांनाही आता अडचणीत आणू लागले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडर महागले आहेत तर घरगुती गॅस सिलेंडरचा कालावधी तब्बल ४५ दिवसांचा करण्यात आला आहे. सदोष वितरणामुळे ४५ दिवसानंतरही सिलेंडर मिळेल याची कोणतीही खात्री देता येत नाही.
गॅस सिलेंडरचे वाढलेले दर व पर्यायी इंधन व्यवस्था नसल्याने हॉटेल व्यवसायिकांनी पदार्थांच्या दरात वाढ केली आहे. कांही पदार्थ तर मेनू कार्ड वरून गायब झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतच आहे परंतु पर्यटक देखील अडचणीत येऊ लागले आहेत. ग्रामीण भागात तर पर्यायी इंधन म्हणून लाकडांचा वापर केला जातो परंतु वनविभागाने वृक्षतोडीवर बंधने आणल्याने धड लाकूड मिळत नाही आणि धड सिलेंडरही मिळत नाही अशा विचित्र परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.

शेतकऱ्यांच्या विरोध डावलून संयुक्त मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास संघटीतपण विरोध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेतकरी आणि पर्यावरणाला उध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध आहे. शेतकऱ्यांच्या विरोध डावलून संयुक्त मोजणी करण्याचा प्रयत्न केल्यास लोकशाही मार्गाने संघटीतपणे विरोध करू, असा इशारा शक्तीपीठ संघर्ष समितीच्यावतीने दिला आहे. याबाबात आजऱ्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी निवेदन स्विकारले.
निवेदनात म्हटले आहे, शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक ०५ मे २०२६ रोजी शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित अरेखनेची अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेत गावातील जमिनीचे गट नंबर नमूद केलेले आहेत. प्रशासनाच्या पातळीवर गावातील शेतकऱ्यांची माहिती वेगाने संकलित करण्यासाठी महसूल यंत्रणा कामाला लागल्याचे दिसते. या माहितीच्या आधारे शेतकरी व स्थानिक नागरिकांना एकत्र करून मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न झाला आहे. तथापि, शक्तीपीठ महामार्गामुळे या तालुक्यातील शेतकरी आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात. या महामार्गामुळे हजारो हेक्टर शेतीचे जमीन संपादित होवून पर्यावरणीय हानी, पाण्याचे संकट, जंगल आणि जमिनीवर प्रतिकूल परिणाम होतील. तसेच, या परिसरातील नैसर्गिक संसाधने आणि स्थानिक भूमिपुत्रांचे अधिकार बाधित होतील. भविष्यातील जीवनशैलीवर व पर्यावरणावर दीर्घकालीन नकारात्मक परिणाम होऊ शकतात.
यावेळी कॉ. देसाई म्हणाले, सरकार कायदा मानत नाहीं. हा मार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकऱ्याला त्रास दिल्यास शेतकरी मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. चंदगडच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या हिता विरोधाची भूमिका घेवू नये. पालकमंत्र्यांनीही शेतकऱ्यांचे हित पहावे. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई, युवराज पोवार यांचे भाषण झाले. या वेळी काशिनाथ मोरे, गोपाळ जाधव, शिवाजी आडाव, सुभाष देसाई, रवि भाटले, संजय सावंत, दिनेश कांबळे, महेश पाटील, निवृत्ती कांबळे यांच्या शेतकरी उपस्थित होते.

१५ मे रोजी बुरुडे येथे रक्तदान शिबिर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवशाहू प्रतिष्ठान, मुंबई आणि बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ (लोअर परळ विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, १५ मे २०२६ रोजी बुरुडे (नेसरी – महागाव रोड कॉर्नर) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वाधिक रक्तदान करणाऱ्या गावांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देऊन छत्रपतींच्या जिरेटोपाचे मानाचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.
आजरा आगारात उद्या प्रवासी राजा दिन
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बुधवार दिनांक १३ मे रोजी आग्रा आगारात प्रवासी राज्यातील व कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे प्रवासी व कामगारांच्या समस्यांचा स्थानिक पातळीवर निपटारा करण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आभार प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.
सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत प्रवाशांच्या लेखी तक्रारी स्विकारल्या जाणार असून त्यावरील उपाय योजनांबाबत विभाग नियंत्रक आदेश देणार आहेत.
दुपारच्या सत्रात दुपारी तीन ते पाच या वेळेत आगारातील कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत अथवा संघटनात्मक समस्या ऐकून घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
निधन वार्ता
सौ.मनिषा पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सौ.मनीषा गणपती पाटील ( वय ४५ वर्षे ) समर्थ कॉलनी, आजरा यांचे आकस्मिक निधन झाले .
त्या गडहिंग्लज साखर कारखान्याचे एच.आर. मॅनेजर जी. एस. पाटील यांच्या पत्नी होत.
त्यांच्या पश्चात दोन दोन मुले आहेत मुळगाव दर्डेवाडी ता आजरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षा विसर्जन गुरुवारी आहे.
संगाप्पा आमणगी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथील संगाप्पा चंदाप्पा आमणगी ( वय ७६ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुन,नातवंडे असा परिवार आहे.

आयपीएल न्यूज
कालच्या सामन्यात पंजाबचा दिल्लीकडून धक्कादायक पराभव झाला असून पंजाबचे २१० धावांचे उद्दिष्ट दिल्लीने १९ षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
माधव तिवारी याला सामनावीर म्हणून जाहीर करण्यात आले.
आजचा सामना
गुजरात विरुद्ध हैदराबाद
वेळ सायंकाळी ७.३० पासून
आजचे पंचांग
दिनांक : १२ मे २०२६
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : दशमी तिथी (दुपारी ०२.५३ पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा नक्षत्र (१३ मे रात्री ०१.१७ पर्यंत) त्यानंतर उत्तराभाद्रपदा नक्षत्र
योग : वैधृति योग (रात्री ११.१९ पर्यंत) त्यानंतर विष्कुम्भ योग
करण : विस्ती भद्रा करण (दुपारी ०२.५२ पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : कुंभ राशी (रात्री ०७.२४ पर्यंत) त्यानंतर मीन राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी ०३.४९ ते सायंकाळी ०५.२६ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९ ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी 6०६.०६
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०४
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत


