mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार  दिनांक १८ ऑक्टोबर २०२४

खोटे कॉल्स… खोटा गुन्हा…

उत्तूर येथील एकाला अकरा लाखांचा लावला चुना….

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

  •        मोबाईल वरून खोटे कॉल करून वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे भासवत गुन्ह्यात अडकवण्याची भीती घालून उत्तुर ता. आजरा येथील ऋषिकेश दिनकर घेवडे यांच्याकडून बँक डिटेल्स घेऊन अज्ञातांनी अकरा लाख रुपयांची रक्कम उकळल्याचा प्रकार उघडकीस आला असून घेवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलिसात अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तब्बल अकरा लाख रुपये उकळल्याने उत्तूर पंचक्रोशीत खळबळ माजली आहे.

      याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी…

      उत्तूर ता .आजरा येथील ऋषिकेश दिनकर घेवडे हे नोकरी निमित्त खडकपूर, पश्चिम निदनापूर ,पश्चिम बंगाल येथे राहतात. मोबाईल वरून त्यांना अज्ञाताने संपर्क साधून आपण लोकसेवक असून फेडेक्स या इंटरनॅशनल कुरियर सर्विस मधून बोलत असून आपले पार्सल स्टफ झाले आहे ते पुढे जाऊ शकत नाही अशा आशयाची माहिती दिली व पार्सल ची खोटी डिटेल्स दिली. आपल्या नावाने पार्सल आले आहे व टेस्ट झाले आहे हे ऐकून नेमके कोणी पार्सल पाठवले आहे व पार्सल मध्ये काय आहे ? याबाबत घेवडे यांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली.

     दरम्यान आपण नॅशनल क्राईम ब्रँचचे तपासी अधिकारी/ डीसीपी बोलत असून या पार्सलच्या पार्श्वभूमीवर आपण मोठ्या गुन्ह्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे व आपणावर पोलीस कारवाई होणार असल्याची भीती दुसऱ्या एका मोबाईल वरून दुसऱ्या व्यक्तीमार्फत घेवडे यांना घालण्यात आली.

     हा नेमका प्रकार लक्षात न आल्याने व पाठोपाठ एकमेकांशी संबंधित फोन सुरू झाल्याने घेवडे हे गोंधळून गेले. तातडीने त्यांना इन्स्टा लोन करून दहा लाख ९१ हजार रुपये एका बॅंक खात्यावर भरण्यासंदर्भात सुचवण्यात आले अन्यथा सदर गुन्ह्यात आपण अडकाल अशी भीतीही घालण्यात आली.

     या फोनच्या संदर्भाने घाबरून गेलेल्या घेवडे यांनी इन्स्टा लोन करून संबंधितांच्या सूचनेप्रमाणे दिलेल्या खात्यावर रक्कम पाठवली. त्यानंतर त्यांना संशय आल्याने त्यांनी अधिक माहिती घेतली असता त्यांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

     याबाबतची फिर्याद त्यांनी आजरा पोलिसात दिली असून पुढील तपास गडहिंग्लज उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे निरीक्षक होडगर करीत आहेत.

अपरिचित नंबर वरून येणारे कॉल टाळावेत

      अलीकडे विविध मोबाईल नंबर वरून अनेकांना कॉल येत असून वेगवेगळी कारणे सांगून वेगवेगळी ॲप्स डाऊनलोड करणे, बँक तपशील उपलब्ध करून घेणे व त्याद्वारे फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे मोबाईल धारकांनी याची दक्षता बाळगण्याची गरज आहे.

पावसाच्या तडाख्याने शेतकरी चिंतेत…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गेले आठ दिवस आजरा तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने सुगीच्या तयारीत असणारी शेतकरी मंडळी धास्तावून गेली आहेत. कापणीला पिके आली असतानाच भात, नाचणा पिके अडचणीत आली आहेत, तर भुईमुगही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाने उघडीप न दिल्यास हातातोंडाशी आलेली पिके वाया जाऊन शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत येणार असे दिसत आहे.

      नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये सुरू झालेल्या पावसाने अद्याप विश्रांती घेतलेली नाही. दिवसभर ढगाळ वातावरण व दुपारनंतर जोरदार पाऊस असे चित्र सध्या तालुक्यांमध्ये दिसत आहे. यावर्षी भात पिके अतिशय चांगली असताना ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे पावसाच्या माऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे.

      काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने तर संपूर्ण बाजारपेठेत पाणीच पाणी झाले होते.

आजरा महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत यश

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        वारणानगर येथे पार पडलेल्या शासकीय जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. ४ x १०० मीटर धावणे रिले संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघात किशोर लाड, संकेत कांबळे, रामचंद्र वास्कर, अश्विन कांबळे व पृथ्वीराज कांबळे या खेळाडूंचा समावेश होता.

        या खेळाडूंची डेरवण (चिपळूण, रत्नागिरी) येथे होणाऱ्या विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंना जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. अशोक सादळे, उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांचे प्रोत्साहन लाभले तर क्रीडा शिक्षक प्रा. अल्बर्ट फर्नांडिस व क्रीडा संचालक डॉ. धनंजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये ‘ रोजरी ‘ स्कूलचे यश..

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेने १४ वर्षे वयोगट विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली. वैयक्तिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये सेजल सावंत ६०० मीटर धावणे प्रथम व लांब उडी प्रथम रोशन लोबो ६०० मीटर धावणे द्वितीय क्रमांक , क्लिंटन बारदोस्कर लांब उडी मीटर तृतीय क्रमांक. तसेच सतरा वर्षे वयोगट ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये गोळा फेक या प्रकारात रोनिता द्वितीय क्रमांक,४०० मीटर धावणे मारिया मुल्ला द्वितीय क्रमांक ,८०० मीटर धावणे मंजिरी तावडे तृतीय क्रमांक, पंधराशे मीटर धावणे स्वरांजली मुरूकटे प्रथम क्रमांक व आयुष पाटील तृतीय क्रमांक,३०० मीटर मॅरेथॉन मध्ये तनुजा पाटील प्रथम क्रमांक व तन्वी गावडा तृतीय क्रमांक असे यशस्वी ठरले.

     सांघिक स्पर्धेत रुपेश सावंत हर्षवर्धन जगताप प्रथमेश सावंत, रोहित चौगुले व सावेज मुल्ला या मुलांच्या गटाने तर स्वरांजली मुरूक , रीया रोबो ,नियती नाईक , मानसी बुडके,तनुजा पाटील या मुलींच्या गटाने ४ x ४०० मीटर रिलेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

     यातील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी व द्वितीय क्रमांक प्राप्त रिले संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .या स्पर्धेसाठी शाळेचे मॅनेजर फादर मेल्विन पायस ,प्राचार्य फा. अँथोनी डिसोजा,मुख्याध्यापक श्री. मनवेल बार्देस्कर यांचे प्रोत्साहन व क्रीडा प्रमुख संतोष कदम पर्यवेक्षक विजय केसरकर व सौ. लक्ष्मी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

कौतुकास्पद…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

      कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचं टोक असलेल्या आजरा तालुक्यातील हात्तिवडे येथील सुनीत चंद्रमणी यांचे सुपुत्र मिलिंद चंद्रमणी याने जिद्द आणि चिकाटीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. पहिल्याच प्रयत्नात त्याने तालुका कृषी अधिकारी हे पद मिळवले. तेवढ्यावरच समाधान न मानता पुन्हा एकदा जिद्दीने तयारी करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी विभागाच्या गुणवत्ता यादीत त्याचे नाव झळकले. नुकतीच त्याची राजपत्रित अधिकारी म्हणून विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय नागपूर येथे विभागीय कृषी उपसंचालक- सांख्यिक या पदावर नियुक्ती झाली आहे

      नवोदय विद्यालयातून बारावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडल्यानंतर त्याने तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला.तेथे बी.एस्सी.ॲग्री चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून त्याने कृषी विषयातील एम.एस्सी. पदवी घेतली तसेच युजीसी मार्फत घेतली जाणारी नेट (राष्ट्रीय अभियोग्यता) परीक्षाही उत्तीर्ण झाला.वडील सुनीत चंद्रमणी स्पर्धा परीक्षेतून विस्तार अधिकारी झाल्याने त्यालाही वाचन,सामान्य ज्ञान व स्पर्धा परीक्षेत रूची निर्माण झाली. त्यामुळे एम.एस्सी.चा अभ्यास सुरू असतानाच त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचीही तयारी सुरू केली.

      महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०२१ च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्याची तालुका कृषी अधिकारी राजपत्रित पदावर निवड झाली, मात्र त्यावर समाधान न मानता ध्येय, जिद्द, चिकाटी बाळगत त्याने पुन्हा एकदा २०२२ ची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीत त्याचे नाव झळकले. ही बातमी कळताच  त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव सुरू झाला आहे.

निधन वार्ता
लिलाबाई पाटील


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा येथील लिलाबाई बसवाणी पाटील (वय ८० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

     त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आजरा येथील पानपट्टी व्यावसायिक रवी पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

                          (Advt.)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969



 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!