रविवार दि. २१ डिसेंबर २०२५

सांगली – कोल्हापूर महामार्गावरील तावडे हॉटेल नजिक अपघात
मलिग्रे येथील युवा डॉक्टर ठार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील मलिग्रे येथील प्रसाद उर्फ बाबू दिनकर बुगडे या २६ वर्षीय तरुण डॉक्टरचा सांगली – कोल्हापूर महामार्गावर तावडे हॉटेल नजिक काल शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान दुचाकीला ट्रकने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रसाद बुगडे यांचा जन्म अगदी सामान्य कुटुंबात झाला. वडील दिनकर हे मलिग्रे येथे पोलीस पाटील व गृहरक्षक दलामध्ये कार्यरत होते. वडिलांच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीतून दहावीपर्यंत मलिग्रे येथे शिक्षण घेतले व पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी सांगली येथे गेले होते. यावर्षीच त्यांचे बीएचएमएस शिक्षण पूर्ण झाले.
त्यांना तीन बहिणी विवाहित असून दोन नंबरची बहीण एमबीबीएस डॉक्टर असून त्या एमडी करण्यासाठी मिरज येथे राहत असल्याने आपला भाऊ डॉक्टर व्हावा यासाठी आपल्या जवळ ठेऊन त्यांना शिक्षण दिले होते.
आईच्या डोळ्यांच्या उपचारासाठी कणेरी मठ येथे जायचे होते यासाठी प्रसाद यांनी आईला कोल्हापुर येथे बोलावले होते व प्रसाद सांगलीहून कोल्हापूरकडे आपल्या मोटरसायकलने येत असता एका मालवाहू ट्रकने धडक दिली यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
या तरुण व हरहुन्नरी डॉक्टरच्या अपघाती मलिग्रे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

आज निकाल…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीकरता डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदान नाट्याचा अंतिम अंक आज आजरा शहरवासीयांना पाहायला मिळणार असून सकाळी साडेदहापर्यंत निकाल अपेक्षित आहे. मतदानानंतर निकाल लांबल्याने थोडासा कमी झालेला निकाल प्रक्रियेचा उत्साह गेल्या दोन दिवसापासून पुन्हा एक वेळाश शिगेला पोहोचला आहे. नगराध्यक्षपदासह १७ प्रभागातील नगरसेवकांवर आज शिक्कामोर्तब होणार आहे.
आज सकाळी १० वाजल्यापासून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसीलदार कार्यालय आजरा येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीची प्रशासकीय पातळीवरची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी तथा आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांनी दिली. एकूण दोन फेऱ्यात दहा टेबलावर ही मतमोजणी होणार आहे. यासाठी ५५ कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक ८ या प्रभागातील १ ते ९ मतदान केंद्रावरची मतमोजणी पूर्ण होणार आहे. या फेरीत १ ते ७ प्रभागातील प्रत्येकी एक तर प्रभाग आठ मधील दोन केंद्रावरची मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या फेरीत प्रभाग क्रमांक ९ ते प्रभाग क्रमांक १७ या प्रभागातील १० ते १९ मतदान केंद्रावरची मतमोजणी पूर्ण होणार आहे. या फेरीत प्रभाग ९ मधील दोन तर प्रभाग १० ते १७ मधील प्रत्येकी एका केंद्रावरची मतमोजणी होणार आहे. सकाळी साडेदहापर्यंत संपूर्ण निकालाचे कल हाती येणार आहेत.
पोलिसांचे संचलन
निवडणूक निकाल पार्श्वभूमीवर काल शनिवारी सायंकाळी पोलिसांनी शहरातून संचलन केले. यामध्ये पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले होते.

आजाराशी सतीशची झुंज व्यर्थ…
काल झाला मृत्यू

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तुर येथील आदर्श युवा ग्रुपचे सक्रिय सदस्य सतीश शिवराम फाळके उर्फ बबलू यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून ते आजाराशी झुंज देत होते. अखेर त्यांचा काल मृत्यू झाला.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सतीश फाळके हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला. व्यवसायात ते प्रामाणिक, कष्टाळू व हुशार म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.

चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश
मडिलगे येथील एका विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे ता. आजरा येथील दशरथ शंकर तांबे यांच्या घरी शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास बाथरूममध्ये चोरीच्या उद्देशाने लपलेल्या सुरेश लक्ष्मण सुतार ( वय ५० रा. मडीलगे ) याला तांबे यांनी रंगेहात पकडून त्याच्या विरोधात आजरा पोलिसात फिर्याद दिली आहे.
सदर फिर्यादीवरून सुरेश सुतार याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस हवालदार पांडुरंग येलकर पुढील तपास करीत आहेत.

‘स्मार्ट किड्स’ च्या छोट्यांचा बडा धमाका…
वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील न्यू अन्नपूर्णा बहुउद्देशीय संस्था, संचलित स्मार्ट किड्स प्री प्रायमरी शाळेच्या छोट्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनानिमित्त विविध कार्यक्रम सादर करून बडा धमाका केला. यावेळी पारितोषिक वितरण समारंभ ही उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांना सण संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी यावर्षीच्या कार्यक्रमाची “महाराष्ट्र सण -संस्कृती “या उद्दिष्टावर आधारित विविध कार्यक्रम घेण्यात आले.
गुढीपाडवा, बैलपोळा , नारळी पौर्णिमा, गणेश जयंती,दसरा ,दिवाळी ,रंगपंचमी, महाशिवरात्र, महाराष्ट्राचे लोकनृत्य लावणी, शाळेच्या अभ्यासक्रमावर आधारित मुलांनी प्रात्यक्षिक दाखविले.
विद्यार्थी व पालक बक्षीस वितरण मृत्युंजय महान्यूज चे मुख्य संपादक ज्योतिप्रसाद सावंत, संगम गुंजाटी,योगेश पाटील सुरज जाधव, सुयोग जाधव यांच्या हस्ते पार पडले.
छत्रपती संभाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमास सर्व मुलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. शाळेच्या मुख्याध्यापिका अमृता पाटील, शिक्षिका अनिता सुतार, वर्षा पाटील, रेश्मा सुतार तसेच कोरिओग्राफर नितीन पाचवडेकर, वंदना सुतार, यांच्यासह संस्था सदस्य , कार्यक्रमाचे पाहुणे ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

मडिलगेच्या विद्यार्थ्यांनीचे नेत्रदीपक यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नुकत्याच पार पडलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर आजऱ्याच्या नवनाट्य कलामंच या मंडळाने ‘काळोख देत हुंकार ‘ हे नाटक सादर केले होते. या नाटकातील स्त्री पात्राची भूमिका वठवणारी कलाकार कु. श्रृती कांबळे हिला अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्या निमित्ताने मडिलगे हायस्कूल मध्ये तीचा सत्कार करण्यात आला. ती या हायस्कूलची माजी विद्यार्थिनी आहे. नविन विद्यार्थ्यांना कलाकारांना प्रेरणादायी ठरेल असे काम श्रृतीने करुन दाखवले आहे असे गौरवोद्गार मुख्याध्यापक श्री. वामन सामंत यांनी काढले. श्रृतीने कलेचे जीवनातील महत्व व आपण कसे शालेय जीवनापासून घडत गेलो हे सांगतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.रीयाज मुल्ला यांनी तर आभार सौ. मनीषा येसणे यांनी मानले. या कार्यक्रमाला मडिलगे हायस्कूलचे सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होता.


