शनिवार दि. २० डिसेंबर २०२५


नो गुलाल… नो फटाके… नो मिरवणुका
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नगरपंचायत निवडणुकीचा निकाल उद्या लागत असून या निकालाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जल्लोषावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने मर्यादा आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मतमोजणी दिवशी म्हणजे उद्या रविवारी २१ डिसेंबर रोजी विजयी उमेदवारांची मिरवणूक काढणे, रॅली काढणे, सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे अथवा त्याचा वापर करणे, फटाके फोडणे याला संपूर्ण कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रात प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसे आदेशही लागू करण्यात आले आहेत.
उद्या रविवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पार पडण्याची शक्यता असून दहा टेबलवर दोन फेऱ्यांमध्ये सदर मतमोजणी होणार आहे याकरिता सुमारे ३५ कर्मचारी व अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
विजयाची खात्री असणाऱ्या अनेक उमेदवारांनी जंगी मिरवणुका व आतषबाजीचे नियोजन केले होते. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाने उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या उत्साहावर पाणी पडले आहे.

रवळनाथ हौसिंग फायनान्सची निवडणूक सहाव्यांदा बिनविरोध : ९ विद्यमान तर ४ नव्या चेहऱ्यांना संधी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली कार्यक्षेत्र असलेल्या येथील श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी लि., आजरा (मल्टी-स्टेट) प्रधान कार्यालय, गडहिंग्लज या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सलग सहाव्यांदा बिनविरोध पार पडली. स्थापनेपासूनच सभासदांनी बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम राखत यंदा बिनविरोध निवडणुकीचा षट्कार मारुन सहकार क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे.
सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीकरीता मल्टीस्टेट कायद्यानुसार या पंचवार्षिक निवडणूकीसाठी १३ जागेसाठी १३ अर्ज दाखल झाले . निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
नवनिर्वाचित संचालक मंडळात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले, विद्यमान उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे, ज्येष्ठ संचालक प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर, प्रा. डॉ. किरण पोतदार, डॉ. संजय चौगुले, श्री. सुशांत करोशे, प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील, श्री. महेश मजती, प्रा. डॉ. मनोहर पुजारी, श्री. सुहास नाडगौडा, श्री. बाबासाहेब आजरी, श्री. पी. आर. शिंगटे, सौ. राजश्री कोले यांचा समावेश आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. एकनाथ काळबांडे, सहा. निबंधक तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सौ. अनिता शिंदे यांनी देखील काम पाहीले. संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांनी निवडणूक बिनविरोध पार पाडल्याबद्दल सभासदांचे आभार मानले. सीईओ श्री. डी. के. मायदेव, संस्थेचे आजी-माजी संचालक, आजी-माजी शाखा सल्लागार, सभासद, प्रशासन अधिकारी सौ. प्रज्ञा पाटील व श्री. सागर माने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
निवृत्त अधिकारी, व्यावसायिक यांना संधी
नवनिर्वाचित संचालक मंडळात यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथून अप्पर पोलीस अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले श्री. सुहास नाडगौडा आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झालेले श्री. बाबासाहेब आजरी या निवृत्त अधिकाऱ्यांना तर आयआयटी श्रीनगर येथून उच्चशिक्षित केमिकल इंजिनिअर व सल्लागार स्वस्या सोल्युशन्स प्रा. लि., चे संस्थापक अध्यक्ष श्री. पी. आर. शिंगटे यांना संधी देण्यात आली आहे.

स्पीड ब्रेकर करा… अन्यथा अपघाताची शक्यता…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर – बांदा महामार्गावरील आंबोलीच्या दिशेने आजरा शहरात प्रवास करताना हॉटेल मिनर्वा ते आजरा बसस्थानकापर्यंत असणाऱ्या मार्गावर गतिरोधक नसल्याने या मार्गावर चार चाकी व अवजड वाहने सुसाट धावताना दिसतात. विशेषता हा मार्ग वळणाचा व तीव्र उताराचा असल्यामुळे एखाद्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यास अथवा ब्रेकफेल सारखी घटना घडल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असून या मार्गावर तातडीने गतिरोधक तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत आजरा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांशी लेखी पत्रव्यवहार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे.
एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने या मार्गावर गतिरोधक तयार करणे आवश्यक आहे.

‘आजरा महाल’ च्या उपाध्यक्षपदी कृष्णा पटेकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा या संस्थेच्या उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक कृष्णा गणपती पटेकर यांची निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी व सर्व संचालक मंडळ यांनी संस्थेच्या उपाध्यक्षपदी श्री. कृष्णा गणपती पटेकर यांची एकमताने बिनविरोध निवड केली.
या निवडीनंतर श्री. जयवंतराव शिंपी यांचे हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सचिव श्री. अभिषेक शिंपी, खजिनदार श्री. सुनील पाटील, संचालक श्री. पांडुरंग जाधव, श्री. सचिन शिंपी, श्री. सुधीर जाधव, श्री. विलास पाटील, व प्राचार्य श्री. एम.एम. नागुर्डेकर उपस्थित होते

उत्तूरच्या उपसरपंच समीक्षा देसाई यांचा राजीनामा
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर गावच्या उपसरपंच सौ. समीक्षा देसाई यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आहे. ग्रामपंचायतीतील इतर सदस्यांनाही नेतृत्वाची संधी मिळावी या हेतूने आपण स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जानेवारी २०२३ पासून उपसरपंच पदाची जबाबदारी सांभाळत असताना ग्रामविकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच विविध विकासकामांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता व समन्वय राखण्यावर विशेष भर देण्यात आला.
राजीनामा देताना त्यांनी आपले नेते वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंतराव धुरे तसेच सुकाणू समिती यांनी दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यासोबतच ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी आभार मानले.
समीक्षा देसाई यांच्या राजीनाम्यामुळे उत्तूर ग्रामपंचायतीच्या राजकारणात नव्या उपसरपंच निवडीच्या हालचालींना वेग आला असून, उपसरपंच पदासाठीच्या पुढील निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंडित दीनदयाळ विद्यालयात आय.कें. ना शुभेच्छा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पंडित दीनदयाळ विद्यालयामध्ये हरहुन्नरी व्यक्तिमत्व, ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यप्रेमी आय .के. पाटील यांचा त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा व सत्कार समारंभ स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आजराचे अध्यक्ष प्रा. डॉ.सुधीर मुंज यांच्या हस्ते संपन्न झाला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजीव देसाई यांनी केले. संस्थेचे सचिव मलिक कुमार बुरुड यांनी विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असणारे,अभिनयाच्या क्षेत्रात मन लावून काम करणारे ,विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे ,निवृत्तीनंतरही सतरा वर्षे अखंड सेवा करत असणारे , कामाशी प्रामाणिक ,बहुआयामी असणारे आय. के .पाटील यांना निरोगी आयुष्यासाठी तसेच पुढील पण वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तके वाचा. शिक्षण घेत असताना आपले आई-वडील, शेजारी ,समाज यांचा विचार करा. चुकले तरी मी करत राहणार ,मी शिकणार हा आदर्श आपल्यासमोर विद्यार्थ्यांनी ठेवला पाहिजे. आपल्या शिक्षकांवर विश्वास ठेवा. मेहनत,मार्गदर्शन योग्य घेतो तोच पुढे जातो . कोणतीही गोष्ट मिळते म्हणून घेऊ नका, गरज असेल तर घ्या. पैशापेक्षा आपले अनुभव महत्त्वाचे आहेत .प्रत्येक गोष्ट आपल्याला प्रयत्नाने शिकता आली पाहिजे. कला असेल तर आपण कुठेही कमी पडत नाही. असे विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.सुधीर मुंज यांनी आय .के .पाटील यांच्याबरोबर घेतलेले अनुभव सांगितले. श या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक सुधीर कुंभार ,नाथ देसाई ,आनंदा कुंभार ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश प्रभू यांनी तर आभार भरत बुरुड यांनी मानले.


