देवराज माडभगत मारहाणीत गंभीर जखमी: दोघांविरोधात गुन्हा नोंद
आल्याचीवाडी(ता.आजरा) येथील सामाजिक कार्यकर्ते देवराज जानबा माडभगत (वय६० वर्षे) यांना पूर्व वैमनस्यातून महादेव जोतिबा परीट व यशवंत महादेव परीट (दोघे रा. आल्याचीवाडी ता. आजरा) या दोघांनी मारहाण केल्याप्रकरणी माडभगत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माडभगत हे गवसे एस.टी. बस स्टॉप वर ट्रॅक्समधून उतरलेवर परीट बाप-लेकांनी दोघांचे घरामध्ये रिकामे बोळाचे हद्दीवरून चालू असले वादाचा मनात राग धरून शिवीगाळ करत तुला संपवून टाकतो तुला सोडत नाही… असे म्हणून डोकीत लोखंडी सळीने मारहाण करून खाली पाडले व मोठा दगड उजव्या पायावर दगडाने मारून गंभीर जखमी केले.त्यात माडभगत यांचा पाय फ्रेंक्चर झाला आहे. माडभगत यांच्या फिर्यादीवरून परीट बापलेकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

इटे येथील वास्तू भाव धान्य दुकानाचा परवाना रद्द
इटे (तालुका आजरा) येथील रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना दुकानावर झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिला आहे. गेले काही दिवस या दुकानाबाबत तक्रारी सुरू आहेत. ग्राहकांनी केलेल्या तक्रारी मध्ये धान्य कार्डधारकांना मिळत नाही, धान्याची परस्पर विक्री केली जाते, पूर्वपरवानगी न घेता धान्य साठा ठीक- ठिकाणी केला जातो अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारीवरून सदर कारवाई करण्यात आली आहे.

चाफवडे येथील १५० घरांच्या प्रस्तावाला मंजुरी
चाफवडे येथील १५० घरांच्या खासबाब प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून मार्च अखेर पर्यंत त्याचा मोबदला वाटप केला जाईल असा निर्णय आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ भारत पाटणकर, कॉ संपत देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या या बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, गडहिंग्लज प्रांत बाबासाहेब वाघमोडे, पुनर्वसन तहसीलदार पिलारे, तहसीलदार विकास अहिर, उपाभियंता राठोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
खासबाब प्रस्तावाच्या घरांच्या किमतीबरोबरच राहिलेली संकलन दुरुस्तीची प्रकरणे आठवड्यात पूर्ण करणे, गायरान जमीन वाटप झालेल्या लोकांचा आकार निश्चित करणे, ज्यांचे करार झाले आहेत त्यांना तातडीने पॅकेज वाटप, जमीन मागणी केलेल्या लोकांना जमीन वाटप, भूखंडांचे वाटप यासह अनेक बाबींच्यावर या बैठकीत निर्णय होऊन त्याचा कालबध्द कार्यक्रम ठरविण्यात आला.
निर्वाहक क्षेत्र जास्त असल्यामुळे वगळण्यात आलेल्या आणि ज्यांची स्थळपाहणी केली आहे अशा आठ शेतकऱ्यांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असून तो लवकर मंजूर करण्याबाबत पाठपुरावा करून लवकर निर्णय दिला असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याबरोबरच ज्यांचे वैयक्तिक प्रश्न आहेत त्याबाबत प्रांताधिकारी स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या स्तरावर निर्णय करतील असेही ठरले. लाभक्षेत्रात जमीन वाटप केलेल्या शेतकऱ्यांना जमीन कसण्यासाठी रस्ता देण्याबाबत तहसीलदार आजरा यांना सूचना देण्यात आल्या.
बैठकीला दशरथ घुरे, विष्णू मांजरेकर, विजय पाटील, परसु तरडेकर यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
ऋषीकेश पाटील यांची निवड

समर्थ महाराष्ट्र शिक्षण मंडळ महागाव, संचलित मलिग्रे हायस्कूल मलिग्रे( ता. आजरा)येथील इयत्ता पाचवी तील विद्यार्थी ऋषीकेश सयाजी पाटील याची इयत्ता सहावी साठी सातारा सैनिक स्कूल साठी निवड झाली आहे .
मागील वर्षी ऑल झालेल्या ऑल इंडिया सैनिक स्कूल परीक्षेतून निवड झाली आहे.






