
सिरसंगी येथे नवविवाहितेची आत्महत्या

सिरसंगी (ता.आजरा) येथे मनिषा नयन पाटील (रा. खिंडी व्हरवडे, ता राधानगरी) या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. मनिषाचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.
१५ दिवसांपूर्वी मनिषा पाटील या माहेरी सिरसंगी येथे वडील विलास बाबुराव होडगे यांच्याकडे रहाण्यासाठी आल्या होत्या. रविवारी दुपारी मनिषा यांनी घरीच गळफास लावून घेतला. याची माहिती समजताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी नेसरी व तेथून पुढे गडहिंग्लज येथे दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या मृत्यूची नोंद गडहिंग्लज पोलिसात झाली आहे.
शेतकरी कुटुंबातील अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या मनिषा यांच्या निधनामुळे सिरसंगी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नामदार मुश्रीफ यांच्यावरील चराटी यांचे आरोप म्हणजे ‘ चोराच्या उलट्या बोंबा ‘… ना. मुश्रीफ समर्थक कारखाना संचालकांचा पत्रकार बैठकीत आरोप

गतवर्षी कारखाना सुरू करण्यासाठी ना. मुश्रीफ यांनी हमी दिल्यानंतर सोळा कोटी रुपये भरणे शक्य झाले. परंतु कारखाना अध्यक्षपदावर असताना ‘हमारे पास बहुत पैसा है’… असे म्हणणाऱ्या अशोकअण्णा चराटी यांना तीन कोटी रुपये परत मिळतील याची हमी नसल्याने व या पैशांचा वेळेत भरणा न झाल्याने कारखाना बंद पाडण्याचे पाप चराटी यांनी केले आहे. कारखान्याच्या चराटी यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत सुमारे 112 कोटी रुपये तोटा झाला आहे असे आर्थिक पत्रकातून स्पष्ट होते , कारखान्यावरील कर्जाचे खापर जर चराटी विरोधकांवर फोडत असतील तर कारखाना संचालक मंडळाच्या बुधवारी होणाऱ्या सभेमध्ये पत्रकार, संबंधित अधिकारी यांच्यासमोर याचा खुलासा करावा व आपले म्हणणे मांडावे. यावर खुली चर्चा करण्यास आपण केव्हाही तयार आहोत असे आव्हान कारखान्याचे ना. मुश्रीफ समर्थक संचालक वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर,श्रीमती अंजनाताई रेडेकर, एम.के. देसाई, सुधिर देसाई यांनी पत्रकार बैठकीद्वारे केले आहे.
चराटी यांच्या कारभाराबाबत साखर संचालकांसह ठीक – ठिकाणी वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या परंतु चराटी यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश करून भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांना हाताशी धरून सर्व तक्रारी बाजूला करण्यात यश मिळवले. तीन अपत्य असणारे संचालकही संचालक मंडळात राहिले परंतु याबाबत आम्ही कधीही हरकत घेतली नाही. ना. मुश्रीफ यांच्यावर टीका करणारे चराटी हे जिल्हा बँक व कारखाना संचालकपदी मुश्रीफ यांच्या आशीर्वादानेच गेले होते. याचा विसर त्यांना पडत आहे. जोपर्यंत आजरा सुतगिरणी अडचणीत होती तोपर्यंत जिल्हा बँकेकडून आवश्यक ती मदत मुश्रीफ यांच्यामार्फत चराटी यांनी घेतली व त्यांचे गोडवे गाईले. कालांतराने मुश्रीफ यांच्यावर तेच टीका करू लागले.
वास्तविक चराटी यांना ना. मुश्रीफ यांच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.चराटी यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीतील तोट्याचा आलेख चढता असतानाही कारखान्याचा चेअरमन कोण याचा विचार न करता मुश्रीफ यांनी मदतीचा हात पुढे केला. ज्या- ज्या वेळी कारखान्याने जिल्हा बँकेकडून कर्ज मिळवले त्या-त्या वेळी चराटी यांनी स्वतःच्या संस्थांचे पैसे प्रथम काढून घेतले. ना. मुश्रीफ यांच्या सहकार्यातून व त्यागातून आजरा साखर कारखाना सुरु आहे याचा सोयीस्कर विसर चराटी यांना पडू लागला आहे.
आजरा साखर कारखान्यातील अडचणींचा संदर्भ जिल्हा बँक व इतर निवडणुकांशी जोडू नये. जिल्हा बँकेमध्ये तुमच्या कर्तुत्वाने तुम्हाला अपयश आले आहे. ज्यांनी कारखाना चालवण्यासाठी मदत केली त्यांच्याबाबत बोलताना भान ठेवावे असा इशाराही या संचालकांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिला.




