
येणाऱ्या सर्व निवडणुकीत शिंपी-चराटी युतीचा वारू कोणी अडवू शकणार नाही : अशोक चराटी

जयवंतराव शिंपी व आपण एकत्र आल्याचे दुःख स्थानिक विरोधकांसह जिल्हास्तरीय नेत्यांना झाले आहे. जिल्हा बँकेमध्ये आपला पराभव झाला असला तरी शिंपी यांच्याकरिता जिल्हा परिषदेसाठी दिलेला शब्द पाळणार असून शिंपी यांचा जिल्हा परिषदेमध्ये एकतर्फी विजय होईल. याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या तालुक्यातील विविध सेवा संस्थांच्या निवडणुकीचा निकाल पहाता येथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये शिंपी व चराटी युतीचा वरचष्मा निश्चितच राहणार आहे. आजरा साखर कारखान्यामध्ये आपली बदनामी करणाऱ्या मंडळींच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपण देण्यास तयार आहोत ‘आरोप सिद्ध करा… राजकारण सोडेन’ असे खुले आव्हान अण्णा-भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांनी विरोधकांना करत आजरा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून भविष्यातील निवडणुकीला सामोरे जाऊन घवघवीत यश संपादन करू असा विश्वास व्यक्त केला.

आजरा येथे अण्णा-भाऊ संस्था समूह व जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा व नुकत्याच पार पडलेल्या सेवा संस्थांच्या निवडणुकीत विजयी उमेदवार यांचा सत्कार समारंभ असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जयवंतराव शिंपी होते.
स्वागतपर भाषणात बोलताना आजरा अर्बन बँकेचे संचालक व नगरसेवक विलास नाईक म्हणाले, शिंपी व चराटी यांच्या एकत्रीकरणाची चर्चा गेले वर्षभर चालू होती. आता या चर्चेला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. या पुढील सर्व निवडणुका एकत्र येऊन
एक दिलाने लढूया.
यावेळी अशोक चराटी पुढे म्हणाले, तालुक्यातील काही देसाई मंडळींनी वाण्याला चेअरमन का केला? असा प्रश्न उपस्थित करत कारखाना कारभारात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.आपण चेअरमन असताना पैसे नसतानाही कारखाना कामगारांना अकरा टक्के प्रमाणे बोनस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी दहा टक्के रक्कम पोहोचली. परंतु केवळ एक टक्का रक्कम मागे राहिल्याने कामगार संघटनातील काही मंडळींनी पश्चिम भागातील संचालकांच्या सांगण्यावरून आपणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आपल्या कारखाना चेअरमन कालावधीतील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देण्यास आपण तयार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये लांबलेला कार्यक्रम, दगाबाजी, कुपेकरांनी स्वार्थासाठी केलेली घाण याचा फटकाही आपणाला बसलाच पण या निवडणुकीत आपण आपल्या पाठीशी आहोत असे सांगत स्वार्थी त्रिमूर्तींनी आपणाला अडचणीत आणले अशी टीका विष्णुपंत केसरकर,अबुताहेर तकीलदार व संभाजी पाटील यांच्यावर केली.कारखाना चोरी प्रकरणातील सात जणांवर कारवाई व्हावी यासाठी आपण आग्रही असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षपदावरून बोलताना जि.प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले, येत्या सहा महिन्यांमध्ये तालुक्यात अनेक महत्त्वाच्या निवडणूका होऊ घातलेल्या आहेत.सहकारामध्ये जिथे संधी मिळेल तिथे चांगल्या पद्धतीचे काम करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे.आजरा साखर कारखान्याची परवानगी ,कारखाना उभारणीसाठी जागा निवड यासह कारखान्याच्या प्रत्येक घडामोडीमध्ये आपला सहभाग राहिला आहे. असे असताना काही मंडळींनी कारखाना उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. यापुढील प्रत्येक निवडणुका आपण एकोप्याने लढूया व आपली वेगळी ताकद निर्माण करूया असे आवाहन केले.
यावेळी नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा सौ. संजीवनी सावंत, जि. प.
सदस्या सौ. सुनिता रेडेकर, पंचायत समिती सदस्य बशीर खेडेकर, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, उद्योजक रमेश रेडेकर, दशरथ अमृते, डॉ. दीपक सातोसकर, आजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, नगरसेवक किरण कांबळे, अनिरुद्ध केसरकर, माजी पंचायत समिती सभापती मसणू सुतार, दिगंबर देसाई, प्रकाश वाटवे, रमेश कुरूणकर, राजू पोतनीस, शंकर उर्फ भैय्या टोपले,अनिकेत चराटी, शैला टोपले,सचिन इंजल,रामा शिंदे,हसन शेख,दिनेश कुरुणकर, सुनील शिंदे सिद्धेश नाईक, गोविंद गुरव, वैभव सावंत यांच्यासह विविध गावचे सरपंच व सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आभार डॉ. इंद्रजीत देसाई यांनी मानले.
बुद्धिभेद करणाऱ्या मंडळींना थारा देऊ नका… नगरसेवक अभिषेक शिंपी
जिल्हा बँकेमध्ये झालेल्या पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने काम सुरू केले आहे. जिल्ह्याच्या नेत्यांच्या हातात निवडणूक जाऊनही त्यांना विजयासाठी किती प्रयत्न करावे लागले हे नेत्यांना माहित आहे. जातीभेदाचे व द्वेषाचे राजकारण बाजूला ठेवून बहुजन समाजाला पुढे घेऊन जाणाऱ्या शिंपी -चराटी यांच्या पाठीशी राहावे असे आवाहन नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी केले.
शिंपी व चराटी युती तालुक्याला रूचली हे स्पष्ट : विजयकुमार पाटील
तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या विविध विकास सेवा संस्थांच्या निवडणुकीत अशोकअण्णा व शिंपी गटाच्या युतीला घवघवीत यश मिळाले असून अण्णा व शिंपी यांची युती तालुक्याला रुचली आहे हे या निवडणूकीच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे असे विजयकुमार पाटील यांनी सांगितले.
विष्णुपंत केसरकर यांच्यावर चौफेर टीका
वसंतराव देसाई व जयवंतराव शिंपी यांना त्रास देणाऱ्या विष्णुपंत केसरकर यांनी कारखाना चालू व बंद करण्यामध्ये केलेल्या घडामोडी सर्वश्रुत आहेत. कारखाना कारभारामध्ये त्यांची संगत आपणाला वेळोवेळी नडली आहे.त्यांच्या संगतीचा आपणाला पश्चाताप होत असल्याचेही चराटी यांनी स्पष्ट केले.

बहिरेवाडी येथे मारामारी…दोघे जखमी..तिघांविरोधात गुन्हा नोंद
बहिरेवाडी (ता.आजरा) येथील दत्तात्रय शंकरनाथ डवरी यांच्या घरासमोरील खडी भरुन नेताना जाब विचारल्याच्या कारणावरुन डवरी व जोंधळे या दोन कुटूंबात मारामारी झाली यात दोघे जखमी झाले असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डवरी हे मुमेवाडी (ता.आजरा) येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डवरी यांनी घर बांधकामासाठी खडी आणली होती.ही खडी रस्त्यामध्ये असल्याने रामचंद्र हरी जोंधळे हे खडी ट्रॅक्टर मध्ये भरुन जात होते. यावेळी डवरी यांनी याबद्दल जाब विचारला असता शाब्दिक बचाबाची झाली. तू अजून रस्त्यातील खडी का बाजूला केली नाहीस असे जोंधळे यांनी सांगत शिवीगाळ केली. शिवीगाळ करु नका, आम्ही उद्या खडी भरून घेतो असे सांगत असताना रामचंद्र जोंधळे याने हातातील खोरे डवरी यांच्या डाव्या गालावर मारुन जखमी केले. तसेच दिपक जोंधळे व पुंडलिक या दोघांनी डवरी यांना काठीने मारहाण केली,डवरी यांची मुलगी वैष्णवीलाही मारहाण केली. या प्रकरणी तिघांविरोधात उत्तूर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.

आजरा येथे आज चराटी- शिंपी गटाचा मेळावा…
नुकत्याच आजरा तालुक्यात पार पडलेल्या विविध गावातील विकास सेवा संस्थांमधील विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ व कार्यकर्त्यांचा मेळावा असा संयुक्त कार्यक्रम आज सकाळी दहा वाजता अण्णा भाऊ संस्था समूह व जि.प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या गटातर्फे अण्णाभाऊ सांस्कृतिक सभागृह, आजरा हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी कारवाईची मागणी
आजरा तालुक्यातील वझरेपैकी घागरवाडीमध्ये बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आह. या वृक्षतोडीस जबाबदार असणाऱ्या सर्व मंडळींवर कारवाई करावी अन्यथा शंखध्वनी आंदोलन करण्याबरोबरच वन मंत्र्यांकडे याबाबत दाद मागितली जाईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे लेखी निवेदन वन विभागाला देण्यात आले आहे. या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.





