

लग्नाचे वीस आणि वाजपाचे तीस… एसटी बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल

एसटी अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होऊ लागले आहेत. बाजार हाटीसाठी येणाऱ्या तालुका वासियांना प्रवासापोटी खाजगी वाहतुकीचा आधार घेऊन प्रचंड पैसे खर्च करावे लागत आहेत. दहा ते बारा रुपये तिकीट असणाऱ्या गावांमध्ये खाजगी वाहतूकचालक सरासरी ५०-१०० रुपये आकारणी करू लागले आहेत. त्यामुळे वडाप चालकांची चांदी होत असली तरी सर्वसामान्य नागरिकांना मात्र हा प्रवास खर्च आता झेपेनासा असा आहे. पेन्शन, दवाखाना,बँका व शासकीय कार्यालयातील कामांकरीता येणाऱ्या नागरिकांचे यामुळे प्रचंड हाल होऊ लागले आहेत. बाजारासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा प्रवासाचा खर्च अधिक होऊ लागला असल्याचेही आता प्रकर्षाने दिसू लागले आहे. यामुळे लग्नाचे वीस व वाजपाचे तिस अशी अवस्था निर्माण झाली आहे.

आजऱ्यात नाताळचा जल्लोष सुरू

आजरा शहरासह तालुक्यात नाताळला उत्साहात प्रारंभ झाला आहे. ठिक-ठिकाणच्या चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आजरा येथील रोझरी चर्च मध्ये मध्यरात्री फादर फेलिक्स लोबो, फादर रेमेड यांनी प्रार्थना केली. यावेळी नाताळाची गीते सादर करण्यात आली. प्रभू येशुच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमासाठी पेरणोली, साळगाव, खानापूर येथून ख्रिस्ती बांधव मोठ्या प्रमाणावर जमले होते. वाटंगी व गवसे येथे नाताळला उत्साहात प्रारंभ झाला.आजरा येथे ब्रदर पॉल, सिस्टर रूपा, सिस्टर ग्लोरिया, जेम्स फर्नांडिस, अल्बर्ट फर्नांडिस, ग्रेसी कुतिनो, फ्लोरिन लोबो, जेकब सोज, स्टीफन फर्नांडिस, स्टीफन डिसोजा, जेसिका कुतिनो, क्लारा सेज, निओनिता डिसोजा व इतर ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थनेमध्ये सहभाग घेतला. प्रार्थनेनंतर होन्जी गेम्सचे आयोजन विवियन मास्कारेन्स यांनी केले.

भाजपाच्या वतीने आजरा येथे अटलजींच्या प्रतिमेचे पूजन

भारतीय जनता पार्टी, मध्यवर्ती कार्यालय, आजरा येथे अटलजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तालुका अध्यक्ष सुधीर कुंभार यांनी अटलजींच्या कार्याचा आढावा घेतला. युवा मोर्चा सरचिटणीस उदयराज चव्हाण यांनी अटलजींच्या ओजस्वी कवितेचे वाचन केले, प्रा. सुधीर मुंज यांनी सर्व कार्यकर्त्यां समोर अटलजींचे विचार मांडले आणि कार्य प्रबोधन केले.
यावेळी ज्येष्ठ नेते व जनता बँकेचे संचालक बापू टोपले,माजी अध्यक्ष अरुण देसाई,आजरा साखर कारखाना संचालक मलिककुमार बुरुड, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आज-यात अनधिकृतपणे उभारलेले गाळे पाडा : सभापती पवार
आजरा पंचायत समिती सभा
…..आजरा : प्रतिनिधी
आजरा शहरात भुदरगड पतसंस्थेच्या इमारतीसमोर बांधलेल्या गाळ्यांचे प्रकरण सध्या चांगले गाजत आहे. हे गाळे कोणी बांधले हे स्पष्ट होत नाही. कोणत्याही प्राधिकरणाने याबाबत खुलासा केलेला नाही. हे गाळे वाहतुकीला अडथळा ठरणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात आठ दिवसात गाळे पाडावेत, अशी सूचना सभापती उदयराज पवार यांनी केली. वीज वितरण कंपनीने मंजूर अधिभार व मिटर रिडींग न्सार कृषी पंपाची बिल द्यावीत अशी मागणी सदस्य शिरीष देसाई यांनी केली. सभापती श्री. पवार अध्यक्षस्थानी होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. एन. सावंत यांनी बांधकाम विभागाचा आढावा घेत असतांना मध्येच हस्तक्षेप करत सभापती पवार यांनी शहरात गाजत असलेल्या गाळ्यांच्या प्रकरणाबाबत विचारणा केली. ते म्हणाले. हे गाळे कुणी बांधले याबाबत खुलासा झालेला नाही. कोणतेही प्राधिकरण याबाबत पुढे आलेले नाही या गाळ्यांच्यामुळे वहातूकीला अडथळा तयार झाला आहे. हे गाळे आठ दिवसात तातडीने हटवावेत. यासाठी पोलीसांचीही मदत घ्यावी. श्री. सावंत यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केल्यावर श्री. पवार म्हणाले, तांत्रिक उत्तरे देवू नका. मुळात येथील जागेचे हस्तांतरण नगरपंचायतीकडेही झालेले नाही. ही जागा जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक संकुलच्या संरक्षक भिंतीला लागून आहे. त्यामुळे गाळे हटवण्याबाबतचे पत्र आम्ही देतो. श्री. सावंत म्हणाले, सदरची जागचे हस्तांतरण बाबत संभ्रम आहे. त्यामुळे महसुलशी चर्चा करून तहसीलदारांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे सांगीतले. सदस्य देसाई म्हणाले, वीज बिलाबाबत घोळ अजूनही कायम आहे. बारमाही पाऊस असताना देखील शेतकऱ्यांना कृषी पंपाची बील वाढीव आली आहेत. पावसामुळे पाण्याचा वापर नसतांना वाढीव आलेली बिल ही शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे असे स्पष्ट केले . क्रीडा संकुलचा आराखड्याबाबत सभागृहाला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप सदस्य देसाई यांनी केला. क्रिडा संकूलचे हस्तांतरण झालेले आहे. हे वापरात यावे अशी मागणीही सभेत करण्यात आली. अंगणवाडी भरतीची यादी वेळेत दिली | नसल्याबाबत सभापती पवार यांनी नाराजी व्यक्त केली. भरतीत घोळ असावा म्हणून यादी लाबवली का? अशी विचारणा करून संबंधीतानी खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली. डॉ. निलकुमार बड़े यानी कृषी, पी. डी. ठेकळे यांनी पशुसंवर्धन, आजरा परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके यांनी वनविभागाचा अहवाल मांडला.
एसटीचे अधिकारी पृथ्वीराज चव्हाण यांनी संप व एसटीच्या फे-या याबाबत माहीती दिली. पाटबंधारे शिक्षण यासह विविध विषयांवर चर्चा झाली. सदस्या रचना होलम, वर्षा कांबळे यांनी केले.
मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व आमदारांचे अभिनंदन
सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता श्री सावत यांनी आजऱ्यात पन्नास खाटाचे उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळाली असून १७ कोटी रुपयामध्ये चार मजली इमारत होणार असल्याचे सांगीतले यावर मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
तो वाघ असण्याची शक्यता
किटवडे येथे बैलाला ठार करणारा प्राणी हा बाघ असू शकतो, पण त्याबाबत अजूनही संबंधीत हिंस्त्र प्राण्यांच्या खुणा मिळालेल्या नाहीत. याबाबतची खात्री वनविभागाकडून केली जात असल्याचे परिक्षेत्र बनाधिकारी स्मिता डाके यांनी सांगीतले.

साळगाव येथील ग्रामदैवत श्री. केदारलिंग मंदिराचा वास्तुशांती व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा आजपासून
साळगाव (ता.आजरा)गावचे ग्रामदैवत श्री. केदारलिंग मंदिराचा वास्तुशांती मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ आज दिनांक २५ डिसेंबर पासून सुरू होत असून दोन दिवस सदर कार्यक्रम चालू राहणार आहे. आज २५ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता देवदेवतांना आवाहन, पुण्या वाचन यासह मूर्ती व कळस मिरवणूक, दुपारी एक वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत महाप्रसाद, सायंकाळी पाच वाजता मूर्ती प्रतिष्ठापना व सायंकाळी सात ते नऊ पुन्हा महाप्रसाद होणार आहे रात्री ९ वाजता हरिभक्त परमपूज्य चैतन्य महाराज देहूकर यांचे कीर्तन होणार आहे रविवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी गंगापूजन, वारकरी दिंडी महिलांचा गारवा कार्यक्रम, सकाळी दहा वाजता कलशारोहण , ध्वजारोहण परमपूज्य भगवानगिरी महाराज यांच्या शुभहस्ते तर सकाळी साडेअकरा वाजता वास्तुशांत व होमहवन होणार आहे. दुपारी एक ते तीन व सायंकाळी सात ते नऊ या कालावधीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री ९.३० वाजता भूपाळी ते भैरवी लोककला अविष्कार यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे संयोजकांनी सांगितले.
निधन वार्ता…..

उत्तूर (ता आजरा ) येथील सचिन गोविंद गुरव(वय ४०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . उत्तूर मधील ज्येष्ठ व्यापारी गोविंद गुरव यांचे ते जेष्ठ सुपुत्र होते. त्यांचा मागे पत्नी ,दोन मुले, बहिणी,वडील असा परीवार आहे.


