


आमचं गणित चुकतय का त्यांचं बरोबर हाय…. डोक्याचा पार भुगा झालाय …

ज्योतिप्रसाद सावंत..
जिल्हा बँकेच्या निवडणूक निमित्त्याने गेले तीन महिने ठराव धारकांची आकडेमोड करताना आमच्या मेंदूचा पाक भुगा झाला असून आमच्या आण्णांसह भाऊंनीही ५८ मतावर आपला दावा केला आहे. एकूण ठरावधारक १०६ असताना दोघांना ५८ मतं मिळाली तर बेरीज १०६ कशी होईल याचं गणित आम्हाला सापडना झालय.
आता ठराव धारकांच्या बेरजेचे गणित करत असताना काही हातचे लिहायचे राहणारच तर कांही वाढणार. नेमके हातचे किती ? याचा हिशोब लागेना झाल्यान हे गणित चुकायला लागल आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील काही हातचे आण्णांनी धरले होते तर उत्तूर भागातील काही हातचे भाऊनी धरले होते. त्यामुळे दोघांच्या हातच्यांची बेरीज पाहिली असता दोघेही ५८ वर ठाम आहेत. आण्णांच्या पाठीशी ‘दादा’ तर भाऊंच्या पाठीशी ‘साहेब’आहेत. दादांशी फारकत घेऊन काहीजण भाऊंच्या पाठीशी गेलेत तर साहेबांचा डोळा चुकून काहीजण आण्णांच्या पाठीशी गेले आहेत. पण शेवटी हातचे ते हातचेच…
एखादा हातचा चुकला तर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते हे आता संपूर्ण तालुक्याने आजरा साखर कारखान्यापासून अनुभवलेलं आहे. नेत्यांनाही हे नवीन नाही. आता आम्हाला आमच्या गुरुजींनी शाळेत व्यवस्थित हातचा घ्यायला शिकवलं म्हणून आमची तग लागली,पण राजकारणातलं गणितच वेगळ. इथं हातच्यांना दांडगा भाव. एक हातचा उमेदवारांची गणितं पार इस्कटून घालतोय. अशा हातच्यांना सांभाळताना आण्णांसह भाऊंच्याही चांगलेच नाकी नऊ आले आहे. बरं हे हातचे जमेत घ्यावेत तर अशा हातच्यामुळे फक्त आर्थिक गणित पार कोलमडून जायला लागलय अस नाही तर कोणाला कारखान्याचा संचालक, तालुका संघाचा संचालक व्हायच आहे तर कोण पंचायत समितीचा सदस्य मलाच करा म्हणून बसलाय. तर काहीजणाना झेडपी सदस्य झाल्याची स्वप्न पडू लागलेत. काहीनी तर चक्क नोकऱ्यांचे आदेश पदरात पाडून घेतल्याची चर्चा आहे. एवढं करूनही त्यांना जमेत धरताना आण्णाच नव्हे तर भाऊनाही लाख वेळा विचार करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच दोन्ही बाजूंच्या मतांची बेरीज सध्यातरी ११६ वर जाऊन पोहोचली आहे.१०६ ऐवजी ११६ म्हणजे परत दहा मतांचा गोंधळ आहेच.
आता हा गोंधळ वाढायला हातचेच जबाबदार आहेत असे म्हटल्यास चुकीचे होणार नाही. राजकारणातल्या बेरजा- वजाबाक्या करताना आमच गणित मात्र विस्कटू लागलय. आमच्या गुरुजींनी शिकवलेल्या गणीताप्रमाणे बेरीज १०६ च व्हायला पाहिजे… नाही झाली तर डायरेक्ट फेल… म्हणजे नापास. आमची बेरीज अजून तरी बरोबर आहे. आता आण्णा आणि भाऊ यापैकी या जिल्हा बँकेच्या राजकीय गणितात कोण पास होणार ? हे नव्या वर्षाच्या सात तारखेलाच कळेल.तुर्तास आमच्या या आण्णा आणि भाऊना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यास काय हरकत आहे…?




