‘त्या’ अनधिकृत दुकान गाळ्यांबाबत सत्ताधारी नगरसेवकाचे उपोषण सुरू
सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिल्याने प्रश्न गंभीर

आजरा शहरांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत बांधण्यात आलेले नऊ गाळे नेमके कोणाचे? हा प्रश्न उपस्थित करत येथील मूळ व्यवसायिकांना येथून हटवल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक किशोर पारपोलकर यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आज सकाळी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पारपोलकर समर्थक कार्यकर्ते रवळनाथ मंदिर येथे मोठ्या संख्येने जमा झाले होते. यामध्ये भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, सतीश बामणे, सचिन बिरजे, गौरव देशपांडे, सिद्धेश नाईक, अतुल पाटील,भास्कर बुरुड,दादू नेवरेकर आदींचा समावेश होता. सर्वजण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आल्यानंतर पारपोलकर यांनी उपोषणाला सुरुवात केली. पारपोलकर यांच्या समर्थनार्थ शिवसेना तालुका प्रमुख युवराज पवार, आजरा साखर कारखान्याचे संचालक मलिककुमार बुरूड, रवी तळेवाडीकर डॉ.श्रद्धानंद ठाकूर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दर्शविला. यावेळी सदर आंदोलनाबाबतची माहिती तहसीलदार विकास अहीर यांनी घेतली. अतिक्रमणे काढण्याबाबत अभियंता कुंभार यांच्याकडून तोंडी हमी देण्यात आली. परंतु यावर आंदोलनकर्त्यांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता सावंत हे उपस्थित नसल्याबद्दल त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. या गाळयांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम खाते, नगरपंचायत यांच्यासह आंदोलकांची संयुक्त बैठक उद्या( मंगळवारी) घेण्याचे ठरले आहे. एकंदर परिस्थिती पाहता या अनधिकृत दुकान गाळयांचा प्रश्न चांगलाच तापला आहे. प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला
नगरपंचायतीच्या कांही कारभाऱ्यांनी अर्थपूर्ण व्यवहार करत हे गाळे बेकायदेशीररित्या उभे केले. याची नोंद ना नगरपंचायतीकडे ना जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे… त्यामुळे हे गाळे नेमके कशाच्या आधारे बांधले व ते देताना संबंधितांकडून पैसे कोणी घेतले ? असा प्रश्न आता शहरवासीय उपस्थित करू लागले आहेत त्यामुळे या प्रकरणात गुंतलेल्या मंडळींवर बाप दाखवा, नाहीतर श्राद्ध घाला अशी वेळ आली आहे…



लिंबांचा खच, सुया आणि हळदी-कुंकू…..
रामतीर्थ परिसरातील अघोरी प्रकार थांबवण्याची मागणी
गेल्या कांही दिवसापासून आजरा शहरानजीक असलेल्या रामतीर्थ या पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षण ठरलेल्या ठिकाणी काही मंडळी धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली अघोरी प्रकार करत असल्याचे स्पष्ट होत असून या परिसरामध्ये लिंबू, सूया, हळदीकुंकू ठिक-ठिकाणी पडलेला दिसतो. यामुळे पर्यटकांमध्ये व स्थानिक निसर्गप्रेमी मधून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये लोकसहभागातून रामतीर्थ परिसराचे स्वरूप बदलले आहे. अतिशय देखण्या स्वरूपात येथे सुशोभिकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र या सुशोभीकरणाचा गालबोट लावणारे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. कांही स्थानिक मंडळी विविध धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली येथे अक्षरशः धुमाकूळ घालताना दिसतात. यामध्ये प्राधान्याने शनीची पीडा काढणे, मयताचे विधी करणे असे प्रकार होताना दिसतात. भरमसाठ पैसे स्वीकारून काही वेळेला बोगस मंडळी तयार करुन हे विधी पार पाडले जातात. गेल्या कांही दिवसापासून येथे लिंबू टाचण्या, .ले दिसते. वास्तविक हा प्रकार सध्याच्या विज्ञान युगामध्ये निश्चितच लाजीरवाणा आहे. निसर्ग प्रेमिंकडून हे प्रकार थांबवले जावेत अशी मागणी पुढे येत आहे..

आजरा हायस्कूलचे शिवाजी येसणे
‘प्रिन्सिपल ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

आजरा हायस्कूल आजरा चे मुख्याध्यापक शिवाजी येसणे यांना दिल्ली येथील एज्युकेशन आयकॉन अवार्ड 2021 अंतर्गत प्रिन्सिपल ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .नुकताच आजरा हायस्कूल येथे पार पडलेल्या सत्कार समारंभात प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन जिल्हा परिषद कोल्हापूर चे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री एकनाथ आंबोकर यांच्यामार्फत गौरविण्यात आले .सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद कोल्हापूर चे उपशिक्षणाधिकारी टोणपे ,पंचायत समिती आजरा चे गटशिक्षणाधिकारी बी सी गुरव, विस्ताराधिकारी विलास पाटील ,जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे ,सचिव रमेश कुरुणकर, संचालक के. व्ही .येसणे ,सल्लागार ए आय के पाटील ,सौ भालेराव ,सौ सोलापुरे, आजरा महाल चे संचालक सुनील देसाई ,आजरा हायस्कूल मधील सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी व पालक उपस्थित होते. येसणे सर उत्कृष्ट वक्ते ,तज्ञ मार्गदर्शक, लेखक ,अनेक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असणारे शिक्षक आहेत .पेरणोली व गवसे येथील ११ विद्यार्थी एन एम एम एस शिष्यवृत्ती प्राप्त ठरले आहेत. एमटीएस परीक्षा, गणित स्पर्धा परीक्षा, विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षा, विज्ञान मंच प्रवेश परीक्षा इत्यादी परीक्षांमध्ये १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे .राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून सरांनी स्वच्छ सुंदर हिरवी शाळा हा उपक्रम राबवून शाळेला पुरस्कार मिळवून दिला आहे. हँगिंग गार्डन ,वृक्षाबंधन , दत्तक झाड योजना, निर्माल्य संकलनातून कंपोस्ट खत निर्मिती, रामतीर्थ परिसर स्वच्छता ,सांडपाण्याचा उपयोग झाडांसाठी करणे असे अनेक उपक्रम राबविले आहेत .एड्स प्रतिबंधात्मक योजनेअंतर्गत जिल्हा साधन व्यक्ती म्हणून आजरा तालुक्यातील अनेक शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. जनस्वास्थ्य दक्षता समिती अंतर्गत उपक्रम राबवून आजरा हायस्कूल व गवसे हायस्कूल या शाळांना आदर्श शाळा पुरस्कार मिळवून दिले आहेत .2020/21 या काळात कोरोना चा कहर असूनही उत्कृष्ट पद्धतीने शाळा चालवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्य चालू ठेवले. शाळेतील १००० विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षकानी भेटी दिल्या .कोरोना बाबत पालकांचे उद्बोधन केले व कोरोनावर मात करण्यासाठी विद्यार्थी व पालकांचे मनोधैर्य वाढविले. विद्यार्थ्यांची सर्वतोपरी काळजी घेऊन शाळा चालवली .तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शाळेला भेट देऊन शाळेने केलेल्या कार्याचे कौतुक केले होते.

स्व. वसंतराव देसाई यांना अभिवादन
आजरा साखरकारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व.वसंतराव देसाई ,माजी आमदार यांच्या १६ व्या स्मृती दिनी कारखाना कार्यस्थळावर पुतळ्याचे पूजन मा.चेअरमन श्री. सुनिल शिंत्रे साहेब यांचे हस्ते व संस्थापक संचालक व माजी चेअरमन मा.श्री. जयवंतराव शिंपी साहेब यांचे हस्ते श्रीफळ वाढवून अभिवादन करणेत आले.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन मा. आनंदराव कुलकर्णी, माजी चेअरमन व संचालक अशोक अण्णा चराटी, संचालक मा. दिगंबर देसाई, डॉ. इंद्रजित देसाई, नगर सेवक मा. किरण कांबळे तसेच मा.कार्यकारी संचालक डॉ. तानाजी भोसले, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




