mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्रराजकीयसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

बुधवार   दि. १० सप्टेंबर २०२५   

सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मलिग्रे या.आजरा येथील चाळू शंकर येमेटकर या ४५ वर्षी शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू झाला.

मंगळवारी दुपारच्या दरम्यान येमेटकर हे शेतामध्ये गेले असता शेतातच त्यांना सर्पदंश झाला. घरी आल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले उपचाराला दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, दोन भाऊ व  मुले असा परीवार आहे.

शहरासह परिसरात टायफाईडचे रुग्ण वाढले…
डेंग्यू सदृश्य रुग्णांचाही आढळ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरासह परिसरामध्ये टायफाईडच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून येथील ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यांमध्ये टायफाईडचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचार घेत आहेत. याचबरोबर डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्णही आढळत आहेत.

यावर्षी वाढलेला पावसाळा हंगाम, शहरामध्ये रस्त्यांच्या जागी तयार झालेला चिखल व डबक्यांचे साम्राज्य, ठीक ठिकाणी पाणीपुरवठा योजनेला लागलेल्या गळत्या या सर्वाचा परिणाम म्हणून शहरांमध्ये रोगराई पसरू लागली आहे दूषित पाण्यामुळे टायफाईडचे रुग्ण वाढले असल्याचे सांगितले जाते तर ठिकठिकाणच्या डबक्यांमुळे डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्णही आढळत असल्याचे डॉक्टर वर्गाकडून सांगितले जात आहे.

मंत्री मुश्रीफ यांचा उत्तूरमध्ये जनता दरबार : लोकांच्या प्रश्नांना तात्काळ प्रतिसाद


उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

उत्तूर येथे  मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जनता दरबार पार पडला. यावेळी परिसरातील शेकडो नागरिकांनी विविध समस्यांसह आपल्या तक्रारी, प्रश्न मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर मांडले.जनता दरबारात सर्वात महत्त्वाचा मुद्दा वैद्यकीय शिक्षणाशी निगडीत उचलण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांना प्रवेश प्रक्रियेत अडचणी येत आहेत, अशी तक्रार उपस्थित करण्यात आली. यावर मंत्री मुश्रीफ यांनी संबंधित विभागाशी बोलून विद्यार्थ्यांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

ग्रामीण भागातील नागरिकांनी एसटी बसच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली. गावोगावी प्रवाशांची वाढती गैरसोय लक्षात घेऊन त्वरित नियोजन करून अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच एम. एस. सी. बी. मध्ये लोकांना मागणीनुसार मीटरची सोय करून देण्यात यावी, अशी मागणीही झाली.ग्रामीण भागातील रुग्णांना सी. पी. आर. रुग्णालयात योग्य सोयीसुविधा मिळाव्यात, तसेच शस्त्रक्रिया लांबणीवर न टाकता लवकर करण्यात याव्यात, यासाठीही मंत्री मुश्रीफ यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
जनता दरबारात आलेल्या अनेक प्रलंबित कामांवरही त्यांनी अधिकाऱ्यांना थेट फोन करून तोडगा काढला. लोकांच्या कोणत्याही कामात विलंब होऊ नये. प्रत्येक नागरिकाला वेळेवर सुविधा मिळाली पाहिजे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे असे स्पष्ट केले.
या दरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी प्रत्येक नागरिकाशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी तत्परता दाखवली. नागरिकांच्या प्रश्नांना दिलेला तातडीचा प्रतिसाद आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या स्पष्ट सूचना यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

या जनता दरबारासाठी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, राष्ट्रवादीचे प्रतिनिधी वसंतराव धुरे, शिरीष देसाई, मारुती घोरपडे, दीपकराव देसाई, सुधीर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

रोपांना जीवदान देण्यासाठी वन विभाग कर्मचाऱ्याचे अखंड कुटुंब प्रयत्नशील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

२०२३ पावसाळ्यामध्ये वड, वडस्टंप,पिंपळ, जांभळ, खाया, आंबा, चिंच, कदंभ, चिकु, पेरू, हेळा, रामफळ, उंबर इत्यादी जातीची सुमारे १२५ जातीची झाडे रामतिर्थ आजरा या पर्यटन स्थळी लाऊन त्यांना श्री. टी. एस. लटके वनरक्षक व त्यांच्या कुटुंबीयांनी झाडांचे सभोवार गवत काढून साफसफाई केली आहे.

वनसेवक श्री. पुंडलिक शिंदे आणि मधुकर दोरूगडे यांच्या मदतीने त्यांच्यासह कुटुंबीयांनी झाडांना उन्हाळ्याचे दिवसात खत व पाणी दिले. त्याच झाडांची उंची ४ फुट ते १२ फुटापर्यंत वाढ झालेली आहे. त्या झाडांच्या संरक्षणासाठी सभोवार कुंपण केले आहे.तसेच सर्प मित्राचे काम करत असुन सुमारे २०० ते २५० सर्प वेगवेगळ्या जातीचे पकडून त्यांना आधिवासात सोडले तसेच वन्यप्राणी जखमींना औषध उपचार करून अधिवासात सोडले आहेत.

मृत सभासदाच्या वारसास जिल्हा बँकेकडून मदत


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

लाकूडवाडी ता. आजरा येथील राजहंस सहकारी विकास सेवा सोसायटी विकास संस्थेचे कर्जदार सभासद तुकाराम आप्पा धुमाळे यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने जनता अपघात विमा योजनेअंतर्गत जिल्हा बँकेचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते रुपये दोन लाखांचा निधी धनादेश स्वरूपात समारंभ पूर्वक वारसांना प्रदान केला.

छाया वृत्त

वेळवट्टी ता. आजरा येथे विद्युत तारांना चिकटून वानराचा मृत्यू झाला. वन विभागाने सदर वानराचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यापुढील सोपस्कार पार पाडले.

आज आजऱ्यात…

ह.भ.प.लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज सप्ताहा निमित्त दुपारी बारा वाजता बोरकर महाराज यांच्या समाधी स्थळापासून दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

विजय गवंडळकर यांचे निधन

mrityunjay mahanews

खेडे येथे एकाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!