mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाठळक बातम्यादेशभारतमहाराष्ट्रराजकीयरोजगारसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

मंगळवार   दि. ९ सप्टेंबर २०२५   

हाजगोळीबंधाऱ्याच्या सळ्या आल्या बाहेर…
बंधाऱ्याचा धोका वाढला…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

एकीकडे दाभिल बंधाऱ्याची दुरावस्था सुरूच असताना हाजगोळी बंधाऱ्याच्या स्लॅबच्या सळ्या उघड्या झाल्याने हा बंधारा वाहतुकीकरीता पूर्णपणे धोक्याचा बनला आहे यावरून वाहतूक सुरूच राहिल्यास एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वाहन चालकांकडून वर्तवली जात आहे.

यावर्षी पावसामुळे दाभिल बंधाऱ्याचा पिलर कमकुवत झाला आहे. तर काही ठिकाणी तो ढासळलाही आहे.भरीस भर म्हणून आता हाजगोळी बंधाऱ्यावर टाकलेल्या सळ्याही उघड्या झाल्या आहेत. याचाच अर्थ हे बंधारे आता वाहतुकीकरता अडचणीचे बनले आहे.

पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

आजरा- चंदगड/भावेवाडी (उचंगी-जेऊर मार्गे) दिवसभरातील सर्व वेळेच्या बस नियमित सुरु करण्याची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा-चंदगड/भावेवाडी मार्गावरील बस सेवा सुरळीत चालू नसलेने ग्रामस्थांना नाहक त्रास होत आहे व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व वृद्ध वर्ग व आजारी व्यक्तीना चालत यावे लागत आहे. सदर तक्रारी बाबत वारंवार पत्र व तोंडी सूचना देऊनही त्याची आपल्या भागाकडून गांभीर्याने दखल घेतली जात नाही असे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. या बस फेऱ्या तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तरी आजरा येथून चंदगड व भावेवाडीला जाणाऱ्या सर्व बस नियमित सुरु ठेवाव्यात च सदर पत्राचा गांभीर्याने विचार करून वरील वेळापत्रकाप्रमाणे बस सेवा नियमित सुरू
कराव्यात अन्यथा शुक्रवार दि.१२ रोजी या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी संजय सांबरेकर, मारुती गुरव, अजित राणे, धोंडीबा सांबरेकर, धोंडीबा मळेकर, श्रावण भुतुर्ले, तुकाराम पोवार, दत्तू सुतार, यमाजी कस्तुरे, बाळू पोवार,वैभव सुपर, सुरेश राणे उपस्थित होते.

डॉक्टर सौम्या विनयन गुरुवारी आजरा तालुक्याच्या अभ्यास दौऱ्यावर


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जी.आय.मानांकन मिळाल्यानंतर आजरा घनसाळची लागवड कोल्हापूर जिल्ह्यात किती केली जाते या जातीच्या लागवडी संदर्भात नोंदणी पूर्व आणि नंतर झालेल्या बदलांचा आणि जीएल टॅगचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि उपजीविकर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर सौम्या विनयन या गुरुवारी आजरा तालुका दौऱ्यावर येत आहेत.

दाभिल मध्ये आजरा घनसाळ शेतीला भेट. शेतकऱ्यांशी संवाद आजरा ॲग्रो प्रोडूसर कंपनीला भेट, आजरा घनसाळ क्लस्टरला भेट असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.

आजरा घनसाळला सन २०१५ ला जीआय मानांकन मिळाले. सदरच्या जीआय मानांकंडाचा शेतकऱ्यांच्या आर्थिक सामाजिक उन्नती करण्यासाठी काय फायदा झाला याची अभ्यास पूर्ण माहिती घेतली जाणार आहे.

घरगुती गॅस सिलेंडर बाबत दक्षता घेण्याचे आजरा तहसीलदार समीर माने यांचे आवाहन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोल्हापूर शहर व महागाव येथे घरगुती गॅस सिलेंडर मधून गळती होऊन स्फोट झाला. या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील घरगुती गॅस सिलेंडर धारकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांनी केले आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आजरा तहसील कार्यालय यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कोल्हापूर शहरात व महागाव, (ता. गडहिंग्लज ) येथे शनिवारी दि. ०६ सप्टेंबर २०२५ रोजी घरगुती गॅस सिलिंडरमधून गळती होवून स्फोट झाला. कोल्हापूर येथे झालेल्या गॅस गळतीने जीवितहानी झाली असून महागाव येथे गॅस गळतीने झालेल्या स्फोटातून भलेही जीवीतहानी टळली असली तरी घराचे व प्रापंचिक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. असे प्रकार आजरा तालुक्यामध्ये घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून तहसिल कार्यालय (पुरवठा) आजरा येथील पुरवठा निरिक्षक संदिप चव्हाण यांनी सोमवारी दि. ८ सप्टेंबर रोजी रवळनाथ इंडेन या गॅस एजन्सीची मुंगुसवाडी, खेडे येथे असलेल्या सिलेंडर साठा गोदामास भेट देवून तपासणी केली. तपासणी वेळेस गॅस वितरणचे विक्रेते मानसिंग देसाई उपस्थित होते. तपासणी वेळेस गोदामातील सिलेंडर तपासले गेले. तसेच गळती लागलेले सिलेंडर कंपनीकडून प्राप्त झाल्यास तात्काळ परत करण्याचे व ग्राहकास गळती असलेले सिलेंडर देवू नये तसेच गॅस सिलेंडर वितरीत करताना गॅस गळतीबाबत घ्यावयाची खबरदारीबाबत गॅसधारकास माहिती करुन देण्याच्या सुचना गॅस वितरकास देणेत आल्या.

तहसीलदार समीर माने व तालुका प्रशासन यांच्यावतीने आजरा तालुक्यातील सर्व गॅस ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, सिलेंडर मधून गॅस गळती होत असल्याचे आढळल्यास तात्काळ गॅस एजन्सीस संपर्क करावा. अधिकृत गॅस एजन्सीकडून गॅस रेग्युलेटर व गॅस पाईप जोडून घ्यावे व तसेच वेळोवेळी शेगडी, रेग्युलेटर, गॅस पाईप याची गॅस एजन्सीकडून तपासणी करुन घेणेत यावी. गॅसचा वापर करताना कंपनीने दिल्या गेलेल्या सुचनेनसार हाताळणी करण्यात यावी जेणेकरुन तालुक्यात कोणतीही गॅस दुर्घटना घडू नये.

तपासणीचे वेळी रवळनाथ गॅस एजन्सीचे मानसिंग देसाई यांनी भविष्यात गॅस बाबतीत कोणतीही समस्या उद्भवू नये करीता कंपनीने उत्पादित केलेले फायबर मध्ये निर्माण केलेले १० किलो गॅस असलेले सिलेंडर वापरण्याचे सुचित केले. जे हाताळणीस सुलभ असेल. गॅस गळती व स्फोट हा प्रकार होण्याचा प्रकार फारच कमी राहील.

आजरा येथील श्री गणेशा आरोग्य शिबीर उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथे दि. २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर कालावधीमध्ये समुदाय आरोग्य शिबीरे अंतर्गत श्री गणेशा आरोग्य अभियान उत्साहात पार पडले. ४ प्राथमिक आरोग्य केंद्र व २७ उपकेंद्रांमध्ये शिबीर राबविण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबीर, गोल्डन कार्ड, आभा कार्ड, वंदना गोल्डन कार्ड प्लास्टीक मुक्तीबाबत जनजागृती, नेत्र तपासणी, इ.सी.जी, रक्तदाब, मधुमेड या तपासण्या सार्वजनिक गणेश मंडळ असणाऱ्या ठिकाणी करण्यात आल्या.

यामध्ये रूग्ण तपासणी ५००९, इ.सी.जी ७२, गोल्डन कार्ड ६०३, आभा कार्ड ६६४, वंदना कार्ड ५७, अवयवदानाचे फॉर्म ५२२ कर्करोग तपासणी २९४, रक्तदाब तपासणी २२५२, नेत्र तपासणी ३५७ नागरीकांची करण्यात आली तर रक्तदान २८५ जणांनी केले. या श्री गणेशा आरोग्याच्या अभियानासाठी तालुक्यातील सर्व वेद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी या मोहिमेअंतर्गत लाभार्थी यांची तपासणी केली. तसेच तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी सहकार्य केले. पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. जी. गुरव यांनी आभार व्यक्त करत भविष्यात येणाऱ्या आरोग्य उपक्रमांना सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. गुरव यांनी केले.

श्री पार्वती-शंकर विद्यालयात तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

उत्तूर, मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

श्री पार्वती-शंकर शैक्षणिक संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय शासकीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडल्या. आजरा तालुक्यातील १७ शाळांचे ४१ स्पर्धक सात फेऱ्यांत भिडले.

१४ वर्षाखालील मुलांमध्ये चिन्मय पाटील (पार्वती-शंकर) अव्वल, तर मुलींमध्ये हुमेरा जमादार (नवकृष्णा व्हॅली) पहिली ठरली. १७ वर्षाखालील मुलांमध्ये वीरेन बुजरे (नवकृष्णा व्हॅली) आणि मुलींमध्ये शर्वरी पाटील (उत्तूर विद्यालय) यांनी पहिला क्रमांक मिळवला. विजेत्यांना नृसिंहवाडी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.पंच म्हणून सौ. मनोरमा चव्हाण, श्री. शंकर सावंत व श्री. विजयकुमार नाईक यांनी काम पाहिले.
संस्थेचे अध्यक्ष बसवराजआण्णा करंबळी यांनी म्हणाले, बुद्धिबळ हा केवळ खेळ नाही तर जीवनातील निर्णय घेण्याची कला शिकवतो.”

यावेळी सहभागी स्पर्धकांसह विद्यार्थी उपस्थित होते.

आजचा वाढदिवस…

आज तालुक्यामध्ये…. 

♦ मा.नामदार हसनसो मुश्रीफ ,वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचा उत्तूर दौरा सकाळी- ०९:३० वाजता…
स्थळ : मा.मुश्रीफ फौंडेशन कार्यालय मेन रोड, उत्तूर

♦ ह.भ.प.लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज सप्ताहा निमित्त शिवाजीनगर येथील विठ्ठल मंदिरामध्ये जागराचे औचित्य साधून सायंकाळी ६.०० वाजता ‘भक्तिरंग’ हा भक्ती संगीताचा कार्यक्रम तर रात्री नऊ वाजता ह.भ.प. आनंदराव घोरपडे महाराज यांचे कीर्तन.

 

संबंधित पोस्ट

आज-यात ३३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पुन्हा एकदा गृहराज्यमंत्री सतेज पाटील व माजी आमदार अमल महाडिक आमने सामने

mrityunjay mahanews

भाकरी फिरणार…

mrityunjay mahanews

हाजगोळी बंधाऱ्यात महिलेचा मृतदेह आढळला…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!