सोमवार दि. ८ सप्टेंबर २०२५


दोन हत्ती दोन दिशेला…
बळीराजा मात्र सापडलाय वेठीला…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पश्चिम भागात किटवड्यात तर पूर्व भागात उचंगी येथे दोन हत्तींनी धुमाकूळ घातला असून हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. वनविभागाच्या मर्यादा हत्तीच्या या उपद्रवामुळे अधोरेखित होत आहेत.
तालुक्यातील शेतकरी वर्गाची पाठ सोडण्यास हत्ती तयार नाही अशीच सध्या अवस्था निर्माण झाली आहे. तब्बल महिनाभर किटवडे येथील रामचंद्र सावंत यांच्या शेती पिकाचे नुकसान सुरू आहे एकाच शेतकऱ्याला लक्ष्य केल्याप्रमाणे हत्तीचे रोज सावंत यांच्या शेतातील येणे- जाणे सावंत कुटुंबीयांना उध्वस्त करू लागले आहे. या कुटुंबाच्या रोजी रोटीचा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे.
किटवडे येथे सावंत यांचे नुकसान एका हत्ती कडून सुरू असताना दुसरीकडे उचंगी परिसरामध्ये हत्तीचा धिंगाणा सुरू आहे. येथे घराजवळ उभा केलेली चार चाकीची अवस्था हत्तीने दयनीय करून टाकली आहे. तर गेले चार दिवस भीमगोंडा मलगोंडा पाटील,अनिल निंबाळकर, अशोक कळेकर, धनाजी शिंदे, विलास कळेकर आदींच्या शेतातील नारळ झाडांसह ऊस, नाचना,भात या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. वन विभागाने खास पथक पाचारण करून हत्ती हटाव मोहीम राबवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु या जुजबी उपायाने फारसे काही साध्य होत नाही असेही यापूर्वीच्या अनुभवातून स्पष्ट होत आहे.
हाता तोंडाशी आलेली पिके वाया जात असल्याने शेतकरी आता मात्र हातबल झाला आहे. वनविभागाने या हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा एक वेळ जोर धरू लागली आहे.

पार्वती सावेकर यांचे निधन

उत्तुर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथील प्रतिष्ठित व्यापारी विजय बापू सावेकर यांच्या मातोश्री श्रीमती पार्वती सावेकर (वय ९६ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्यामागे पाच मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

केंद्र शाळा विद्या मंदिर सिरसंगी येथे शिक्षक दिन उत्साहात

सिरसंगी : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
केंद्र शाळा विद्या मंदिर, सिरसंगी येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक शिवाजी बोलके सर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून केली.
या विशेष दिवशी इयत्ता सातवीचे विद्यार्थी शिक्षक बनून दिवसभर अध्यापन कार्य पार पाडले. त्यानंतर “शिक्षक दिन”, “माझी शाळा”, “माझे शिक्षक” व “माझा गाव” या विषयांवर विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे सादर केली.
श्री.अर्जुन पाटील यांनी डॉ.राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याबद्दल व श्री.संतराम केसरकर सरांनी डॉ.जे.पी.नाईक यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. तसेच ग्रामपंचायत सिरसंगी, शाळा व्यवस्थापन समिती व माननीय शंकर बुडके (माजी मुख्याध्यापक, गोवा राज्य) यांच्या सहयोगाने शाळेमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व प्रमाणपत्रांचे वाटप करून गौरविण्यात आले.
यावेळी श्री. संजीव नाईक संजय केसरकर , शिवाजी बोलके , संदीप कुंभार आदी शिक्षकवर्ग, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते

सुभाष चौक गणेश मंडळात अन्याय निवारण समितीचा सन्मान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुभाष चौक गणेश मंडळ, आजरा यांच्या वतीने गणपती विसर्जनपूर्व आरती व प्रसादाकरिता अन्याय निवारण समिती सदस्यांना निमंत्रित करण्यात आले. या प्रसंगी समिती सदस्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले तसेच समितीला आरतीचा मानही प्रदान करण्यात आला.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून परशुराम बामणे यांच्या अध्यक्षतेखाली अन्याय निवारण समिती नगरपंचायत क्षेत्रातील दुर्लक्षित प्रश्न, नागरिकांच्या अडचणी व जनहिताच्या मागण्यांबाबत सातत्याने आवाज उठवत असून, लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नशील आहे. या कामाची दखल घेऊन सुभाष चौक गणेश मंडळाने समितीचा गौरव केला ही समितीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
समितीच्या वतीने सुभाष चौक गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले असून, समितीच्या कार्याचा सन्मान केल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही करण्यात आले.

ज्ञानदीप प्रबोधिनीमार्फत ग्रामीण मुलींसाठी वसतिगृह सुरु करणार :श्री. एम. एल. चौगुले
९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गडहिंग्लज आजरा व चंदगड तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपले करिअर घडवावे यासाठी गडहिंग्लज व आजरा येथे झेप ॲकॅडमी सुरु केली आहे. याचा विद्यार्थी लाभ घेत आहेत. परंतू ग्रामीण भागातील मुलींना शहरातील उपलब्ध अनेक शैक्षणिक सुविधांचा लाभ घेता येत नाही याचे कारण राहण्यापासून ते जेवणापर्यंत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी ग्रामीण भागातील मुलींना ज्ञानदीप प्रबोधिनीमार्फत सर्व सोयींनीयुक्त मुलींचे वसतिगृह सुरु करणार आहोत, असा संकल्प ज्ञानदीपचे संस्थापक अध्यक्ष श्री. एम एल. चौगुले यांनी व्यक्त केला.
श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीच्या गडहिंग्लज येथील प्रधान कार्यालयाच्या सभागृहात ज्ञानदीप प्रबोधिनी गडहिंग्लज या संस्थेच्या ९ व्या वार्षिक सर्व साधारण सभेत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. उपाध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबरोबरच संस्थेच्या नियोजित उपक्रमांसाठी विद्यार्थीनी वसतिगृहासह जागा / इमारत खरेदी करण्याच्या ठरावास सभासदांनी एकमताने मान्यता दिली.
खजिनदार श्री. महेश मजती यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. सचिव श्री. संदीप कागवाडे यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचला. संचालक श्री. नंदकुमार शेळके यांनी जमा खर्च व ताळेबंद पत्रकाचे तर प्राचार्य डॉ. आर.एस. निळपणकर यांनी अंदाज पत्रकाचे वाचन केले. संचालिका सौ. मीना रिंगणे यांनी, स्वागत व प्रास्ताविक केले. झेप अकॅडमीच्या, अधीक्षक गौरी बेळगुद्री यांनी सूत्रसंचलन केले. संचालक प्रा. डॉ. आप्पासाहेब आरबोळे यांनी आभार मानले.
यावेळी सहसचिव प्रा. व्ही. के. मायदेव, संचालक श्री. पांडुरंग शिंगटे, श्री. संदीप पाटील, डॉ. समिधा चौगुले, सौ. निता पाटील व श्री. बाबासाहेब आजरी यांच्यासह श्री. बसाप्पा आरबोळे, श्री. निजगुणी स्वामी, श्री. संभाजी साठे, प्राचार्य डॉ. दत्तात्रय पाटील, श्री. डी. के. मायदेव, श्री. मनोहर गुरबे, श्री. मारुती दळवी, श्रीमती उमा तोरगल्ली, प्रा. डॉ. संजिवनी पाटील, प्रा.डॉ. दीपा कुलकर्णी, सौ. अर्चना सुळकुडे आदीसह सभासद, देणगीदार, हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते.

उत्तूरमध्ये ‘कलाकार आपल्या भेटीला’ उपक्रम

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा.
उत्तूर येथील वसंतरावदादा पाटील विद्यालयात डॉ. पोवार चॅरिटेबल ट्रस्ट अँड फाउंडेशन व विद्यार्थी विकास परिषद, कोल्हापूर (महाराष्ट्र राज्य विभागीय कार्यालय, उत्तूर) यांच्या वतीने ‘कलाकार आपल्या भेटीला’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत नामवंत कलाकारांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. कांबळे होते. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कलाकारांशी संवाद साधत कलाक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन मिळवले. अभिनेता व कास्टिंग डायरेक्टर अमोल दोरुगडे यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील बालकलाकारांना भविष्यातील मालिका व चित्रपटांत नक्कीच संधी दिली जाईल”.
झी टीव्ही ‘होम मिनिस्टर’ फेम एन. के. बाबा यांनी स्वतः लिहिलेले गाणे सादर करत विद्यार्थ्यांना ध्येय, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, असे सांगितले. “ग्रामीण भागातच मोठे कलाकार दडलेले असतात” असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच किरण आमणगी यांच्या हस्ते झाले. युवा उद्योजक अश्विन भुजंग, ग्रामपंचायत सदस्य संदेश रायकर, सामाजिक कार्यकर्त्या अरुणा दोरुगडे व लोककला महोत्सव समिती कार्याध्यक्ष गणपती नागरपोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक डॉ. सचिन पोवार यांनी केले. आर. व्ही. थोरवत, डी. व्ही. मोहिते, विठ्ठल कदम, आनंदा हसबे, उत्तम तोरगले, नितीन ससाणे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन एच. एस. हळवणकर यांनी केले तर आभार ए. व्ही. गुरव यांनी मानले.


आज आजऱ्यात
ह.भ.लक्ष्मण बुवा मोरजकर महाराज सप्ताह निमित्त श्री विठ्ठल मंदिर (शिवाजीनगर) आजरा येथे दुपारी २ नंतर चैतन्य सांप्रदाय, खेडे यांचे भजन व ६.३० वाजता हरिपाठ. रात्री ११.०० वाजता मसोली भजनी मंडळ व सन्मित्र भजनी मंडळ आजरा यांचे भजन…


