मसोलीजवळ अपघात १० जखमी : तीन गंभीर
आजरा-आंबोली मार्गावर मसोली- वेळवट्टीच्या दरम्यान असणाऱ्या वळणावर भरधाव लक्झरी बसच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी चारचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात तब्बल दहा जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदर अपघात झाला. जखमीमध्ये दोन वर्षाच्या लहान मुलीसह ४ महिलांचा समावेश आहे. हे सर्व जण आजरा तालुक्यातील देवर्डे येथील आहेत.
देवर्डे(ता.आजरा)येथील तानवडे कुटुंबीय कोरीवडे (ता. आजरा) येथे लग्न ठरवण्यासाठी गेले होते. सदर कार्यक्रम आटोपून परत देवर्डे येथे तवेरा गाडीने परतत असताना गोव्याहून पुण्याकडे निघालेल्या लक्झरीने गाडीला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की गाडी सुमारे ५० फुटावर जाऊन रस्त्याशेजारील शेतामध्ये कोसळली. चारचाकीत असणारे आकाश प्रकाश तानवडे (वय ३०), बाबासाहेब गणपती तानवडे (वय ६५) शंकुतला बाबासाहेब तानवडे(वय६०), लक्ष्मी दौलती तानवडे- (वय ६०), लता अंबाजी मळेकर (वय ५५), गीता एकनाथ पाटील( वय ६०), राजेंद्र दौलती तानवडे- (वय ३८), गीता सोमनाथ मळेकर(वय ५५) ,भीमराव महादेव मळेकर- (वय ७५),व महेश्वरी तानवडे (वय२) हे जखमी झाले आहेत. अपघातात चालक आकाश तानवडे हे गंभीर जखमी आहेत.
लक्झरी गाडीतील प्रवासी एका खाजगी कंपनीतील कर्मचारी असून सहकुटुंब ते फिरायला गेले होते. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे जखमींवर आजरा ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

आजरा सूत गिरणीच्या अध्यक्षपदी अन्नपूर्णा चराटी यांची निवड : उपाध्यक्षपदी डॉ. देशपांडे
आण्णा भाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या अध्यक्षपदी अन्नपूर्णा चराटी यांची व उपाध्यक्षपदी डॉ.अनिल देशपांडे यांची एकमताने निवड करणेत आली. निवडीच्या पार्श्वभूमीवर विशेष सभा सूत गिरणी कार्यस्थळावर विभागीय उपनिबंधक श्री. अरूण काकडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
अध्यक्ष पदासाठी अन्नपूर्णा चराटी यांचे नांव शंकर टोपले यांनी सुचविले व त्यास अनुमोदन कृष्णात गिरीगोसावी यांनी दिले. उपाध्यक्ष पदासाठी डॉ. अनिल देशपांडे यांचे नांव जयसिंग देसाई यांनी सुचविले व त्यास अनुमोदन सौरभ नाईक यांनी दिले.या निवडीप्रसंगी अशोकअण्णा चराटी, शंकर टोपले, डॉ. अनिल देशपांडे, चंद्रशेखर फडणीस यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सूत गिरणीचे संचालक अविनाश सोनटक्के, नारायण मुरकुटे, राजु पोतनीस, सुधीर कुंभार, डॉ. संदीप देशपांडे, शशिकांत सावंत, मालुताई शेवाळे, मनिषा कुरूणकर यांचेसह जनरल मॅनेजर अमोघ वाघ, चीफ अकौंटंट विष्णू पोवार, स्टोअर परचेस ऑफीसर राजेंद्र धुमाळ, चीफ इंजिनिअर आर.ए.पाटील प्रॉड. मॅनेजर श्रीकांत कुलकर्णी उपस्थित होते. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर सचिन सटाले यांनी आभार मानले.
आजरा महाविद्यालयात जागतिक मानवी हक्क दिन उत्साहात
आजरा महाविद्यालय येथे एन.सी.सी. विभाग व विद्यार्थी कल्याण कक्ष यांच्यामार्फत जागतिक मानवी हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ए. एन.सादळे होते. यावेळी डॉ. अविनाश वर्धन यांच ‘मानवी हक्क व समकालीन संदर्भ’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर व्याख्यानात संयुक्त राष्ट्रसंघाने १९४८ साली प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात नुसार मानवी हक्काचे संरक्षण, जतन व संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी असून भारतीय संविधानामध्ये मानवी हक्कांची तरतूद केली आहे व या हक्कांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी न्यायालयाकडे सोपविण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाषा, प्रदेश, लिंग, जात या आधारे वर्चस्व सत्ता प्रस्थापित करून दुसऱ्यांचे अधिकार नाकारण्याच्या घटना वाढत असून ही लोकशाही व्यवस्थेमध्ये चिंतेची बाब असल्याचेही सांगितले. उपस्थितांचे स्वागत डॉ. संजय चव्हाण यांनी केले तर आभार प्रा. मलिकार्जुन शिंत्रे यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी प्रा. बाळासाहेब कांबळे, डॉ. आनंद बल्लाळ, डॉ. रणजीत पवार यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.






