शुक्रवार दि. १९ डिसेंबर २०२५


धडधड वाढली… काउंटडाऊन सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायती करता मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर तब्बल वीस दिवसानंतर होणारी मतमोजणी अवघ्या ४८ तासावर येऊन ठेपली असल्याने रिंगणातील उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची धडधड वाढली आहे.
ताराराणी आघाडी, राष्ट्रीय काँग्रेसची शहर परिवर्तन विकास आघाडी व अन्याय निवारण समिती पुरस्कृत आघाडी अशा तीन आघाड्यांमध्ये चुरशीने लढत झाली आहे. काही प्रभागात एकतर्फी निकाल लागण्याची संकेत आहे तर काही प्रभागात हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच विजयी उमेदवार व पराभूत उमेदवारांमधील मतांचा फरक राहणार आहे.
ऐन मतदानादिवशी मतमोजणी प्रक्रिया पुढे गेल्याचे स्पष्ट झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये थोडी नाराजी निर्माण झाली होती. दरम्यानच्या काळात प्रचाराचा शिण घालवण्यासाठी काही उमेदवारांनी प्रमुख कार्यकर्त्यांना गोव्यासह ठिकाणच्या सहली करून आणल्या आहेत. आता रविवारी २१ तारखेला मतमोजणी प्रक्रिया असल्याने मध्यंतरीच्या कालावधीत थंडावलेली चर्चा पुन्हा एक वेळ सुरू झाली आहे.
आजरा शहरातील काही प्रभागात तर प्रचंड इर्षा निर्माण झाली असून रविवारी सकाळी साडेदहा-अकरा वाजेपर्यंत दोन फेऱ्यांमध्ये प्रशासकीय कार्यालयात होणाऱ्या मतमोजणीवेळी निवडणूक निकालाचा कौल स्पष्ट होईल असे दिसत आहे.

भादवणवाडीत हातभट्टीची दारू बाळगल्या प्रकरणी एका विरोधात गुन्हा नोंद
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवणवाडी ता. आजरा येथील कांबळे गल्ली ते मोहिते गल्लीच्या दरम्यान असणाऱ्या बोळामध्ये उघड्यावर विक्रीच्या उद्देशाने सुमारे २६ लिटर गावठी हातभट्टीची दारू जवळ बाळगल्याने प्रकाश कलाप्पा कांबळे (वय ३९ वर्षे राहणार कांबळे गल्ली, भादवणवाडी) यांच्या विरोधात समीर संभाजी कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये हवालदार सतीश जंगम हवालदार दीपक घोरपडे व हवालदार समीर कांबळे यांनी भाग घेतला.आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

लक्ष्मी विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी जयवंत सुतार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री लक्ष्मी वि. का. स. (विकास) सेवा संस्था मर्यादित, किणे या संस्थेच्या अध्यक्षपदी जयवंत मसणू सुतार यांची निवड करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर बोलवण्यात आलेल्या विशेष सभेच्या अध्यक्ष स्थानी पी.व्ही. फडणीस सहाय्यक निबंधक, आजरा हे होते.
यावेळी अध्यक्षपदासाठी जयवंत मसणू सुतार यांचे नाव मनोहर दत्तू पताडे यांनी सुचविले तर गोविंदा सुभाना वांजोळे यानी अनुमोदन दिले. यावेळी नूतन अध्यक्षांचा सत्कार करणेत आला. यावेळी उपाध्यक्ष आप्पा गुरव, संचालक आनंदा कामत, श्रीकांत शेंदरकर, मारूती गिलबिले, चाळू केसरकर, गंगाराम पाटील, जनाबाई गिलबिले, सुशाबाई तुपट उपस्थित होते.
आभार सचिव संजय घाटगे यांनी मानले.

निधन वार्ता
अनिता नार्वेकर

बाजारपेठ, आजरा येथील अनिता हरी (अण्णा) नार्वेकर (वय ७५ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे माजी संचालक हरी उर्फ अण्णा नार्वेकर यांच्या त्या पत्नी होत.
बाळकृष्ण पांडव

आजरा येथील बाळकृष्ण तुकाराम पांडव (वय ६६ वर्षे) यांचे आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहीत मुली, मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
जिजाबाई राणे

आवंडी वसाहत ता.आजरा येथील कै. जिजाबाई मारूती राणे (वय ६५ वर्षे ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, विवाहित दोन मुले आणि मुलगी,सूना, नातवंडे असा परिवार आहे.
प्रतिभा कश्यप

मुरुडे ता. आजरा येथील सोनाबाई रामचंद्र कश्यप ( वय ५८ वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे आजरा तालुका अध्यक्ष प्रवीण कश्यप यांच्या त्या आई होत.
श्रीमती सावित्री जाधव

पेरणोली ता. आजरा येथील सावित्री तानाजी जाधव व साठ वर्षे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
मेसकाठी व्यावसायिक संपत जाधव यांच्या त्या आई होत.

रस्ता कामाची बोंब…
आजरा महागाव एस. टी. सेवाच बंद?
प्रवाशांचे हाल.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – हलकर्णी रस्त्याच्या कामाला दोन महिन्या पासून सुरुवात केली असून, आजरा- महागाव रस्ता खुदाई केल्याने या दर्जाहीन रस्ता कामामुळे प्रवाशाना धुरळ्याने श्वासोश्वास घेण्याचे अवघड झाले आहे, तर गाडी खाचखळग्यातून चालवणे वाहनधारकाना जिकीरीचे झाले आहे . एस.टी. महामंडळाने तर या सर्व प्रकाराला वैतागून आजरा- महागाव बसफेऱ्या बंद केल्या आहेत. कांही गाड्या नाइलाजाने हात्तिवडे पर्यंत सोडल्या जात आहेत. आजरा तालुक्यातील पूर्व भागातील लोकांना सरकारी कामाकरिता ये-जा करण्यासाठी एस. टी सेवा बंद झाल्याने, प्रवाशांना प्रसंगी पायी प्रवास करावा लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने हलकर्णी- चंदगड रस्ता आजरा तालुक्यातील मलिग्रे,हात्तीवडे नेसरी फाटा ते श्रृंगारवाडी, चितळे भावेवाडी मार्गे चंदगड तालुक्यातील बेळगाव आंबोली रस्त्याला जोडण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ याचे मार्फत आय ए एस सी प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनीला रस्ता बांधकामचे टेंन्डर दिले आहे. मे २०२४ पासून श्रृंगारवाडी पासून कामाला सुरुवात केली. पावसाळ्यात जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागला. यावर्षीचा असणारा पावसाळा लोकाचे झालेले हाल लक्षात घेऊन महागाव- आजरा रस्त्यावर नियोजन आवश्यक असताना, कंपनी काँन्ट्रॅक्टर बेशिस्तपणे वागत आहे.
गेल्या दोन महीन्यापासून रस्त्यावरील वेडीवाकडी वळण काढणे तसेच रस्त्यासाठी लागणारी जमिन भूसंपादन करणे यातले काहीही न करता केवळ रस्ता खुदाई करून रस्त्याच्या एका बाजूने खडीकरण करून काँक्रीटचे अर्धवट भाग तयार केले तर मध्येच पाण्याच्या मोरीचे बांधकाम सुरू केले आहेत. यामुळे वाहन चालकाना रस्त्याचा अंदाज येत नाही. केलेल्या रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास वाहन धारकांना होत असल्यामुळे महागाव – आजरा वाहतूक विसकळीत झाली आहे. चार चाकी व दुचाकी गाड्या कोवाडे – पेद्रेवाडी- हाजगोळी मार्गे आजरा या मार्गाने जात आहेत.
नवख्या प्रवाशांचे हाल…
ज्यांना या रस्त्याचे काम सुरू आहे व ते इतक्या निकृष्ट दर्जाचे आहे हे माहित नाही ती वाहन चालक मंडळी या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतात परंतु निम्म्यापर्यंत गेल्यानंतर रस्त्याचा दर्जा व केलेले खोदकाम पाहून पश्चातापाव्यतिरिक्त काहीही पदरात पडत नाही.

वसंतरावदादा पाटील व नवजीवन विद्यालयांचा क्रीडा महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सन २०२५–२६ या शैक्षणिक वर्षातील वसंतरावदादा पाटील विद्यालय व नवजीवन विद्यालय, उत्तूर यांचा संयुक्त शालेय क्रीडा महोत्सव उत्साहात सुरू झाला.
या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सरस्वती शिक्षण मंडळ, उत्तूर संस्थेचे अध्यक्ष उमेशराव आपटे यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजारोहणाने करण्यात आले. क्रीडांगणाचे पूजन अनिल पोटे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विविध क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तूरचे सरपंच किरण आमणगी यांनी केले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक सुरेश कांबळे यांनी केले. उद्घाटन सामन्याची नाणेफेक मंदार हळवणकर यांच्या हस्ते झाली, तर खेळाडूंना ऋषिकेश हाळवणकर यांनी शपथ दिली.
कार्यक्रमास शिक्षकवृंद, पालकवर्ग व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मुख्याध्यापक श्री. रविंद्र येसादे यांनी मानले.
वझरे येथील वार्षिक यात्रा २३ व २४ डिसेंबर रोजी

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दरवर्षीप्रमाणे वझरे गावची लक्ष्मी देवीची यात्रा मंगळवार २३ आणि बुधवार दि. २४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
२३ तारखेला लक्ष्मी खेळवणे कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता आणि २४ तारखेला ओटी भरण्याचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता नंतर व प्रसादाचा कार्यक्रम होणार आहे असे महादेव पाटील व वैभव शिंदे यांनी सांगितले.


