
अन्यायी पाणीपट्टी वाढ व वॉटर मीटरला तीव्र विरोध
आजरा येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अन्यायी पाणीपट्टी वाढ आणि जलमापक यंत्राच्या सक्ती विरोधात कोल्हापूर येथे राज्यव्यापी आंदोलन होत असून या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय आज रवळनाथ मंदिर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आजरा तालुका फेडरेशनचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा होते.
सुरुवातीला आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी कॉ. संपत देसाई म्हणाले, चार महिन्यांपूर्वी आजरा तहसील कार्यालयावर अन्यायी पाणीपट्टी आणि जलमापक (वॉटर मीटर) सक्तीच्या मोर्चा काढला होता. त्यावेळी वाढीव पाणीपट्टी न घेता चालू दरानेच पाणीपट्टी घेण्याचा निर्णय झाला होता. याबरोबर वॉटर मीटर सक्तीला आमचा विरोध आहे हे सांगितलं होत पण त्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. दरम्यान महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने कोल्हापूर येथे राज्यव्यापी आंदोलन होत आहे. या आंदोलनात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील ४० हजार शेतकरी जमणार आहेत. आपणही या आंदोलनात प्रातिनिधिक स्वरूपात सहभागी व्हावे असा प्रस्ताव त्यानी मांडला. त्याला सर्वानी सहमती दिली.
यावेळी कॉ. सम्राट मोरे, कृष्णा भारतीय, विनय सबनीस, तानाजी देसाई, विलास नाईक, संभाजी पाटील ( हात्तीवडे), व प्रकाश मोरुस्कर यांनीही आपली मते मांडली. बैठकीला आनंद जोशीलकर, राजेंद्र कांबळे, आनंदराव कुंभार, जोतिबा चाळके, डॉ. अनिल देशपांडे, संजयभाऊ सावंत, प्रभाकर कोरवी, विजय थोरवत, दशरथ अमृते, सुरेश निर्मळे, धनाजी राणे, परशुराम शेटगे, नौशाद बुड्डेखान, मिनीन परेरा, मच्छीन्द्र मुगडे, मारुती पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

अपंगांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन करणार – संग्राम सावंत
. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अपंगांच्या विविध मागण्यांसाठी तहसीलदार, मुख्याधिकारी,नगरपंचायत व गटविकास अधिकारी, आजरा यांना मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देऊन चर्चा केली. तहसीलदार,मुख्याधिकारी, नगरपंचायत व गटविकास अधिकारी आजरा यांनी सकारात्मकरित्या प्रश्न सोडवण्यासाठीचा पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावले नाही तर याबाबतीत अपंगांच्या विविध मागण्यांसाठी तहसिलदार व पंचायतसमिती कार्यालयावर मोर्चा व नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मागण्यांच्या बाबतीत मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने दिव्यांग- अपंगांना देण्यात येणाऱ्या पेन्शन योजनेबाबतीत त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात वेळोवेळी आणि वेळच्या वेळी जमा झाली पाहिजे. यासाठी दिव्यांगांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. यासाठी आपण दिव्यांगांच्या पेन्शन बाबतीत जे अडथळे आहेत ते दूर करून त्यांची पेन्शन जर महिन्याला त्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा झाली पाहिजे. तशीच दिव्यांगांच्या इतर मागणीबाबत लक्ष घालून संबंधित सर्व विभागांना याबाबतीत सूचना करून याबाबतीतील बैठक लावून संघटनेबरोबर चर्चा करून या प्रश्नाची सोडवणूक करावी यासह विविध मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
यावेळी मुक्ती संघर्ष समितीच्या राज्याध्यक्ष संग्राम सावंत,सुरेश खोत,रविंद्र भोसले,भारती पवार,रूजाय डिसोझा,अबु माणगावकर, संजय डोंगरे, बबन चौगुले,अहमद नेसरीकर,दिलीप कांबळे, इम्तियाज दीडबाग, अमिन कानडीकर, गौस माणगावकर, सुलेमान दरवाजकर ,बबन कुरळे, जगदीश कुरुणकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सगळेच पास…?
दहावी परीक्षेचा ९९.४५ टक्के निकाल२९ शाळांचा १०० टक्के निकाल

. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्याचा दहावी परीक्षेचा निकाल ९९.४५ टक्के निकाल लागला असून तालुक्यातून परीक्षा दिलेल्या १२८३ पैकी १२७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर तालुक्यातील तब्बल २९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तब्बल ५९० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे तर ४७३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
संकेत स्थळावर दुपारी १ वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर आजरा शहर आणि परीसरात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व पालकांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला. तालुक्यातील शाळानिहाय निकाल पुढील प्रमाणे व्यंकटराव हायस्कूल आजरा (९८.९९) टक्के, उत्तूर विद्यालय उत्तूर (९८.४८), डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल आजरा (९५.४५), वसंतदादा विद्यालय उत्तूर (९४.८७) निकाल लागला. या शाळांमधील प्रत्येकी एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे.
शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळा…
भादवण हायस्कूल, कर्मवीर विद्यालय चिमणे, आजरा हायस्कूल आजरा, मलिग्रे हायस्कूल, रोझरी इंग्लिश स्कूल आजरा, भैरवनाथ हायस्कूल बहिरेवाडी, सरस्वती हायस्कूल हात्तिवडे, बापूसाहेब सरदेसाई हायस्कूल गवसे, आप्पासाहेब गायकवाड हायस्कूल महागोंड, आदर्श हायस्कूल सिरसंगी, परंडोळ हायस्कूल, राजाभाऊ केसरकर हायस्कूल निंगुडगे, पेरणोली हायस्कूल, शारदा व्ही चव्हाण गर्ल्स हायस्कूल आजरा, माध्यमिक विद्यालय आर्दाळ, मडिलगे हायस्कूल, ह. भ. प. चोरगे विद्यालय बेलेवाडी, पं. दीनदयाळ विद्यालय आजरा, दाभिल हायस्कूल, वाटंगी हायस्कूल, कै. केदारी रेडेकर हायस्कूल पेद्रेवाडी, आदर्श विद्यालय सरंबळवाडी, शिवाजी विद्यालय होन्याळी, रवळनाथ हायस्कूल देवर्डे, कोळिंद्रे हायस्कूल, पार्वती शंकर विद्यालय उत्तूर, माऊली हायस्कूल सुळेरान, डायनॅमिक पब्लिक स्कूल धनगरमीळा

वडकशिवालेचा हंडा मोर्चा अखेर स्थगित

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वडकशिवाले ता.आजरा मध्ये निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येबाबत सोमवार दि. २७ मे रोजी हंडा मोर्चा काढणार असल्याचे निवेदन पोलीस स्टेशन, आजरा व संबंधित विभागाना देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने तात्काळ रविवारी नवीन बोअर मारली. नवीन बोअर मारून पिण्याच्या पाण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केल्यामुळे हंडा मोर्चा स्थगित करण्यात आला.
नवीन बोअर मधून पाणी पुरवठा लवकर न झालेस पून्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

निधन वार्ता
राजाराम हसबे

दाभिल येथील राजाराम विष्णू हासबे ( वय ८० ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहीत मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे . रक्षाविसर्जन बुधवार दि २९ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे .
फोटो क्लिक...

रस्त्यावरून धड चालत जाता येत नाही तर वाहन कसे नेणार ? या प्रश्नाचे उत्तर नळ पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदारालाच माहीत…


