मंगळवार दिनांक १ एप्रिल २०२५


गव्याच्या हल्ल्यात दोघे जखमी
एक गंभीर...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – आंबोली मार्गावर सुळेरान ते घाटकरवाडीच्या दरम्यान आज पहाटेच्या वेळी गव्याने दुचाकीस्वारांवर केलेल्या हल्ल्यात दुचाकीवरील अजित मारुती कांबळे ( वय २७ रा. हात्तीवडे) व सागर धोंडीबा कांबळे (वय २८ राहणार हात्तीवडे, ता. आजरा ) हे दोघे जखमी झाले असून यापैकी अजित कांबळे याची प्रकृती गांभीर आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी…
अजित मारुती कांबळे व सागर धोंडीबा कांबळे हे पणजी गोवा येथे कामाला असून पाडवा सणानिमित्त गावी हात्तीवडे येथे येथे आले होते .
सण आटोपून कामावर लवकर पोहोचण्याच्या उद्देशाने ते आज सोमवारी पहाटे दुचाकीवरून गोव्याच्या दिशेने जात असताना अचानकपणे रस्त्यावर आलेल्या गव्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली यामध्ये दोघेही दुचाकीवरून बाजूला फेकले गेले.
अजित कांबळे हा गंभीर जखमी झाला असून सागर हा देखील जखमी आहे. दोघांनाही गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अजित याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.


वादळी पावसाने धामणे परिसरात दाणादाण…
अनेक घरांचे छप्पर उडाले

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सोमवारी दुपारी आजरा तालुक्यातील धामणे परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने ग्रामस्थांची चांगलीच दाणादाण उडाली. वादळी वाऱ्याने अनेक घरांचे छप्पर उडून गेले. महसूल विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.
दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास धामणे परिसरात जोरदार वादळी वाऱ्याने
मंगल निवृत्ती कोकीतकर,सचिन संजय सावंत,रामचंद्र बाबू पोवार,चंद्रकांत विष्णु बांबरे,उद्धव मगदूम,चंद्रकांत शिवाजी गुरव,केरबा जोति धामणेकर, दत्तात्रय बाबू पवार,अण्णाप्पा यशवंत बांबरे आदींच्या घरांचे छप्पर घरापासून दूरवर जाऊन पडले सुदैवाने यामध्ये जिवित हानी झाली नाही.
वादळी वाऱ्यापाठोपाठ पावसाने ही हजेरी लावल्याने ग्रामस्थांची चांगलीच दमछाक झाली. संजय महादेव सावंत यांच्या नवीन घराचे छप्पर म्हणून गेले. एकाच वेळी अनेक घरांचे छप्पर उडाल्याने सर्वत्र जोरदार आवाज व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. गावभर एक ठिकाणी या उडालेल्या छप्परांचे अवशेष दिसत होते.


आजरा अर्बन बँकेचा १००० कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
दि आजरा अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. (मल्टी-स्टेट) मार्च २०२५ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षासाठी बँकेने ठेवलेले १००० कोटी ठेवींचे उद्दीष्ट पूर्ण केल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली.
दि आजरा अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. (मल्टी-स्टेट) गेली ६५ वर्षे महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये आपल्या ३५ शाखांद्वारे कार्यरत आहे. मार्च २०२५ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षासाठी बँकेने १००० कोटी ठेवीचे उद्दीष्ट समोर ठेवले होते, बँकेचे सर्व सभासद, ग्राहक व हितचिंतक यांच्या मदतीने आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने एकूण ठेवी या १०२५ कोटी इतक्या झाल्या आहेत. आण्णा-भाऊ आणि संस्थापक संचालक यांच्या दूरदृष्टीने लावलेले हे रोपटे आता सशक्त वटवृक्षामध्ये रूपांतरीत झाले आहे. या प्रसंगी हे यश बँकेच्या सर्व सभासद, ग्राहक आणि हितचिंतक यांना समर्पित करत आहे असे निवेदन अशोक चराटी व संजय चव्हाण यांनी केले. बँकेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी यांनी या परिवारशी जोडलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

‘रवळनाथ’मध्ये गुढीपाडव्याला सात कोटी ठेवींचे संकलन
संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांची माहिती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटी लि., आजरा (मल्टी-स्टेट) प्रधान कार्यालय गडहिंग्लज या संस्थेमध्ये गुढीपाडव्यानिमित्त १५ शाखांमध्ये मिळून तब्बल सात कोटी ठेवींचे संकलन झाले, अशी माहिती ‘रवळनाथ’चे संस्थापक अध्यक्ष श्री. एम. एल. चौगुले यांनी दिली.
श्री. एम. एल. चौगुले म्हणाले, पारदर्शक व्यवहार, तत्पर सेवा आणि सभासदांनी दाखवलेला विश्वास यामुळेच संस्थेचे अल्पावधीत मोठी प्रगती केली आहे. संस्थेच्या अनेक ग्राहकांनी गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गुंतवणूक करून नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. संस्थेच्या आजरा, गडहिंग्लज, चंदगड, नेसरी, कोल्हापूर, जयसिंगपूर, बेळगाव, निपाणी, कुडाळ, सुविधा केंद्र गडहिंग्लज, सांगली, पुणे, कराड, सांगोला, चिक्कोडी या १५ शाखांमधून ०७ कोटी १७ लाखाच्या ठेवी जमा झाल्या आहेत. गेल्यावर्षी यादिवशी ३ कोटी १५ लाखाच्या ठेवी जमा झाल्या होत्या यावर्षी त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन ग्राहकांनी रवळनाथमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती दर्शविली आहे.
शाखानिहाय ठेवी अशा, शाखा आजरा (४४ लाख ७५ हजार), गडहिंग्लज (३७ लाख ७४ हजार), चंदगड (०७ लाख १९ हजार), नेसरी (३९ लाख २८ हजार), गडहिंग्लज सुविधा केंद्र (९२ लाख २४ हजार), कोल्हापूर (०२ कोटी ४४ लाख), जयसिंगपूर (१८ लाख ८९ हजार), बेळगाव (६७ लाख ०४ हजार), निपाणी (४४ लाख ८३ हजार), कुडाळ (१७ लाख ९१ हजार), सांगली (२ लाख ५३ हजार), पुणे (३५ लाख २३ हजार), कराड (३६ लाख ६३ लाख), सांगोला (१६ लाख ७९ हजार), चिक्कोडी (११ लाख ७० हजार) शाखेत इतक्या ठेवी जमा झाल्या असून आजअखेर संस्थेकडे ५०० कोटीहून अधिक ठेवी आहेत. संस्थेने सन २०२४-२५ सालाकरीता संकल्प केलेले ५०० कोटीं ठेवींचे लक्ष्य देखील पुर्ण केले आहे.
यासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. मीना रिंगणे, सर्व संचालक, शाखा चेअरमन, सल्लागार, सीईओ श्री. डी. के. मायदेव, सर्व अधिकारी, शाखाधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


स्वामी विवेकानंद मध्ये ३.१७ कोटीची ठेव संकलन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजऱ्यातील स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ३ कोटी १७ लाख ठेव संकलन झाल्याची माहिती अध्यक्ष दयानंद भुसारी यांनी दिली.
संस्थेने गुढीपाडव्याच्या दिवशी ३ कोटी १७ लाख ७ हजार ४५० इतक्या विक्रमी ठेव संकलनाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. संस्थेच्या सभासद, ठेवीदार, खातेदार यांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाच्या जोरावर संस्थेने आर्थिक बळकटीकरणाचा व आपल्या विश्वासार्हतेचा ठसा उमटवला आहे. संस्थेच्या संचालक मंडळाच्या नियोजनबध्द कार्यपध्दती आणि सभासदांच्या विश्वासामुळेच हे विक्रमी ठेव संकलन करणे साध्य झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष भुसारी यांनी सांगितले. या ठेव संकलनामुळे पतसंस्थेच्या आर्थिक स्थैर्यात आणखी भर पडली आहे
संस्थेकडे एकूण १६९ कोटींच्या ठेवी, १५० कोटी कर्जवाटप, ऑडिट वर्ग सतत ‘अ’ असून एकूण ९ शाखा कार्यरत आहेत. सर्व ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहेत. संस्थेच्या सर्व शाखांकडे ऑनलाईन वीज बिल, फोनबिल, डीटीएच रिचार्ज, सोनेतारण कर्जाची सोय, मनिट्रान्स्फर करणेची सोय, एनईएफटी, आरटीजीएस, क्यू आर कोड, आयएमपीएस, एसएमएस इ. अनेक सुविधा सभासदांकरिता उपलब्ध करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत आहेत. संस्थेला राज्यपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
ठेव संकलनासाठी केलेल्या विशेष परिश्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष भुसारी, उपाध्यक्ष सुधीर कुंभार, सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार व संचालक मंडळ यांनी सर्वांचे आभार मानले.


आजऱ्यात रमजान ईद उत्साहात...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजऱ्यात रमजान ईद मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर एकत्र येऊन नमाज पठण केले. नमाज पठण मौलाना युसूफअली तकीलदार यांनी केले तर कुतबा व प्रवचन मौलाना तैयब मणेर यांनी दिले.
पोलीस प्रशासनातर्फे उपस्थित मुस्लिम बांधवाना डी. वाय. एस. पी. रामदास इंगवले, ए.पी.आय. नागेश यमगर, पी. एस. आय. युवराज धोंडे, पी. एस. आय. लोंढे यांच्या हस्ते पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी तहसीलदार समीर माने, नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, मंडल अधिकारी सुंदर जाधव, ग्राममहसूल अधिकारी समीर जाधव आदी सह अंमलदार, होमगार्ड, एस.आर.पी. जवान उपस्थित होते.
नमाज पठणानंतर एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. दिवसभर ठीक ठिकाणी बिर्याणी व शिरकुर्म्याचे बेत आखले गेले होते.


आजरा साखर कारखान्यात तोडणी -वाहतुक करार शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या गळीत हंगामात ऊस तोडणी -वाहतुक यंत्रणा भरणेचे काम सुरू केले आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तोडणी -वाहतुक कंत्राटदारांचे वाहन व बीड, परभणी इत्यादी भागातील मजूर पुरविणे चे करार करून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी व्हाईस चेअरमन श्री. सुभाष देसाई, जेष्ठ संचालक मुकुंदादा देसाई, गोविंद पाटील, रणजीत देसाई, शिवाजी नांदवडेकर , प्र. कार्यकारी संचालक व्यंकटेश ज्योती यांच्या हस्ते कराराचे वाटप करण्यात आले.
तोडणी -वाहतुक कंत्राटदार श्री. धनाजी शिंदे, शंकर चोथे, विजय नेवगे, उदय हरेर, शैलेश गेंगे, सुनिल मिसाळ, सलीम काकतीकर, मोसिन नेसरीकर, इत्यादी तोडणी -वाहतुक कंत्राटदारांनी करार केले.




