गुरूवार दि.२ आक्टोंबर २०२५


पनवेल येथे पोलिसांच्या गणवेशात सराफाला लुटले
शेळप येथील दोघांना अटक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पनवेल (मुंबई) येथील सराफी व्यावसायिकावर पाळत ठेवून पोलिसाचा गणवेश करून तपासणीच्या निमित्ताने रोख रकमेसह लाखो रुपयांचे सोने लंपास केल्या प्रकरणी पनवेल शहर पोलिसात संबंधित साराफाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचे धागेदोरे आजरा तालुक्यातील शेळप गावापर्यंत पसरले असून पनवेल पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने या प्रकरणातील प्रत्यक्ष सहभागी शेळप येथील दोघांना अटक केली आहे. त्यांच्या सोबत नरतवडे तालुका राधानगरी येथील एकालाही अटक केली आहे.
त्यांच्याकडून एक ईर्टीका, एक वॅगन आर चार चाकी व कांही रक्कमही जप्त केली आहे.
पोलीस असल्याचा बनाव करून अन्य. साथीदारांच्या मदतीने सदर प्रकार केल्यानंतर सराफी व्यावसायिकांत खळबळ उडाली होती.

कथा टग्यांच्या…
व्यथा बांधकाम कामगारांच्या..

हे आमचे दाखले नाहीतच…?
बांधकाम कामगार नोंदणीसाठी लागणारे 90 दिवसांच्या बांधकाम कामाच्या अनुभवाचे दाखले अनेकांनी बोगस अशा सही शिक्क्यांचा परस्पर वापर करून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी घातली. मध्यंतरी याबाबतच्या तक्रारी वाढल्यानंतर अनेक ठेकेदारांना आपल्या नावावर असे दाखले दिले गेले असल्याचे आढळून आले.
आयकर विभागासह जीएसटी विभागाच्या दृष्टीने एकाच वेळी एकाच ठेकेदाराकडून शेकडो कामगारांना दाखले दिले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित ठेकेदारांना नोटीसा करण्याचे काम सुरू झाले.
येथील कांही ठेकेदारांनी बांधकाम विभागाच्या आयुक्तांना आपल्या सही शिक्यांचा गैरवापर होत आहे अशा बांधकाम कामगारांच्या कृतनीकरणासह नोंदणीच्या कामात ते वापरले जात आहेत. संबंधितांची नोंदणी रद्द करावी असे लेखी देखील कळवले. परंतु ही यंत्रणाच इतकी सुस्त आहे की या पत्रांची फारशी दखल घेतली गेली नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे लेखी पत्रे दिल्यानंतरही अशा बोगस टाकल्यावर कामगारांची नोंदणी सुरूच राहिली आहे.
शासनाच्या एका चांगल्या योजनेचा बोजवारा केवळ या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विविध गोष्टींचा लाभ उठवण्यासाठी कामगार या व्याख्येशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या मंडळींनी उडवला आहे.
आता पुन्हा एक वेळ चौकशीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु नियंत्रणात इतकी विचित्र आहे. काही दिवस हा चौकशीचा फार सुरू राहील. आणि कालांतराने पुन्हा एक वेळ नव्याने अशा बोगस कामगारांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी सुरू होईल हे निश्चित…
(समाप्त)
आणि ऐतिहासिक व्हिक्टोरिया पुलाने घेतला मोकळा श्वास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अण्णा-भाऊ स्मृती पंधरवडा व महात्मा गांधी जयंतीनिमित्त आजरा महाविद्यालवतीने स्वच्छता अभियान पार पडले. शहरातील ऐतिहासिक व्हिक्टोरिया पूल आणि आजरा शहराच्या विविध भागांमध्ये आजरा महाविद्यालयाच्या वतीने विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानामध्ये विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहराच्या प्रमुख रस्त्यांची, सार्वजनिक ठिकाणांची आणि महाविद्यालयाच्या परिसराची साफसफाई करून ‘स्वच्छ आजरा, सुंदर आजरा’ हा संदेश कृतीतून दिला.
या स्वच्छता अभियानाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अशोक आण्णा चराटी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छता अवजारांचे पूजन करून स्वच्छता अभियानाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणातून करण्यात आली. अनेक वर्षापासून महाविद्यालयाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविले जात असून ‘स्वच्छतेतून समाजसेवा’ हा विचार विद्यार्थांमध्ये रुजावा ही भावना या अभियानामागे असल्याचे मत अशोकआण्णा चराटी यांनी उद्घाटन प्रसंगी मांडले.
या स्वच्छता अभियानामध्ये आजरा शहराचे वैभव असणाऱ्या आणि येथील इतिहासाचा साक्षीदार असलेल्या व्हिक्टोरिया पुलाची साफसफाई करण्यावर विशेष भर देण्यात आला. पुलाच्या परिसराची साफसफाई करून विद्यार्थ्यांनी पुलाचे सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व जतन करण्याचा संदेश दिला. यासोबतच आजरा शहरातील एस. टी. स्टँड, आंबोली रोड, पोलीस स्टेशन परिसर, दत्त कॉलनी, एकता कॉलनी, पेट्रोल पंप, गोठण गल्ली या निवडक भागाची स्वच्छता करण्यात आली.
या स्वच्छता अभियानाचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या वतीने करण्यात आले होते. या अभियानामध्ये NSS व NCC चे स्वयंसेवक, महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शहीद अब्दुलहमीद सेवा संस्थेची वार्षिक साधारण सभा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा/ सावरवाडी येथील शहीद अब्दुल हमीद वि. का. स.सेवा संस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी संस्थेचे संचालक युसूफ भडगावकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर ताळेबंद, नफातोटा पत्रक तसेच इतिवृत्तांतचे वाचन संस्थेचे सचिव रजनीकांत कुंभार यांनी केले.
या सभेमध्ये विविध विषयावर चर्चा झाली. प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करताना संस्थेचे चेअरमन अबूताहेर तकीलदार म्हणाले, संस्था काही प्रमाणात तोट्यात आहे. परंतु संस्थेची १०० % वसुली करून संस्थेने एक नवीन आदर्श घालून दिला आहे. दरवर्षी १०० %वसुलीमुळे संस्थेला आदर्श संस्था म्हणून मानले जाते. संस्थेचा तोटा कमी करण्यासाठी प्रयत्नशील असून यासाठी पदरमोड करून संस्था चालवीत आहे.
युसूफ भडगावकर यांनी संस्थेचे भागभांडवल वाढण्यासाठी १० % शेअर्स रक्कम वर्गणी कपात करून घेणेबाबत मत मांडीत संस्थेसाठी निःस्वार्थपणे योगदान देत आलेल्या झाकीरभाई आगलावे यांना स्वीकृत संचालक म्हणून घेण्याबाबत मत मांडले.
बशीरभाई तकीलदार यांनी आभार मानले.यावेळी इब्राहिम नसरदी (उपाध्यक्ष), बशीर (न्हन्या)लतीफ, बाबुभाई लतीफ, नियाज तकीलदार, कुदरत लतीफ, युसूफ खेडेकर, प्रकाश कांबळे, ताई शिंगटे, श्रीमती रजिया तकीलदार, आशपाक तकीलदार, शौकत लतीफ, इम्तियाज दिडबाग, बशीर काकतिकर, खलील दरवाजकर, सौ. शबाना (मुन्नी )तकीलदार, साबीर तकीलदार,साजिद दरवाजकर यांच्यासह सभासद उपस्थित होते.

व्यंकटरावमध्ये नगरपंचायत मार्फत कचरा व्यवस्थापनाचे मार्गदर्शन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये नगरपंचायत मार्फत स्वच्छ संरक्षण २०२५ व माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत विद्यार्थ्यांना कचऱ्याचे प्रकार त्याच बरोबर कचरा व्यवस्थापन या बाबत मार्गदर्शन श्री. पेडणेकर व त्यांचे सहाय्यक कांबळे यांनी केले.
प्रशालेला कापडी कचरा पेटी आणि प्रमाणपत्र ही प्रदान केले .६(A) विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. यावेळी प्राचार्य श्री. एम. एम. नागुर्डेकर पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, श्रीम. आर. एन. पाटील उपस्थित होत्या..

जनता गृहतारणमार्फत कर्मचाऱ्यांना जादाची वेतन वाढ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मार्च, २०२५ अखेर १०० कोटी ठेवींचे उद्दिष्ट संस्थेने ठरविलेले होते. हे उद्दिष्ट कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण झाले, त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून जादाची एक वेतन वाढ देत आहोत. याचा फायदा संस्थेला नक्कीच होणार. असे प्रतिपादन चेअरमन मारूती मोरे यांनी केले.
दरवर्षी ऑक्टोबरमध्ये वार्षिक वेतन वाढ दिली जाते. यावर्षी ही जादाची वेतन वाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ही वाढ सप्टेंबरच्या पगारापासून रोखीने देण्यात येईल. शिवाय नेहमीची ऑक्टोबरची वेतनवाढ सुद्धा त्यांना देण्यात येईल. या वेतन वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. स्वागत प्रास्ताविक करताना व्हाईस चेअरमन अशोक बाचुळकर यांनी सांगितले की,सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांना पगार देणारी ही संस्था आहे. त्यांना दैनिक भत्ता, आणि घर भाडे दिला जातो. या वेतनवाढीमुळे सरासरी आठशे रुपयांची वाढ कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली आहे.

संत तुकाराम दूध संस्थेच्या मृत सभासदांच्या वारसांना मदत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता.आजरा येथील संत तुकाराम दूध संस्थेच्या वार्षिक सभेत मृत सभासदांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सावंत अध्यक्षस्थानी होते.
यावेळी गणेश चतुर्थीला साडे तीन रूपयाप्रमाणे प्रती लिटर रक्कम व लिटर मागे दोन रूपये कपात करून दूध उत्पादकांना मदत करण्याचे ठरले. यावेळी आकस्मिक निधन झालेल्या मच्छिंद्र कालेकर यांच्या कुटुंबाला ५ हजार रुपयांची मदत देण्यात आली.
यावेळी संचालक बाबूराव सावंत, नामदेव वांद्रे, छाया गुरव, धनाजी सुतार, सदाशिव कांबळे, शंकर नावलकर, अजित सासूलकर आदी उपस्थित होते. सचिव बाबू कांबळे यांनी अहवाल वाचन केले. उपाध्यक्ष रामदास सावंत यांनी स्वागत केले. अमित सावंत यांनी प्रास्ताविक केले. संचालक कृष्णा सावंत यांनी आभार मानले.

छायावृत्त…




