

हॉटेल कामगाराचा मृतदेह विहिरीत सापडला

आजरा;प्रतिनिधी
आजरा-आंबोली मार्गावरील एका हॉटेलमधील कर्मचाऱ्याचा मृतदेह हॉटेलच्या मागिल बाजूस असणाऱ्या विहिरीमध्ये आढळला. संदीप अशोक होडगे (रा. उंबरवाडी ता. गडहिंग्लज) असे या कर्मचाऱ्यांचे नाव आहे.
गेली कांही वर्षे संदीप हा संबंधित हॉटेलमध्ये कामाला होता.सोमवारी रात्री पासून संदीप हॉटेलच्या परिसरात इतर कर्मचाऱ्यांना आढळला नाही. त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू असताना हॉटेलच्या मागील बाजूस असणाऱ्या विहिरीमध्ये त्याचा मृतदेह आढळला. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.
आजरा पोलिसांत सदर घटनेची नोंद झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.


आजरा साखर कारखान्याच्या नुतन संचालकांचा घाटकरवाडी येथे सत्कार

आजरा: प्रतिनिधी
माजी आमदार, के.पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घाटकरवाडी येथे आजरा साखर कारखान्याच्या नुतन संचालकांचा सत्कार समारंभ पार पडला.
कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर रवळनाथ विकास आघाडीला मिळालेल्या एकतर्फी विजयी निकाल हा आघाडीला बळ देणारा आहे असे रवळनाथ आघाडीचे पॅनेल प्रमुख सुधीर देसाई यांनी स्पष्ट करून कारखान्याच्या हितासाठी हा निकाल कसा फायदयाचा आहे हे सांगितले.
स्थानिक संचालक गोविंद पाटील यांनी आज-याच्या पश्चिम भागातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या समस्या व आव्हाने मांडली व या शेतक-यांना जंगली प्राण्यांपासून होणाच्या नुकसानीला कायमचा पायबंद घालण्यासाठी एक रोल मॉडेल गाव तयार करण्याचे आवाहनही केले.

माजी आमदार के. पी. पाटील यांनी कारखाना आणी व्यवस्थापन यांच्या समोरील आव्हानावरती मात करून कारखान्याला ऊर्जीतावस्था प्राप्त करून देण्यासाठी मार्गदर्शन केले.यावेळी अध्यक्ष वसंतराव धूरे, उपाध्यक्ष मधुकर देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास मुकुंदराव देसाई, उदयसिंह पवार,मारुती घोरपडे, अनिल फडके, राजेंद्र जोशीलकर, दिपक देसाई, रणजीत देसाई,हरीबा कांबळे, सौ. मनिषा देसाई, सौ रचना होलम, इत्यादी संचालक व ग्रामस्थ तसेच परिसरातील कारखान्याचे सभासद उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भास्कर डेळेकर ,घाटकरवाडी ग्रामस्थ व मुंबई मंडळ यांनी महत्त्वाचे योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लक्ष्मण पाटील यांनी तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर रोडे यांनी केले.


प्रांताधिकारी बारवे यांनी केली महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या शेताची पहाणी

आजरा: प्रतिनिधी
दिनांक ८ जानेवारी रोजी आजरा भुदरगडच्या प्रांताधिकारी वसुधा बारवे यांच्या कार्यालयामध्ये संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ प्रांताधिकारी यांना भेटून चर्चा केली.
यावेळी प्रांताधिकार्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत प्रत्यक्ष शेताच्या व राहत्या घरांची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दौऱ्याची नियोजन करत संघटना प्रतिनिधी, शेतकरी, महामार्गाचे अधिकारी, महसूल अधिकारी, मंडल अधिकारी, गाव कामगार तलाठी, कंपनीचे प्रतिनिधी या सर्व टीमने प्रत्यक्ष पाहणी केली व अंतिम निवाडा प्रक्रिया चालू असून नियमाप्रमाणे मोबदला दिला जाईल अशी ग्वाही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटीच्या वेळी दिली.
शेतकऱ्यांना नियमानुसार दिलासा रक्कम व १२ टक्के व्याज देखील मिळणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. आपल्या पुनर्वसनाची जलद गतीने प्रक्रिया होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिष्टमंडळामध्ये संघटना अध्यक्ष कॉ. शिवाजी गुरव, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, शिवाजी इंगळे, दिगंबर हरंबळे ,अण्णासो पाटील, सागर भाटले, संदीप कोंडुसकर महामार्गाचे अभियंता अनिल पाटील व शेतकरी उपस्थित होते.
समाधानकारक मोबदला हवाच…
आज पुन्हा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक पार पडली यावेळी आम्हाला समाधानकारक जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत आमच्या शेतात कोणत्याही प्रकारचे काम करू न देण्याचा निर्णय यावेळी शेतकऱ्यांनी घेतला.


ग्रामपंचायत नूतन पदाधिकाऱ्यांचा शनिवारी सत्कार

आजरा तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सरपंच परिषदेच्या वतीने शनिवार दिनांक १३ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर येथे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संघटनेचे जिल्हा समन्वयक जी.एम. पाटील यांनी दिली.
संघटनेचे आजरा तालुका अध्यक्ष संदीप चौगले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, संघटनेचे प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस यांच्या हस्ते सदर समारंभ होणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

कै.रमेश टोपले स्मृती नाट्य महोत्सव १४ जानेवारीपासून

आजरा : प्रतिनिधी
नाट्यरसिकांचे आकर्षण असणाऱ्या नवनाट्य कला मंच संस्था, आजरा च्या वतीने कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाचे रविवार दिनांक १४ जानेवारी ते २० जानेवारी २०२४ अखेर आयोजन करण्यात आले आहे.
१४ जानेवारी रोजी उद्घाटन व कार्तिक थिएटर्स कलंगुट, गोवा निर्मित सूर राहू दे, १६ जानेवारी रोजी मेरिड इंडिया, कोल्हापूर यांचे स्पायडरमॅन, १६ जानेवारी रोजी वैभवी क्रिएशन्स डिचोली, गोवा यांचे अग्गंबाई सुनबाई, बुधवार दिनांक १७ जानेवारी रोजी जाणीव चॅरिटेबल फाउंडेशन, कोल्हापुर यांचे सारी रात्र, गुरुवार दिनांक १८ जानेवारी रोजी जागृती नाट्य कला मंच, सातारा यांचे आम्ही दोघेच राहायचो घरात, शुक्रवार दिनांक १९ जानेवारी रोजी मधुमिता सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक संस्था, सातारा निर्मित बटरस्कॉच व शनिवार दिनांक २० जानेवारी रोजी लोक रंगभूमी, सांगली यांचे ओॲसिस अशा नाटकांचे आयोजन करण्यात आले असून रविवार दिनांक २१ जानेवारी २०१९ रोजी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. यावेळी संयोजक संस्थेचे नाटक सादर करण्यात येणार आहे.
आजरा महाविद्यालयाच्या रंगमंचावर दररोज सायंकाळी सात वाजता सदर नाट्यप्रयोग होणार आहे


गांधीनगर येथे हरिनाम सप्ताह

आजरा: प्रतिनिधी
गांधीनगर, आजरा येथे रविवार दिनांक २१ व सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण, काकड आरती, हरिपाठ, किर्तन, दिंडी,जागर यासह विविध कार्यक्रम होणार असून सोमवारी दुपारी बारानंतर महाप्रसाद होणार आहे.हे सर्व कार्यक्रम श्री विठ्ठल मंदिर, गांधीनगर येथे होणार आहेत.

पाऊस पाणी

आजरा शहर व परिसरात दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे चांगलेच हाल होत असून कारखान्याच्या वाहतूक व तोडणी यंत्रणेमध्ये अडथळे येत आहेत. आंबा व काजू पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



