
ग्रामीण भागात देशी दारूची बेकायदेशीर विक्री
पुन्हा पोलिसांची दोघांवर कारवाई

आजरा: प्रतिनिधी
आजरा तालुक्यामध्ये ग्रामीण भागात बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री सुरू असून पोलीसांच्या रडारवर असे दारू विक्रेते असून पोलिसांनी आक्रमक होत कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. कोळिंद्रे येथील कारवाईनंतर सोमवारी पुन्हा दोघा जणांना देशी दारू बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याबद्दल रंगेहाथ पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे.
कोवाडे- निंगुडगे मार्गावर एका झुडपाच्या आडोशाला संजय भैरू तांबेकर रा. कोवाडे यास तर गजरगाव-गडहिंग्लज मार्गावर गजरगाव येथील संदेश हरी चोथे यास बेकायदेशीररित्या दारू साठा करून विक्री करताना पोलिसांनी मुद्देमालासह रंगेहात पकडले आहे.
त्यांच्याकडून देशी बनावटीची दारू हस्तगत केली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.


किणे – पोश्रातवाडी रस्ता अखेर केला खुला…
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही २५० मीटरवरील काढले अतिक्रमण

आजरा: प्रतिनिधी
गेली तेरा वर्ष प्रलंबीत असलेल्या किणे- पोश्रातवाडी रस्त्याचा प्रश्न आज मार्गी लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आजरा तहसीलदारांनी कार्यवाही करत रस्त्याचा मार्ग खुला केला. सुमारे २५० मीटर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे किणे- पोश्रातवाडीचे अंतर कमी होणार असून दोन्ही गावच्या ग्रामस्थांना शेती कामासह रहदारीसाठी रस्ता खुला झाला आहे.
किणे- पोश्रातवाडी रस्ता हा ग्रामिण मार्ग ६६ या नावाने रस्त्याच्या सुचिमध्ये नमूद आहे. पंधरा वर्षापूर्वी हा रस्ता मंजूर झाला होता. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही निधी खर्च झाला होता. रस्त्याचे अर्धवट काम होवून काही रक्कम खर्च झाली होती. दरम्यान काही शेतक-यांनी रस्त्याचे काम रोखले होते. त्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले, मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने रस्ता खुला करण्याचे आदेश आजरा तहसीलदारांना दिले होते.
महीनाभरात रस्ता खुला करावा असे आदेशात सुचित केले होते. त्यानुसार आज महसुल प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये कार्यवाही केली तहसीलदार समीर माने यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयाच्या निकालाप्रमाणे हद्दी निश्चित करून मार्ग करण्यात आला आहे .जेसीबीच्या सहयाने रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले.

या रस्त्यामुळे किणे- पोश्रातवाडी अंतर कमी होणार आहे त्याचबरोबर कोळिंद्रे, नेसरी ही गावे जोडली जाणार आहे. भविष्यात रस्त्याचे काम पक्के करण्याचे नियोजन आहे. या वेळी जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता सुर्यकांत नाईक, पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे, मंडल अधिकारी संदिप कुरणे, तलाठी प्रविण परीट यांनी कार्यवाहीमध्ये सहभाग घेतला. यावेळी पं.स. माजी सभापती विष्णूपंत केसरकर किणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय केसरकर, ग्रामसेवक कविता कोकितकर व संबंधित जमीन मालक उपस्थित होते.


आज-याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस

आजरा : प्रतिनिधी
आजरा तालूक्याच्या पश्चिम भागात रविवारी जोरदार अवकाळी पाऊस झाला. पावसाने ऊसाला फायदा झाला.मात्र शेतातील गवतांच्या गंजी, काजू व आंबा पिकाचे नूकसान झाले.तालूक्यात गेले चार दिवस ढगाळ वातावरण आहे.कांही गावात हलक्या स्वरूपाचा वळीवाचा पाऊस झाला आहे.तर पश्चिम भागातील दाभिल,शेळप,मेढेवाडी आदी गावात मुसळधार पाऊस झाला.सध्या उस तोडणी सुरू आहे.पावसामूळे उसतोडणीत अडथळा निर्माण झाला.
गवताच्या गंजी पावसामूळे नूकसान झाले आहे. सध्या आंबा, काजू पीक मोहरले असून या पिकाला पावसाचा तडाखा बसला आहे.मात्र वळीव पावसामूळे व ढगाळ वातावरणामूळे थंडी कमी झाली आहे.
मंगळवारी सकाळी आजरा शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या…


वाटंगी सरपंचपदी संजय पोवार

आजरा : प्रतिनिधी
वाटंगी-मोरेवाडी-धनगरवाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय वसंतराव पोवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मलिग्रे मंडल अधिकारी संदीप कुरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदस्यांच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली.
यावेळी माजी सभापती व आजरा तालुका संघाचे संचालक अल्बर्ट डिसोझा,लाकूडवाडी सरपंच शंकर कुराडे,माजी सरपंच शिवाजी नांदवडेकर, उपसरपंच स्वाती गुरव, सदस्य शिवाजी नांदवडेकर, मधुकर जाधव, मंगल वांद्रे, इंदू कुंभार, मिनाक्षी देसाई, सुनिता सोनार,रविंद्र पोवार,संजय भडांगे आदी उपस्थित होते. ग्रामसेवक रणजित पाटील यांनी आभार मानले.


निवेदन…

‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालयाची जागा बदलावी अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय जनहित पार्टीच्या वतीने आजरा तहसीलदारांना देण्यात आले आहे.
निवेदनावर संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोरवी, शाहिद मुल्ला, शिवराज लोखंडे, प्रकाश कांबळे, राहील खेडेकर, आसिफ मुल्ला, उदय चव्हाण, सिकंदर अंकलिकर,आकाश लोखंडे, शरद लोखंडे रोहित कोरवी, श्रीधर कळेकर संदेश कळेकर यांच्या सह्या आहेत.
यावेळी महादेव कुंभार, अशोक जांभळे (पोवार) शहिद मुल्ला, रवी तळेवाडीकर, सुनिल दोरुगडे, सुशील लतीफ, अनिल वाजंत्री,अरुण नाईक, अमित सुतार, साहिल मुल्ला धनाजी दळवी (सरपंच चाफवडे) उपस्थित होते.

महिलांसाठी…

राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त मराठा महासंघ शाखा आजरा तालुक्याच्या वतीने शुक्रवार दिनांक १२ जानेवारी रोजी हळदी-कुंकू व संत साहित्याचे अभ्यासक प्रा. शिवाजीराव भुकेले यांच्या व्याख्यानाचे आयोजन श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे सायंकाळी ४.३० वाजता आयोजित केले असल्याची माहिती संघटनेच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ. भैरवी सावंत व तालुका अध्यक्ष सौ. मिनल इंजल यांनी दिली आहे.


यात्रा…
श्री कुरकुंदेश्वर पेरणोली
सालाबादप्रमाणे श्री कुरकुंदेश्वर देवाची यात्रा शुक्रवार दि. १२-०१-२०२४ ते रविवार दि. १४-०१-२०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री थळजत्रा व शनिवारी दि. १३-०१-२०२४ रोजी रात्री मुख्य जत्रा होईल. त्यानंतर रविवारी सकाळी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन श्री कुरकुंदेश्वर देवस्थान यात्रा समिती
कुरकुंदे, पेरणोली ता. आजरा यांनी केले आहे.


निधन वार्ता…
गंगूबाई सावंत

जाधेवाडी या.आजरा येथील पदवीधर शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवाजी ईश्वर सावंत व पंचायत समिती स्तरावरील पतसंस्थेचे मॅनेजर पांडूरंग सावंत यांच्या मातोश्री गंगुबाई ईश्वर सावंत ( वय ८० वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.



.

