बुधवार २९ एप्रिल २०२६


पाणी कनेक्शन्सचा नव्याने सर्वे करा…
नगरसेवकांच्या अधिकाऱ्यांना सूचना
मासिक सभा शांततेत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शहरामध्ये नवीन पाणीपुरवठा योजना हळूहळू कार्यान्वित होत असून प्रशासनाला कल्पना न देता काहींनी परस्पर मनमानी पद्धतीने एकापेक्षा जास्त नळ कनेक्शन घेतली असून नव्याने प्रभाग निहाय सर्वे करून तातडीने अशी जादाची कनेक्शन बंद करण्यात यावी व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक परेश पोतदार व अन्य नगरसेवकांनी केली तर शहर समन्वयक पदाकरीता नगरपंचायत फंडातून दिल्या जाणाऱ्या पगाराबाबत गरमागरम चर्चा झाली. चर्चेमध्ये डॉ. स्मिता कुंभार, परेश पोतदार, परशुराम बामणे, निसार दरवाजकर, सौ. पुनम लिचम, नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी, आसिफ/सरफराज पटेल आदींनी भाग घेतला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी होते.
थोडक्यात आढावा पुढील प्रमाणे…
♦ महिला दिनी घेतलेल्या कार्यक्रमांची बिले त्वरित अदा करा… निशांत चांद
♦ क्रीडा संकुल इमारत खेळाडूंसाठी खुली करा… अनिकेत चराटी
♦ गाळेधारकांच्या भाडे वाढीचा फेरविचार व्हावा… निसार दरवाजकर
♦.सभागृहातील झालेल्या निर्णयावर पुन्हा पुन्हा चर्चा नको… विक्रम पटेकर
♦ शहर समन्वयक पदाचा ४५०००/-पगार परवडणारा नसल्याने सदर पद रद्द करा… परेश पोतदार
♦ गांधीनगर शाळा इमारतीची दुरुस्ती आवश्यक… आसावरी खेडेकर
♦ वाहतूक सुरळीत लावण्याकरता पोलिसांच्या मदतीने संघटित प्रयत्न करूया… असिफ लतिफ
♦ समर्थ कॉलनीतील अतिक्रमणे काढा…
परशुराम बामणे
सभेस उपनगराध्यक्षा सौ.पूजा डोंगरे,सौ. बुड्डेखान, श्रीमती कलावती कांबळे, असिफ सोनेखान यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती.

पेरणोली ७२ टक्के, कोरीवडेत ८५ टक्के सरपंचपदासाठी मतदान
पोटनिवडणूक: बहिरेवाडीत ६० टक्के, धामणेत ६४.२५ टक्के सदस्यपदासाठी मतदान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तालुक्यातील पेरणोली व कोरीवडे येथील सरपंचपदासाठी बहिरेवाडी, धामणे येथे सदस्यपदाच्या काल मंगळवार (ता. २८) मतदान झाले. पेरणोली ७२ टक्के तर कोरीवडेत ८५ टक्के चुरशीने मतदान झाले. बहिरवाडी ६० टक्के तर धामणेत ६४.२५ टक्के मतदान झाले. आठ मतदान केंद्रावर ४० कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली होती. मतदान आणण्यासाठी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांच्यामधे शाब्दिक वाद वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.
पेरणोली ग्रामपंचायतीसाठी राजश्री उदयराज पवार, संजीवनी मारुती नावलकर, शीतल लक्ष्मण हळवणकर, वनश्री रविंद्र देसाई यांच्यात चौरंगी लढत होत आहे. कोरीवडे येथे विवेक पाटील, दामाजी पाटील यांच्यात दुरंगी सामना होत आहे. दोन गावातील मतदान केंद्रावर आज सकाळपासून मतदारांच्या रांगा दिसून आल्या. उमेदवारांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी चार चाकीचा वापर केला. सकाळच्या पहिल्या टप्प्यात मतदारांच्या मतदान केंद्रावर तळक गर्दी होती. सकाळी १० वाजल्यानंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. मतदानाचा हक्क बजावून बऱ्याच जणांनी शेताची वाट धरली. मतदार आणण्यावरून कार्यकर्त्यांमधे चस दिसून आली. कार्यकर्त्यामधे शाब्दिक वादाचे प्रसंग घडले. पोलीसांनी हस्तक्षेप केला. उमेदवारांनी कार्यकर्त्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था केली होती. कोल्हापुर, मुंबई, पुणे येथून मतदार आणण्यात आले होते. दुपारी मतदान केंद्रावर शुकशुकाट पहावयास मिळाला.
आज मतमोजणी होणार आहे.

चोरीला न गेलेली दुचाकी अखेर सापडली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘साहेब माझी दुचाकी चोरीला गेली आहे…’ असे म्हणत धाकू गुंडू पाटील या सुळेरान येथील व्यक्तीने आजरा पोलिसात दुचाकी चोरीची तक्रार दिली. पोलीस हवालदार शिकलगार यांच्यासह पोलिस यंत्रणा कामाला लागली. घटनास्थळावर शेजारील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासण्यात आले. कोणीतरी खाकी कपडे परिधान केलेली व्यक्ती मोटरसायकल नेत असल्याचे निदर्शनास आले. व्यक्तीचा शोध घेतला असता ती व्यक्ती आजरा आगाराची कर्मचारी निघाली. पोलीस चौकशी सुरू झाली.
जाण्या- येण्यास अडथळा होतो म्हणून ती दुचाकी आपण बाजूला सरकवून लावली असे त्याने सांगितले. प्रत्यक्षात दुचाकी तेथे आढळलीच नाही. पुन्हा दुचाकीचा शोध सुरू झाला. दरम्यान दुसऱ्या एका व्यक्तीने वाहतुकीस अडथळा होतो म्हणून दुचाकी लावलेल्या इमारतीच्या मागील बाजूस ढकलून लावली होती. तेथेच ती दुचाकी आढळली. शोध संपुष्टात आला.
चोरीला न गेलेल्या दुचाकीचा २४ तासात शोध लावण्यात पोलिसांना यश आले.
मस्कत (ओमान) येथे वाढदिवसानिमित्त
हनुमान चालीसा व रामरक्षा स्तोत्राचेही पठण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
घाटकरवाडी येथे बालपण गेलेल्या श्री बाळू उर्फ तुकाराम पट्टेकर यांनी आपल्या कन्या कुमारी गिरीजा हिचा सातवा वाढदिवस बालगोपालांसह उपस्थित एकत्र येत सात वेळा हनुमान चालीसाचे सामूहिक पठण केले तसेच रामरक्षा स्तोत्राचेही भक्तिभावाने गायन करून केला. या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.सोहळ्यात कोणताही दिखाऊ खर्च न करता सर्वांना प्रेमपूर्वक प्रसादरूप भोजन देण्यात आले.
वाढदिवसाचे औचित्य साधत श्री बाळू उर्फ तुकाराम पट्टेकर यांनी अनावश्यक खर्च टाळून चंदगड येथील ‘रयत आरोग्य सेवा केंद्र’ (संचालक : श्री संदीप गावडे, PRO KLE) या समाजोपयोगी संस्थेला आर्थिक मदत केली. गरजू रुग्णांना अत्यल्प दरात वैद्यकीय साहित्य व घरपोच सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेस दिलेली मदत ही त्यांच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती ठरली.
या कुटुंबाला वडिलोपार्जित संस्कारांची समृद्ध परंपरा लाभली असून ह. भ. प. श्री मारुती भीमाण्णा पट्टेकर यांच्या मार्गदर्शनातून कुटुंबात अध्यात्म, संस्कृती व समाजसेवेची मूल्ये दृढ झाली आहेत.
परदेशात वास्तव्यास असूनही श्री बाळू उर्फ तुकाराम पट्टेकर वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार सातत्याने करत आहेत. प्रत्येक एकादशी तसेच विविध सणांच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी नियमित भजन-कीर्तनाचे आयोजन केले जाते. या माध्यमातून मराठी संस्कृती व वारकरी परंपरा पुढील पिढीकडे पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे.
पट्टेकर हे घाटकरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. जयसिंग गोपाळ पाटील यांचे मेहुणे असून त्यांचा बालपणीचा काळ घाटकरवाडी व परिसरात व्यतीत झाला आहे.

फोटो क्लिक

श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत काल मंगळवारी रात्री सोहाळे येथे लक्ष्मी खेळवण्याचा कार्यक्रम पार पडला. पहाटे उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. आज यात्रेचा मुख्य दिवस आहे.

वाटंगीच्या महादेव मंदिराचा जिर्णोद्धार ७ मे रोजी
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी येथील महादेव मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रम गुरुवार दि. ७ मे रोजी होणार आहे. गुरुवारी सकाळी ८.१५ ते ११ वा. मूर्ती व कळस मिरवणूक सकाळी ११.३० ते रात्री ८ पर्यंत वास्तू शुद्धीकरण विधी जलाधिवास, पूजा होम व इतर कार्यक्रम रात्री १० वा. सोन्याची शिरोली यांचा सोंगी भजनाचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी ६ ते ११ पर्यंत प्रतिष्ठापना, प्रदान होम श्री रवळनाथ अभिषेक व सत्यनारायण महापूजा. सकाळी ११ वाजता महाआरती होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता आहे. मंदिर उभारणीसाठी अंदाजे १५ लाख खर्च आला असून कोणताही शासकिय निधी नसताना ग्रामस्थांच्या वर्गणी आणि देणगीमधून मंदिर पूर्ण होत आहे अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष विजय देसाई यांनी दिली.

जत्रा – यात्रा सुरू
वाहतूक थांबली

जत्रा, यात्रा, विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने आजरा शहरात दुचाकी व चारचाकी गाड्यांची प्रचंड गर्दी होत असून यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे.

आजचे पंचांग
दिनांक : २९ एप्रिल २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : त्रयोदशी (रात्री ०७.५१ पर्यंत) त्यानंतर चतुर्दशी तिथी
नक्षत्र : हस्त नक्षत्र (३० एप्रिल रात्री १२.१५ पर्यंत) त्यानंतर चित्रा नक्षत्र
योग : हर्षण योग (रात्री ०८.५० पर्यंत) त्यानंतर वज्र योग
करण : कौलव करण (सकाळी ०७.१८ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : कन्या राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.३६ ते दुपारी ०२.१२ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.१३
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५९
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज
पंजाबला पराभवाचा दणका…
राजस्थान रॉयल कडून पंजाबचा चालू सत्रातील पहिला पराभव झाला आहे. पंजाबने राजस्थान रॉयल समोर ठेवलेले २२२ धावांचे उद्दिष्ट राजस्थानने १९.२ षटकात पूर्ण केले. राजस्थानचा हा पहिला पराभव ठरला आहे.
आजचा सामना
मुंबई विरुद्ध हैदराबाद
वेळ : सायंकाळी ७.३० पासून
गुण तक्ता- पहिले चार संघ
१. पंजाब – १३ गूण
२. बंगळुरू – १२ गुण
३. राजस्थान – १२ गुण
३. हैदराबाद – १० गुण


