बुधवार २५ जून २०२५

मालवाहू टेम्पो मधून १३ लाख ४८ हजार रुपये लंपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गोव्याहून इचलकरंजीच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोचा चालक उत्तूर येथे जेवणासाठी थांबला असता अज्ञात चोरट्यांनी ड्रायव्हर केबिनमध्ये डॅशबोर्डच्या आत ठेवलेली १३ लाख ४८ हजार ८०० रुपये इतकी रोकड लंपास केल्याची फिर्याद चालक रवी हणमंत माने रा. पाटील मळा, इचलकरंजी याने आजरा पोलिसात दिली आहे. या घटनेमुळे वाहनचालकात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी…
माने हे गोव्याहून इचलकरंजीच्या दिशेने टेम्पो ( एम. एच. दहा ए. डब्ल्यू ८९८२) घेऊन चालले होते. सोमवारी रात्री त्यांनी आपला टेम्पो गडहिंग्लज रस्त्याच्या दिशेने तोंड करून शिवाजी चौक येथे थांबवला व ते जेवणासाठी खाली उतरले. गाडीला चावी तशीच असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने गाडीत प्रवेश करून गाडीतील ड्रायव्हर केबिनच्या डॅशबोर्ड मध्ये ठेवलेली १३ लाख ८० हजार ८०० रुपये इतकी रक्कम लंपास केली. याबाबतची फिर्याद रवींद्र माने यांनी पोलिसात दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर पुढील तपास करीत आहेत.

पाणीच पाणी
सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी धुवांधार पाऊस कोसळल्याने पावसामुळे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिरण्यकेशीसह चित्री नदी पात्राबाहेर पडली असून तालुक्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. अनेक घरामध्ये पाणी शिरले आहे तर घरांची पडझड सुरू झाली असून रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी झाले होते तर शहरांमध्ये सर्वत्र चिखल व पाणी दिसत होते.

तालुक्यातील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बुरुडे, मुरुडे भागातून येणाऱ्या ओढ्याचे पाणी महागाव मार्गावरील मोरीवर आल्याने येथील मोरी खचली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने या परिसराची पाहणी करण्यात आली. रामतीर्थ परिसरातील पाणी पातळीतील कमालीची वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास राम मंदिरात पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टीसह ८० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद आजरा मंडळ मध्ये झाले आहे.
सर्फनाला प्रकल्प दोन दिवसात भरणार… नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा
सर्फनाला प्रकल्प क्षेत्रामध्ये विक्रमी पाऊस होत असून मंगळवारी केवळ आठ तासात तब्बल १९० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे प्रकल्प क्षेत्रात १३९९ मिलिमीटर इतक्या पावसाची मंगळवार दुपारी तीन वाजेपर्यंत नोंद झाला आहे. सध्या ७४.३४ % इतका प्रकल्पात पाणीसाठा आहे. येत्या कांही तासात पावसाचा जोर कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून पाणी सांडव्यावरून बाहेर पडण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

साळगावसह हाजगोळी, दाभिल, सुळेरान, परोली बंधारे पाण्याखाली
तालुक्यातील साळगाव बंधारा सलग दुसऱ्या दिवशी पाण्याखाली असून हाजगोळी, दाभिल, सुळेरान, परोली बंधारेही पाण्याखाली गेले आहेत.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रकल्प निहाय पाणीसाठा पुढील प्रमाणे…
चित्री प्रकल्प ५९.८९ %, चिकोत्रा प्रकल्प ५१.७१% , आंबेओहोळ प्रकल्प ८३.३९%, सर्फनाला ७४.३४ % , उचंगी ३१.६१%, धनगरवाडी १००%, एरंडोळ ९८%

न्यू आजरा रोडलाईन्सची चौकशी सुरू…
सहाय्यक निबंधकांची तपासणी अधिकारी म्हणून नियुक्ती

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
न्यू आजरा रोडलाईन्स सहकारी वाहतूक संस्था मर्यादित कोल्हापूर या संस्थेच्या कामकाजाबाबत अष्कर नन्हू लष्करे यांनी जिल्हा उपनिबंधक यांचेकडे केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी सदर संस्थेच्या तपासणीचे आदेश दिले असून तपासणी अधिकारी म्हणून आजऱ्याचे सहाय्यक निबंधक सुजय येजरे यांची नियुक्ती केली आहे.
लष्करे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या कामकाजाची पूर्ण तपासणी करून तपासणी अहवाल ३० दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आजऱ्यात सरपंचपदाची १ जुलैला आरक्षण सोडत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील सरपंचांची १ जुलैला फेर आरक्षण सोडत होणार आहे. येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता आरक्षण काढण्यात येईल. सन २०२५ ते सन २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी ही आरक्षण सोडत असेल. ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिसुचनेनुसार, सर्वोच्च न्यायालय व जिल्हाधिका यांच्या आदेशानुसार सोडत होत आहे. नागरीकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणाचा टक्का वाढल्यामुळे एका जागेसाठी फेर आरक्षण टाकण्यात येणार आहे.
तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती, सरपंच, उपसरपंच व विविध संस्थाचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मसोली उपसरपंचपदी मनोज गुरव

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मसोली ता. आजरा च्या उपसरपंचपदी मनोज मारुती गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच चंद्रकांत गुरव यांच्या अध्यक्षतेखाली नूतन उपसरपंच निवडीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. बैठकीस रवींद्र होडगे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

जे.पी. नाईक पतसंस्था गडहिंग्लज शाखेचा वर्धापन दिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिक्षणतपस्वी डॉ .जे. पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्या, आजरा गडहिंग्लज शाखेचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. संस्थेचे सल्लागार श्री. पांडुरंग चव्हाण व सौ. रंजना चव्हाण यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा संपन्न झाली. यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. शिवशंकर उपासे यांनी संचालक आणि शाखा सल्लागार यांच्या मार्गदर्शानामुळेच गडहिंग्लज शाखेने दुस-या वर्षात ५ कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे. सभासद व संस्था यांच्यातील नाते एकरुप असल्यामुळेच जे.पी. नाईक पतसंस्थेची सर्व स्थरांवर विश्वासहिता निर्माण झाली आहे असे स्पष्ट केले.
गडहिंग्लज मधील आप्पासाहेब कमलाकर मनोहर पाटील, शशिकांत गोडसे, राजाराम पाटील, बचाराम इंगळे, रोहन कुरबेटटी, संतोष पवार, मधुकर जांभळे, अनिल माने, मोहन चव्हाण, अभिषेक पाटीत आदी उपस्थित होते.
जनरल मॅनेजर संतोष जाधव, शाखा सल्लागार बसाप्पा आरबोळे, शिवाजीराव होडगे, मॅनेजर नागाप्पा कुरळे, सतिश सुतार, यांनी वर्धापन दिनाचे आयोजन केले.

व्यंकटरावच्या स्वराज आणि विवेकची ISRO अभ्यास दौऱ्यासाठी निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षेत व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेच्या कु.स्वराज प्रवीण निंबाळकर व विवेक धनाजी पाटील (इयत्ता नववी) या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत निवड झाल्यामुळे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) येथील अभ्यास दौऱ्यासाठी निवड होवून त्यांचे पाच दिवसांच्या अभ्यास सहली करीता बेंगलोर येथे प्रयाण झाले .
या विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी , सर्व संचालक मंडळ, माजी प्राचार्य श्री. आर.जी. कुंभार, नूतन प्राचार्य श्री. एम एम नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार, वर्ग शिक्षिका सौ. पाटील ए. डी. , विषय शिक्षक श्री. गुरव पी.एस., श्री. चौगुले व्ही. ए., श्रीमती कुंभार एस. के. यांची प्रेरणा व प्रोत्साहन लाभले.
या विद्यार्थ्यांचा कोल्हापूर दक्षिण चे आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते त्यांच्या या अभ्यास दौऱ्याच्या प्रयाण दरम्यान कोल्हापूर येथे सत्कार करण्यात आला.

उर्दू हायस्कूल मध्ये रक्तगट तपासणी शिबिर संपन्न

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
अंजुमन इत्तेहादूल इस्लाम आजरा संचलित डॉ. झाकीर हुसेन अँग्लो उर्दू हायस्कूल अ़ँण्ड ज्युनिअर कॉलेज आजरामध्ये संस्थेचे अध्यक्ष हाजी आलम अहमद नाईकवाडे, सचिव हुसेन दरवाजकर व खजिनदार अष्कर लष्करे आणि सर्व शिक्षकवर्ग यांच्या उपस्थितीत इयत्ता ५ वी ते १० वी ग्रुपच्या विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी शिबीर मोठया उत्साहात पार पडले.
यावेळी या शिबिरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले होते.

जि.प. मतदार संघाबाबत ग्राम विकास मंत्र्यांना आजरेकरांचे निवेदन…

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील कमी झालेला जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाबाबत जिल्हा परिषदेचे ३ आणि पंचायत समितीचे सहा असे मतदारसंघाची पूर्ण रचना व्हावी याकरिता मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री नाम. जयकुमार गोरे यांना पालकमंत्री नामदार प्रकाश आबीटकर तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना मुंबई मंत्रालय येथे निवेदन देण्यात आले व कमी झालेल्या मतदारसंघाबाबत न्याय व्हावा या संदर्भाचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी आमदार शिवाजीराव पाटील व आमदार अमल महाडिक आणि अशोकअण्णा चराटी, दशरथ अमृते ,जयवंत सुतार, संजय सावंत उपस्थित होते.


