दि.२ आक्टोंबर २०२४


बहिरेवाडी येथून एक जण बेपत्ता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बहिरेवाडी तालुका आजरा येथील शिवाजी केशव कापसे हा ४८ वर्षीय शेतकरी बेपत्ता झाला असून याबाबतची वर्दी शिवाजी यांची बहीण अक्काताई काळू भिंगले रा.हडलगे ता.हुक्केरी यांनी आजरा पोलिसात दिली आहे.
बहिरेवाडी येथील राहत्या घरातून काही दिवसापूर्वी जनावरांना वैरण टाकून येतो असे सांगून घरातून निघून गेलेले कापसे हे अद्याप घरी परतले नसल्याचे या वर्दीत म्हटले आहे. आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

युवा महोत्सवात विवेकानंद कॉलेज कोल्हापूर चे वर्चस्व

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील आजरा महाविद्यालयावर झालेल्या चव्वेचाळीसाव्या मध्यवर्ती युवा महोत्सवात लोकनृत्य या कला प्रकारात विवेकानंद कॉलेज कोल्हापुर व शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे महाविद्यालय, मिरज यांनी संयुक्त विजेतपद मिळवले. विवेकानंद कॉलेजने वैयक्तिक व सांघिक प्रकारात सर्वसाधारण विजेतपद पटकावून महोत्सवावर मोहर उमटवली.
बक्षिस वितरण व समारोप समारंभाला ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते शरद भुताडिया प्रमुख उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. अभिनेते भुताडीया, कुलगुरु प्रा. डॉ. शिर्के, जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. टी. एम. चौगले, व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. आर. डी. ढमकले, ॲड. स्वागत परुळेकर, सिनेअभिनेत्री रावी किशोर, प्राचार्य डॉ. अशोक सादळे, दीपक बिडकर, संग्राम भालकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण झाले.
श्री. भुताडीया म्हणाले, कला ही माणसाच्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. युवा महोत्सवातून कला गुणांना वाव मिळतो. या व्यासपीठावर व्यक्त होता येते.
जगतं असतांना पडलेले प्रश्न व चाकट मोडून टाकण्याची जिद्द तयार होते. कुलगुरु प्रा. डॉ. शिर्के म्हणाले, महाविद्यालयाने यशस्वीपणे महोत्सव पार पाडला आहे. येथील नियोजन व संयोजन उत्तम होते. कलेचे संवर्धन व जतन करण्यासाठी हा महोत्सव आहे. प्रभारी संचालक विद्यार्थी विकास विभाग शिवाजी विद्यापीठाचे डॉ. टी. एम. चौगले, विद्यार्थी कलाकार शुभांगी दुबे, संघ व्यवस्थापनातून प्रातिनिधी मनिषा नाईकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. या संस्थेचे संचालक व मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ .सादळे यांनी स्वागत केले. डॉ. अशोक बाचुळकर यांनी सुत्रसंचालन केले. कार्यालयीन अधिक्षक योगेश पाटील यांनी आभार मानले.

मडिलगे येथे रानडुकरांचा धुमाकूळ
भुईमुग पिकाचे नुकसान : बंदोबस्ताची मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे, खेडे परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. हातातोंडाशी आलेले भुईमुगाचे पिक डुकरांचा कळप उध्वस्त करीत आहे. शेतकरी हैराण झाले असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
आजरा तालुक्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव नवा नाही. गवे, जंगली हत्तीकडून पिकांची नुकसान होत असते. यामध्ये रानडुकरांची भर पडली आहे. मडिलगे गावातील सुमारे वीस एकर भुईमुगाचे क्षेत्र रानडुकरांनी उध्वस्त केले आहे. मडिलगे, वडकशिवाले लगतच्या डोंगररांगात रानडुकरांचे कळप वावरत आहेत. ऊस पिकातही त्यांचा वावर असतो. त्यांनी पठार, बरम, टेंबर आणी पायरीकरडील शेतात डुकरांनी नुकसान केले आहे. नागली, भात पिकांचे गव्यांच्या कळपाकडून नुकसान सुरु आहे.
वनविभागाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा भाजपचे तालुका उपाध्यक्ष संदिप पाटील व शेतकऱ्यांनी दिला आहे.

उचंगीतील रवळनाथ विकास सेवा संस्थेला २ लाख ९० हजारांचा नफा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उचंगी येथील श्री. रवळनाथ विकास सेवा संस्थेला संस्थेला आर्थिक वर्षात २ लाख ९० हजारांचा नफा झाला असल्याची माहिती चेअरमन विठ्ठलराव देसाई यांनी दिली. तसेच सभासदांना ६ टक्के लाभांश वाटप करण्याचे त्यांनी जाहीर केले. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.
संस्थेचे सचिव अशोक शिंदे यांनी ताळेबंद, नफा-तोटा पत्रकांचे वाचन केले. यावेळी बोलताना चेअरमन देसाई म्हणाले, संस्थेकडे एकूण भागभांडवल १९ लाख ९१ हजार ८९८ इतके असून राखीव निधी ३ लाख ३६ हजार २७२ इतका आहे. राखीव निधी गुंतवणूक ९ लाख ४४ हजार ९०१ इतकी असून संस्थेला सलग ३ वर्षे ‘अ’ वर्ग मिळालेला आहे. संस्थेकडे सचिव म्हणून २२ वर्षे अशोक शिंदे यांनी चांगल्याप्रकारे कामकाज करून जिल्हा बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती सभासदांना देऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केल्यानेच संस्थेची प्रगती शक्य झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन मनोहर देसाई, संचालक धनाजी शिंदे, रवळनाथ देसाई, दिलीप देसाई, शिवाजी देसाई, संभाजी निंबाळकर, संजय कांबळे, मसणू गुरव, निता कळेकर, सचिव पांडुरंग कुंभार यांच्यासह कर्मचारी, सभासद उपस्थित होते. संचालक उत्तम देसाई यांनी आभार मानले.

अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मेंढोली येथे उद्या उदघाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मेंढोली ता.आजरा येथे गुरूवार दिनांक ३ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता अखिल भारतीय वारकरी मंडळाचे शाखा उदघाटन ह.भ.प. राजाराम जाधव, ह.भ.प. लक्ष्मण शिंत्रे व मार्गदर्शक काॅ. संपत देसाई याच्या उपस्थित होत असून केदारलिंग माऊली भजनी मंडळ मेढोली याच्यावतीने शाखा उदघाटन व प्रवचन किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
ह.भ.प. बाळासाहेब सुतार याचं प्रवचन व ह.भ.प. विश्राम निऊंगरे यांचे किर्तन होणार आहे. यावेळी ह.भ.प. गौरव सुतार तालूका अध्यक्ष, ह.भ.प. संतू कांबळे उपाध्यक्ष, कोडिंबा आडे, कोषाध्यक्ष, पांडूरंग जोशिलकर, गंगाराम येडगे, दिपाली गुरव, कल्पना जाधव, याच्यासह अखिल भारतीय वारकरी मंडळ आजराचे वारकरी संप्रदायातील सदस्य उपस्थित होणार आहेत, तरी आजरा तालुक्यातील तमाम वारकरी, किर्तनकार बंधू भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन शाखा अध्यक्ष प्रकाश घेवडे यांनी केले आहे.


(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



