

आजरा मुलीची छेडछाड प्रकरण …
तणाव निवळला..
शांतता समितीची बैठक शांतता, सुव्यवस्थेचे आवाहन…

आजरा येथे शाळकरी मुलीच्या छेडछाड प्रकरणाचे शहरासह तालुक्यात पडसाद उमटत असताना आज प्रशासनाने संबंधितावर कठोर कारवाईची ग्वाही दिल्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या तीन दिवसाचा आजरा बंद आज मागे घेण्यात आला. शहरातील प्रमुख मान्यवर नेतेमंडळींच्याबरोबर प्रशासनाने येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये बैठक घेतली. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून या वेळी करण्यात आले. त्यामुळे काल मंगळवार (ता. ३) रात्रीपासून एका शाळकरी मुलीच्या छेडछाडीनंतर शहरात तयार झालेली तणावाची स्थिती निव्वळण्यास मदत झाली आहे.

स्नेहसंमेलनानंतर बसस्थानकाकडे जात असतांना एका मुलीची छेड काढण्याचा प्रकार मंगळवारी रात्री आजऱ्यात घडला होता. यामुळे शहरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. पोलीसांनी या प्रकारणाची सखोल चौकशी करून याबाबत जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी काही संघटनांनी केली होती. पोलीस ठाण्यासमोर रात्री मोठा जमाव जमला होता. रात्रीतच गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. राजीव नवले शहरात दाखल झाले. त्यांनी तातडीने कार्यवाहीला सुरवात केली होती. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान कांहीं संघटनांनी तीन दिवसाचा आजरा बंद पुकारला होता. याबाबतच्या पोस्ट सोशल मिडीयावर फिरत होत्या. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आजरा शहरात आज बंद पाळण्यात आला. आजरा शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान आज दुपारी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आजरा शहर व तालुक्यातील प्रमुख मान्यवरांबरोबर प्रशासनाची बैठक झाली. या वेळी तहसीलदार विकास अहिर, डॉ. नवले यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख मंडळींनी आपली मते मांडली. डॉ. नवले म्हणाले, हे शहर आपले घर आहे. त्यामुळे या घराला आग लागू नये याची काळजी घ्या. जो प्रकार घडला आहे तो दुर्दैवी आहे. संबंधीत प्रकाराची सखोल चौकशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करणार आहे. त्याबाबतचा तपास गतीने सुरु आहे. प्रशासनावर अविश्वास दाखवू नका. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवा. प्रशासनाला वेठीस धरू नका. शांतता व सुव्यवस्था बिघडेल असे वर्तन करू नका,
तहसीलदार अहिर म्हणाले, एखाद्याच्या चुकीमुळे कुटुंब, समाज व शहराची होरपळ होते. त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतात. अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. मोहल्ला कमीटी स्थापन करून चुकीच्या घटनावर आळा घालावा. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार,शिवसेनेचे संभाजी पाटील, भादवणचे माजी सरपंच संजय पाटील, अरुण देसाई,मुकुंदराव देसाई, प्रा. सुनिल शिंत्रे, नाथ देसाई, बशीर खेडेकर, आनंदा कुंभार, याहया बुड्डेखान, युवराज जाधव,आनंदा कुंभार, सुनिल डोंगरे, युवराज पोवार, गुरु गोवेकर, अबूसईद माणगावकर,मंजूर मुजावर, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूनील हारूगडे यांच्यासह हिंदू मुस्लिम समाजाचे नेते उपस्थित होते.
मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी आज-यात
तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे लक्षात येताच पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मोठा अधिकारी व कर्मचारी वर्ग तैनात केला . शांतता समितीच्या बैठकीनंतर महसूल व पोलीस विभागाच्या वतीने शहरातून संचलन करण्यात आले.

गडहिंग्लज उपविभागाचे विभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील चंदगड नेसरी गडहिंग्लज भुदरगड व आजरा येथील प्रमुख अधिकारी व पोलीस कर्मचारी आजरा शहरात तैनात करण्यात आले आहेत.जलद कृती दलाचे एक पथकही ठेवण्यात आले आहे.
सोशल मीडियावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित न करण्याचे आवाहन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर व फोटो प्रसारित करू नयेत. अशा मंडळीवर पोलीस प्रशासनाने विशेष लक्ष ठेवले आहे असेही सांगण्यात आले.
शुक्रवारी जन आक्रोश मोर्चा
या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारचा बंद स्थगित करण्यात आल्याचे सांगितले गेले.परंतु हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मात्र कोणत्याही परिस्थितीत गुरुवारी आजरा बंद राहणारच असा निर्धार व्यक्त केला. शुक्रवारी जन आक्रोश मोर्चाही काढण्यात येणार आहे.




