mrityunjaymahanews
अन्य

देवर्डे येथील अल्पवयीन मुलाचे सांगलीतून अपहरण…??

 

देवर्डे येथील अल्पवयीन मुलाचे सांगलीतून अपहरण…??

सांगली येथे विश्रामबाग चौकाशेजारी राहणाऱ्या देवर्डे(ता.आजरा)येथील सुमंत सुरेश तानवडे या अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आल्याची फिर्याद मुलाचे वडील सुरेश जोतिबा तानवडे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली. फिर्यादीत म्हटले आहे की,१७ वर्षीय सुमंत हा सांगली येथील एका महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. विश्रामबाग येथे खोली करून तो रहावयास होता. २० डिसेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास सुमंत हा कामानिमित्त तासगावला जाऊन येतो, असे सांगून बाहेर निघून गेला आहे. मात्र त्याचा काहीच संपर्क होत नाही.

त्याचे मोबाईल लोकेशन हिमाचल प्रदेश असे निष्पन्न होत असल्यामुळे त्याचे अपहरण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


कृष्णा मेणसे यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार 

बेळगांव येथील कामगार, कष्टकऱ्यांचे नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील आघाडीचे नेते कॉ कृष्णा मेणसे यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार पुरस्कार जाहीर झाला आहे.

गेली ८० वर्षांहून अधिक काळ श्रमिक, कष्टकरी, कामगार शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे आणि बिदर-भालकी, बेळगांव-कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी आपले आयुष्य वेचणारे कॉ. कृष्णा मेणसे यांना यावर्षीचा लोकशाहीर द. ना.गव्हाणकर स्मृती पुरस्कार देण्याचा निर्णय आज येथे झालेल्या पुरस्कार व स्मारक समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष रवींद्र आपटे होते.

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्यासोबत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत खांद्याला खांदा लावून लढलेले कॉ कृष्णा मेणसे यांनी तब्बल अकरा महिण्याहून अधिक काळ महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्यासाठी तुरुंगवास भोगाला आहे. एका बाजूला भाषावार प्रांतरचनेत कर्नाटकात राहिलेल्या मराठी भाषिकांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना लाल बावटा खांद्यावर घेऊन बेळगांव परिसरातील श्रमिक कष्टकऱ्यांचे अनेक लढे त्यांनी लढविले. गोकाक येथील गिरणी कामगारांचा प्रश्न असो कि हिंडालको कंपनीच्या कामगारांना न्याय देणे असो कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. कामगारांच्या बरोबरच खानापूर तालुक्यातील त्यांनी काढलेला शेतकऱ्यांचा बंदूक मोर्चा विशेष गाजला होता.

चळवळीत कार्यकर्ता म्हणून काम करीत असताना त्यांनी पत्रकारिताही केली. हेमंत नावाचे मासिक आणि नंतर साम्यवादी नावाने साप्ताहिक सुरु करून आपल्या लेखणीतून कष्टकरी श्रमिकांचे प्रश्न मांडले. त्यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा मोठा प्रभाव होता. राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्यासोबत बेळगांव परिसरात सत्यशोधक विचारांच्या प्रसाराचे त्यांनी काम केले. कार्यकर्ता पत्रकार म्हणून काम करीत असताना त्यांनी उत्तम वैचारिक साहित्यही जन्माला घालून प्रबोधनाच्या चळवलीला गती देण्याचे काम केले आहे. हो ची मिन्ह यांचे चरित्र, बसवेश्वर ते ज्ञानेश्वर, अशा तोडल्या बेड्या, असा लढलो असा घडलो, गोठलेली धरती पेटलेली मने, गोवा मुक्ती आंदोलन, डॉ आंबेडकर आणि बुद्धधर्म याबरोबर विरगाथा या कन्नड पुस्तकाचे अनुवादन, परिक्रमा प्रवासवर्णन, वीररांनी कित्तूर चन्नामा इतके विपुल लेखन आपल्या धकाधकीच्या आयुष्यात केले आहे. लोकशाहीर द. ना. गव्हाणकर आणि त्यांचे व्यक्तिगत आयुष्यात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. पुरस्कार वितरण २२ जानेवारी २०२३ रोजी आजरा येथे होणार आहे.
बैठकीच्या सुरवातीला समितीचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी मागील तीन वर्षाचा आढावा घेतला. त्यानंतर कांही नावे पुरस्कारासाठी पुढे आली त्यातून कॉ. कृष्णा मेणसे यांचे नाव यावर्षीच्या पुरस्कारासाठी सर्वानुमते निश्चित करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, जेष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे, प्रा नवनाथ शिंदे, सचिव सुनील पाटील, नामदेव नार्वेकर, संजय घाटगे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

शालेय पोषणचे मानधन २३हजार करा

आज-यात शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा मेळावा


आजरा तालुका शालेय पोषण आहार कामगार संघटना (फेडरेशन) (सी आय टी यु)चा मेळावा येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये संपन्न झाला.यावेळी मदतनीसांचे मानधन २३ हजार करण्याची मागणी करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष काॅम्रेड प्राचार्य ए.बी.पाटील यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हा कमिटी व शालेय पोषण आहार ठेकेदार,स्वयंपाकी व मदतनीस यांच्या उपस्थिती मेळावा उत्साहात पार पडला .

जिल्ह्याच्या नुतन जनरल सेक्रेटरी निवेदिता वासमकर व नुतन जिल्हा उपाध्यक्ष तानाजी कुंभार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी पुढच्या महिन्याचे धान्य आधिच्या महिन्यात पंधरा दिवस आधी मिळावे,धान्य पुरवठा नियमितपणे झाला पाहिजे आणि पुरवठा करण्याआधी धान्याची गुणवत्ता तज्ज्ञ व्यक्तींकडून आणि आमच्या संघटनेच्या पाच महिलांकडून करुन घ्यावी,बचत गटांना भाजीपाला, इंधनावर त्याचप्रमाणे मदतनीस, स्वयंपाकी यांचे मानधन दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत. मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील गडहिंग्लज,सदस्या मलिकवाडे,कमल पाटील,बाळकृष्ण कुरूंदवाडे,यशवंत डेळेकर,परशुराम बांदेकर,विजय गणाचारी चंदगड,गडहिंग्लज तालुका अध्यक्ष शालन मोहिते,आजरा तालुका अध्यक्ष रेखाताई देवलकर, नंदा राणे,राजेंद्र मयेकर व आजरा तालुक्यातील स्वयपाकी मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हा खजिनदार संतोष देसाई यांनी आभार मानले.

🟡🟢’या’ लोकांना द्यावा लागणार नाही टोल, सरकारने जारी केली यादी

केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्रालयाने टोलविषयी मोठी माहिती दिलीय. मंत्रालयाकडून यादी जारी करण्यात आलीय. यामध्ये कोणत्या लोकांना राष्ट्रीय महामार्गावर टोल टॅक्स भरावा लागणार नाही, याविषयीची ही यादी आहे. त्यांना टोलमध्ये सूट मिळणार आहे. सरकारने सांगितलं की, नव्या नियमांतर्गत टोल टॅक्समध्ये या लोकांना सूट मिळेल.

टोल एनएचआयकडून वसूल केला जातो. जर तुम्ही महामार्गावर चारचाकी वाहनाने प्रवास करत असाल तर टोल द्यावा लागतो. जर तम्ही दोन चाकी वाहनाने प्रवस करत असाल तर टोल वसुली केला जात नाही. दुचाकी वाहन खरेदी करतानाच ग्राहकांकडून रोड टॅक्स घेतला जातो.

यांना मिळणार सूट

>> भारताचे राष्ट्रपती
>> भारताचे उपराष्ट्रपती
>> भारताचे पंतप्रधान
>> भारताचे मुख्य न्यायाधीश
>> राज्याचे राज्यपाल
>> संघाचे कॅबिनेट मंत्री
>> सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती
>> लोकसभेचे अध्यक्ष
>> संघ राज्यमंत्री
>> संघाचे मुख्यमंत्री
>> केंद्र शासित प्रदेशाचे उपराज्यपाल
>> पूर्ण सामान्य किंवा समतुल्य पद धारण करणारे प्रमुख कर्मचारी
>> राज्याचे विधान सभेचे अध्यक्ष
>> उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
>>राज्याच्या विधान परिषदेचे अध्यक्ष
>> उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
>> भारत सरकारचे सचिव
>> राज्यांचे परिषद
>> संसद सदस्य आर्मी कमांडर, व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ
>> संबंधित राज्यांतर्गत एका राज्य सरकारचे मुख्य सचिव
>> राज्याच्या विधानसभेचे सदस्य
>> राजकीय प्रवासांवर असलेले परदेशी प्रतिष्ठीत व्यक्ती

उपरोक्त यादीशिवाय-

अर्धसैनिक दल आणि पोलिस, वर्दीतील केंद्रीय आणि राज्य सशस्त्र दल, अग्निशमन विभाग वा संघटना, कार्यकारी मजिस्ट्रेट, राष्ट्रीय हायवेचे निरीक्षण, सर्वेक्षण, निर्मिती वा संचालन, शव वाहन, रक्षा मंत्रालय आणि दिव्‍यांगासाठी बनवण्यात आलेल्या मेकॅनिकल वाहनासाठी टोल द्यावा लागणार नाही.

🟪🟪पुणं पुन्हा हादरलं! व्हॉट्सअप ग्रुपमधून काढल्याने जीभचं कापली

♦️व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केल्यावरून बाचाबाची झाल्यानंतर पाच जणांनी एकाला बेदम मारहाण करत जीभ कापल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील फुरसुंगी भागात ही धक्कादायक घटना घडली असून, याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार २८ डिसेंबर रोजी घडला. तक्रारदार दाम्पत्य व आरोपी एकाच सोसायटीत वास्तव्यास आहेत. सोसायटीतील रहिवाशी असणाऱ्या व्यक्तींचा तक्रारदारांच्या पतीने “ओम हाईट्स ऑपरेशन” या नावाने व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता. त्यात सर्व सदस्य ही होते. तक्रारदार यांचे पती या ग्रुपचे अ‍ॅडमिन होते. दरम्यान, त्यांनी यातील एका व्यक्तीला जो याप्रकरणात आरोपी आहे. त्या ग्रुपमधून रिमूव्ह म्हणजे काढून टाकले.

या गोष्टीचा त्यांनी तक्रारदारांच्या पतीला विचारणा केली. मात्र त्यांना काही उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी तक्रारदारांच्या पतीला फोन करून भेटायचे आहे, असे सांगून भेटण्यास बोलावले.त्यावेळी ग्रुपमध्ये कोणीही कसलेही मेसेज करत असल्याने ग्रुपच बंद केला असल्याचे सांगितले, असता आरोपीने पाच जणांसोबत येऊन तक्रारदारांना मारहाण केली. त्यांच्या तोंडावर बुक्की मारली, या बुक्कीचा फटका इतका जोरात होता की दातासह जिभेवर त्याचा मार लागला यात ते जखमी झाले असून त्यांच्या जिभेला टाके पडले आहेत.

Source:wpnews

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!