
गाड्यांसह चालकांच्या हाडांचा खुळखुळा…
आंबोली-गडहिंग्लज मार्गाची दुर्दशा…

आंबोली ते गडहिंग्लज दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. एकीकडे महामार्गाचे स्वप्न वाहनधारक पाहत असले तरीही दुसरीकडे सद्यस्थितीला या मार्गावर पडलेले खड्डे, चुकवताना करावी लागणारी कसरत, वारंवार दुचाकी व चार चाकी गाड्या खड्ड्यातून घालाव्या लागत असल्याने या गाड्यांसह वाहन चालकांच्या हाडांचा खुळखुळा होण्याची वेळ आली आहे. गाड्या गॅरेज मध्ये तर मालक दवाखान्यात अशी परिस्थिती दिसत आहे.
गेले नऊ ते दहा महिने रस्त्याचे काम सुरू आहे या कामाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड प्रमाणात रस्त्यांची खुदाई सुरू आहे रस्त्यांकरता लागणाऱ्या मुरूम खडी सिमेंट यासारख्या कच्च्या मालांच्या वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून हा माल ठिकठिकाणी पडल्यामुळे रस्त्यांची पूर्ण दुर्दशा झाली आहे. रात्रंदिवस रस्त्याच्या कामाची अवजड वाहने मार्गावरून फिरताना दिसतात. यामुळे पडलेले खड्डे चुकवताना वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. काही ठिकाणी तर खड्डे चुकवणे केवळ अशक्य असल्याने खड्ड्यातूनच वाहने पुढे न्यावी लागतात. याचा परिणाम म्हणून वाहनांचा खुळखुळा होत आहे. अनेक वाहने दुरुस्तीकरता गॅरेजमध्ये व स्वच्छतेकरता सर्व्हिसिंग सेंटरला लावलेली दिसतात. लहान मोठे अपघात होऊन वाहन चालकांना दवाखाना गाठावा लागत आहे.
आणखी किती दिवस हा त्रास सहन करावा लागणार ? असा सवाल आता या मार्गावरील वाहन चालक करू लागले आहेत.
कारखाना सुरू झाल्यानंतर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता…
येत्या महिन्याभरात आजरा साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होत आहे. गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची या मार्गावर प्रचंड वर्दळ वाढणार आहे. रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. मध्येच पावसाने हजेरी लावली तर खड्ड्यांचे डबक्यात रूपांतर होताना दिसते. हे चित्र असेच राहिल्यास कारखाना सुरू झाल्यानंतर वाहतुकीची परिस्थिती बिकट होणार आहे.

आजऱ्यातील बिगरशेती प्रकरणांची चौकशी करा- संग्राम सावंत
मुक्ती संघर्ष समिती आक्रमक

आजरा शहरातील भावेश्वरी कॉलनीमध्ये रस्ता, गटर्स व इतर पायाभूत सुविधा ताबडतोब मिळाल्या पाहिजेत, तसेच आजरा तालुक्यातील बिगरशेती केलेल्या तालुक्यातील सर्व गट नंबर प्रकरणांची परिपूर्ण चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुक्ती संघर्ष समितीचे राजाध्यक्ष संग्राम सावंत यांनी आजरा तहसीलदार समीर माने यांना निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बुरुडे (ता.आजरा) येथील नवीन वसलेल्या भावेश्वरी कॉलनीमधील येथील रहिवासी लोकांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. भावेश्वरी कॉलनीमधील संबंधित जागा मालकांनी रहिवाशी प्लॉटधारकांना अकृषक (बिगरशेती) NA करून राहण्यासाठी विकले. पण, तेथे गटर्स, रस्ते, वीज पुरवठा या पायाभूत सुविधा दिलेल्या नाहीत. या प्लॉटधारकांना रस्ता व गटर्स यांच्या सोयी उपलब्ध नसल्याने त्यांना पावसाळ्यात व इतर ऋतूमध्ये नाहक त्रास होत आहे. यासाठी त्या कॉलनीमध्ये ताबडतोब रस्ता व गटर्स व इतर पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत.
आजरा तालुक्यातील येथील सन-२०१० ते सन -२०२३ आजपर्यंत बिगरशेती केलेल्या तालुक्यातील सर्व गट नंबर प्रकरणांची परिपूर्ण चौकशी झाली पाहिजे. तसेच बिगरशेती सर्व गट नंबरमधील फेरफार कसे घातले आहेत. याबाबतीत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी आणि NA संदर्भातील आदेश (ऑर्डर) कशा झालेल्या आहेत. याबाबतीत तत्कालीन सर्व तहसीलदार याची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच तत्कालीन नायब तहसीलदार डी. डी. कोळी यांच्या सह्यांच्या आधारे त्यांच्या काळातील सर्व बिगरशेती प्रकरणांची कायदेशीररित्या चौकशी करून त्यांच्यासह सर्व संबंधितांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
यावेळी सुनील हरेर,सागर करमळकर, संजय कुंभार, अनिल चौगले, विनोद ओतारी, लखन पाटील, संगीता जादूनवर, मंगल घोरपडे, मोहन गावडा, प्रमोद पाटील, दिंगबर विटेकरी, संघर्ष प्रज्ञावंत, संजय कांबळे, मजीद मुल्ला, राहुल दास, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आजरा महाविद्यालयात भरडधान्य पाककृतीचे प्रदर्शन

अण्णा-भाऊ स्मृती पंधरवड्यानिमित्य व आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष – २०२३ उपक्रमांतर्गत वनस्पतीशास्त्र, व पर्यावरण शास्त्र विभागाच्यावतीने भरडधान्य पाककृतीचे प्रदर्शन भरवण्यात आले. प्रदर्शनाचे उदघाटन आजरा साखर कारखान्याचे चेअरमन प्रा. सुनील शिंत्रे, आजरा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अनिकेत चराटी, यांच्या हस्ते झाले.
डॉ. आर. एस. कर्पे यांनी प्रास्ताविकात भरडधान्याविषयी माहिती सांगितली. ज्वारी,बाजरी, नाचणी, राजगिरा, राळे, वरी इत्यादीपासून बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. ज्वारीचे धपाटे, धिरडे, वड्या, आंबोली, आंबील, कन्या, बाजरीचे, लाडू, भाकरी, चकल्या, कापण्या, लाह्या, नाचणीचे लाडू, पापड, नाचणीचे उकडीचे मोदक, बर्फी, नाचणीचा केक, नाचणीचे घावन, नाचणीचे डोसे, अप्पे, राळे पासून गुलाब जामून, भात, अशा विविध ३० पाककृती तयार करून मांडण्यात आल्या आहेत.
स्वागत डॉ. टी. आर. कावळे यांनी केले.यावेळी संस्थेचे संचालक के.व्ही.येसणे, उपप्राचार्य डी.पी. संकपाळ, पर्यवेक्षक एम एच देसाई, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील प्रा.सौ.लता शेटे, प्रा.अनुराधा गोटखिंडे, सौ.पारकर,सौ.केंद्रे प्रा.बाळासाहेब कांबळे व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रदर्शनाचे संयोजन डॉ. आर. एस. कर्पे व प्रा.मल्लिकार्जून शिंत्रे यांनी केले. आभार प्रा. एस.के.जाधव यांनी मानले.
धुरळा ग्रामपंचायत निवडणुकांचा…
कार्यक्रम पुढील प्रमाणे :-
■ अर्ज भरणे -१६ ते २० ऑक्टोबर- सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत
■ छाननी-ता. २३ ऑक्टोबर-सकाळी अकरापासून
■ अर्ज माघारी ता. २५ ऑक्टोबर -दुपारी तीनपर्यंत
■ चिन्ह वाटप-ता. २५ ऑक्टोबर – दुपारी तीननंतर
■ मतदान-ता. ५ नोव्हेंबर-सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत
■ मतमोजणी- ता. ६ नोव्हेंबर-सकाळी आठपासून


