

छप्पर उडाले…
झाडे कोसळली…पुन्हा वीजपुरवठा खंडीत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सलग दुसऱ्या दिवशी आजरा तालुक्यात जोरदार वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले, ठिकठिकाणी झाडे कोसळली तर तब्बल पाच तास वीज पुरवठा खंडित झाला. पावसाने मात्र किरकोळ हजेरी लावली .
शुक्रवारी दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली पावसापेक्षा वारीत जास्त असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याशेजारील झाडे पडून वाहतूक खोळंबली.
रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

सुराज्य व रामराज्य आणण्यासाठी प्रा. मंडलिक यांना विजयी करा :सुधीर कुंभार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देशामध्ये सुराज्य व रामराज्य आणण्यासाठी, देशाची शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी व पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना विजयी करा असे आवाहन भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी केले. प्रा. मंडलिक यांच्या प्रचारार्थ आजारा तालुक्याच्या पश्चिम भागात झालेल्या संपर्क दौऱ्यात ते बोलत होते.
आजरा तालुक्यातील किटवडे, लिंगवाडी, अंबाडे, घाटकरवाडी, धनगरमोळा, सुळेरान ,दर्डेवाडी, मेढेवाडी, देवर्डे, आल्याचीवाडी, वेळवट्टी येथे संपर्क दौरा पार पडला.
यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक प्रा.अर्जुन आबिटकर म्हणाले, पंतप्रधान मोदी हा देशासमोरील आश्वासक चेहरा असून देशाला विकसित करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. गेल्या दहा वर्षात अनेक धाडसी निर्णय घेऊन पंतप्रधान मोदी यांनी देशाची प्रतिमा उंचावली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ठिकठिकाणी झालेल्या बैठकामध्ये नाथा देसाई, संजय पाटील, बाळ केसरकर ,गोविंद गुरव, जी. एम. पाटील आदींनी मार्गदर्शन केले.
दौऱ्यामध्ये विजय थोरवत, परशुराम बामणे, दशरथ अमृते, काका देसाई, इंद्रजीत देसाई, मंदार बिरजे, धनंजय पाटील, संतोष भाटले, सुनील देवेकर, उदय चव्हाण, विनोद जाधव, दयानंद निऊंगरे, दत्ता पाटील, उत्तम कासार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आज-यात आज आम. सतेज पाटील, भास्कर जाधव यांची सभा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार श्री शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ आज शनिवार दिनांक २७ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता दाजी टोपले नाट्यगृह, भाजी मंडई येथे आमदार सतेज पाटील व आमदार भास्कर जाधव यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आजच्या सभेत आमदार पाटील काय बोलणार ? याकडे संपूर्ण तालुका वाशी यांचे लक्ष लागून आहे.

महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा हेल्मेट सक्तीला विरोध

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गडहिंग्लज मधुन संकेश्वर – आंबोली असा महामार्ग बनवण्याचे काम चालू आहे. सुरुवातीपासून आम्ही सरकारकडे निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या जमिनी रीतसर संपादन करून मोबदला देणे, तसेच जिथे रस्ता क्रॉस करावा लागतो तेथे हायवेवर प्रवेश करण्यासाठी तरतूद करा व हेल्मेट सक्तिपेक्षा रस्त्याच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्या. असे सांगत संकेश्वर बांधा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी हेल्मेट सक्तीला विरोध दर्शवला आहे.
ग्रामीण भागामध्ये अनेक गावाच्या मधून रस्ता महामार्ग गेला आहे तिथे उड्डाणपुलाची गरज आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी अत्याळ – बेळगुंदी जवळ रस्ता पास करताना एका महिलेला जीव गमवावा लागला. चालत जाणारी महिला हेल्मेट घालू शकते का? हेल्मेट मुळे वाहन चालवणारा सुरक्षित राहील मात्र नागरीक, शालेय विद्यार्थी यांच्या सुरक्षिततेसाठी जे उपाय करणे गरजेचे आहे त्याबाबत पोलिसांनी सरकारला अहवाल देऊन कंपनीला कामाबाबत व पर्यायी मार्गा बाबत सूचना देणे गरजेचे आहे तसेच शहरामध्ये वाहतूक कोंडी होते त्याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
आवश्यक त्या प्रमाणात पोलिस नसल्याने ब-याच वेळा या समस्या निर्माण होतात त्यामुळे पोलिसांची भरती करण्यासाठी सरकारनेही लक्ष देणे आवश्यक आहे.
कोल्हापूर मध्ये हेल्मेट सक्तीला विरोध करून नागरिकांनी डाव हाणून पाडला होता. आता तोच प्रयोग गडहिंग्लज मध्ये चालू करण्याचा प्रयत्न आहे. कृपया हेल्मेट सक्ती करू नये. महामार्गावरून दीर्घ प्रवास करण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेट असावे; मात्र सक्ती नसावी. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे ; याबाबत प्रबोधन आवश्यक आहे. मात्र हेल्मेट सक्ती करून गोरगरीब शेतकरी कामगार कामा निमित्त शहरात ये-जा करत असतात. अशा नागरिकांना विनाकारण त्रास दिला जाऊ शकतो. महसूल गोळा करण्याचा हा नवा प्रयोग असावा असा संशय ही संघटनेने व्यक्त केला आहे. जनतेच्या भावना लक्षात घेऊन हेल्मेट सक्तीचा निर्णय मागे घ्यावा अशी नागरिकांची मागणी आहे. कृपया विचार व्हावा अन्यथा विनाकारण नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागेल. कृपया हेल्मेट वापराबाबत प्रबोधन असावे; मात्र सक्ती नसावी अशा आशयाचे निवेदन संघटनेमार्फत गडहिंग्लज उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

बळीराजा कुरकुंदेश्वर पतसंस्थेला ३७ लाख ७६ हजारांचा ढोबळ नफा : चेअरमन शिवाजी देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली येथील श्री बळीराजा कुरकुंदेश्वर पतसंस्थेला आर्थिक वर्षात ३७ लाख ७६ हजार इतका ढोबळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन शिवाजी देसाई यांनी दिली.
संस्थेकडे ९९ लाख ४४ हजार १७५ इतके वसुल भागभांडवल असून ११ कोटी ६१ लाख ८३ हजार ५८४ इतक्या ठेवी आहेत. १ कोटी १२ लाख ३४ हजार ९५३ इतका निधी असून संस्थेने ९ कोटी १५ हजार ८४२ इतके कर्ज वाटप केले आहे. संस्थेने तरलेपोटी ४ कोटी ७७ लाख ७२ हजार ३९१ इतकी गुंतवणूक केली आहे. संस्थेचा ४४ कोटी २४ लाख १८ हजार इतका एकूण व्यवसाय आहे. संस्थेचे खेळते भागभांडवल १५ कोटी ५९ लाख ५५ हजार ६२८ इतके असल्याचे चेअरमन देसाई यांनी सांगतिले.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी उपस्थित होते.



