
उत्तूरच्या तरुणाचा नदीत मृतदेह आढळला

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर येथील नामदेव बाळू खांडेकर (वय ४०, रा. उत्तूर, ता. आजरा) यांचा मृतदेह आकुर्डे येथील नदीपात्रात आढळून आला. नामदेव खांडेकर हा घरातील कोणालाही न सांगता निघून गेला होता.
दरम्यान काल आकुर्डे येथील नदीपात्रातील पाण्यात त्याचा मृतदेह आढळला. याबाबतची वर्दी मृताचा भाऊ संतोष खांडेकर यांनी भुदरगड पोलिसांत दिली आहे.
नामदेव हा टेम्पो चालक होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई -वडील असा परिवार आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे…
भाजपाचा आंदोलनाचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरातून सध्या सुरू असलेले संकेश्वर- बांदा या राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. यामुळे ठिकठिकाणी गटर्स ढासळत पाणी तुंबल्याने असून शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. तातडीने या कामातील त्रुटी काढाव्यात अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
सिद्धिविनायक कॉलनी येते आत येण्यासाठीच्या रस्त्याला असणारी गटर पुन्हा ढासळली आहे .तसेच कॉलनी मधून येणारी गटर मेन गटरला जोडली नसल्यामुळे घाण पाणी तुंबलेले आहे. त्यामुळं दुर्गंधी सुटलेली आहे.
तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली असून यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अनिरुद्ध केसरकर इतर मागास सेलचे गौतम भोसले, अभिजीत रांगणेकर,उमेश पारपोलकर, शुभम पाटील, तौफिक आगा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रदीप तुपट यांचे कौतुकास्पद यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
किणे येथील पोस्टमास्तर महादेव तुपट यांचा मुलगा प्रदिप उपशिक्षणाधिकारी बनला असून यावेळी किणे ग्रामस्थांनी प्रदीप तुपट यांची गावातून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.
प्रदीप महादेव तुपट यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा २०२२ मध्ये दिली होती यामध्ये यशस्वी होत त्यांची उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली आहे .अगदी सामान्य कुटुंबात जन्मलेल्या प्रदीप तुपट यांच्या यशामुळे किणे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

एक जण बेपत्ता

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बहिरेवाडी ता. आजरा येथून गवंडी काम करणारी प्रकाश दत्तू मोरे ही ४० वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली असल्याची वर्दी प्रकाश यांच्या पत्नी सौ.संगीता प्रकाश मोरे यांनी पोलिसात दिली आहे.
चार दिवसापूर्वी कामावर जातो असे सांगून घराबाहेर पडलेले मोरे अद्याप परतलेले नाही असे वर्दीत म्हटले आहे.



