
मुंगूसवाडीत धुमशान…
पाच जखमी ,नऊ जणांविरोधात गुन्हा नोंद
. आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुंगूसवाडी ता. आजरा होळी सणाची लगबग सुरू असतानाच किरकोळ कारणावरून झालेल्या मारामारीत पाच जण जखमी झाले असून पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
याप्रकरणी दत्तात्रय महादेव सावंत यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत शेतीच्या जुना वादाचा राग मनात धरून बबन नारायण कोंडुसकर, अंजना बबन कोंडुसकर, आकाश बबन कोंडुस्कर, अनिकेत बबन कोंडुसकर, व संकल्प रवींद्र सावंत यांनी दयानंद गुंडू रेडेकर यांच्यासोबत आपण शेकोटीला बसलो असताना अचानक येऊन लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. यामध्ये स्वतः दत्तात्रय सावंत व दयानंद गुंडु रेडेकर हे जखमी झाले आहेत. या फिर्यादीवरून बबन कोंडुस्कर, अंजना कोंडुस्कर,आकाश कोंडुसकर, अनिकेत कोंडुस्कर व संकल्प सावंत यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान बबन नारायण कोंडुसकर यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये दयानंद गुंडू रेडेकर यांनी आपल्या दारात फटाके वाजवून घरात घुसून दयानंद यांच्यासह दत्तात्रय महादेव सावंत, मयुरी दयानंद रेडेकर व प्रीतम दत्तात्रय सावंत यांनी आपणाला मारहाण केली असे म्हटले आहे.यामध्ये बबन नारायण कोंडुस्कर,अंजना नारायण कोंडुसकर, आकाश बबन कोंडूसकर हे तिघेजण जखमी झाले आहेत.
सर्व जखमी गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली आजरा पोलीस करीत आहेत.

कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या हालचाली सुरू..नगरपंचायतीत बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहर अन्याय निवारण समिती व नगरपंचायतीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आज बैठक पार पडली.
बैठकीमध्ये प्रामुख्याने भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यावर जोर देण्यात आला. त्यावर मुख्याधिकारी सूरज सुर्वे म्हणाले, यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार पूर्ण केलेला आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री मागविण्यात येईल.
तसेच नेवरेकर कॉलनी, गांधीनगर येथील पाण्याच्या लाईनची जी अडचण होती ती तातडीने कामगार पाठवून देऊन काम चालू केले आहे .जिथे जिथे गटर्स तुंबलेल्या आहेत ते ताबडतोब साफ करून घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीसाठी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष प्रा.सुधीर मुंज, सेक्रेटरी सुधीर कुंभार, सचिव विजयभाऊ थोरवत, सहसचिव गौरव देशपांडेंसह सेक्रेटरी पांडुरंग सावरतकर ,डॉ. डिसोजा , डॉ.प्रविण निंबाळकर , राजू विभुते ,जावेद पठाण, अनिल पाटील ,दयानंद भोपळे,मेजर जोतिबा आजगेकर , रवी तळेवाडीकर, इत्यादी सदस्य हजर होते.

पेरणोलीत तुकाराम बीज सोहळ्याला हजारो भाविकांची हजेरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता आजरा येथे सुमारे ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या संत तुकाराम बीज सोहळ्याला जिल्ह्यातील हजारो भाविकांनी हजेरी लावली.
तुकाराम बीजच्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसापासून पारायण, प्रवचन व किर्तन सुरू आहे.वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाला आहे.भजन, किर्त़नाच्या निनादाने परीसर दुमदुमून गेला आहे.
बीजनिमित्त सकाळपासून भजन,किर्त़नाचा गजर सुरूआहे.सकाळी१०वाजता ह.भ.प. अँड. कृष्णा महाराज चावरे यांचे किर्तन सुरू झाले. त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगांचे निरूपण केले. दुपारी बारा वाजता तुकाराम महाराजांची आठवण व विचारांना उजाळा देण्यासाठी हजारो भाविकांनी फुलांची पूष्पवृष्टी केली.यावेळी वारकऱ्यांसह महिला, तरुण व बालचमूंनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
दरम्यान दुपारी व संध्याकाळी भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. बीजनिमित्त बालगोपालासाठी,खेळणी, आईस्क्रीम, थंड पेयांची दुकाने थाटण्यात आली होती.

उत्तूर विद्यालयाच्यावतीने जोमकाईदेवी परिसरातील स्वच्छता
उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील उत्तूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्यावतीने सलग २५ वर्षापासून येथील ग्रामदैवत जोमकाईदेवी परिसराची स्वच्छता करण्यात आली. जोमकाईदेवी यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरातील स्वच्छता केली जाते. यंदाही विद्यार्थी व शिक्षकांनी स्वच्छता केली. यावर्षी विद्यालयाच्या वतीने स्टॉलधारक व्यावसायिकांना कचरा एकत्रित करण्यासाठी बॉक्स देण्यात आले होते. स्वच्छतेनंतर विद्यार्थ्यांना शाळेचे माजी विद्यार्थी कुंभार यांच्यावतीने खाऊचे वाटप करण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेचे आयोजन मुख्याध्यापक शैलेंद्र आमणगी, इंद्रजित बंदसोडे, ईश्वर शिवणे, बाबासाहेब पाटील, संदीप बादरे, अशोक जाधव, चिदंबर पोतदार यांनी केले.

शेळप येथे आज दशावतारी नाटकाचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शेळप येथे होळीनिमित्त गुरूवार दि. २८ रोजी दशावतारी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. भैरवनाथ दशावतार नाट्य मंडळ, शेळप यांचा महान पौराणिक ‘हुडलासुर वध’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. रात्री ११ वाजता नाटकाला सुरुवात होणार असून याचा लाभ पंचक्रोशीतील नागरीकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

निधन वार्ता…
पवन डोंगरे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भादवण ता.आजरा येथील पवन दत्तात्रय डोंगरे या २७ वर्षीय तरुणाचे बुधवारी पहाटे पुणे येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. कामानिमित्त सध्या तो पुणे येथेच वास्तव्यास होता.
पवन याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा त्याच्यावर भादवण या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.



