
शनिवार दिनांक २ नोव्हेंबर २०२४




आजरा जिल्हा परिषद मतदार संघात राजकीय धुमशान सुरू
नेते मंडळींच्या भूमिका स्पष्ट…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील बहुतांशी प्रमुख नेते मंडळींच्या विधानसभा निवडणुकीतील भूमिका स्पष्ट झाल्याने आता राजकीय धुमशान सुरू झाले आहे.
आजरा जिल्हा परिषद मतदार संघामध्ये आजरा शहरासह तालुक्याच्या पश्चिम भागाचा समावेश होतो. हा भाग मूळ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. आता राष्ट्रवादीतच फूट पडल्याने यापुढील कालावधीत हा बालेकिल्ला राखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींना प्रयत्न करावे लागणार आहेत. या मतदार संघातील अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, मुकुंदराव देसाई, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, संभाजी पाटील,कॉ.संपत देसाई , उदयराज पवार, रशीद पठाण,भाजपाची मंडळी यांच्या भूमिका स्पष्ट झाल्याने विधानसभा निवडणुकीतील मताधिक्य मिळवण्याच्या दृष्टीने विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील व अपक्ष उमेदवार ए.वाय.पाटील यांनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्याही मोठी आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी आपला जनसंपर्क वाढवून या भागात विविध विकास कामांद्वारे कामाचा ठसा उमटवला आहे. कार्यकर्त्यांशी असणारा थेट संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे .
माजी आमदार के. पी. पाटील यांच्या पाठीशी राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसमधील बडी नेते मंडळी असल्याने या जि.प. मतदारसंघात मताधिक्य मिळवताना आमदार आबिटकर यांची चांगलीच दमछाक होणार आहे. तर ए.वाय. पाटील यांचीही या मतदारसंघातील एन्ट्री व त्यांच्यासोबत असणारी तरुण कार्यकर्ते मंडळी पाहता मतदार संघात मताधिक्याच्या समीकरणात सावळा गोंधळ होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत या जि.प. मतदार संघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले होते. परंतु विधानसभा निवडणुकीत रिंगणात असलेले उमेदवार मतदारांशी थेट संबंधित असल्यामुळे लोकसभा व विधानसभेच्या परिस्थितीमध्ये बराच फरक दिसत आहे.
अण्णाभाऊ संस्था समूहासह अशोकअण्णा चराटी यांचे नेतृत्व मानणारी मंडळी आम. प्रकाश आबिटकर यांच्या पाठीशी राहणार आहेत. यापुर्वी एकगठ्ठा असणाऱ्या मुस्लिम मतांमध्येही फूट पडून वैयक्तिक संबंधावर आबिटकर यांनाही चांगले मतदान होईल असे दिसत आहे. तर के. पी. पाटील यांना राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना व मुस्लिम बांधव यांची मतांची घसघशीत रसद मिळेल असे दिसत आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांसह अजित दादा पवार यांच्या कार्यकर्त्यांचीही त्यांना मदत होणार असेही दिसत आहे. अपक्ष उमेदवार ए.वाय. पाटील यांनीही मतदारांशी थेट संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या माध्यमातून तिसरा पर्याय मतदारांसमोर उभा राहिला आहे. त्यांचा सुरू असलेला मतदारांशी संपर्क, मिळणारा चांगला प्रतिसाद प्रत्यक्ष मतदानात कितपत रूपांतरित होणार हे देखील महत्त्वाचे आहे.
एकंदर आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील नेत्यांच्या भूमिका जसजशा स्पष्ट होत आहेत तसे या मतदारसंघातून मताधिक्य मिळवण्याच्या दृष्टीने उमेदवारांची जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.


राहुल देसाई पुन्हा काँग्रेसमध्ये….

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव व माजी जिल्हा परिषद सदस्य राहूल देसाई यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतत असून ४ नोव्हेंबर रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, खासदार शाहू महाराज, माजी आमदार मालोजीराजे याच्या प्रमुख उपस्थितीत ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
भाजपा मध्ये गेल्यानंतर ते तेथे फारसे रमले नाहीत. अलीकडेच त्यांनी भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.



सभा मंडप व संरक्षक भिंत बांधून मिळावी
आसगाव येथील ‘भीम क्रांती’ संस्थेची शिवाजीराव पाटील यांच्याकडे मागणी

चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भीम नगर आसगाव येथे दलित वस्तीमध्ये आंबेडकर भवन उभारण्यात आले आहे. त्यापुढे खुली जागा असून त्यात अतिक्रमण केले जात आहे. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम करताना अनेक समस्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे शिवाजीराव पाटील यांनी सभा मंडप आणि संरक्षक भिंत बांधून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन पाटील यांना देण्यात आले असून निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष रमेश कांबळे, उपाध्यक्ष अर्जुन कांबळे, सचिव राहुल कांबळे, खजिनदार पांडुरंग कांबळे, सदस्य मसणू कांबळे यांच्यासह आप्पा कांबळे, सुनील कांबळे, नामदेव कांबळे,शंकर कांबळे, जयराम कांबळे, पांडुरंग कांबळे, रामदेव कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, सचिन कांबळे अनंत कांबळे, पूजा कांबळे, रेश्मा कांबळे,लक्ष्मी कांबळे, शांता कांबळे, रसिका कांबळे आदींच्या सह्या आहेत.


विहिरीत गटरचे पाणी…
रहिवासी आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील रामदेव गल्लीमधील रामाची विहीरीमध्ये गटारीचे पाणी मिसळत असल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आजरा नगरपंचायतीला दिले असून गटारांची योग्य प्रकारे दुरुस्ती करावी. पाणी विहीरीत झिरपणार नाही याची दक्षता घ्यावी. अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा नागरीकांनी दिला आहे.
येथील नगरपंचायतीसमोर रामाची विहीर ही शहरातील सर्वात जूनी विहीर आहे. या विहीरीचे पाणी रामदेव गल्ली, कुंभार गल्ली, भाजी मंडई लगतचे नागरीक वर्षानुवर्ष वापरत आहेत. पण या विहीरीमध्ये गेले काही दिवसापासून जवळच जाणाऱ्या गटारीचे पाणी मिसळत आहे. यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न तयार झाला आहे. नगरपंचायतीच्या अगदी समोरच विहीर असून देखील नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. गटारी दुरुस्तीबाबत प्रशासनाकडून डागडूजी केली जात होती. पण ही केवळ मलमपट्टी असल्याचा आरोप केला आहे. येथे कायमस्वरुपी उपयायोजना करावी अन्यथा आंदोलनाच्या पावित्र्यात नागरीक असल्याचे म्हंटले आहे.
मारुती बिरजे, मंजूर राजगोळकर, अमानुल्ला दरवाजकर, असलम राजगोळकर, दिनेश कुरुणकर, साजिद दरवाजकर, मुस्ताक खेडेकर, आक्रम वाडीकर, रुपेश वाळके, शिवाजी बुरुड, विक्रांत वाळके, बशीर राजगोळकर, दीपक कुरुणकर, अनिता कुंभार, शीतल आजरेकर, शाहिदा वाडीकर, सायरा दरवाजकर, छाया गवळी यांच्यासह नागरीकांच्या निवेदनावर सह्या आहेत.


डॉ. आनंद बल्लाळ यांच्या संशोधन ग्रंथास पुरस्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील जनता एज्युकेशन सोसायटीच्या आजरा महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांच्या मराठी हास्यात्मिका (फार्स) या संशोधन ग्रंथास नुकताच कारदगा येथील श्री शिव स्वामी साहित्य कला क्रीडा आणि सामाजिक सेवा संस्था कारदगा ता. निपाणी, जि. बेळगाव यांच्या वतीने उत्कृष्ट संशोधन ग्रंथ म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत माने, जेष्ठ कवी डॉ. रफिक सुरज, डॉ. गोपाळ महामुनी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात डॉ. बल्लाळ यांना हा पुरस्कार देण्यात आला.


दिवाळीत धुवांधार पाऊस, पूलही गेला पाण्याखाली, आयएमडीचे अपडेट काय?

Maharashtra rain update :
राज्यातील सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. शेतकरी दिवाळीच्या आनंदात आहे. त्याचवेळी काही भागांत मुसळधार पावसाचे आगमन झाले आहे. या पावसाचा फटका शेती पिकांना बसला आहे.
सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये शुक्रवारी पहाटे अतिवृष्टी झाली आहे. धुंवाधार पाऊस वाळवासह परिसरामध्ये रात्री आणि पहाटे पडला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अशा पावसामुळे वाळवा परिसरातील ओढ्या-नाल्यांना पूर स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आष्टा -वाळवा रस्त्यावरील छोटा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक सकाळपासून बंद होती. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच सांगली जिल्ह्याच्या अनेक भागात देखील रात्री आणि पहाटेच्या सुमारास मुसळधार असा पाऊस पडला आहे.
हवामान विभागाचा इशारा…
हवामान विभागाने शुक्रवारी सांगली, सातारा रत्नागिरीत यलो अलर्ट दिला आहे. तसेच लातूर, नांदेड जिल्ह्यातील काही भागांत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. शनिवारी रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता मुंबई हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रत्नागिरीत गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा भातशेतीलाही मोठा फटका बसला आहे. रायगड, ठाणे, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
का सुरु आहे पाऊस?
दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागरावर गेल्या काही दिवसांपासून चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील काही भागावर होत आहे. या भागात बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी पाऊस सुरु आहे. हा पाऊस 3 नोव्हेंबरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या ऑक्टोबर हीटचा तडाखा कमी झाला आहे. पुणे, मुंबईसह अनेक शहरांमध्ये सकाळच्या वेळी गारवा जाणवत आहे. यंदा पाऊस चांगल्या झाल्यामुळे थंडीचा कडाका चांगला राहणार असल्याचा अंदाज आहे. (source:online news)


लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा


🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969




