शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबर २०२४




के.पी. पाटील व जयवंतराव यांच्यात अखेर दिल जमाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बंटी साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असे सांगत काल दिवाळीच्या मुहूर्तावर जयवंतराव शिंपी गटाने माजी आमदार के. पी. पाटील यांना विधानसभा निवडणुकीत बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला. यामुळे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केलेली शिष्टाई के.पी. पाटील यांच्या पथ्यावर पडली असे म्हणण्यास हरकत नाही. के.पी. पाटील यांनीही यापूर्वी आपण जयवंतराव शिंपी यांच्या विरोधात केलेल्या विधानांची नम्रपणे कबुली देत शिंपी गटांच्या कार्यकर्त्यांची माफी मागून यापुढे अभिषेक शिंपी व जयवंतराव शिंपी यांना सहकार्याचा शब्दही त्यांनी दिला. मोठ्या मनाने कार्यकर्त्यांनी मला माफ करावे असेही त्यांनी आवाहन केले.
बैठकीच्या सुरुवातीस युवा नेते नगरसेवक अभिषेक शिंपी म्हणाले, आमदार बंटी पाटील यांचा आदेश मानून आपण यापुढे राजकीय भूमिका घेणार आहोत. माजी आमदार के.पी. पाटील यांच्या पाठीशी सर्व ताकतीनिशी शिंपी गट राहील. लोकसभा निवडणुकीत सर्वजण एकत्र राहिल्याने मतदारसंघात महाविकास आघाडीला बळ मिळाले. त्याच ताकतीने के. पी. पाटील यांना मदत करू असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी जयवंतराव शिंपी म्हणाले,आपण मुळचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत. ज्या त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन कांही वेळा कार्यकर्त्यांच्या हितासाठी तर कांही वेळा आजरा साखर कारखाना वाचवण्यासाठी राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाचे काम केले. आजरा तालुक्यामध्ये सर्व धर्मीय गुण्यागोविंदाने नांदत आहेत. अशावेळी मोदी व फडणवीस यांच्यासह त्यांच्या सोबत असणाऱ्या जातीयवादी पक्षासोबत न जाता पुरोगामी विचारांच्या आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतला असून सर्व राग, लोभ बाजूला ठेवून कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या विजयाला हातभार लावावा असे आवाहन केले.

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, प्रेषित महम्मद पैगंबर याविषयी अपशब्द काढून जातीय द्वेष वाढवणारी भूमिका भाजपा व त्यांच्या समर्थकांची दिसते. जातीवादी विचारसरणी पोहोचणारा युतीचा प्रवाह असून तो महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. जयवंतराव शिंपी हे अतिशय अनुभव संपन्न व लोकाभिमुख नेतृत्व आहे. अनवधानाने काही वेळेला त्यांच्या कार्यकर्त्यांना दुखावणारी विधाने आपल्याकडून झाली. कार्यकर्त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून ती विसरून जावीत. शासनातील मुख्यमंत्र्यांच्या जवळचा म्हणून आमदार प्रकाश आबिटकर यांची ओळख आहे. त्यामुळे केवळ स्लीपिंग पार्टनरशिपसाठी करोडो रुपयांची विकास कामे केल्याचा कांगावा त्यांच्याकडून होत आहे. केवळ स्वतःचे व कॉन्ट्रॅक्टरांचे हित साधणाऱ्या आबिटकरी यांना आता थांबवण्याशिवाय पर्याय नाही. यापुढे अभिषेक शिंपी यांना आवश्यक तेथे ताकद दिली जाईल त्यांनी याबाबत निश्चिंत रहावे असेही स्पष्ट केले.
या मेळाव्यास अशोक पोवार, किरण कांबळे, सचिन शिंपी, मुकुंद तानवडे, विक्रम पटेकर, सुधीर जाधव, सुनिल पाटील, के.जी. पटेकर, आसिफ सोनेखान, हुसेन दरवाजकर, वसंत मस्कर, शामराव कांबळे, अनिल नार्वेकर, रमेश निकम सदाशिव डेळेकर, पांडूरंग जाधव, विश्वास जाधव, राजेंद्र कुंभार, मंजूर मुजावर ,बाबाजी नाईक, निवृत्ती अडकुरकर, प्रकाश देसाई (लाटगाव) विष्णू पाटील (अंबाडे), शिवाजी डोंगरे (सुलगाव), योगेश पाटील (आवंडी) संकेत सावंत यांच्यासह जयवंतराव शिंपी गटाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विलास पाटील यांनी आभार मानले.
विश्वासार्ह बातम्यांमुळे मृत्युंजय महान्यूज चर्चेत…
गेल्या पंधरा दिवसात वर्तवलेल्या राजकीय समीकरणांच्या मृत्युंजय महान्यूजच्या बातम्या तंतोतंत खऱ्या ठरत आहेत. यामुळे सध्या मृत्युंजय महान्यूजची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अशोक अण्णा व मंत्री मुश्रीफ यांचे मनोमिलन होणार… अशोकअण्णा आम. प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा देणार… जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई पक्षाचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन के.पी. पाटील यांच्यासोबत राहणार… जयवंतराव शिंपी व के. पी. पाटील एकत्र येणार… या सर्वच राजकीय बातम्या तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत.


समर्थ कॉलनीतील रहिवासी पाणी प्रश्नी आक्रमक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील समर्थ कालनीमध्ये पिण्याचे पाणी व मुलभुत सुविधांबाबत विविध प्रश्न भेडसावत बाहेत. आजरा नगरपंचायतीकडे सुचना व तक्रारी करून उपाययोजना झालेल्या नाहीत. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तातडीने कार्यवाही करावी. अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. प्रशासकीय अधिकारी राकेश चौगले यांनी निवेदन स्विकारले.
निवेदनात म्हंटले आहे, समर्थ कॉलनीमध्ये गेले काही महीने कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाण्याच्या वेळा अनिश्चित आहेत. कधी कधी तर चार दिवसांनी पाणी येते. येथे पाण्याचे वेळापत्रक निश्चित करून पुर्णक्षमतेन पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करावेत. येथील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे पडलेले आहेत. पक्क्या रस्त्यांसाठी प्रयत्न व्हावेत. कॉलनीतील गटारी तुंबल्या असून घाणीचे सामाज्य पसरले आहेत. यामुळे डासांचा फैलाव होत असून नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारीची स्वच्छता करण्याची गरज आहे.
या वेळी प्रशासकीय अधिकारी श्री. चौगले यांच्याबरोबर नागरीकांची चर्चा झाली. त्यांनी कार्यवाहीची ग्वाही दिली. या वेळी एस. एस. बिद्रे,जी. एम. पाटील, बी. एम. मोहीते, डा. आर. जी. गुरव, रोहन साठे, विजय आमणगी, बाळकृष्ण दरी, जोतीबा आपगेकर, सचिन पवार यासह नागरीकांच्या निवेदनावर सह्या आहेत.


के. पी. पाटील यांना आघाडी मिळवून देण्याचा कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्धार…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांना आजरा जिल्हा परिषद मतदार संघातून आघाडी मिळवून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला.
सुरुवातीला संजय येसादे यांनी स्वागत केले. प्रास्तविक करताना मुकुंदराव देसाई म्हणाले, आम्ही लोकसभा निवडणुकीत जसे राबलो तसेच या निवडणुकीत राबून ही निवडणूक जिंकून दाखवुया. मशाल हे चिन्ह घराघरात पोहचवूया.कॉ. संपत देसाई म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आपण दोन महिने आधी प्रचाराची मोहीम संविधान बचाव रॅलीच्या निमित्ताने राबवली. आता आपल्याकडे फारच कमी दिवस असून नियोजनबद्ध प्रचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी सगळे मिळून कामाला लागूया.
यावेळी बोलताना उमेदवार के पी पाटील म्हणाले, महाविकास आघाडीकडूनच लढण्याचा आपण निर्णय घेतला होता. आघाडीतील ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल त्या पक्षाची उमेदवारी घेण्याचे ठरविले. त्यानुसार आज मी शिवसेनेची मशाल घेऊन आपल्याकडे आलो आहे. आपण मला विश्वसने निवडून द्याल याची खात्री आहे. आजपासून सगळे कामाला लागूया.
यावेळी डॉ. रोहन जाधव, युवराज पोवार यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे संभाजी पाटील, रवींद्र भाटले,उदयराज पवार, संजय सावंत, रशीद पठाण, शांताराम पाटील, रणजित देसाई, नौशाद बुड्डेखान, विक्रम देसाई, प्रभाकर कोरवी, प्रकाश मोरुसकर, उत्तम देसाई, डी.ए.पाटील , जोतिबा चाळके, परेश पोतदार, जयदीप महागावकर, बाळू जोशी, शिवराज देसाई इकबाल शेख, दत्ता कांबळे, आप्पासाहेब पाटील, अजय देशमुख, काशिनाथ मोरे, सुरेश पाटील, संतोष पाटील,ॲड. जावेद दिडबाग, बाकीव खेडेकर,निसार लाडजी, अमित सामंत, आरिफ खेडेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आजऱ्यात ‘आजरा चॅम्पियन्स’ ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
प्रॅक्टिस क्लब आजरा यांच्या वतीने दिवाळीनिमित्त आजरा चॅम्पियन ट्रॉफी -२०२४ या एक दिवशीय क्रिकेट स्पर्धेचे गुरुवार दिनांक ३१ रोजी आजरा क्रीडा संकुल, गांधीनगर येथे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत रवी स्पोर्ट्स नेसरीने प्रथम क्रमांक .आणि अण्णा स्पोर्ट्सने द्वितीय क्रमांक पटकावला.मुख्य संयोजक सतीश बामणे,सुभाष कांबळे.गजानन परपोलकर. गौरव देशपांडे. शेखर पाटील (बोंजूर्डी) यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे दहा हजार रुपये रोख व ट्रॉफी तर उपविजेत्या संघाला रोख रक्कम दोन हजार रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले.


क्रीडा स्पर्धेत जगदीश सयाजी सावंत ठरला तालुक्यात वेगाचा बादशहा…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राजाभाऊ केसरकर हायस्कूल व श्री बापूसाहेब सरदेसाई ज्युनिअर कॉलेज, निंगुडगेचा जगदीश सयाजी सावंत याने तालुकास्तरीय ३००० मिटर व ८०० मिटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
जिल्हास्तरीय ३००० मीटर चौथा क्रमांक पटकावला सर्वस्तरावरून त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे.त्याला अजित कुरणे त्यांचे मार्गदर्शन लाभले.


बालकांच्या कलागुणांना
किल्यांची जोड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शाळांना दिवाळीची सुट्टी आणी मुलांची मातीशी गट्टी असे चित्र शहरी आणी ग्रामीण भागात सर्रास पहावयास मिळत आहे. दिवाळीच्या सुट्टीत शाळेचा अभ्यास आईवडिलांना मदत करण्याबरोबर लहान मुलामुलींना महाराष्ट्रातील गड किल्ला समजून घेण्यासाठी त्याची प्रतिकृती घरासमोरच्या अंगणात तयार करण्यासाठी ही बालमंडळी कामाला लागली आहेत.
अनेक ठिकाणी आकर्षक अशा किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आलेल्या आहेत. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील बालचमू किल्ल्यांमध्ये रमलेला दिसत आहे.


लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा


🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969




