शुक्रवार दि.३१ आक्टोंबर २०२५



चव्हाणवाडीत तीन मंदिरात चोरट्यांचा धुमाकूळ…
पावणेदोन लाखांचे दागिने व रोकड लंपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चव्हाणवाडी ता. आजरा येथे चोरट्यांनी स्थानिक मंदिरांना ‘लक्ष्य’ बनवत तब्बल तीन मंदिरातून सोने चांदीच्या दागिन्यांसह दानपेटीवर डल्ला मारत एक लाख ६७ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी…
अज्ञात चोरट्यांनी बुधवार दिनांक २९ रोजी सायंकाळी सात ते गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान जोमकाई देवी, रेणुका देवी, स्वामी समर्थ मंदिर या मंदिरांची कुलपे फोडून व गज काढून चांदीच्या पादुका, त्रिशूल या सह रेणुका देवीचे सोन्याचे मंगळसूत्र व दानपेट्या फोडून रोख रकमा लंपास केल्या. या चोरींची फिर्याद पुजारी समर्थ सचिन गुरव रा. उत्तुर यांनी आजरा पोलिसात दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर करीत आहेत.


सर्फनाला बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांचा २८/क चा पाच कोटी रुपयांचा निवाडा मंजूर
नवीन वसाहतीतील नागरी सुविधा पुन्हा सुस्थितीत आणण्याची ग्वाही

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पग्रस्तांचा २८/क चा ५ कोटी रुपयांचा निवाडा मंजूर करण्यात आला असून कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांच्या माध्यमातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सदर पैसे वर्ग करण्यासंदर्भात प्रकल्पग्रस्तांची सकारात्मक चर्चा झाली आहे. आठ दिवसात सदर पैसे वर्ग होण्याची ग्वाही रोहित बादिवडेकर यांनी दिली. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही वसाहती मधील पारपोली येथील प्रकल्पग्रस्तांनी कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सदर पैसे लवकरच संबंधित प्रकल्पग्रस्तांच्या नावावर वर्ग करण्यात येतील अशी ग्वाही दिली. याचबरोबर येत्या पंधरा दिवसात रस्ते,पाणी, गटर्स,दिवाबत्ती यासह दोन्ही वसाहतीतील १८ नागरी सुविधा नव्याने सुस्थितीत करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. उत्कृष्ट कार्यकारी अभियंता म्हणून रोहित बांदीवडेकर यांना गौरवण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
दरम्यान आजरा भुदरगड राधानगरीचे उपविभागीय अधिकारी हरीष सूळ
यांनी वाढीव रकमेचा सदर निवाडा मंजूर करून घेण्यामध्ये पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार प्रकल्पग्रस्तांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी सर्फनाला प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सुरेश मिटके, गोपाळ ढोकरे, तुकाराम गुंजाळ, मारुती जाधव, लक्ष्मण कांबळे, राहुल कांबळे, तुकाराम वाकर, चिलोजी ढोकरे, सुरेश सुतार यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

बाबुरावजींना आजऱ्यात आदरांजली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
भाजपाचे ज्येष्ठ नेते कै. बाबुरावजी कुंभार यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. बाबुरावजी कुंभार विचार मंच आजरा यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
पंडित दीनदयाळ विद्यालय, आजरामध्ये संस्थेचे सचिव मलिक कुमार बुरुड यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले.यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीम. विमल भुसारी व सर्व संचालक तसेच स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दयानंद भुसारी,व्हाईस चेअरमन सुधीर कुंभार, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते.

एसटीपी प्लांट जागेला स्थानिक रहिवाशांचा विरोध…
नगरपंचायत प्रशासनाला निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नगरपंचायती मार्फत आजऱ्यातील शिवाजीनगर मधील ऐतिहासिक घाट परिसरामध्ये. स्मशानभूमी व महादेव मंदिर परिसरामध्ये येथील जागेमध्ये प्रस्तावित एसटीपी प्लांट (प्रकल्प) उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
त्याला स्थानिक नागरिकांचा व संपूर्ण हिंदू समाजाचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे ही जागा बदलावी अन्यथा संघर्षाला सामोरे जावे लागेल अशा आशयाचे निवेदन नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आले आहे.
सदर नियोजित केलेली स्मशानभूमी व महादेव मंदिर परसातील घाट येथील एसटीपी प्लांट/प्रकल्प साठी जागा हि अत्यंत चुकीची निवड आहे तिथे स्मशानभूमी कार्यरत आहे. आणि नगरपंचायतने हि जागा एस.टी.पी प्रकल्पासाठी वापरणे नियमबाह्य/चुकीचे असून नगरपंचायतीने पर्यायी जागेची व्यवस्था करावी. हा परिसर हिंदूंच्या आस्थेचा परिसर आहे. यामध्ये महादेव मंदिर, मोरजकर महाराज समाधी मंदिर. महादेव मंदिर, लिंगायत समाज स्मशानभूमी. इतर बेवारस यांसाठीची स्मशानभूमी अशा पद्धतीची जागा आहे. ही जागा एसटीपी सारख्या प्रकल्पासाठी वापरणे अत्यंत चुकीचे आहे. हि जागा खुली किंवा मोकळी अशी नाही आहे ती स्मशानभूमी म्हणून वापरात आहे. याला येथील स्थानिक नागरिकांचा तसेच. सकल हिंदू समाज आजरा यांचा तीव्र विरोध राहील. तरी आपण ही प्रस्तावित एसटीपी प्रकल्पासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन नगरपंचायतीला देण्यात आले आहे.
यावेळी सुधीर कुंभार, उदय चव्हाण, ज्योतिप्रसाद सावंत, नाथ देसाई, रमेश दळवी, राजेंद्र चंदनवाले इत्यादी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आंदोलनाला आजरा तालुका शेतकरी कृती समितीचा पाठिंबा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
नागपूर येथे शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी, अनिल नवले यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे. याबाबतचे लेखी निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.
महापूर,अतिवृष्टी हमीभावाचा अभाव यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी कर्जमाफीची गरज आहे यासाठी तातडीने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबतचे लेखी निवेदन निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांना देण्यात आले असून निवेदनावर तानाजी देसाई, संजय तर्डेकर, शिवाजी गुरव, संभाजी पाटील, शिवाजी इंगळे, सखाराम केसरकर, संजय देसाई, अर्जुन तुप्पट, सुरेश पाटील आदींच्या सह्या आहेत.

वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विविध प्रश्नांबाबत स्थानिक शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर साहेब यांच्या सूचनेनुसार आजरा वनविभाग व शिवसेना पक्षाच्या वतीने आज आजरा वन कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्याच्यावरती योग्य मार्ग काढून मदत मिळण्यासाठी जिल्हा वन अधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. सदर मीटिंगमध्ये वन हक्क दावे जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर लवकरच बैठक घेऊन निकाली काढणे बाबतची चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर ऊस पिकाची नुकसान भरपाई त्या एका वर्षापर्यंत देण्याचे ऐवजी पुढील पाच वर्षे ती मिळावी याबाबत शासनाकडे पाठपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा असे सूचित करण्यात आले. त् शेती अवजारे व घरातील घराच्या बाहेर असणारे संसारोपयोगी साहित्य, चारचाकी वाहने यांचे नुकसान हत्ती करत आहेत.त्यांना मिळणारी मदत ही तूट पूंजी असून त्याला त्याबाबत जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी पाठ पुरवठा करणेबाबतच्या सूचना करण्यात आल्या ज्या गावाला वन नाही पण वनाला लागून असणाऱ्या गावांच्या लगत गाव आहेत त्यांना वन खात्याच्या सिलेंडर सारख्या योजनांची लाभ मिळत नाही ते लाभ मिळणे साठी सूचित करण्यात आले.
वन विभागाच्या जमिनीमध्ये ज्या जमिनी अतिक्रमित आहेत त्या नियमानुकूल करणे बाबत व त्यांना नुकसान भरपाईचे लाभ मिळण्याबाबतचे धोरण स्पष्ट करावे अशी सुचित करण्यात आले .नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नही शासनाशी निगडित असून काही बाबत धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे आहे असे पाटील यांनी सुचित केले.
सदरच्या बैठकीस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, शहर प्रमुख विजय थोरवत, आत्मा कमिटीचे अध्यक्ष इंद्रजीत देसाई, कार्यालय प्रमुख संतोष भाटले, सुनिल दिवेकर उपस्थित होते.
निधन वार्ता
वसंत कुंभार

कुंभार गल्ली आजरा येथील वसंत बंडू कुंभार (वय ७३ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.


