


नवरात्र उत्सवाचा जल्लोष आजपासून…
दुर्गा मातेच्या आगमनासाठी शहर नटले
चेंदा मेलम ड्रम्सचे खास आकर्षण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यामध्ये नवरात्र उत्सवाला आज उत्साहात प्रारंभ होत असून दुर्गा मातेच्या स्वागतासाठी संपूर्ण तालुका सज्ज झाला आहे. तर आजरा शहरामध्ये प्रचंड जल्लोष असून आगमनापूर्वी होणाऱ्या मिरवणुकांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असून भगवा रक्षक तरुण मंडळाच्या मिरवणुकीमध्ये असणारे केरळचे सुप्रसिद्ध चेंदा मेलम ड्रम्स यंदा खास आकर्षण राहणार आहे.
गेले आठ दिवस दुर्गा मातेच्या स्वागताची सार्वजनिक मंडळाकडून जय्यत तयारी सुरू आहे. तालुक्यात ५६ नवरात्र उत्सव मंडळे आहेत .
शहरामध्ये भगवा रक्षक, शिवाजीनगर, लायन्स किंग, रवळनाथ मंदिर,क्रांतिकारी चाफे गल्ली, गांधीनगर या मंडळाकडून दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली जाते.रवळनाथ मंदिराचे सद्यस्थितीस बांधकाम सुरू असल्याने येथील कार्यक्रमावर मर्यादा येत आहेत.
येत्या नऊ दिवसांमध्ये सांस्कृतीक, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन तालुकाभरातील दुर्गा माता मंडळांनी केले आहे. शहरभर ठिक-ठिकाणी विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे.

आजरा तालुक्यातील आठ गावे क्षयरोगमुक्त

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तालुक्यातील ८ गावे क्षयरोग मुक्त झाली आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने या ग्रामपंचायतींचा महात्मा गांधीचा ब्रान्झचा पुतळा व प्रशस्तीपत्र देवून तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते गारव करण्यात आला. या वेळी तहसीलदार श्री. माने यांनी क्षयरोग मुक्त चळवळीत सर्व ग्रामपंचायतीनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात कार्यक्रम झाला. तहसीलदार श्री. माने अध्यक्षस्थानी होते. सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वंदना हातळगे प्रमुख उपस्थित होत्या.
श्रीमती काजल देसाई यांनी स्वागत केले. डॉ. श्रीमती हातळगे यांनी प्रास्ताविकात म्हणाल्या, सन २००० ते २०२५ अखेर संपूर्ण देश क्षय रोग मुक्त करावयाचा आहे. त्यादृष्टीने हे पाऊल महत्वाचे ठरले आहे. या वेळी त्यांनी क्षय रोग मुक्त गावांचे निकष सांगीतले. यावेळी क्षय रोगमुक्त गजरगाव, मसोली, सरंबळवाडी, चिमणे, कर्पेवाडी, आरदाळ, हरपवडे, जाधेवाडी या ग्रामपंचायतीचा गारव झाला. तहसीलदार श्री. माने म्हणाले, प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याबाबत जागृत रहावे. वेळेत उपचार घ्यावेत. गावाचे ही आरोग्य उत्तम राहील यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून कार्यरत रहावे.
क्षयरोग उपचार पर्यवेक्षक संग्राम पाटील, युनुस सय्यद, कौस्तुभ पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. आरोग्य विस्तार अधिकारी विनायक काटकर यांनी आभार मानले.

स्वच्छ भारत अंतर्गत पेरणोलीत विविध उपक्रम

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
स्वच्छ भारत मिशन ग्रामिण टप्पा २ अंतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त पेरणोली ग्रामपंचायतीमध्ये विविध उपक्रम पार पडले. लोकनियुक्त सरपंच प्रियांका जाधव अध्यक्षस्थानी होत्या.
आजरा पंचायत समितीचे माजी सभापती उदयराज पवार यांच्या हस्ते घंटा गाडीचे उद्घाटन करण्यात आले घंटा गाडीचे पुजन प्रतिष्ठित नागरीक संजय लोंढे यांच्या हस्ते झाले. सरपंच सौ. जाधव यांच्या हस्ते प्लास्टिक बंदीच्याा अनुषंगाने कापडी पिशव्यांचे ग्रामस्थांना वाटप झाले. तसेच स्वच्छ माझे अंगण स्पर्धा झाली. यामध्ये दहा विजेत्या कुटुबांना प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात आले. गावातील घनकचरा व्यवस्थापन शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.

यावेळी सुषमा मोहीते, रुपाली पाईम, शुभदा सावंत, सुनिता कालेकर, अश्विनी कांबळे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, बचतगट सीआरपी बचत गटाचे अध्यक्ष, सचिव, कर्मचारी, विविध संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक संदिप चौगले यांनी आभार मानले.

आज-यात म. गांधी जयंती उत्साहात...
व्यंकटराव हायस्कूल

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आजरा या प्रशालेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी यांचे शुभ हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
यावेळी जयवंतराव शिंपी यांनी गेल्या शतकात आमच्या तुलनेत प्रसारमाध्यमांचा फार कमी वापर असतानाही संपूर्ण जगात आपल्या कार्यकर्तृत्वातून सर्वांच्या मनात स्थान निर्माण करून प्रसिद्धीच्या प्रथम स्थानावर पोहोचलेले एकमेव आपल्या भारतातील व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधीजी होय.असेच दुसरे व्यक्तिमत्व साधी राहणी व उच्च विचारसरणी असणारे स्वतंत्र भारतातील पंतप्रधान पदावर विराजमान असणारे म्हणजे लाल बहादूर शास्त्री. त्यांचेही त्यावेळी हरितक्रांती हे कार्य विशेष उल्लेखनीय असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी माजी प्राचार्य व संचालक श्री. सुनील देसाई , श्री. सचिन शिंपी, श्री. अभिषेक शिंपी, श्री सुनील पाटील, प्राचार्य श्री. आर.जी. कुंभार, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. पन्हाळकर , श्री. शिवाजी पारळे, सर्व शिक्षक, शिक्षिका- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
भादवण हायस्कूल, भादवण

भादवण ग्रामपंचायत व भादवण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून ग्रामपंचायत परिसरातील स्वच्छता केली. महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करणेत आले. गांधीजींच्या कार्याची माहिती देण्यात आली. प्लास्टिकचे दुष्परिणाम याविषयी श्रीकांत देवरकर यांनी मार्गदर्शन केले. शाळा व शाळेचा परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर, बाजार मैदान, ग्रामपंचायत समोरील परिसरातील कचरा गोळा करण्याचे काम सर्व विद्यार्थ्यांनी केले.
यावेळी भादवण गावचे उपसरपंच संजय पाटील, सदस्य संजय केसरकर, सौ. देवरकर, सौ .पाटील, सुरज केसरकर, मदन देसाई, भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी ग्रामपंचायत शिपाई विजय केसरकर काशिनाथ कुंभार उपस्थित होते मुख्याध्यापक संजय कुमार पाटील यांनी स्वागत आणि आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन आर. पी. होरटे यांनी केले.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आजरा

स्वामी विवेकानंद विद्यामंदिरमध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक सुनील सुतार यांनी प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी विद्यार्थ्यांसह सौ. संयोगिता सुतार, उत्तम नातलेकर व सुनील सुतार यांनी मनोगते व्यक्त केली. विजयालक्ष्मी देसाई, राजाराम गाडीवड्ड, संतोषी कुंभार या शिक्षकांसह पालकही उपस्थित होते.


छाया वृत्त

अविष्कार फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने व्यंकटराव हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक ए. वाय. चौगुले (भादवणवाडी,ता.आजरा ) यांना डॉ. विकास जाधव ,प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय सरपंच संसद महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला .(मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा)



(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



