mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मंगळवार  दि. २४  डिसेंबर २०२४              

एसटीचा ब्रेक फेल…
तिघे जखमी

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     गणेशवाडी ता .आजरा येथून सव्वा अकराला सुटणाऱ्या एसटीचा गणेशवाडी ते कासारकांडगावच्या उताराला ब्रेक फेल
झाला. चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या बाजूच्या चढावाला थडकून थांबवली. यामध्ये एक महीला व अन्य दोघेजण जखमी आहे.

      वाहक बी. एन. खोकले यांनाही दुखापत झाली आहे. चालक एस. एन. गुरव. गाडीत तीन प्रवाशी होते.तानाजी मनगुतकर (वय ६० वर्षे ), श्रुती कृष्णा मा‌द्याळकर (वय १७ वर्षे ) अंजना मारुती चौगले (वय ५२ वर्षे) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत.

वेळवट्टी येथे गवताच्या गंजी पेटल्या…
शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वेळवट्टी ता.आजरा येथील शेतकरी रघुनाथ शंकरराव देसाई यांच्या शेतामध्ये असणाऱ्या गवताला काल सोमवारी सकाळी ८ वाजता अचानक आग लागली.अचानक लागलेल्या या आगीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.

       गावातील नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु यामध्ये फारसे यश आलेला आहे. पावसाची जोडणा म्हणून जनावरांसाठी ठेवण्यात आलेले गवत आगीच्या भक्षस्थानी पडल्याने संबंधित शेतकरी आहे. आगीचे नेमके कारण समजले नाही.

संसाधनांचा अतिरेकी वापर पर्यावरणाला
घातक : प्रा. गौरव पाटील
५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने माणसाने प्रगती साधली. पण येणाऱ्या पिढीला आपण शाश्वत भविष्य देऊ शकणार आहोत का असा प्रश्न उपस्थित करीत संसाधनांचा अतिरेकी वापर घातक असल्याचे प्रतिपादन गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाचे प्रा. गौरव पाटील यांनी केले. पं. दीनदयाळ विद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या सुनिता विल्यम्स विज्ञान नगरीत आयोजित करण्यात आलेल्या ५३ व्या आजरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधीर मुंज होते. तर तहसीलदार समीर माने, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

         आजरा पंचायत समिती शिक्षण विभाग व पं. दीनदयाळ विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबीराचे उद्घाटन तहसीलदार माने यांच्या हस्ते करण्यात आले. पं. दीनदयाळ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संजीव देसाई यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात आजरा केंद्रप्रमुख सुभाष विभुते यांनी विज्ञानप्रदर्शन आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. यावेळी प्रा. पाटील म्हणाले, आपल्या पूर्वजांनी पर्यावरणासह सर्वच गोष्टी सुरक्षितपणे आपल्या पिढीकडे सोपविल्या आहेत. पण आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करीत असून ही पृथ्वी, इथले पर्यावरण सुरक्षितपणे पुढच्या पिढीकडे सोपविणे आपल्या पिढीची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. इथली जंगल, पाण्याचे स्रोत, अक्षय ऊर्जा याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

        यानंतर तहसीलदार माने यांनी तंत्रज्ञानाचा वापर करताना पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगितले. विज्ञान आणि पर्यावरणाशी संबंधित शासनाच्या सर्व योजनांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय मनोगत डॉ. मुंज यांनी व्यक्त केले.

      यावेळी संस्थेचे सचिव मलिक बुरूड, खजानिस रमेश कारेकर, अरूण देसाई, संचालक भिकाजी पाटील, सुधीर कुंभार, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन दयानंद भुसारी, नगरसेविका शुभदा जोशी, नगरसेवक आनंदा कुंभार, संभाजी बापट, मायकेल फर्नांडिस, शिवाजी बोलके, विनायक आमणगी, सुनील चव्हाण यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रकाश प्रभू यांनी आभार मानले.

सदृढ आरोग्यासाठी नैसर्गिक जीवनशैली आत्मसात करा : डॉ. सी. बी. देसाई
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर व्याख्यानमाला

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आज उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती असून सदृढ आरोग्यासाठी नैसर्गीक जीवनशैली आत्मसात करा असे आवाहन आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. सी. बी. देसाई यांनी केले. येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ते जीवनाची विविध अंगे या विषयावर बोलत होते.

      येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्यावतीने शिवाजीराव सावंत स्मृतीदालनात आयोजित आयोजित व्याख्यानमालेचा शुभारंभ आजऱ्याचे सुपुत्र, ख्यातनाम साहित्यिक ‘मृत्युंजय’ कार शिवाजी सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने आला. स्वागत व प्रास्ताविक वाचनलायाचे अध्यक्ष वामन सामंत यांनी केले.

      यावेळी डॉ. देसाई म्हणाले, भारतीय आयुर्वेद ही एक श्रेष्ठ उपचार पध्दती आहे. आयुर्वेदाने शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ राखणे शक्य आहे. माणसाने प्लास्टीक, फॅन, फ्रीज, फ्लॅट व फियाट या पाच गोष्टी टाळल्या तर अनेक आजार होण्यापासून बचाव होऊ शकतो. आजार झाल्यानंतर वैद्याकडे जाण्यापेक्षा आजार होणार नाही याची दक्षता आपल्या आहार विहारातून घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. कडधान्ये शरीरासाठी उपयुक्त असली तरी ती मोड न आणता खावीत कारण मोड आलेल्या कडधान्यामुळे शरीरातील अनाश्यक पेशी वाढून कॅन्सरसारख्या आजाराचा धोका संभवतो, प्राचिन भारतीय मुद्रापध्दती, ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर, गोंदण, स्वातीजल, नक्षत्रवन याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले उपस्थीत श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

     कार्यक्रमाला डॉ. अनिल देशपांडे, जयवंतराव शिंपी, डॉ. धनाजी राणे, अनिकेत चराटी, धनंजय वैद्य, डॉ. अंजनी देशपांडे, डॉ. रश्मी राऊत, डॉ. गौरी भोसले, रचना होलम, स्वरूपा देसाई, कार्यवाह कुंडलिक नावलकर, रविंद्र हुक्केरी, संभाजीराव इंजल, बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विजय राजोपाध्ये, अनिकेत गाडगीळ, किरण प्रधान, बंडोपंत चव्हाण, संभाजीराव इंजल राजकुमार पाटील उपस्थीत होते.

बस फेऱ्या वेळेत सोडा अन्यथा रस्ता रोको…
इटे ग्रामस्थांचा इशारा


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मौजे इटे, ता.आजरा या गावी आगारा कडून सकाळी ६.३५, ९.३५, दुपारी १२.३५, ३.३५ व सायंकाळी ५.३५ अशा एस.टी बस चालू आहेत. परंतु सद्या त्या एस.टी. बसेस वेळेत न येणे तसेच रविवारच्या फेऱ्या पुर्णत: बंद करणे अशा प्रकारामुळे शाळेच्या विदयार्थ्यांची गैरसोय होत आहे. तसेच रविवारी सुट्टीच्या दिवशीही विदयार्थ्याचें जादा तास असलेने त्यांची गैरसोय होत आहे. तरी वरील वेळेप्रमाणेच येथे एस.टी बसेस सोडून गावच्या प्रवाशांची व विद्यार्थीची गैरसोय टाळावी. अन्यथा सोमवारी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

      सायंकाळी ५.३५ ला जाणारी बस ही आवंडी व इटे स्वतंत्र सोडणेत यावी. वरील वेळेच्या बाबतीत वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार देऊनही आमच्या गावावर अन्याय होत आहे. वरील प्रमाणे एस.टी. फेऱ्या न सोडल्यास सोमवार दि.३०/१२/२०२४ इ. रोजी खानापूर फाटा येथे सकाळी ११.०० वाजता रास्ता रोको करणार असल्याचे तहसीलदार व आगार प्रमुखांना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

      निवेदनावर सरपंच विलास पाटील,नामदेव फगरे, प्रियांका पेडणेकर, लक्ष्मण पाटील, विष्णू सुतार, शिवाजी साबळे, गोकुळ तेजम,अनिल पेडणेकर, शिवाजी पाटील, अशोक पाटील आदींच्या सह्या आहेत.

स्मार्ट आणि प्रीपेड मीटरच्या विरोधात ६ जानेवारीला गडहिंग्लज महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा…

          गडहिंग्लज : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     राज्य शासनाने अदानी उद्योग समूहासोबत करार करून स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बसवण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याविरोधात महावितरणच्या गडहिंग्लज विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय आज आजरा, गडहिंग्लज, चंदगड आणि भुदरगड तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. वीज ग्राहक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर बसवू द्यायचे नाही असा निर्धार यावेळी करण्यात आला.

      सुरुवातीला निमंत्रक कॉ. संपत देसाई यांनी बैठक बोलवण्यामागील हेतू स्पष्ट करताना सांगितले की आज आपण शांत राहिलो तर अदानी संपूर्ण महावितरण कंपनी आपल्या घशात घालील. सामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरु होईल. जनतेच्या पैशातून उभा राहिलेले इन्फ्रास्ट्रक्टर आपल्या ताब्यात घेईल. हे थांबवायचं असेल तर जनआंदोलन उभा करावं लागेल. आज सत्तेवर असलेलं सरकार हे अदानीचे बटीक आहे त्याना सरळ करायचे असेल तर जनआंदोलनाशिवाय दुसरा मार्ग नाही.

      बैठकीच्या अध्यक्षस्थनावरून बोलताना प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले की आज अदानींची चाल वेळीच ओळखून त्याला पायबंद घालावा लागेल. गावागावात जाऊन जागृती करून आंदोलन व्यापक करावे लागेल. त्याची आखणी करून आजपासून कामाला लागूया.विद्याधर गुरबे यांनी म्हणाले, यापूर्वी आमदार बंटी उर्फ सतेज पाटील यांनी याविरोधात आवाज उठवला होता. आपण जन आंदोलन उभा करू.बाळेश नाईक, अमर चव्हाण,नागेश चौगले, श्रीमती अंजनाताई रेडेकर, दिलीप नाईक यांनीही मनोगते व्यक्त केली.

      यावेळी पुढील तीन विषयांना घेऊन मोर्चा काढण्याचे ठरले.

१- महाराष्ट्र शासनाने महावितरणच्या जुन्या मीटर ऐवजी स्मार्ट आणि प्रीपेड मीटर अदानी उद्योग समूहाला ठेका देऊन बसविण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला जनतेचा तीव्र विरोध असून आजरा तालुक्यातील कोणत्याही ग्राहकाला हे मीटर न देणे बाबत

२- अदानी उद्योग समूहासोबत स्मार्ट मीटर आणि प्रीपेड मीटर बसवण्यासाठी जो करार केला आहे त्याची मराठी भाषेतील प्रत प्रत्येक गाव चावडीवर लावून त्यानंतर याबाबत तालुका स्तरावर जनसुनावणी घेऊन जनतेचे मत जाणून घेणे बाबत.

३- साडे सात हॉर्स पॉवरच्या आतील वीज पंपाचे कनेक्शन मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे त्यांना सोलर सिस्टीमची सक्ती करून विद्युत कनेक्शन नाकारले जात ते तात्काळ थांबवून सर्व मागणीदारांना कनेक्शन तातडीने देणे.

      यावेळी कृष्णा भारती, प्रकाश मोरुस्कर, शिवप्रसाद तेली, डॉ. रोहन जाधव, किरण पाटील, अजित बंदी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनसे विद्यार्थी सेनेचे रौनक कारेकर भाजपात…


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     मनसे विध्यार्थी सेना कोथरूड चे उपाध्यक्ष रौनक रमेश कारेकर यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

      यावेळी भाजपा नेते नवनाथ भाऊ जाधव ,नगरसेविका वासंतीताई जाधव,नगरसेविका
हर्षलीताई माथवड, कोथरूड विभाग अध्यक्ष पुनीत जोशी,कोथरूड दक्षिण भाजपा अध्यक्ष डॉ.संदीप बुटाला तसेच भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अभिजित राऊत उपस्थित होते.

      आजरा येथील आजरा मर्चंटस् पतसंस्थेचे चेअरमन व स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे खजानीस रमेश कारेकर यांचे ते चिंरजीव आहेत.

‘व्यंकटराव ‘मध्ये गणित दिन उत्साहात


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून “राष्ट्रीय गणित दिन” व्यंकटराव हायस्कूल व जुनिअर कॉलेज आजरा या प्रशालेत प्राचार्य आर. जी. कुंभार व पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार यांचे हस्ते प्रतिमा पूजनाने संपन्न झाले.

      प्रास्ताविकात सौ.व्ही.ए. वडवळेकर यांनी विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी कशी लावावी यासह रामानुजन यांच्या गणित विषयातील योजनांची माहिती दिली व विद्यार्थ्यांनी रामानुजन यांचा आदर्श मानून चिकित्सक वृत्ती बाळगावी असे आवाहन केले.

      प्राचार्य आर.जी. कुंभार यांनीही रामानुजन यांच्या कार्याची माहिती सांगून विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा गणित हा विषय सोपा आहे आणि यासाठी त्यांनी लक्षपूर्वक त्यातील काही क्लुप्त्या आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

      या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य श्रीनिवास रामानुजन गणित प्राविण्य परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या प्रशालेतील इयत्ता आठवीतील २१ विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका सौ. ए. डी. पाटील व ए. वाय. चौगुले यांचाही सत्कार करण्यात आला .

      सूत्रसंचालन पी. एस. गुरव यांनी केले. व्यंकटराव प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ.चव्हाण , प्राथमिक स्टाफ, माध्यमिक स्टाफ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

आज शहरात…

♦ इतिहास संशोधक राम यादव यांचे छत्रपती शिवरायांची युद्धनीती या विषयावर सायंकाळी ५.३० वाजता ‘ मृत्युंजय ‘ कार शिवाजीराव सावंत दालना मध्ये  व्याख्यान…

♦ झेप ॲकॅडमी या अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या आजरा शाखेचे सकाळी ९.३० वाजता विदेश मंत्रालयाचे माजी राजदूत व सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते उद्घाटन.

♦ पंडित दीनदयाळ विद्यालय येथील तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ दुपारी ३.०० वाजता मंत्री ना.हसन मुश्रीफ व आमदार शिवाजीराव पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Oplus_131072

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मणिपूर घटनेचा आज-यात मोर्चाद्वारे निषेध…

mrityunjay mahanews

महाविद्यालयीन तरुणीची इटे येथे आत्महत्या…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!