mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

गुरूवार  २६ जून २०२५              

जोर थोडा ओसरला..
पूरस्थिती कायम…
सर्फनालाकडे लक्ष

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा तालुक्यामध्ये पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी पावसामुळे अतिवृष्टीची नोंद तिसऱ्या दिवशीही कायम आहे.

       हिरण्यकेशीसह चित्री नदी पात्राबाहेर पडली असून तालुक्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्फनाला प्रकल्प पूर्ण क्षमतेने कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता निर्माण झाल्याने पाणी पातळीत वाढ होणार असून आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय झाला आहे.

      तालुक्यातील हाजगोळी, दाभिल बंधारे वाहतुकी करता खुले झाले आहेत. भडगाव पुलावर पाणी आल्याने गडहिंग्लज – चंदगड मार्गावरील वाहतूक आजरा मार्गे वळविण्यात आली आहे.

गवसे भागात घरात झरे

     पश्चिम भागात मुसळधार पावसाच्या माऱ्याने गवसे येथे लोकांच्या घरात  पाण्याचा पाझर व उगळी चालू झाल्या आहेत. घरातील पाणी काढताना स्थानिक नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे.

     जेष्ठ नागरिकांकडून आपण आपल्या हयातीत अशा घरात पाण्याच्या उगळी पहिल्यांदाच पाहिल्या असे सांगितले जात आहे. अंकुश पाटील, मारुती पाटील, अंकुश पेडणेकर, राजाराम पाटील इत्यादीच्या घरात अशा पाण्याच्या उगळी सुरू झाल्या आहेत.

घराची पडझड सुरुच…

      भादवण येथील रामचंद्र महालिंग पाटील यांचे रहाते घर पडून मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड सुरू झाली आहे.

वीजपुरवठा खंडित…

      पावसामुळे झाडांचं झाडाच्या फांद्या विद्युत तारांवर कोसळणे सुरू असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होताना दिसत आहे.

प्रकल्पनिहाय झालेला पाऊस व पाणीसाठा पुढील प्रमाणे…

सर्फनाला मध्यम प्रकल्प – आज अखेर एकूण पाणीसाठा १६.४० दशलक्ष घनमीटर ( ८८.४४ % ) बुधवारी आठ तासातील पाऊस १३० मिलिमीटर १ जून पासून प्रकल्प क्षेत्रात झालेला पाऊस – १६०२ मिलिमीटर

चित्री मध्यम प्रकल्प – आज अखेर एकूण पाणीसाठा ३७.२४२ दशलक्ष घनमीटर (६९.७२ % ) बुधवारी आठ तासातील पाऊस ७५ मिलिमीटर -प्रकल्प क्षेत्रातील एक जून पासून झालेला पाऊस १२२ मिलिमीटर

आंबेओहोळ मध्यम प्रकल्प – आज अखेर एकूण पाणीसाठा ३०.०८ दशलक्ष घनमीटर ( ८५.६७ %) बुधवारी आठ तासातील पाऊस ३९ मिलिमीटर आज अखेर एकूण पाऊस ३४८ मिलिमीटर

आजरा परिसरामध्ये जून महिन्यात १८ पावसाच्या दिवसात तब्बल ६७५ पेक्षा जास्त मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद जवळपास जून महिन्यातील सरासरी पावसाच्या दुप्पट आहे.

१३ लाख ४८ हजार रुपये चोरी प्रकरणी तपास सुरू…
स्थानिक गुन्हा अन्वेषण कडून चालकाची चौकशी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गोव्याहून इचलकरंजीच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोचा चालक उत्तूर येथे जेवणासाठी थांबला असता अज्ञात चोरट्याने ड्रायव्हर केबिनमध्ये डॅशबोर्डच्या आत ठेवलेली १३ लाख ४८ हजार ८०० रुपये इतकी रोकड लंपास केल्याची घटना घडल्यानंतर वाहन चालकात खळबळ उडाली आहे.

      सदर घटने दरम्यान वीज पुरवठा खंडित झालेला होता. त्यामुळे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना अडचणी येत आहेत. पोलीस या संपूर्ण घटनेची माहिती मिळवत असून चालक रवी हनमंत माने ( रा. पाटील मळा, इचलकरंजी ) यांच्याकडे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे काम सुरू आहे.

     सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर पुढील तपास करीत आहेत.

आणीबाणी काळातील बंदीवासांचा सत्कार

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       १९७५ साली आणीबाणी काळात शिक्षा भोगलेल्या बंदीवासांचा शासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. आजरा येथील शंकरराव तुरंबेकर, विष्णुपंत कारेकर यांना मिसाखाली अटक झाली होती. तसेच वेगवेगळ्या कलमानुसार बंडोपंत कुंभार, विश्वनाथ नागाप्पा कोरे,मोहन तेंडुलकर यांनाही अटक केली गेली.

       या घटनेला तब्बल पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आजरा येथे विश्वनाथ कोरे व इतर मंडळींच्या हयात वारसांचा मुख्यमंत्र्यांच्या सहीचे प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

दाभिल बंधाऱ्यावरील स्लॅबसह रस्ता उखडला…
प्रवास धोकादायक

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा-दाभिल मार्गावरील हिरण्यकेशी नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर अतिवृष्टीने दोन दिवस पाणी आले होते. बंधाऱ्यावरील पाणी कमी झाल्यानंतर बंधाऱ्यावर टाकले गेलेल्या स्लॅबसह डांबरीकरण केलेल्या रस्त्याचा पॅच निघाला असून अखंड पॅच बंधाऱ्याशेजारील संरक्षण खांबामध्ये अडकला आहे. बंधाऱ्यावर धोकादायक असा मोठा खड्डा पडल्याने बंधाऱ्यावरून ये-जा करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

      बंधाऱ्यावरील रस्त्याची तातडीने डागडुजी करणे गरजेचे ठरले आहे.

उत्तूरला आज विकास कामाचा शुभारंभ

           उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      उत्तूर (ता.आजरा) येथे गुरुवार (ता.२६) नुतन बस स्थानक बांधकाम शुभारंभ, बांधकाम कामगारांना भांडी वाटप असा संयुक्त कार्यक्रम होणार आहे.

      येथील नविन बस स्थानक उभारणीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी चार कोटीचा निधी मंजूर केला आहे. मंजूर निधीतून याठिकाणी सर्व सोयीनी युक्त सुसज्ज बसस्थानक उभारण्यात येणार आहे. या बांधकामाच्या इमारतीची पायाभरणी कार्यक्रम मंत्री मुश्रीफ यांचे हस्ते होणार आहे. यावेळी बांधकाम कामगारांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आजरा साखर कारखाना संचालक काशिनाथ तेली, मारुतीराव घोरपडे, दिपक देसाई, माजी उपसभापती शिरीष देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

        आजरा साखर कारखान्याच्या सभासद साखर वाटपास १० जुलै अखेर मुदतवाढ

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यामार्फत सभासदांना व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना आजरा तालुका संघाच्या शाखांमधून साखर वितरणाचे काम सुरू आहे. सदर साखर वाटपाची यापूर्वी जाहीर केलेली मुदत ३० जून २०२५ अशी होती. तथापि तालुक्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे साखर उचल करण्यात शेतकरी सभासदांना अडचणी येत आहेत. याचा विचार करुन व्यवस्थापनाने साखर उचलणेची मुदत वाढवून ती १० जुलै २०२५ केली आहे अशी माहिती अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी दिली.

आम.सतेज पाटील यांचेकडून व्यंकटराव प्रशालेला कॉम्प्युटर संच प्रदान

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आम. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यंकटराव शिक्षण संकुलातील होतकरू व गोरगरीब विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे अद्ययावत ज्ञान मिळाले पाहिजे या उदात्त हेतूने शाळेसाठी डेल कंपनीचे अद्ययावत आय फाईव्ह १२ कॉम्प्युटर संच भेट स्वरूपात दिले आहेत .

      या कॉम्प्युटर संचांचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते प्रशालेत करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष श्री. एस. पी. कांबळे, सचिव श्री. अभिषेक शिंपी, खजिनदार श्री. सुनील पाटील, संचालक श्री. कृष्णा पटेकर, श्री. सचिन शिंपी,श्री. विलास पाटील, व्यंकटराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष शेळके , ज्युनियर कॅालेज व हायस्कूल चे नूतन प्राचार्य श्री. एम. एम. नागुर्डेकर, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. रणजीत देसाई, ज्युनियर कॉलेज व्यवस्थापक एम. ए. पाटील व व्यंकटराव परिवारातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING NEWS

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

News

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!