बुधवार दि.१४ जानेवारी २०२६

आजऱ्यातील नाट्यमहोत्सवात ‘कट्यार काळजात घुसली” ची बाजी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथे नवनाट्य कला मंचच्या वतीने आयोजित १२ व्या कै.रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवांमध्ये अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर सांगली ने सादर केलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवला. तर पुणे शील सुमित्रा राजे सांस्कृतिक ट्रस्ट सातारा यांच्या ‘खानदानी’ व जाणीव चॅरिटेबल फाउंडेशन संचलित आनंद रंग कोल्हापूर यांच्या ‘भांडा सौख्यभरे’ या नाटकांनी अनुक्रमे द्वितीय व द्वितीय क्रमांक पटकावला.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संतोष पाटील यांनी ‘पोकळ घिस्सा’ या नाटकात करीता द्वितीय पारितोषिक ‘युटोपिया’ या नाटकाकरिता इरफान मुजावर यांनी तर ‘खानदानी’ या नाटकाकरिता शरद लिमये यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
‘कट्यार काळजात घुसली’ नाटकातील अभिषेक काळे यांना पुरुष विभागातील अभिनयाचे प्रथम पारितोषिक तर ‘पोकळ घिस्सा’ या नाटकातील अथर्व वाघ यांच्या भूमिकेला द्वितीय व हितेश दायमा यांच्या ‘मी कुमार’ या नाटकातील भूमिकेला तृतीय क्रमांक देण्यात आला.
उत्कृष्ट स्त्री भूमिके करीता ‘ युटोपिया’ या नाटकातील स्वरा मेंडगुळे यांनी प्रथम क्रमांक तर ‘खानदानी’ मधील अमृता क्षीरसागर हे नेतृत्व ‘भांडा सौख्यभरे’ या नाटकातील अश्विनी कांबळे यांच्या अभिनयाला तृतीय क्रमांक देण्यात आला.
यावेळी नवनाट्य कला मंचचे अध्यक्ष, नगराध्यक्ष अशोकअण्णा चराटी व मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी नाट्यमहोत्सव समितीचे अध्यक्ष अण्णा फडके, उपाध्यक्ष मंगेश तिऊरवाडकर, डॉ. अनिल देशपांडे, विजयकुमार पाटील, ज्योत्स्ना चराटी, वासुदेव मायदेव, सुभाष विभुते, अमोघ वाघ, उपनगराध्यक्षा सौ.पूजा डोंगरे, अन्नपूर्णादेवी चराटी, अनिकेत चराटी, मुग्धा चराटी,योगेश पाटील, प्रशांत गंभीर, वामन सामंत, बळवंत शिंत्रे, सुनील पाटील, नगरसेविका अश्विनी चव्हाण, रहिमतबी खेडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अशोक बाचूळकर व डॉ. आनंद बल्लाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

काजू उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अनुदान वाढवून द्यावे: आ. शिवाजीराव पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
काजू उद्योगातील वाढती स्पर्धा, वाढत्या समस्या आणि वाढते काजूचे उत्पादन लक्षात घेऊन शासनाने काजू प्रक्रिया उद्योगास विशेष प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. शिवाजीराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदनही दिले.
आ. शिवाजीराव पाटील यांनी निवेदनात नमूद केल्याप्रमाणे २०१० पासून काजू प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने कर परतावा योजना अंमलात आणली. या योजनेमुळे राज्यातील काजू प्रक्रिया उद्योगांना मोठ्या प्रमाणात विकास साधता आला. परतावा योजनेमुळे उद्योग आणि त्या संबंधीत सर्व काजू घटकांना त्याचे फायदे मिळाले. दि.१ एप्रिल २०२० पासून २.५ टक्के जी.एस.टी. परतावा सुरु झाल्याने काजूचे उत्पादन तसेच लागवडीखालील क्षेत्र यात वाढ झाल्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारात देखील झालेली वाढ दिसून येते. शासनाने दिलेल्या प्रोत्साहन आणि सवलतीमुळे काजूची लागवड वाढली, रोजगार वाढला, उद्योग वाढला व काजू गराचे उत्पादनही वाढले. सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात सदर योजनेकरीता रु.७.०० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील रु.४.२० कोटी निधी वाटप करण्यात आले आहे व रु.२.८० कोटी निधी शिल्लक आहे. सध्याच्या काळातील वाढत्या स्पर्धेमुळे आणि उत्पादनामुळे काजू उद्योगास वाढीव अनुदानाची गरज आहे. चालू आर्थिक वर्षात दाव्यांकरीता रु.१०.०० कोटी एवढ्या अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. तसेच या योजनेअंतर्गत सहामाही कालावधीचे काजू प्रक्रीया उद्योगाचे एकूण सुमारे २०० ते २५० दावे सद्यस्थितीत उद्योग संचालनालय, मुख्यालय मुंबई विभागास सादर होत असून रु.१३.०० कोटी ते रु.१५.०० कोटी इतके Sanction Letters (Annexure D) चे प्रस्ताव उद्योग विभाग, मंत्रालय येथे निधी मंजूरीसाठी सादर करण्यात येतात. त्यामुळे वार्षिक रु.७.०० कोटी निधी हा अपुरा पडत असल्याने पुढील आर्थिक वर्षापासून या योजनेची परिणामकारकता टिकवून ठेवण्यासाठी सुधारित निधीची आवश्यकता आहे. या योजनेची प्रभावीतता आणि उद्योजकांना मिळणारे लाभ लक्षात घेता, आगामी वर्षासाठी रु.१५.०० कोटी रुपयांची वाढ करावी. या महत्त्वपूर्ण मागणीचा मुख्यमंत्र्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून, योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी वाढीव निधी मंजूर करावा अशी विनंती त्यांनी या निवेदनाद्वारे केली.

आजरा तालुक्यातील ३२ तरुणांची सैन्य दलात निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यातील तब्बल ३२ जणांची सैन्य दलातील अग्नी वीरसह विविध पदांकरिता निवड झाली आहे. सदर निवडी जाहीर झाल्या नंतर तालुक्यात ठीक ठिकाणी मोठा जल्लोष करण्यात आला.
निवड झालेले तरुण पुढील प्रमाणे…
अक्षय चाळके/आजरा अग्निवीर, विजय नाईक/ आजरा, सोमेश कांबळे/आजरा,निखिल मुगुर्डेकर/कासारकांडगाव अग्निवीर ,राहुल गुरव. कासरकांडगाव अग्निवीर,राज सुनील गुरव/ मसोली, प्रसन्न बाळू चव्हाण/ बहिरेवाडी,अभिजीत कोपटकर/बहिरेवाडी, हर्षद नाईक/बहिरेवाडी
टेक्निकल विभाग,विनायक डोंगरे/ शेळप, गुरु पाटील/ मडिलगे ,अमित कुरळे/ मडिलगे, विराज चव्हाण/चव्हाणवाडी ,पवन चाळके/देवर्डे,आकाश चाळके/देवर्डे, पार्थ धनाजी शिंदे/देवर्डे ,सुहास परीट/ देवकांडगाव,श्रावण परीट/एरंडोळ,
श्रेयस चिमणे/कोवाडे, शैलेश शेलार/कोवाडे, वैभव कुंभार/शिरसंगी, अग्निवीर,यश सांबरेकर/भावेवाडी, पृथ्वीराज कांबळे/मेढेवाडी/रोहित दळवी/ मेढेवाडी,स्वरूप गुरव/ मेढेवाडी,विनायक कसेकर/दर्डेवाडी ,भागोजी अडुळकर/ मोरेवाडी
धनगरवाडा, रोहन चव्हाण/उत्तूर,आदित्य कुंभार/उत्तूर, सोहम जांभळे/उत्तूर, ओमकार सावंत/ उत्तूर
संकेत जाधव/मलिग्रॆ
या सर्व विद्यार्थ्यांचे तालुकावासीयांकडून अभिनंदन होत आहे.

डॉ.अनिल देशपांडे यांची निवड

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
डॉ. अनिल देशपांडे यांची महाराष्ट्र राज्य मेडिकल कौन्सीलच्या राज्यस्तरीय Public Health Awareness कमिटीवर निवड करण्यात आली आहे.
या कमिटीद्वारे नागरिकांमध्ये जनजागृतीद्वारे उत्तम मानसिक व शारीरिक आरोग्य राखण्यासाठी व विविध आजरांपासून संरक्षक करण्यासाठी आरोग्य शिबीरे, कार्यशाळा, लसीकरण यांचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व शाखा, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, आशा सेविका व विविध सहकारी संस्थेचे मदतीने आयोजन करून कॅन्सर, डायबेटीस, हृदयरोग व विविध साथीचे आजार यांचे प्राथमिक स्तरावर निदान करणे व त्यावरील पुढील उपचार करणेसाठी मदत करणे या ध्येयाने ही कमिटी काम करते.
डॉ. संतोष कुलकर्णी अध्यक्ष IMA महाराष्ट्र राज्य व डॉ. विक्रांत देसाई सेक्रेटरी IMA महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शन खाली राज्यातील विविध विभागामध्ये Public Health Awareness Programme राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

वाटंगी येथे पाणंद रस्त्याचे उद्घाटन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वाटंगी ता. आजरा मातोश्री पाणंद रस्ते योजनेतून मंजूर असलेल्या रु.६९ लाखांच्या पानंद रस्त्याचे उद्घाटन तहसीलदार समीर माने व भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगीसरपंच इंदुताई कुंभार, उपसरपंच सुनीता सोनार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिव प्रसाद, देसाई, रवींद्र देसाई,गणपती कानडे,आप्पासो कुऱ्हाडे,उत्तम जाधव, उमेश घोरपडे, अर्जुन घेवडे, विजय देसाई, प्रकाश पाटील, तुकाराम बामणे, गोविंद कुंभार, बाळू तेजम, संतोष बिरजे, सुजित देसाई,एकनाथ सुतार, बाबासो घोरपडे, संतोष जाधव, मोहन घेवडे, दर्शन वांद्रे, राजू घेवडे, सागर जाधव, सचिन कुंभार, संदेश देसाई,अविनाश घोरपडे, जयवंत कसलकर, भीमराव सुतार, गुंडू बोर, जानबा धडाम इत्यादी उपस्थित होते.

७५ वर्षे पूर्ण केलेल्या निवृत्त एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील हनीफा एज्युकेशन ट्रस्ट व ए.एस. दरवाजकर (बाबू दरवाजकर)यांच्या संयुक्त विद्यमानाने ७५ पूर्ण केलेल्या २२ निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला .
येथील सबाज फार्म हाऊसवर पार पडलेल्या या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा या निमित्ताने मिळाला. हनीफा ट्रस्टच्या वतीने शाल, श्रीफळ आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्नेहमेळाव्यासाठी ठाणे, पुणे, कोल्हापूर, गडहिंग्लज, चंदगड, कोवाड आणि नेसरी या भागांतून सुमारे २०० हून अधिक निवृत्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अनेक वर्षांनंतर आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटल्यामुळे सर्वच कर्मचारी भारावून गेले होते. कार्यक्रमात श्री. सोनकर आणि माजी डीटीओ एस. के. पाटील यांनी आजरा आगाराच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाच्या आणि यशाच्या आठवणी जागवल्या.
ए. एस. दरवाजकर यांनी आपल्या कार्यकाळात कामगारांच्या हितासाठी जे कार्य केले त्याबद्दल सर्व वक्त्यांनी गौरवोद्गार काढले.

तालुका सरपंच संघटने मार्फत ‘जनता सहकारी गृहतारण’चा सत्कार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘ सहकार भारती’ मार्फत सहकार सन्मान देऊन जनता सहकारी गृहतारण संस्था मर्या, आजरा या संस्थेला गौरविण्यात आलेले आहे. या सन्मानामुळे संथेच्या लौकिकाबरोबरच आजरा तालुक्याच्या लौकिकात भर पडली आहे. असे मत मडिलगे सरपंच व संघटनेचे अध्यक्ष श्री. बापू निऊंगरे यांनी व्यक्त केले. सरपंच संघटना आजरा मार्फत आज संस्था पदाधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
“माणसं जोडणारी संस्था” अशी या संस्थेची ओळख आहे. सर्वसामान्याचं घराचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यामध्ये संस्थेचे मोलाचे योगदान आहे पारदर्शी कारभार आणि काटकसर ही संस्थेची वैशिष्ट्ये आहेत असे सरपंच सौ. भारती डेळेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. जनता सहकारी गृहतारण संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे, उपाध्यक्ष प्रो. डॉ. अशोक बाचूळकर, मॅनेजर श्री. मधुकर खवरे, प्रशासकीय अधिकारी श्री. मारुती कुंभार, शाखाधिकारी श्री. अरविंद कुंभार व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच संघटनेचे पदाधिकारी श्री. विलास पाटील, (कार्याध्यक्ष, विटे), श्री. महादेव दिवेकर, (उपाध्यक्ष, भादवणवाडी), श्री. रघुनाथ सावंत (सदस्य, जाधेवाडी) श्री प्रशांत कोटकर (सदस्य, हाजगोळी खुर्द) सौ. सुषमा पाटील (महिला अध्यक्ष, कानोली) सौ. सविता जाधव (महिला कार्याध्यक्ष, हाजगोळी) सौ. भारती डेळेकर (महिला सरचिटणीस, सोहाळे) सौ. कल्पना डोंगरे (महिला उपाध्यक्षा, खानापूर), सौ. जयश्री गिलबिले (सदस्या, लाकूडवाडी) सौ. सरीता पाटील (महिला उपाध्यक्षा, एरंडोळ) सौ, स्मिता पाटील (खजिनदार, होण्याळी) सौ. स्वाती कोंडूसकर (चांदेवाडी ) उपस्थित होते. आभार महिला अध्यक्षा सौ. सुषमा पाटील यांनी मानले.
वैज्ञानिक संमेलनात धडपडणारे विद्यार्थीच देशाचे उज्ज्वल भविष्य – प्राचार्य डॉ. एस्. एम्. कदम

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील श्री पार्वती-शंकर शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयोजित २२ व्या तीन दिवसीय बालवैज्ञानिक संमेलनाचा पारितोषिक वितरण व समारोप कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शिवराज महाविद्यालय गडहिंग्लजचे प्राचार्य डॉ. एस्. एम्. कदम यांनी, वैज्ञानिक संमेलनात धडपडणारे णणआजचे कृतिशील विद्यार्थी भविष्यात देशविकासात उत्तम योगदान देऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैज्ञानिक अधिकारी डॉ. विजय लाळे होते.
या संमेलनात १८ प्रकल्प, २४ पोस्टर्स आणि ४२ वैज्ञानिक उपकरणांचे सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
प्रकल्प स्पर्धेत ज्युनिअर गटात शौर्या कुट्रे (प्रथम), धनश्री पाटील व मृणाली घोरपडे (द्वितीय), रुचिता रेडेकर व सई कदम (तृतीय) तर सायली येलकर, श्रीया बोटे, अथर्व कुंभार व राहत तासेवाले यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. प्रकल्प सिनिअर गटात साईश आमणगी व ओम उत्तूरकर (प्रथम), आयुष भाटले व चैतन्य कुंभार (द्वितीय), श्रेया पोवार व आलिशा पाटील (तृतीय) तर किरण साळुंखे, धनश्री भाटले व रिझुल हंजी यांनी यश मिळवले.
पोस्टर स्पर्धेत ज्युनिअर गटात आदी पाटोळे व आयुष शिंदे (प्रथम), श्लोक हळवणकर (द्वितीय), विरेन आजगेकर (तृतीय) तर आराध्या मगदूम व पृथ्वीराज सावंत यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. पोस्टर सिनिअर गटात संचिता पाटील (प्रथम), ऋचा कदम व बेला इंचनाळकर (द्वितीय), निदा वाडीकर (तृतीय) तर स्मित चव्हाण, विरेन बुजरे, आर्या सुतार व वृत्ती माने यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. वैज्ञानिक उपकरणे स्पर्धेत ज्युनिअर गटात पार्थ व्हनबट्टे (प्रथम), अर्णव पाटील (द्वितीय) व पालाश राशिवडे (तृतीय) तर सिनिअर गटात वेदांत येलकर (प्रथम), साईश पोवार (द्वितीय) व अथर्व मोरे (तृतीय) यांनी बाजी मारली.
संस्थेचे अध्यक्ष बसवराजआण्णा करंबळी व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन यशस्वी झाले. मुख्याध्यापक बी. के. जाधव यांनी आभार मानले, तर श्री. एम. एल. काकडे यांनी सूत्रसंचालन केले.

निधन वार्ता
आबुबाई पाटील

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
होन्याळी (ता. आजरा) येथील श्रीमती आंबुबाई तुकाराम पाटील ( वय ९०वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन विवाहित मुली,सूना , जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सेवा सोसायटीचे गटसचिव वसंत पाटील यांच्या आई होत.

आजरा हायस्कूलमध्ये ‘पाणी वाचवा’ अभियान उत्साहात संपन्न

आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
राष्ट्रीय हरितसेना अंतर्गत आजरा हायस्कूलमध्ये ‘पाणी वाचवा’ अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. पाणी वाचवा या विषयावर आधारित विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स स्पर्धांचे आयोजन*श करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एनआयटी कोल्हापूरचे सह प्राध्यापक श्री. अमोल कुलकर्णी, सामाजिक वनिकरण विभाग गडहिंग्लजचे वनपाल श्री. एस. के. निळकंठ आणि कु. एस. एस. पत्की उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री. ए. एल. तोडकर यांच्या स्वागत आणि प्रास्ताविक भाषणाने झाली. त्यांनी अभियानाची उद्दिष्ट्ये स्पष्ट केली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री. अमोल कुलकर्णी यांनी ‘पाणी वाचवा’ या विषयावर मार्गदर्शन केले, ज्यामध्ये त्यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील पाण्याचा योग्य वापर, पाणी वाचवणं ही आधुनिक काळाची गरज, पाण्याचा गैरवापर ही भविष्यकाळातील धोक्याची घंटा यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले .
उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापक सौ. एच. एस. कामत यांनी मानले. विद्यार्थ्यांमध्ये पाणी बचतीबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. याप्रसंगी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
छायावृत्त…

राजमाता जिजाऊ फाउंडेशन संचलित श्री छत्रपती युवा ग्रुप यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. याचप्रसंगी येणाऱ्या संयुक्त शिवजयंती सोहळ्यानिमित्त पासबुक पूजन संपन्न झाले.या कार्यक्रमावेळी श्री छत्रपती युवा ग्रुपचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच कार्यकारी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


