मंगळवार १९ मे २०२६

शक्तीपीठची मागणीच नाही तर पूर्ततेचा अट्टाहास कशासाठी…?
आजरा येथे मोर्चाद्वारे सवाल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शक्तीपीठ मार्गाची कोणीही मागणी केली नसताना धर्म व देवाचे नाव घेऊन धर्मांध राजकारण करणाऱ्या सरकारला आदानी व अंबानी यांचे हित साधायचे आहे. परंतु हे हित साधत असताना अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. पर्यावरण व संस्कृतीचा प्रश्न निर्माण होणार आहे याचे भान सरकारला दिसत नाही. आमदार शिवाजीराव पाटील यांचे शक्तिपीठ उभारणीचे स्वप्न उधळून लावू व त्यांचे स्वप्न हे स्वप्नच ठेवू असे प्रतिपादन कॉम्रेड संपत देसाई यांनी केले. आजरा येथे शक्ती पीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कॉ. देसाई बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी नंदाताई बाभुळकर, माजी आमदार के.पी.पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई, प्रा. सुनील शिंत्रे, शांताराम पाटील आदींनी मार्गदर्शन केले.
मोर्चामध्ये जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, आजरा कारखाना अध्यक्ष मुकुंदराव देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, माजी सभापती उदयराज पवार, संजयभाऊ सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, राजू होलम ,डॉ. धनाजी राणे, युवराज जाधव/खानापूर, निवृत्ती कांबळे, गोविंद पाटील, काशिनाथ मोरे ,संजय तर्डेकर , निसार लाडजी, शांताराम पाटील, विक्रम देसाई, रवी भाटले ,शिवाजी इंगळे, सुभाष देसाई ,महादेव पोवार, निवृत्ती कांबळे प्रकाश मोरुस्कर , आप्पा पावले, दिनेश कांबळे, प्रभाकर कोरली, अमित गुरव, चंदर पाटील व बाधित शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची उदासीनता…
शक्तीपीठला एकीकडे कांही मंडळींकडून विरोध केला जात असला तरीही दुसरीकडे याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शक्तीपीठ बाधित गावांमधील अनेक शेतकरी या आंदोलनाकडे पाठ फिरवत असल्याचे नेमके कारण स्पष्ट होत नाही.

बुद्धांच्या समतेच्या विचारांची आज समाजाला गरज : मंत्री हसन मुश्रीफ

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वझरे (ता. आजरा) येथे नव्याने उभारण्यात आलेल्या नालंदा बुद्ध विहार लोकार्पण सोहळ्यात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुद्ध विहारातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले. तसेच येथील अभ्यासिकेतून गावातील युवकांनी मोठे अधिकारी बनावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कारखाना चेअरमन वसंतराव धुरे होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, भगवान गौतम बुद्ध यांनी सत्य, शांतता, अहिंसा आणि समतेचा संदेश दिला. आजच्या काळात हा संदेश समाजाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. बुद्ध विहार हे केवळ धार्मिक स्थळ न राहता समाज प्रबोधनाचे केंद्र बनले पाहिजे. अभ्यासिकेचा लाभ घेऊन वझरे गावातील युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदांवर पोहोचावे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, आजरा कारखान्याचे संचालक काशिनाथ तेली तसेच कॉ. संपतराव देसाई यांनीही मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास बी. के. कांबळे, संजय केसरकर, शिवाजी पाटील, शशिकांत जाधव, सरपंच सुनिता गुरव, विजयराव वांगणेकर, बापू निऊगरे, युवराज येसणे, डॉ. कांबळे , तुषार घोरपडे, सुधीर सावंत आदी उपस्थित होते.

स्पष्टीकरण द्या, अन्यथा टोल सुरू करू देणार नाही…
शिवसेना उबाठाचा इशारा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर ते बांदा मार्गावर आजरा एमआयडीसी जवळ सुरू होत असलेल्या टोल वसुलीमध्ये आजरा तालुक्यातील खाजगी व व्यावसायिक वाहनधारकांना टोलमाफी कशा पद्धतीने व किती वर्षापर्यंत दिली जाणार आहे ? आजरा तालुक्यातील हद्दीमध्ये रस्त्यालगत असणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काय उपाययोजना करण्यात आली आहे ? शहरातील संभाजी चौकात पावसाचे पाणी साचते त्याचबरोबर वाहतुकीची कोंडी होते त्याचे काय ? यासह विविध प्रश्न उपस्थित करत शिवसेना उबाठाच्या वतीने सर्व प्रश्नांची लेखी उत्तरे दिल्याशिवाय टोल सुरू करू देणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
टोल सुरू करण्याच्या हालचाली सुरू असताना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक रस्त्यालगत असणाऱ्या गावांना बस थांबे बांधलेले नाहीत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा टोल नाका किटवडे येथे स्थलांतरित करणार असल्याचे विधान केले होते त्याबद्दल त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावावी. आजरा साखर कारखान्याच्या कामगारांची वाहने व उसाच्या वाहनांना टोल मुक्ती देणार का ? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
वरील सर्व प्रश्नांबाबत लेखी माहिती द्यावी अन्यथा टोल चे काम बंद पाडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे
याबाबतचे लेखी निवेदन आजरा तहसीलदारांना देण्यात आले असून याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, दिनेश कांबळे, सुयश पाटील, चंदर पाटील, संजय येसादे, समीर चांद, शिवाजी आढाव, बिलाल लतीफ, महेश पाटील व शिवसैनिक उपस्थित होते.

आजरा परिसरात पावसाची पुन्हा हजेरी
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालुक्यात ठीक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह सोमवारी सायंकाळी पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली.
सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला पाऊस सुमारे तासभर सुरूच होता.
पावसामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. पावसाच्या दररोजच्या हजेरीने उन्हाळी पिकांची सुगी अडचणीत आली आहे.
पाऊस गतवर्षीप्रमाणे हळूहळू स्थिरावत चालण्याचे स्पष्ट होत आहे.
कृषी विभागाची आज बियाणे व खतसाठा आढावा बैठक
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
खरीप हंगाम २०२६ च्या अनुषंगाने खत बियाणे उपलब्धतेबाबत आढावा बैठक मंगळवार दिनांक १९ मे रोजी सकाळी ११.०० वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा येथे आयोजित करण्यात आले आहे.
उपसभापती सौ. यशोदा पोवार यांनी सदर बैठकीची मागणी केली होती.
कचराच कचरा चहुकडे...

शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे नवनवीन डेपो होऊ लागले असून हे डेपो म्हणजे स्थानिक रहिवाशांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
♦ न्यायालयाच्या हुकमाप्रमाणे सातबारा पत्रकावर नाव नोंदवण्यासाठी एक लाख २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून पैकी ६० हजार रुपयांची लाच घेत स्वीकारताना नांदणीचे प्रभारी मंडळ अधिकारी अमितकुमार पडळकर/नांदणी मंडल अधिकारी व शिवाजी जाधव या दोघांना अटक करण्यात आली आहे.
♦ फुटलेले ‘ नीट ‘ चे पेपर सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी खरेदी केल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला असून या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.
♦ कचरा डोळ्यात गेल्याने दुचाकीवरील ताबा सुटून दुचाकी विहिरीत कोसळून दऱ्याचे वडगाव ता. करवीर येथे मयुरी विशाल बेनके या ३० वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू झाला.
♦ अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने बेकायदा ऑनलाइन औषध विक्री स्पर्धेविरोधात बुधवार दिनांक २० मे रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे.

आयपीएल न्यूज
काल झालेल्या चेन्नई विरुद्ध हैदराबाद लढतीमध्ये हैदराबादने चेन्नईला पाच गड्यांनी नमवले. एकीकडे चेन्नईचे आव्हान संपुष्टात येत असतानाच हैदराबादने प्ले ऑफ फेरीत प्रवेश केला आहे.
गुण तक्ता
बंगळूर १८
गुजरात १६
हैदराबाद १६
पंजाब १३
राजस्थान १२
चेन्नई १२
दिल्ली १२
कोलकाता ११
मुंबई. ०८
लखनौ ०८
आजचा सामना
राजस्थान विरुद्ध लखनौ
वेळ : सायंकाळी ७.३० पासून

आजचे पंचांग
दिनांक : 19 मे 2026
वार : मंगळवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : तृतीया (दुपारी 02:18 पर्यंत) त्यानंतर चतुर्थी तिथी
नक्षत्र : मृगशीर्ष नक्षत्र (सकाळी 08:41 पर्यंत) त्यानंतर आर्द्रा नक्षत्र
योग : धृति योग (सायंकाळी 05:48 पर्यंत) त्यानंतर शूल योग
करण : गराजा करण (दुपारी 02:18 पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : मिथुन राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी 03:51 ते सायंकाळी 05:28 पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी 12:09 ते दुपारी 01:01
सूर्योदय : सकाळी 06:04
सूर्यास्त : सायंकाळी 07:06
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: 2083 विक्रम संवत
शक संवत: 1948 शक संवत


