mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार २५ एप्रिल २०२६

६१ लाखांचे डिजिटल अरेस्ट ; साळगावच्या एकाला अटक


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी असल्याचे भासवून “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली केपे/गोवा येथील एका व्यक्तीला तब्बल ६१ लाख ८४ हजार २०० रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी साळगाव या. आजरा येथून एका ४८ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केपे येथील तक्रारदाराला एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअप कॉल आला होता. समोरच्या व्यक्तीने आपण मुंबई क्राईम ब्रांचचे अधिकारी बोलत असल्याचे सांगितले. तक्रारदाराचा संबंध “पीएफआय” संघटनेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात असल्याचे सांगून त्यांना धमकावण्यात आले. इतकेच नव्हे तर, संशयिताने बनावट बँक स्टेटमेंट आणि अटक वॉरंट व्हॉट्सअपवर पाठवले.

या प्रकरणातून सुटका करण्यासाठी संशयिताने तक्रारदारावर दबाव आणला आणि त्यांना ६१ लाख ८४ हजार २०० रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती.

पणजी पोलिसांनी संबंधित व्यक्तीला साळगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. तपासादरम्यान धक्कादायक माहिती पोलिसांसमोर आली असून संशयिताच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सायबर विभागाने संशयितांकडून या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याची माहिती मिळवण्यास सुरुवात केली आहे .

शेत जमिनीच्या वादातून दोघा भावांनी एका भावास बॅटने चोपले

दोघां विरोधात गुन्हा नोंद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वडीलार्जित शेत जमिनीच्या वाटणीच्या कारणावरून असणाऱ्या वादाचे पर्यवसान मारामारीत होऊन सागर शामराव चाळके व सतीश शामराव चाळके या दोघांनी वैभव शामराव चाळके या भावाला बॅटने मारहाण करून जखमी केल्याची घटना देवर्डे ता आजरा येथे घडली आहे.

याप्रकरणी वैभव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर व सतीश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार अनिल सरंबळे करीत आहेत.

आजऱ्यात खेळता खेळता शिकूया परीक्षेचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

येथील पंचायत समितीकडील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्यावतीने खेळता खेळता शिकूया परीक्षेचे आयोजन केले होते. पाच वर्ष पूर्ण झालेल्या बालकांनी परीक्षेमधे सहभाग घेतला. विद्यार्थी व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील व्यंकटराव हायस्कूलवर ही परीक्षा झाली.

आजरा पंचायत समितीच्या सभापती जयश्री गाडे व उपसभापती यशोदा पोवार यांच्या हस्ते उ‌द्घाटन झाले. आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत, बालविकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक प्रमुख उपस्थित होते. ४२२ चिमुकल्यांनी या परीक्षेमधे सहभाग घेतला. या परीक्षेसाठी अंगणवाडी सेविकांनी विविध खेळ व कृतीच्या माध्यमातून परीक्षा व अभ्यास आनंददायी वाटावी यासाठी सराव करुन घेतला होता. हीं मूल पहिलीमधे प्रवेश घेणार आहेत. त्यांची शाळापूर्व तयारी करून घेण्यात आली. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती नाईक म्हणाल्या, मुलामधे लहान वयात परिक्षेचा अनुभव व्हावा. नकारात्मक व निरोगी स्पर्धची भावना निर्माण व्हावी व आत्मविश्वास वाढावा. अभ्यासाची आवड व सवय विकसित करण्याबरोबर सर्वांगीण विकासाला चालना मिळावी हीं यामागची भूमिका आहे. हा उपक्रम बालकाच्या उज्वल यशासाठी भविष्यात महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

आजऱ्यात अंगणवाड्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; नगरपंचायतीला निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरातील अंगणवाड्यांची दुरवस्था गंभीर बनली असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने दुरुस्ती व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आजरा नगरपंचायत यांना निवेदन सादर करण्यात आले. अन्याय निवारण समितीच्या नगरसेविका डॉ. स्मिता कुंभार (परळकर) यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

हिंदुहृदय  सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान निधीतून सदर शाळा अंगणवाड्या किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी नगराध्यक्षांकडे व मुख्याधिकाऱ्यांकडे  करण्यात आली आहे.

शहरातील अंगणवाडी क्रमांक दोन/ कुमार भवन अंगणवाडी क्रमांक १३, अंगणवाडी क्रमांक २१ मिनर्वा कॉलनी व अंगणवाडी क्रमांक ४/ छत्रपती शिवाजीनगर या अंगणवाड्यांची छप्पर दुरुस्ती, बांधकाम, चौकट दरवाजे बदलणे इत्यादी कामे करणे आवश्यक आहे. यासाठी निधीची मागणी लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

हरपवडे धनगरवाड्यावर पाणी टंचाईचे संकट

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

:हरपवडे (ता. आजरा) येथील धनगरवाड्यावर पाणी टंचाईचे संकट उभारले आहे. या धनगरवाड्यावर जंगलातील सायफन पध्दतीने पाणीपुरवठा होतो. उन्हाळा तीव्र झाल्याने झऱ्याचे पाणी कमी झालेले आहे. त्यामुळे धनगरवाड्यावरील नागरीकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

हरपवडे पासून तीन किलोमीटर अंतरावर जंगलात हरपवडे धनगरवाडा आहे. येथे २१ धनगरबांधवाची घरे आहे. ग्रामपंचायतीने येथे सायफन पध्दतीने पाणी पुरवठा केला आहे. उन्हाळा तीव्र झाला की झऱ्याचे पाणी कमी होते व टंचाईला स्रवात होते. जंगलातून सुमारे एक किलोमीटर अंतरावरून या वसाहतीला पाणीपुरवठा होत आहे. धनगर बांधवाना पुरेसे पाणी मिळत नसल्याने महीला, पुरुषांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे. या वसाहतीला पाणी मिळावे यासाठी टंचाई आराखड्यात कुपनलिकाचा प्रस्ताव आहे. पण धनगरवाडा हा उंच ठिकाणी जंगलात असल्याने कुपनलिका खोदणारे वाहन तेथे जात नसल्याने प्रशासनासमोर अडचण निर्माण झाली आहे.

येथील पाण्याची गरज भागवण्यासाठी आणखीन कोणते उपाय करता येतील यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता एम. व्ही. तिवले यांनी सांगीतले. श्री. तिवले, शाखा अभियंता अरुण मोरे व हरपवडे ग्रामपंचायतीचे सरपंच सागर पाटील यांनी धनगरवाड्‌यावर पहाणी दौरा केला.

बाजारपेठेत काजू बी ची आवक मंदावली 

वातावरण बदलामुळे उत्पादन कमी 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा बाजारपेठत काजू बीची आवक मंदावली आहे. काल आठवडा बाजारात केवळ टनभर काजू बिया विक्रीसाठी जाल्याचे व्यापारी सूत्रानी सांगितले.

वातावरण बदलाचा मोठा फटका बाजू उत्पादनावर झाला जी शेतकऱ्याचे जार्थिक चक्र बिघडले असून व्यापा-यांची उलाढालही घटली आहे.

काल शुक्रवारी आठवडी बाजार होता. सात आठ व्यापा-यांनी काटे लावले होते. दिवसभरात अपेक्षीत उलाढाल झाली नाही. एप्रिल महीन्याचा शेवटचा आठवडा असल्याने सालाबाद प्रमाणे या बाजारात काजूची मोठी उलाढाल होईल अशी अपेक्षा व्यापारी बाळगून असताना बाजारपेठेतील चित्र मात्र उलटे दिसत होते. बाजारपेठेत व्यापारी बसून होते. शेतक-यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. वातावरण बदलाचा मोठा फटका यंदा काजू उत्पादनावर झाला आहे. चाळीस टक्के इतकेच काजूचे उत्पादन दिसून येत आहे. दर्जेदार काजूबी बाजारपेठेत उपलब्ध नसल्याने काजू बीचा दरही प्रति किलो १५० रुपये पर्यंत राहीला आहे.

नवीन काजू बी उपलब्ध होईल अशा आशेवर असणारा काजू प्रक्रिया उद्‌योजकही अपेक्षीत आवक होत नसल्याने चांगलाच धास्तावला आहे. स्थानिक बाजारपेठेत काजू उपलब्ध नाही व युध्दजन्य परिस्थितीमु‌ळे बाहेरून येणाऱ्या काजू बीयावर मर्यादा आल्याने या वर्षी अनेक काजू प्रक्रिया उद्‌योग बंद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही

आर्थिक संस्थांनाही फटका...

यंदा काजूचे उत्पादन निम्म्याहून कमी आले आहे. मार्च, एप्रिल हा काजू हंगाम तेजीत असतो. अशा काळात अत्यल्प काजू बी बाजारपेठेत विक्रीसाठी आल्याने केवळ व्यापारी वर्गच नाही, काजू प्रक्रिया उद्‌योजक, आर्थिक संस्था यांनाही याचा फटका बसणार आहे.

 आजचे पंचांग 

दिनांक : २५ एप्रिल २०२६
वार : शनिवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : नवमी (सायंकाळी ६.२८ पर्यंत) त्यानंतर दशमी तिथी
नक्षत्र : आश्लेषा नक्षत्र (रात्री ८.०४ पर्यंत) त्यानंतर मघा नक्षत्र
योग : गण्ड योग (रात्री ११.४२पर्यंत) त्यानंतर वृद्धि योग
करण : बलवा करण (सकाळी ०६.५० पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : कर्क राशी (रात्री ०८.०४ पर्यंत) त्यानंतर सिंह राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०९.२६ ते सकाळी ११.०१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.११ ते दुपारी ०१.०२
सूर्योदय : सकाळी ०६.१६
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज

गुजरात विरुद्ध बंगळूरू सामन्यामध्ये गुजरातच्या साई सुदर्शनने दमदार शतक काढूनही बंगळूरूने विराट कोहलीच्या फलंदाजीच्या जोरावर गुजरातवर विजय मिळवला.

आजचे सामने 

दिल्ली विरुद्ध पंजाब

स्थळ : दिल्ली

वेळ : दुपारी ३.३० पासून

राजस्थान विरुद्ध हैदराबाद

स्थळ : उदयपूर

वेळ : सायंकाळी ७.३० पासून

आज तालुक्यात …

शेळप ता. आजरा येथे वारकरी कीर्तन संमेलन

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तणाव निवळला… बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!