mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


भगदाड पुलाला नव्हे , सिस्टीमला…?

       ज्योतिप्रसाद सावंत…

      आजरा येथील लेंड ओहोळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न किती गंभीर बनत चालला आहे हे गेले आठवडाभर रस्ता काम सुरू असताना वारंवार पडत असलेल्या भगदाडांमुळे अधोरेखित होऊ लागले आहे. असे असतानाही पुलाला वारंवार पडणारे भगदाड हे भगदाड म्हणजे केवळ पुलाला पडलेले भगदाड नसून भ्रष्ट सिस्टीमला पडलेले भगदाड आहे असे म्हणण्यास कांहीच हरकत नाही.

      मुळातच महामार्गाचे काम हे काल सर्वे केला आणि आज सुरू झाले असे नाही. वर्षानुवर्षे यावर काथ्याकूट करण्यात आले आहे. विविध विभागांकडून सर्वे करण्यात आले आहेत. असे असताना आजरा शहराच्या प्रवेशद्वाराजवळच व अन्य पर्याय नसणाऱ्या ठिकाणी असणाऱ्या या पुलाच्या नवीन बांधकामाबाबत विचार का झाला नाही? हा संशोधनाचा विषय आहे. लहान मोठ्या मो-या व गरज नसतानाही काही ठिकाणी पूल उभारण्यात आले आहे मात्र लेंडओहोळ नाल्यावरील या पुलाच्या नवीन बांधणीचा विषय कसा काय पुढे आला नाही हा प्रश्नही महत्त्वाचा आहे.

      संकेश्वर -बांदा महामार्गामुळे अनेकांचे उखळ पांढरे झाले आहे. विशेषत: वन विभागाला हाताशी धरून हजारो वृक्षांची कत्तल बेमालूमपणे व कोणतेही पर्यावरण हानीचे भान न ठेवता केली गेली. रस्त्याच्या पोटात असणाऱ्या विविध कंपन्यांच्या केबल्स उत्खननात बाहेर आल्या. या केबल्समधील तांब्याचे वाढलेले मूल्य लक्षात घेऊन दिवस- रात्र केबल चोरीचे उद्योग अनेकांनी केले. अर्थातच या सर्व बाबीला रस्ता तयार करणारी व उत्खनन करणारी यंत्रणा पाठीशी घालत होती.

      एखाद्या गरजूला ब्रासभर मुरूम मिळवताना अथवा दोन-चार फूट उत्खनन करताना कायद्याचा बडगा दाखवणाऱ्या संबंधित विभागाच्या नाकावर टिच्चून तालुक्यात हजारो ब्रासचे प्रचंड  उत्खनन झाले. यामध्ये मुरूम,माती खुलेआमपणे काढलीली गेली आहे. यासाठी उत्खनन विभागाच्या परवानगीची गरज लागली असावी असे वाटत नाही.

      हे सर्व घडत असताना लेंड ओहोळ नाल्यावरील पूल मात्र दुर्लक्षित राहिला. पावसाच्या तोंडावर हा पूल न झाल्याने होणाऱ्या संभाव्य धोक्यांची चर्चा सुरू झाली. हा पूल होणार नाही याबाबत बरेचसे नागरिक अनभिज्ञ होते. रस्ता तयार करताना झालेली पडझड पाहून मात्र आता नागरिक आक्रमक झाले आहेत. काम आटोपून आपला बाडविस्तारा गुंडाळण्याच्या तयारीत महामार्ग विभागाचा ठेकेदार दिसतो. एकदा येथून यंत्रणा हलली की परत या पुलाला वारस राहणार नाही. पुलाचे घोंगडे भिजत पडणार हे देखील वास्तव आहे. ‌ त्यामुळेच आता हा पूल नव्याने बांधल्राशिवाय पुढचे काम चालू करू द्यायचे नाही असा पवित्रा शहरवासीय घेऊ लागले आहेत.

     एकीकडे यावर्षी प्रचंड पावसाची शक्‍यता हवामान तज्ञ वर्तवत आहेत. जून महिन्याची सुरुवात दोनच दिवसात होत आहे. मान्सून केंव्हाही हजेरी लावू शकतो असे असताना या पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.बाह्यवळण रस्त्याची केवळ चर्चाच असल्याने आता ‘ बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला ‘ अशी अवस्था महामार्ग प्राधिकरणाची झाली आहे. पुलाची पडझड समोर दिसत आहे पण पाऊस तोंडावर असल्याने तांत्रिक मंजुरी सह इतर मर्यादा असल्याने नेमकी भूमिका कोणती घेणार ? या प्रश्नाचे लवकरच उत्तर अपेक्षित आहे.

टोलचे भूतही मानगुटीवर बसणार?

     एकीकडे महामार्गाचे काम पूर्णत्वास जाईल तसतसे टोल वसुलीची यंत्रणा सज्ज होऊ लागली आहे. यासाठी मसोली नजीक टोलनाका उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. हा टोलचा प्रश्न आजरेकरांच्या दृष्टीने अवघड जागेचे दुखणे होणार आहे. पश्चिम भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येजा करताना या टोलचा वेळोवेळी त्रास होणार आहे. मुळातच सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर हा टोलनाका का उभा केला नाही ? असा प्रश्न आता तालुकावासीय उपस्थित करू लागले आहेत. तालुका वासियांना टोल द्यावा लागणार का ? द्यावा लागण्याची शक्यता गृहीत धरून त्याला कडाडून विरोध करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे टोलचे भूत मानगुटीवर बसण्यापूर्वीच ते गाडण्याची तयारी तालुका वासीय करू लागले आहेत. यासाठी उद्या शुक्रवारी व्यापक बैठकही बोलवण्यात आली आहे.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

 एसटीच्या विलिनीकरणामुळे २० हजार कोटींचा भार; हा परिवहन मंत्र्यांचा दावा चुकीचा, दिशाभूल करणारा. – मनसे जयराज लांडगे यांचा आरोप.

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पेद्रेवाडीच्या सरपंच सौ.रेडेकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!