
मुम्मेवाडी येथून पावणे दोन लाखांचे सोने लंपास

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुम्मेवाडी ता. आजरा येथील तुकाराम भीमा भिऊंगडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी पावणे दोन लाखांच्या सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एक लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवारी सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास सदर प्रकार घडला.
भिऊंगडे हे घराला कुलूप लावून बाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश केला व सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केली. याबाबतची फिर्याद पोलीसात देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

एस.एस.सी. परीक्षेत व्यंकटराव हायस्कूलचे यश…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा महाल शिक्षण मंडळ संचलित व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी एस .एस. सी. परीक्षा २०२४ मध्ये आजरा तालुक्यात प्रथम, द्वितीय व केंद्रात पाचवा येण्याचा मान मिळवला.
शाळेचा ९८.९९% निकाल लागला असून कुमारी खवरे कादंबरी जयदीप (सुलगाव ) हिने ९८.४०%% गुण मिळवून आजरा तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. कु.नवार राखी राजू (गवसे) ९७.४०% आजरा तालुक्यात द्वितीय क्रमांक तर कु.येरुडकर मेघा श्रीधर (पेरणोली) ९५.६०% गुणांसह केंद्रात पाचवी आली. कुमार पाटील आदित्यराज दीपक (गडहिंग्लज ) ९४.८०%% शाळेत चौथा, कुमारी शिवणे समृद्धी सुरेश (नावलकरवाडी) ९३.८०% गुण मिळवून शाळेत पाचवा येण्याचा मान मिळवला. ९०% च्या वर गुण मिळवत शाळेतून अकरा विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

टोल विरोधात आजऱ्यात शुक्रवारी सर्वपक्षीय मेळावा
आंदोलनाची दिशा ठरणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संकेश्वर – बांदा महामार्ग अजून अपुरा आहे, ज्या शेतकऱ्याच्या जमिनी या रस्त्यासाठी घेतल्या आहेत त्यांच्या संपादनाचा मोबदलाही अजून दिलेला नाही, गेले वर्षभर वाहतुकीची प्रचंड कोंडी सुरू आहे असे असताना टोल नाक्याचे काम मात्र वेगाने सुरू करून आजरेकर जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार चालु आहे. त्यामुळे या टोलला आजरेकर जनतेचा विरोध राहील असा बैठकीतील चर्चेचा सूर होता. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मा सभापती अल्बर्ट डिसोझा होते.
सुरुवातीला कॉ. संपत म्हणाले, हा रस्ता राष्ट्रीय महामार्गच्या वतीने होत आहे, बांधा, वापरा, हस्तांतरित तत्वाने जरी हा रस्ता होत असला तरी आमचं म्हणणं असे आहे की कोल्हापूरच्या जनतेचा विरोध पाहून सरकारने रस्त्यासाठी लागणारा निधी संबंधित कंपनीला दिला. त्याच धर्तीवर या रस्त्यासाठी जो पैसा कंपनीने घातला आहे ती रक्कम सरकारने कंपनीला देऊन हा रस्ता टोल मुक्त करावा त्यासाठी तीव्र लढा उभा करावा लागेल.
विलास नाईक म्हणाले, आजरेकर जनतेला टोल रुपात नाहक भुर्दंड बसणार आहे त्यासाठी आजरेकरांनी एकत्र येऊन लढा द्यावा.तानाजी देसाई म्हणाले, आता ईथुनपुढे जे संघर्ष करतील त्यांनाच न्याय मिळेल त्यामुळं आता लढण्याशिवाय पर्याय नाही.
यावेळी प्रभाकर कोरवी, प्रकाश मोरुस्कर, जोतिबा चाळके यांनी मनोगते व्यक्त केली.
बैठकीला डॉ. अनिल देशपांडे, संजयभाऊ सावंत, आनंदराव कुंभार, वनविजय थोरवत, दशरथ अमृते, संभाजी पाटील (हात्तिवडे),मिनीन परेरा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते.



