


१५ वर्षाच्या मुलीचे आज-यातुन अपहरण
आजरा येथील सावरवाडी परिसरात ऊसतोड करण्यासाठी आलेल्या कुटुंबातील पंधरा वर्षीय मुलीचे दोन दिवसापूर्वी अज्ञातांकडून अपहरण करण्यात आले आहे. मुळगाव मुलाखी, ता. पुसद, जि. यवतमाळ असणारे हे ऊसतोड कामगार कुटुंब सध्या सावरवाडी, (आजरा ) येथे मुक्कामास आहे. मंगळवार दिनांक २८ रोजी सकाळच्या सुमारास सावरवाडी येथील अवधूत मोहन सबनीस यांचे शेताजवळील गायरान येथील झोपडीतून पीडित मुलगी प्रात:विधीच्या निमित्ताने निघून गेली असता या अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाकडून अपहरण करण्यात आले आहे. मुलीच्या वडिलांनी याबाबतची फिर्याद पोलिसात दिलेने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा फौजदार चंद्रकांत मांगले पुढील तपास करीत आहेत.


मडिलगे (ता. आजरा) येथील दशरथ भिमराव नेऊंगरे यांचे मुंबई येथे अपघाती निधन
आजरा तालुक्यातील मडिलगे येथील दशरथ भीमराव नेऊंगरे यांचे दहिसर मुंबई येथे अपघाती निधन झाले. नेउंगरे हे कामावरून घरी परतत असताना सिमेंटच्या पाईप ने भरलेले वाहन खड्ड्यातून जाताना वाहनाची दोरी तूटून सदर पाईप खाली कोसळले. रस्त्यावरून जाणाऱ्या नेउंगरे यांना जोरात मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे वृत्तपत्र विक्रेते बापू नेउंगरे यांचे ते बंधू होत.


‘सार्वजनिक बांधकाम’च्या भूमिकेने आजऱ्यातील अनधिकृत बांधकामधारक व व्यावसायिक धास्तावले…

आजरा येथील बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेले दुकान गाळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ठाम भूमिकेमुळे जमीनदोस्त करण्यात आले. सदर गाळे जमीनदोस्त केल्यानंतर ‘सार्वजनिक बांधकामचे’ मुख्य अभियंता आर. एन. सावंत यांनी शहरातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीच्या रस्त्यावर व रस्त्याच्या शेडबॅकमध्ये अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या टपऱ्या,पक्की बांधकामे जमीनदोस्त करण्यात येणार असल्याचा इशारा दिल्याने शहरातील शंभरभर व्यवसायिक धास्तावले आहेत. सार्वजनिक जागेमधील अतिक्रमणे ही आजरा शहरवासीयांच्या दृष्टीने नेहमीच डोकेदुखी ठरत आली आहे. अनेक ठिकाणी अनधिकृतरीत्या बांधकामे करून व्यवसाय थाटण्यात आले आहेत. जनआंदोलनाच्या रेट्यामुळे बुधवारी शहरातील वादग्रस्त ठरलेले सहा दुकान गाळे सार्वजनिक बांधकाम व नगरपंचायतीच्या संयुक्त कारवाईद्वारे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. यातील उर्वरित तीन दुकानगाळे लवकरच पाडण्यात येणार आहेत. या कारवाईनंतर शहरातील इतर अनधिकृत रित्या उभारण्यात आलेले दुकान गाळे अथवा इतर बांधकामे यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारी अशी अतिक्रमणे तातडीने हलवण्याची गरजही आहे. मुख्य अभियंता सावंत यांनी रीतसर रस्त्याची मोजमापे घेऊन अतिक्रमणे निश्चित केली जाणार असल्याचे कारवाईनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे आता शहरांमध्ये अशा अनधिकृत बांधकामांमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

राजकीय मंडळींचे ‘प्रताप’
शहरांमध्ये बहुतांशी ठिकाणी असणारे दुकान गाळे, टपऱ्या, खोकी यांचे मूळ मालक हे पूर्वीच्या ग्रामपंचायतीशी व सध्याच्या नगरपंचायतीशी संबंधित असणारी राजकीय मंडळीच आहेत. अधिकाराचा गैरवापर करत सदर जागा सुरुवातीला पदरात पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर पोटभाडेकरू ठेवून भरमसाठ भाडे उकळायचे आणि आपला चरितार्थ चालवायचा असे प्रतापही बऱ्याच मंडळींनी केल्याची चर्चा सध्या आजरा तालुक्यात सुरू आहे.


आजऱ्यात मंगळवारी प्रशिक्षणपर व्याख्यान
मनुष्य आणि हत्ती यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. हा थांबायला हवा. आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यांतील हत्तींचा वावर ही चिंतेची बाब आहे. हत्तींबरोबर इतर जंगली प्राण्यांशी कसे जगावयाचे हे शिकले पाहिजेत यासाठी गजमित्र व ‘ट्रंक कॉल द वाईल्ड लाईफ’ फाउंडेशनचे संस्थापक आनंद शिंदे मार्गदर्शन करणार आहेत. येथील अण्णा- भाऊ सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी (ता. ४) सकाळी १० वाजता व्याख्यान होईल. वनविभाग व अर्जुन रिफायनरीज गडहिंग्लज यांच्यातर्फे आयोजन केले आहे. शेतकरी व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन
करून व्याख्यानाला उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.


