शुक्रवार १० एप्रिल २०२६


उत्तूरमध्ये विनापास परवाना लाकूड साठा उघड,वनविभागाची कारवाई

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गडहिंग्लज वनपरिमंडळ विभागाने उत्तूर येथील एकनाथ सुतार यांच्या ‘विवेक फर्निचर वर्क्स’ या दुकानाची तपासणी केली असता विनापरवाना लाकूड साठा आढळून आला. तपासणीदरम्यान मनाई प्रजातीतील सागवान तसेच बिगर मनाई प्रजातीतील लिंब, सिरस व आकेशिया या झाडांचे कापीव लाकूड सापडले.
या लाकडाची एकूण किंमत सुमारे रुपये २,३१,४६४ इतकी असल्याचे समोर आले. संबंधित लाकडासाठी आवश्यक पास अथवा परवाना नसल्याने वनविभागाने हा साठा जप्त करून पोलिस पाटील यांच्या ताब्यात दिला.
या प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे व परिक्षेत्र वन अधिकारी सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही कारवाई वनपाल सागर पोवार, वनरक्षक रुद्रगोंडा पाटील, प्रकाश शिंदे, दयानंद शिंदे तसेच वनसेवक तुकाराम जाधव व आनंदा कुंभार यांनी केली.

अमली पदार्थांंच्या विक्री व वितरणावर नियंत्रण ठेवा
नगरसेवकांची पोलीस प्रशासनाकडे मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुक्यात तरुणांमध्ये वाढत असलेल्या बेशिस्त प्रकारांवर तसेच अमली पदार्थांच्या वाढत्या प्रभावावर आळा घालण्याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आजरा नगरपंचायतीच्या विरोधी नगरसेवकांनी आजरा पोलीसात केली आहे.
आजरा शहराची सामाजिक, सांस्कृतिक व सहकार क्षेत्रातील परंपरा आजतागायत आदर्शवत आहे. तथापी आजरा शहरात मागील कांही दिवसांमध्ये घडलेल्या घटना दुर्देवी आहत. किरकोळ वादातून दोन जीवलग मित्रामध्ये झालेला खुन ही संपूर्ण शहराच्या प्रतिमेला धक्का देणारी आहे.
शहरात व तालुक्यात अमली पदार्थाच्या वाढत्या वापरामुळे तरुणाई चुकीच्या मार्गाला लागण्याचा धोका बळावत आहे. अमली पदार्थाचे सेवन व त्याची अवैद्य विक्री ही केवळ कायद्याच्या दृष्टीने गुन्हा नसून समाजाच्या आरोग्याला व सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करणारी बाब आहे. त्यामुळे आजरा पोलीसांनी शहर व तालुक्यात अमली पदार्थाच्या विक्री व वितरणावर कठोर कारवाई करावी,अवैद्य कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांचा शोध घेऊन त्याचा बिमोड करावा, तरुणांमध्ये जनजागृती करुन त्यांना अशा व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी,शहरात कायदा व सुव्यवस्था अभाधित राखणेसाठी आवश्यक ती प्रतिबंधनात्मक उपाययोजना करणेत याव्यात अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर नगरसेवक अभिषेक शिंपी, परशुराम बामणे, असिफ पटेल, आसिफ सोनेखान,निसार लाडजी, विक्रम पटेकर, नगरसेविका स्मिता कुंभार, रेश्मा बुड्डेखान यांच्या सह्या आहेत.

शिवसेना ( उबाठा) च्या आजरा शहर प्रमुख पदी समीर चांद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शिवसेना ( उबाठा) पक्षाच्या आजरा शहरपदी समीर अब्दुल चांद यांची निवड करण्यात आली आहे.
सदर निवडीचे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी त्यांना दिले आहे. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख युवराज पवार युवा सेनेचे महेश पाटील दिनेश कांबळे यांच्यासह जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.

पेरणोली, कोरीवडे सरपंचपद पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज नाही

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली, कोरीवडे येथे सरपंचपदासाठीच्या रिक्त जागासाठी तर तालुक्यातील मडिलगे, बहिरेवाडी, देऊळवाडी, धामणे व हरपवडे येथील सदस्यपदाच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे. काल गुरुवार अखेर एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उद्या शनिवारी सुट्टी असल्याने आज मोठ्या संख्येने अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे
मंगळवार (ता. ७) अर्ज भरणीला सुरूवात झाली आहे.
पेरणोली ग्रामपंचायत सरपंचांनी राजीनामा दिल्याने तर कोरीवडे येथे सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने या दोनही जागा रिक्त होत्या. पेरणोलीचे सरपंचपद हे सर्वसाधारण महीलेसाठी तर कोरीवडे सरपंचपद हे नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. मडिलगे प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण व सर्वसाधारण महीला, देऊळवाडी प्रभाग ३ मधील अनुसुचित जाती, बहिरेवाडी प्रभाग क्रमांक १ मधील अनुसुचित जाती महीला, हरपवडे प्रभाग क्रमांक १ मधील अनुचित जाती, धामणे प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वसाधारण अशा एकूण सहा सदस्यपदाच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुक होत आहे.

बातमीचा इफेक्ट…

आजरा नगरपंचायतीच्या विरोधी नगरसेवकांनी कचरा प्रश्नी आक्रमक भूमिका घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपंचायतीच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने तातडीने शहरातील कचरा उचलण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.

आजचा कार्यक्रम…
पेरणोली तालुका आजरा येथील सहाय्यक शिक्षक रवींद्र शंकरराव देसाई यांच्या सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा कार्यक्रम दुपारी बारा ते तीन या वेळेत व ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ (रात्री ८ ते १० वाजेपर्यंत) या सांस्कृतीक कार्यक्रमाचे पेरणोली ता. आजरा येथे आयोजन करण्यात आले आहे.

आजचे पंचांग
आजचे पंचांग
दिनांक : १० एप्रिल २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अष्टमी (रात्री ११.१५ पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
नक्षत्र : पूर्वाषाढा नक्षत्र (सकाळी 11:27 पर्यंत) त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र
योग : शिवा योग (सायंकाळी ०६.३० पर्यंत) त्यानंतर सिद्ध योग
करण : बलवा करण (सकाळी १०.२१ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : धनु राशी (सायंकाळी ०६.०३ पर्यंत) त्यानंतर मकर राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.०७ ते दुपारी १२.४० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१५ ते दुपारी ०१.०५
सूर्योदय : सकाळी ०६.२६
सूर्यास्त : सायंकाळी ०६.५३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
आजचे पंचांग

आयपीएल न्यूज
लखनौचा कोलकत्यावर तीन गडी राखून विजय.
आजचा सामना
राजस्थान विरुद्ध बंगळूरु
वेळ सायंकाळी ७.३० वाजता


