
होण्याळी येथील वृद्धाचा विहिरीत मृतदेह सापडला

आजरा:प्रतिनिधी
होण्याळी ता.आजरा येथील शिवाजी विठ्ठल पाटील (वय ७० ) यांचा आंबेओहोळ लगतच्या विहीरीत मृतदेह आढळला.याबाबतची वर्दी भाऊ तानाजी पाटील यांनी आजरा पोलीसात दिली .
याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी, आंबेओहोळ लगतच्या विहीरीत पाटील यांचा मृतदेह आढळून आला . पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर तोल जाऊन ते विहिरीत पडले असावेत अशी शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे . त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहीत मुलगी, एक मुलगा, सून असा परिवार आहे.

अज्ञात इसमाने लावलेल्या आगीत १० ते १५ हेक्टरचा परीसर जळून बेचिराख.

आजरा: प्रतिनिधी
इटे ता. आजरा येथे अज्ञातांनी लावलेल्या आगीत दहा ते पंधरा हेक्टर क्षेत्रातील शेती उपयुक्त साहित्यासह विविध वृक्ष आगेच्या भक्षस्थानी पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काल दुपारच्या दरम्यान सदर आग लागली. अल्पावधीतच आगीने रौद्ररूप धारण केले.
आगीमध्ये नामदेव फगरे,शंकर प्रभू,अर्जुन प्रभू,शिवाजी साबळे, विमल फगरे,जयराम प्रभू,चंद्रकांत शेणवी,सटू प्रभू,अक्षय फगरे,महादेव गुंडू पाटील,शिवाजी फगरे,शैलेश पाटील या शेतकऱ्यांचे मेसकाठी,जनावरांची वैरण,काजूची झाडे,बांबू, लाकडे असे अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.
पेरणोलीत मधमाशांच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी

आजरा : प्रतिनिधी
पेरणोली ता.आजरा येथे मेसकाठ्या तोडताना मधमाशाच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी झाला.चंद्रकांत महादेव शिवणे (वय ६० वर्षे) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शिवणे हे दुपारी १२ वाजता नावलकरवाडी येथील रांगी नावाच्या शेतात संतांजी सोले यांच्या मेसकाठया मजूरीने तोडत होते.या़वेळी खाली वाकून मेसकाठि तोडत असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला.यामध्ये शिवणे यांच्या तोंड,अंग व पायावर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाली आहे.त्यांच्यावर आजरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान सुदैवाने या हल्ल्यातून शिवणे यांचा मुलगा सागर व मेसकाठी व्यावसायिक नामदेव कुकडे ,गणपती ढोकरे,यशवंत जाधव बचावले.
वणव्यापासून जंगलं वाचविण्यासाठी सरपंच परिषदेने उचलले पाऊल… जिल्हाधिकारी, उप वनसंरक्षक, शिक्षणाधिकारी, कुलगुरूंना दिले निवेदन

आजरा : प्रतिनिधी
प्रत्येक वर्षी जिल्हयातील १५०० ते २००० हेक्टर जंगल वणव्यात होरपळते. याचे परिणाम जैवविविधतेवर होत असून जंगल वाचविणं ही काळाची गरज बनली आहे. यासाठीच सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) यांच्यावतीने वणव्यापासून जंगल वाचविण्यासाठी पावले उचलली असून याची सुरूवात कोल्हापूर जिल्हयातून करण्यात आली आहे. नुकतेच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील, प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, उप बनसंरक्षक, जिल्हा शिक्षणाधिकारी, शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन दिले आहे.
कोल्हापूर जिल्हयात असलेली जंगले जैवविविधतेने नटलेली आहेत. येथील जैवविविधता हे आपल्या भागाचे वैभव आणि श्रीमंती आहे. मानवी अस्तित्व जंगलावर अवलंबून असतानाही जंगलांना आग लावण्याचे कृत्य मानवाकडून अजानतेपणी होत आहे. त्यामुळे जंगलांचे मोठे नुकसान होत असून जंगल क्षेत्रात वर्षागणिक घट होताना दिसत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. गायरानातील गवत चांगले यावे यासाठी आग लावली जाते, मात्र या आगीत देवराई, गायरान क्षेत्राचे नुकसान होते. शिवाय लगतच्या जंगल क्षेत्रालाही याची झळ सहन करावी लागते. जंगलाला आग लागण्याची कारणे अनेक असली तरी ती मानवनिर्मितच आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून उपाय योजना करून वणव्यापासून जंगल वाचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. लोकांमध्ये जनजागृती करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
याबरोबरच शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना तसेच उपवनसंरक्षक तसेच जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनातून शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये याबाबत प्रबोधन कार्यक्रम राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. तर जिल्हयातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना लेखी सूचना देऊन जंगलांचे महत्व पटवून देणारे कार्यक्रम शाळांच्या माध्यमातून राबविण्याची मागणीही करण्यात आली आहे. या निवेदनावर सरपंच परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील, प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस, प्रदेश विश्वस्त शिवाजी मोरे, जिल्हा समन्वयक अजित पाटील, शरद पाटील, महिला जिल्हा समन्वयक ज्योत्स्ना पाटील आदिंच्या सहया आहेत.
आजरा महाविद्यालयात आज वणवा निर्मूलन मोहिम कार्यशाळा
जंगलांना लागणाऱ्या आगींच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी वन विभागाच्यावतीने वणवा निर्मूलन मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत येथील आजरा महाविद्यालयात गुरूवार दि. ७ रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापूर वनविभाग, सरपंच परिषद मुंबई (मुंबई) व आजरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेसाठी उपवनसंरक्षक जी. गुरूप्रसाद यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय सहाय्यक वनरक्षक नवनाथ काबंळे, आजऱ्याच्या परीक्षेत्र वनअधिकारी स्मिता डाके, आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे, अधिक्षक योगेश पाटील, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जी. एम. पाटील, प्रदेश सरचिटणीस राजाराम पोतनीस, तालुकाध्यक्ष संदीप चौगले, महिला अध्यक्षा शारदा गुरव उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेसाठी तालुक्यातील सर्व वनव्यस्थापन समिती अध्यक्ष, सरपंच, सदस्य, वनविभागाचे सर्व अधिकारी व सेवक वर्ग यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

मासेवाडीसह परिसराच्या विकासासाठी प्रयत्नशील: समरजितसिंह घाटगे
पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे व बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप

आजरा / प्रतिनिधी
कोणतेही घटनात्मक पद नसतानाही केवळ जनतेच्या आशीर्वादाने कागल विधानसभा मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी निधी खेचून आणत आहे.येत्या काळात मासेवाडी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू.अशी ग्वाही शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे नेते शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
मासेवाडी (ता.आजरा) येथे राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पेन्शनची मंजुरी पत्रे तसेच बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.
ग्रामस्थांच्या वतीने राजे समरजीतसिंह घाटगे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात निराधार योजनेतील लाभार्थी चंद्राबाई भाऊ पाटील,हौसाबाई नारायण चौगुले, गंगुबाई विठोबा सावंत, विठाबाई बापू सावर्डे, रत्नाबाई कृष्णा चौगुले यांना मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.
श्री.घाटगे पुढे म्हणाले, शाहू महाराजांच्या रक्ताचा वारस म्हणून आम्ही निर्हेतुकपणे समाज उभारणीचे काम आमच्या तमाम कार्यकर्त्यांच्या पाठबळावर करत आहोत .त्यामुळे येत्या काळात परिवर्तनाच्या लढाईत आपल्या सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा असे आवाहनही श्री.घाटगे यांनी यावेळी केले.
यावेळी सुदाम सावर्डे, तुकाराम सावर्डे ,वैभव गिरी ,रावसाहेब सावर्डे ,भास्कर पाटील, विजय परीट, सुनील यादव,सुरेश परीट यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते,लाभार्थी,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत प्रास्ताविक शशिकांत पाटील (सर) यांनी केले. आभार आनंदराव परीट यांनी मानले.

प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी तुकाराम तरडेकर उपाध्यक्षपदी अनिल गोवेकर

आजरा : प्रतिनिधी
आनंदराव नादवडेकर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी तुकाराम विठु तरडेकर यांची तर उपाध्यक्षपदी अनिल गंगाराम गोवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्राथ. शिक्षक पतसंस्था अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची संचालक मंडळाची प्रमोद फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
निवडणूक अधिकारी यांनी तुकाराम विठु तरडेकर यांची अध्यक्षपदी व अनिल गंगाराम गोवेकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या वेळी मावळते अध्यक्ष आनंदा भादवणकर उपाध्यक्ष मनोहर कांबळे व नुतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार निवडणूक अधिकारी प्रमोद फडणीस यांचे हस्ते करणेत आला.
यावेळी शिक्षक समितीचे नेते सुनिल शिंदे, शिक्षक बँक संचालक शिवाजी बोलके, बळवंत शिंत्रे समितीचे अध्यक्ष एकनाथ आजगेकर व सर्व संचालक आदी उपस्थित होते.
महाशिवरात्रीनिमित्त साळगाव येथे विविध कार्यक्रम

आजरा : प्रतिनिधी
साळगाव ता. आजरा येथे महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवार दिनांक ८ मार्च व शनिवार दिनांक ९ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक ८ मार्च रोजी सकाळी आठ ते दहा या कालावधीत वारकरी दिंडी निघणार आहे. त्यानंतर कलश मिरवणूक, शिवपिंडीला महाजलाभिषेक, दुपारी दोन ते सहा या कालावधीत भजन तर रात्री नऊ ते अकरा या कालावधीत श्री संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ महिला मंडळ शिप्पूर तर्फे नेसरी यांचा हरिपाठ, शुक्रवारी रात्री अकरानंतर जागरण निमित्त हरिहर संत सेवा संप्रदाय मंडळ साळगाव यांचे वारकरी भजन होणार आहे.
शनिवार दिनांक ९ मार्च रोजी सकाळी दहा ते बारा या कालावधीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


