मंगळवार दि. २ सप्टेंबर २०२५


अन्याय निवारण समितीची गांधीगिरी
खड्डे न मुजवल्याबद्दल मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर केली फुलांची उधळण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही आजरा शहरातील खड्डे न मुजवल्याने सर्वत्र चिखल व डबक्यांचे साम्राज्य झाले आहे .यामुळे गणेश भक्तांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर अन्याय निवारण समितीच्या वतीने नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना पुष्प देऊन अधिकाऱ्यांच्या दरवाजावर पुष्पहार अडकवून फुलांची उधळण करत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे म्हणाले, गणेशोत्सवामध्ये विघ्न आणण्याचे काम नगरपंचायतीने केले आहे. उत्सवापूर्वीच किमान खड्डे बुजवावे अशी मागणी करण्यात आली होती. परंतु या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने अक्षरश: चिखल व खड्ड्यातून वाट काढत गणेश मुर्त्या न्याव्या लागल्या. किमान गणेश विसर्जनापूर्वी तरी शहरातील खड्डे मुजवावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पांडुरंग सावरतकर,वाय.बी. चव्हाण, जावेद पठाण, जोतिबा आजगेकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आजऱ्यात जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा समाज एकवटला

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मुंबई येथील मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आजरा येथे तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या आंदोलनामध्ये मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, संभाजी इंजल, शिवाजी इंजल, सी.आर.देसाई, बापू नेऊंगरे, अमोल भांबरे, संजय पाटील, रणजीत सरदेसाई, कृष्णा पाटील, इंद्रजीत देसाई, परशुराम बामणे, विजय थोरवत, विलास पाटील, तानाजी देसाई, गणपतराव डोंगरे, महादेव पोवार, डॉ. धनाजी राणे, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, पांडुरंग सावरतकर, सौ. मीनल इंजल, सौ.सुनंदा मोरे, प्रकाश सासुलकर, दशरथ अमृते, कॉ. संपत देसाई, शिवाजीराव पाटील, शंकरराव शिंदे, प्रभाकर कोरवी यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आजरा बाजारपेठ वाहनांनी हाऊसफुल्ल…
दुचाकी व चार चाकी वाहनांची प्रचंड गर्दी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – पुण्यासह बाहेर गावचा चाकरमानी तालुक्यामध्ये परतला असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये दुचाकी व चार चाकी वाहनांची प्रचंड गर्दी होऊन वारंवार वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
यापूर्वी महागाव मार्गावर वाहतुकीची कोंडी होताना दिसत असे परंतु गेले चार दिवस शहरातील मुख्य बाजारपेठेतच वाहनांची गर्दी होऊ लागल्याने बाजारासाठी येणारे तालुकावासीय, शाळकरी मुले यांचे प्रचंड हाल होत आहेत.
शहरात, बाजारपेठेत रस्त्याशेजारी लावलेली ठीक- ठिकाणची दुकानेही वाहनांप्रमाणे वाहतुकीस अडथळा ठरू लागले आहेत. नगरपंचायत व पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

उत्तूरला ५० बेडचे हॉस्पिटल व क्रीडांगणाची मागणी

उत्तूर : मृत्युंजय महान्युज वृत्तसेवा (मंदार हळवणकर)
आजरा तालुक्यातील उत्तूर येथे कार्यरत प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सहा उपकेंद्रांचा समावेश असून, हे २५ खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. सध्याचे आरोग्य अधिकारी व रुग्णांमध्ये उत्तम संवाद निर्माण झाल्यामुळे रोज सरासरी २०० रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, ऍडमिट करण्यासाठी आवश्यक बेडची सोय नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उत्तूर येथे ५० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी मागणी होत आहे.यासोबतच स्थानिक खेळाडूंना सुविधा मिळावी म्हणून उत्तूरमध्ये सुसज्ज क्रीडांगणासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य विठ्ठल उत्तूरकर व सदानंद व्हनबट्टे यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.
नगरपंचायतीतून जन्मदाखले वेळेत द्या…
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायत हद्दीत जन्म झालेल्या नागरिकांनी नगरपंचायतीकडे आवश्यक ती कागदपत्रे जमा करून जन्म दाखले मिळवण्यासाठी अर्ज केलेले आहेत पण ते दाखले वेळेत न मिळाल्याने अनेक अडचणींना स्थानिक नागरिकांना सामोरे जावे लागत असून जन्मदाखले वेळेत उपलब्ध करून द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
दाखले वेळेत न मिळाल्यास शैक्षणिक शासकीय वैयक्तिक हिताच्या बाबीवर प्रतिकूल परिणाम होऊन त्यांचे नुकसान होऊ शकते.त्यामुळे दाखल्यासाठी लागणारी योग्य त्या कागदपत्रांची माहिती देऊन तातडीने दाखले उपलब्ध करून द्यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनावर समिती अध्यक्ष परशुराम बामणे, पांडुरंग सावरतकर, वाय.बी. चव्हाण, संजय जोशी, दिनकर जाधव, जोतिबा आजगेकर, जावेद पठाण, गौरव देशपांडे आदींच्या सह्या निवेदनावर आहेत.

उत्तूरमध्ये खुल्या बुद्धिबळ स्पर्धेला ११७ खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चेस असोसिएशन कोल्हापूर यांच्या मान्यतेने अवधूत कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ इंदिरानगर, उत्तूर ता. आजरा यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित भव्य खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत तब्बल ११७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज आदी ठिकाणांहून नामवंत आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही या स्पर्धेत भाग घेतला होता.
या स्पर्धेत आदित्य सावळकर याने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक ऋषिकेश कबनूरकर, तृतीय अथर्व तावरे व उत्तेजनार्थ प्रेम निचल यांना मिळाला. एकूण ११७ पैकी २५ खेळाडूंना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, बक्षीस रक्कम व मेडल प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण गंगाधर हराळे, मारुतीराव घोरपडे, गणपती सांगले, संजय बरडे, उत्तम बरडे, युवराज कातवरे, दत्तात्रय केसरकर यांच्या हस्ते झाले. पंच म्हणून रोहित पोळ, महेंद्र कामत व शशिकांत चव्हाण यांनी काम पाहिले.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुनील पोवार, प्रथमेश बरडे, विशाल जाधव, सौरभ हराळे, देवदत्त काळगे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

हनुमान तरुण मंडळ, उत्तूरतर्फे भव्य स्पर्धांचे आयोजन

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हनुमान तरुण मंडळ, उत्तूरच्या शष्टब्धीपूर्ती निमित्त गणेशोत्सवानिमित्त विविध भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि.३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वा. खुल्या कराओके गीतगायन स्पर्धा होणार असून हिंदी व मराठी गाण्यांवर स्पर्धकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ₹ ४००१/-, द्वितीय क्रमांक ₹ ३००१/-, तृतीय क्रमांक ₹ २००१/- तसेच दोन उत्तेजनार्थ क्रमांक अनुक्रमे ₹१००१/- व ₹ ५०१/- अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
गुरुवार दि. ४ व शुक्रवार दि. ५सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. पासून भव्य खुल्या कॅरम स्पर्धा रंगणार आहे. डबल स्पर्धेत प्रथम क्रमांक ₹ ५००१/-, द्वितीय ₹ ३००१/-, तृतीय ₹ २००१/- व उत्तेजनार्थ ₹१००१/-, तर सिंगल स्पर्धेत प्रथम क्रमांक ₹ ३००१/-, द्वितीय ₹ २००१/-, तृतीय ₹ १००१/-व उत्तेजनार्थ ₹७०१/- अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.तसेच शुक्रवारी दि. ५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. मानाची पैठणी व इतर आकर्षक बक्षिसांसाठी मिनी लॉटरीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व स्पर्धांसाठी प्रवेश विनामूल्य असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
सर्व कार्यक्रम हनुमान मंदिर, नेहरू चौक, उत्तूर या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत.

गणेश दर्शन
लिंगायत गल्ली गणेशोत्सव मंडळ आजरा

अध्यक्ष : निलेश निप्पाणे
उपाध्यक्ष : शिवकुमार गुंजाटी
खजिनदार : अनिकेत शिंत्रे
समता ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सोहाळे

अध्यक्ष : श्री.चंद्रकांत कोंडुसकर
उपाध्यक्ष : श्री.प्रकाश दोरुगडे
सचिव : श्री.सचिन कळेकर
खजिनदार : उत्तम डेळेकर
जाणता राजा कला क्रीडा संस्कृतिक तरुण मंडळ, बहिरेवाडी

अध्यक्ष : अशोक जोंधळे
खजिनदार : पुंडलिक मारुती दळवी
श्री ची मूर्ती अर्पण : श्री उत्तम भिमराव पोरे
मूर्तिकार : धीरज कुंभार हिरलगे
यंगस्टार ग्रुप तरुण मंडळ, चांदेवाडी

अध्यक्ष : श्री.सुधिर बेलकर
उपाध्यक्ष : श्री.जिवबा कोंडूसकर सचिव : श्री.लहू सावरतकर



