mrityunjaymahanews
कोल्हापूर

दीड कोटींच्या अमिषाने १ लाख ८० हजारांचा लावला चुना

दीड कोटी रुपये कर्जासाठी दोन लाखांचा लावला चुना

पुणे येथील एका खाजगी फायनान्स कंपनीने १ कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून महागाव (ता. गडहिंग्लज) येथील मोहनसिंग राजपूत या तरुणाची तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. कर्ज मंजुरीचे पत्र दिल्यानंतर प्रत्यक्षात सदर कंपनी अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आल्याने राजपूत कुटुंबीय हादरून गेले आहे. याप्रकरणी बोरवडे येथील मध्यस्थी करणारा एकजण अद्यापही या कुटुंबियांना भेटू शकलेला नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, महागाव येथील राजपूत यांना एक कोटी साठ लाख रुपयांचे कर्ज व्यवसायासाठीपुणे येथील एका खाजगी फायनान्स कंपनीकडून उपलब्ध करून देतो असे सांगितले. व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होत असल्याने मध्यस्थाला कमिशन देण्याचेही मान्य करण्यात आले. मालमत्ता तारण देऊन सदर कर्ज दिले जाणार असल्याचे सुरुवातीस सांगण्यात आले तारण कागदपत्रांसाठी वकील फी, सर्च रिपोर्ट फी, स्टॅम्प,प्रोसेसिंग फी यासाठी रुपये १ लाख ८० हजार इतकी रक्कम राजपूत यांच्याकडून घेण्यात आली. कर्ज मंजुरीचे कंपनीचे रितसर पत्रही त्यांना देण्यात आले. एक लाख ८० हजार रुपये पोहोच झाल्यानंतर मात्र मध्यस्थाने राजपूत यांना टाळण्यास सुरुवात केली. राजपूत यांनी बोरवडे येथे संबंधित मध्यस्थाच्या भेटीकरीता वेळोवेळी प्रयत्न केला, पण तो बाहेरगावी असल्याचे सांगून भेट टाळतच आला. अखेर कंपनीच्या पुणे येथील मंजुरी पत्रावर असलेल्या पत्त्यावर जाऊन राजपूत कुटुंबीयानी शहानिशा केली असता तेथे अशी कोणतीही फायनान्स कंपनी अस्तित्वात नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ज्या खात्यावर त्यांनी एक लाख ८० हजार रुपयांचा भरणा केला होता त्या बँक खात्यावरील शिल्लकीची चौकशी केली असता एक रुपया ८९ पैसे इतकी रक्कम खात्यावर शिल्लक असल्याचे आढळून आले.कर्ज तर नाहीच पण पदरचे १ लाख ८० हजार गमावण्याची वेळ संबंधीत तरुणावर आली.

……………. ………

सहा. वन व्यवस्थापन समित्यांची कार्यशाळा २४ जानेवारी रोजी…आजरा येथील बैठकीत निर्णय

वनसंरक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र वन अधिकारी, आजरा तसेच श्रमीक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांचे समवेत परिक्षेत्र वन अधिकारी आजरा यांचे कार्यालयात हत्ती, गवे, रानडुक्कर इत्यादी वन्यप्राणी आणि शेतकरी यांचा संघर्ष संपविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे या पार्श्वभूमीवर बैठक आयोजीत करणेत आली होती. सदर बैठकीस मा. वनसंरक्षक कोल्हापूर, आज-याच्या परिक्षेत्र वन अधिकारी स्मिता डाके या उपस्थित होत्या. यावेळी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करणेत आली. यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले,
जंगली प्राणी आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष कायमचा संपवायचा असेल तर काही ठोस उपाययोजना हाती घ्यावी लागतील. जंगलाच्या समृध्दिकरणाचा कार्यक्रम तातडीने हाती घ्यावा लागेल, बांबु आकेशिया, निलगिरी, सुबाभुळ यासारख्या एकाच जातीच्या झाडांची लागवड तातडीने थांबवून या परीसरातील पारंपारिक वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. आकेशिया सारख्या पर्यावरणाला आणि इथल्या जैव विविधतेला बाधा आणणारी झाडे पुर्णपणे काढून टाकण्या बाबतही यावेळी चर्चा झाली.
जंगल समृध्दीकरणाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी तालुक्यातील संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांची कार्यशाळा २४ जानेवारीला घेण्याचा निर्णय करण्यात आला. या कार्यशाळेत पर्यवरणातील तज्ञ, चळवळीचे कार्यकर्ते, वन विभागाचे अधिकारी, तालुक्यातील सर्व गावच्या समितीचे अध्यक्ष सचिव यांना निमंत्रित करून जंगलाच्या समृध्दीकरणाबाबत सूचना घेऊन त्याचा ठोस आराखडा बनविण्यात येईल. वनविभागाने यासाठी पुढाकार घ्यावा असे ठरले. याबरोबरच हरपवडे धनगरवाड्याच्या वीज आणि रस्त्यासाठीच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली जाईल. जंगलातून येणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून योजनेसह आल्यास त्याला तातडीने मंजुरी दिली जाईल.
ज्या शेतक-यांच्या जमिनी वन विभागाच्या हद्दी लागत आहेत अशा दहा शेतकऱ्यांनी एकत्र येत सौर कुंपणाची केली तर त्याला ९० टक्के अनुदान देऊन मंजुरी देऊ असे उपवनसंरक्षक श्री. काळे यांनी सांगितले.
यासह अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी कॉ. संपत देसाई, सहा उपवनसरंक्षक कांबळे, परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके, संजय घाटगे, युवराज जाधव, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे, रणजित सरदेसाई, नारायण राणे, काशीनाथ मोरे, शांताराम पाटील, धोंडिबा झोरे, बायाजी येडगे, शिवाजी गुरव, पांडुरंग गाडे, नामदेव फगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

सक्तीच्या लसीकरणाविरोधात आज-यात निदर्शने

आजरा तहसीलदार कार्यालय येथे लसीकरणाच्या सक्ती विरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामध्ये भारतीय विद्यार्थी मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, इंडियन मेडिकल प्रोफेशनल असोसिएशन या संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला. या वेळी लसीकरणाला आपला विरोध नाही, ज्यांना हवे आहे त्यांना दोन डोस देऊन हवं तर बूस्टरचेही चार पाच डोस द्या. पण ज्यांना लस घेण्याची इच्छा नाही त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या लसीकरणाच्या सक्तीला आपला  विरोध आहे असे यावेळी कार्यकर्त्यांना स्पष्ट केले. यावेळी गौतम मोरे, सलीम महागोंडे,जुबेर माणगावकर, उबेद आगलावे, हसन मकानदार, सूर्यकांत कांबळे, जयदीप कांबळे, गणेश कांबळे, उवैस मुल्ला, ज्ञानेश्वर कांबळे व डाॅ. उल्हास त्रिरत्ने, इ. कार्यकर्ते उपस्थित होते.

…………………………….

आजरा नगरपंचायत ला अग्निशामन वाहनाकरिता ६० लाख रुपये मंजूर

जि.प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या प्रयत्नाने गृहराज्यमंत्री ना.सतेज पाटील यांच्या मार्फत जिल्हा नियोजन निधी मधुन अग्निशामक वाहन व साहित्यासाठी रुपये ६० लाख इतका निधी मंजुर झाला आहे.या कामी आशोकआण्णा चराटी,अभिषेक शिंपी यांच्या सह नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांनीही विशेष प्रयत्न केले.

………………….

आजरा महाविद्यालयाच्या ज्योतीचा डबल धमाका:
तलवारबाजीमध्ये दोन सुवर्णपदकांची कमाई
(शिवाजी विद्यापीठ आंतर -विभागीय स्पर्धा)

शिवाजी विद्यापीठाच्या आंतर -विभागीय तलवारबाजी स्पर्धेत आजरा महाविद्यालयाच्या ज्योती सुतार हिने आज डबल धमाका केला. या स्पर्धेतील तलवारबाजीमध्ये तिने दोन सुवर्णपदकांची विक्रमी कमाई करीत महाविद्यालयाच्या शिरपेचात मनाचा तुरा तर रोवलाच, तसेच शिवाजी विद्यापीठाची तलवारबाजी क्रीडाप्रकारातील महिला विभागाची जनरल चॅम्पियनशिप प्राप्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या सन 2021-22 यावर्षीच्या क्रीडा स्पर्धा सध्या सुरू आहेत. त्यामध्ये आजरा महाविद्यालयाच्या ज्योतीने तलवारबाजीच्या सेबर आणि फॉईल या दोन प्रकारामध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली. या विक्रमी यशामुळे अमृतसर येथे होणाऱ्या नॅशनल लेव्हलच्या अखिल भारतीय विदयापीठिय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशनिमित्त आजरा महाविद्यालयामार्फत ज्योतीचे अभिनंदन करण्यात येत आहे. सध्या जागतिक दर्जाच्या तलवारबाजी स्पर्धेसाठी व तेथेही अलौकिक यश संपादन करण्यासाठी ज्योती पंजाब येथे भारताच्या काही निवडक खेळाडू सोबत सराव करीत आहे. या यशासाठी मार्गदर्शन व सुविधा पुरविल्याबद्दल संस्थेबद्दल ऋण व्यक्त करताना आजरा महाविद्यालयाची खेळाडू असल्याचा अभिमान वाटत असल्याची भावना नमूद केली आहे.
महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाचे डॉ. धनंजय पाटील व प्रा. अल्बर्ट फर्नांडिस यांचे तिला मार्गदर्शन केले. यानिमित्त जनता शिक्षण संस्थेचे चेअरमन अशोक चराटी, उपाध्यक्ष विलास नाईक, सीईओ डॉ. अनिल देशपांडे, सचिव रमेश कुरूणकर, डॉ. दीपक सतोसकर, सुरेश डांग, विजयकुमार पाटील, दिनेश कुरूणकर, कृष्णा येसणे, प्राचार्य डॉ. अशोक सादळे, उपप्राचार्य राजीव टोपले, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील आदींसह शिक्षक व शिक्षकेतरांनी अभिनंदन केले

……………………….

सरपंच परिषदेचे आज ग्रामपंचायत बंद आंदोलन….

सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र संघटनेच्यावतीने ग्रामपंचायत व सरपंच यांच्या समोरील विविध अडचणी व मागण्यांनसंदर्भात आपल्याकडे व राज्य शासनातील संबंधित विभागाच्या मंत्री महोदयांकडे निवेदने देऊन वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यास अद्याप ही कोणता प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आज बुधवार दिनांक २२ रोजी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यांसंदर्भात ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवून एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारला आहे. तरी या बंदची दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या अडचणी सोडवण्यासाठी व सरपंचांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत अशी मागणीही करण्यात येत आहे. या बंदमध्ये सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र आजरा तालुका संघटनेकडून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती
सहभागी होऊन ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे आजरा तालुका संतोष बेलवाडे,राज्य कार्यकारणी सदस्य राजू पोतनीस व खजिनदार जी. एम.पाटील यांनी दिली आहे.

.                 ……………….

विद्यावर्धिनी पतसंस्थेच्या चेअरमनपदी पांडुरंग शिपूरकर यांची निवड


विद्यावर्धिनी शासकीय-निमशासकीय व शिक्षण सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी पांडुरंग शिपूरकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी प्रकाश बडे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी श्री एस.एम.थैल हे अध्यक्षस्थानी होते. चेअरमन पदासाठी पांडुरंग शिरपूरकर यांचे नाव एकनाथ ढवण यांनी सुचवले त्यास सौ अनुजा वाळके यांनी अनुमोदन दिले. तर व्हाईस चेअरमन पदासाठी प्रकाश बडे यांचे नाव विद्यमान चेअरमन बळवंत शिंत्रे यांनी सुचवले त्यास श्रीमती अस्मिता साबळे यांनी अनुमोदन दिले. यावेळी संस्थापक सुभाष विभुते, सुनील सुतार, किरण आमणगी, धनाजी चौगुले , श्रीमती शुभांगी पेडणेकर, व्यवस्थापक विलास पोवार, विकास पाटील ,विजया इंजल उपस्थित होते किरण आमणगी यांनी आभार मानले.

.                    ……………………….

ढं

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चिमणे येथील एकाचा चिकोत्रा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

निपाणी येथील अपघातात लाकुडवाडीचा तरुण ठार

mrityunjay mahanews

अंतिम टप्प्यात जिल्हा बँकेकरिता आजऱ्यात धुमशान… कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशनचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ज्योतिप्रसाद सावंत यांना

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!