mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरगुन्हाभारतमहाराष्ट्रराजकीयविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

सोमवार दि.३ नोव्हेंबर २०२५

नाव पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघ…
स्थानिक उमेदवारीची शक्यता कमीच

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जेथे सर्व पक्षांचे सक्रिय कार्यकर्ते आढळतात व ज्या गावाची राजकीय दृष्ट्या संवेदनशील गाव अशी ओळख असणाऱ्या पेरणोली गावाच्या नावावरूनच पुनर्रचनेत नवीन जिल्हा परिषद मतदार संघ अस्तित्वात आला आहे. नाव पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघ असे असले तरीही पेरणोली येथून स्थानिक उमेदवारी होण्याची शक्यता फारशी दिसत नाही.

जिल्हा परिषद मतदार संघाच्या पुनर्रचनेपूर्वी या नूतन मतदारसंघातील बरीचशी गावे ही आजरा जिल्हा परिषद मतदार संघाला जोडण्यात आली होती. परंतु पुनर्रचनेत आजरा मतदारसंघ संपुष्टात आला असून नवीन अस्तित्वात आलेला पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघामध्ये तब्बल ६० गावांचा समावेश करण्यात आला आहे. अगदी पूर्वीच्या टोकाला असणाऱ्या लाकूडवाडी पासून ते पश्चिमेच्या टोकाला असणाऱ्या किटवडे गावापर्यंतच्या गावांचा यामध्ये समावेश आहे. प्रचंड भौगोलिक व्याप्ती असणाऱ्या या मतदार संघामध्ये प्रचार यंत्रणा राबवताना इच्छुकांची चांगलीच दमछाक होणार असून या वाढलेल्या भौगोलिक रचनेचा धसका अनेकांनी घेतला आहे .यामुळेच मर्यादित इच्छुकच पुढे येण्याची शक्यता आहे.

पेरणोली येथून पंचायत समितीचे माजी सभापती व आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयराज पवार व आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्रसिंह सावंत यांची नावे चर्चेत आहेत. पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तर राजेंद्र सिंह सावंत हे पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांचे समर्थक आहेत. सध्या झालेल्या मतदार संघाच्या अनपेक्षित पुनर्रचनेत पूर्व भागातील गावांचा समावेश झाल्याने अप्रत्यक्षरीत्या या मतदारसंघावर विद्यमान आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार राजेश पाटील यांचेही लक्ष राहणार आहे. विधानसभा निवडणुकीतील संदर्भ विचारात घेतल्यास येथून शिवाजीराव पाटील हे जयवंत सुतार अथवा संदीप चौगले यांच्याशी प्रयत्नशील राहतील तर राजेश पाटील यांच्याकडून आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अल्बर्ट डिसोजा यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. गेली पाच ते सात वर्षे पंचायत समितीचे माजी सभापती विष्णुपंत केसरकर हे या मतदारसंघाची मशागत करत आहेत. तेही या मतदारसंघातून प्रबळ दावेदार समजले जातात. याव्यतिरिक्त आजरा साखर कारखाना संचालक अशोक तरडेकर, शिवसेना उबाठा गटाचे युवराज पोवार,तालुका संघाचे माजी अध्यक्ष राजू होलम, अंजनाताई रेडेकर, जयवंतराव शिंपी, युवा कार्यकर्ते राघव सरदेसाई, शिवसेना शिंदे गटाचे रणजीत सरदेसाई, सुधीर सुपल,समीर पारधे, आदींचाही इच्छुकांमध्ये समावेश आहे.

उमेदवारी मिळवण्याच्या या साठमारीमध्ये संघर्ष हा अटळच आहे. त्यामुळे पेरणोलीकर या सर्व संघर्षापासून दूरच रहाणे पसंत करतील असे सध्या तरी दिसत आहे.

गत निवडणुकीतील (२०१७) उमेदवार निहाय पडलेली मते पुढील प्रमाणे…

कोळींद्रे जि.प. मतदार संघ…
सुनिता रमेश रेडेकर (ताराराणी आघाडी)-९६९२
हिरा विष्णुपंत केसरकर (शिवसेना)-७५५४
अंजनाताई केदारी रेडेकर (काँग्रेस)-६७०६

आजरा जि.प.मतदार संघ
जयवंतराव शिंपी (राष्ट्रवादी)-११२१६
अशोक चराटी (ताराराणी आघाडी)-१०६११

सदर जि. प. मतदार संघ सर्सावधारण प्रवर्गाकरिता आहे.

आजरा येथे भादवण गणातील भाजपा कार्यकर्त्यांची बैठक : उमेदवार निवडीवर सविस्तर चर्चा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

भादवण पंचायत समिती गणातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आजरा येथील अण्णा- भाऊ सभागृहात  पार पडली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार निवडीसंदर्भात ही बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी होते.

बैठकीची सुरुवात अतिशकुमार देसाई यांनी स्वागत व प्रस्ताविक भाषणाने केली. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करत बैठकीचे उद्दिष्ट स्पष्ट केले.

यावेळी अशोकअण्णा चराटी यांनी भादवण गणातील सर्व गावांची सविस्तर माहिती दिली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या गणातील निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ताकतीने लढवावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज आपण उमेदवार निवडीसाठी एकत्र आलो आहोत.यावेळी इच्छुक उमेदवारांनी आपापला परिचय देत निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली.

शैलेश मुळीक, संदीप पाटील, युवराज येसणे, जनार्दन नेऊंगरे, वर्षा बागडी, आणि संभाजी सरदेसाई यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका मांडली. बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ.अनिल देशपांडे यांनी ही निवडणूक आपण सर्वांनी एकजुटीने व ताकतीने लढवून जिंकायची आहे. प्रत्येक गावातून पक्षाचे बळ वाढवणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे असे स्पष्ट केले.

या बैठकीस विजयकुमार पाटील, दशरथ अमृते, रमेश ढोणूक्षे, अनिरुद्ध केसरकर, जयवंत सुतार, भाजपाचे आजरा तालुका अध्यक्ष अनिकेत चराटी, संभाजी सरदेसाई, डी.बी.सावंत,संदेश रायकर, प्रदीप लोकरे, अभी आरेकर, सूर्यकांत पाटील, मंदार हळवणकर, शिवराज लोखंडे, रुपेश लोखंडे आदी मान्यवरांसह भादवण गणातील सर्व गावांतील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘आजरा ‘ गाळपाकरता सज्ज…
पावसाचा व्यत्यय कायम


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सोमवार (ता. ३) पासून ऊस गाळपाला सुरवात होत आहे. प्रत्येक चल गावाला सुरुवात होत असली तरी तोडणी ओढणी यंत्रणेसमोर पावसाचे आव्हान कायम आहे.

यंदा चार लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्टे पुर्ण करण्यासाठी कारखाना प्रशासन सज्ज झाले आहे. हे चित्र एकीकडे असतांना दुसरीकडे ऊसतोडणीसाठी पावसाचा व्यत्यय येत आहे.आजरा कारखान्याकडे तालुका कार्यक्षेत्रात ८ हजार ८०० हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे. पर जिल्ह्यातील, परराज्यातील व स्थानिक ३५० तोडणी वाहतुक यंत्रणा कार्यरत झाली आहे. सध्या पावसामुळे कार्यक्षेत्रातील अनेक गावात ऊस तोडणी करता अडचणी आहेत. ज्या ठिकाणी ऊस तोडणी शक्य आहे. तेथे कारखान्याची यंत्रणा कार्यान्वीत झाली आहे. त्याचप्रमाणे गडहिंग्लज व चंदगड भागात यंत्रणा कार्यरत झाली आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचा प्रयत्न कारखाना व्यवस्थापन करणार आहे. आठवड्यापुर्वी भर पावसातच कारखान्याचा २७ वा गळीत हंगाम शुभारंभ झाला. या वेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कारखान्याला सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही दिली. कारखान्याने जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. परंतु सध्याचे हवामान पाहता पावसाचे मोठे आव्हान कारखाना गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी रहाणार आहे.

आजरा आगाराला नामफलक प्रदान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

वाटंगी (ता. आजरा) येथील सुरेश शिंगटे फौंडेशनच्यावतीने आजरा आगाराला गावांच्या नावाचे एसटीचे फलक प्रदान करण्यात आले.

फौंडेशनचे प्रमुख माजी मुख्याध्यापक सुरेश शिंगटे, माजी सभापती निवृत्ती कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यांच्या हस्ते वहातुक नियंत्रक राजाराम येसादे, वहातुक निरीक्षक सतीश भोगुलकर यांनी फलक स्विकारले.

श्री. तानाजी देसाई म्हणाले, सामाजिक कार्तकर्ते व माजी मुख्याध्यापक शिंगटे यांनी राबवलेला हा कौतुकास्पद उपक्रम आहे. त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा. मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आगारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. स्वाभिमानी संघटनेचे आजरा तालुका उपाध्यक्ष संजय देसाई, मारुती डेळेकर, शिवाजी कृष्णा बोलके, संतोष बिरजे, जोतीबा बोर, काळजी संतराम पाटील, गोविंदा कुंभार, कार्यशाळा अधिक्षक
प्रणित होडगे, सहाय्यक वहातुक निरीक्षक लक्ष्मण गवळी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

छाया वृत्त…

गटर्स वर आणि रस्ता खाली असा प्रकार असेल तर सांडपाणी जाणार कोठे ? त्याचा त्रास तर स्थानिक रहिवाशांना होणारच… हे चित्र आहे साई कॉलनी, आजरा येथील.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तालुका खरेदी  विक्री संघावर सत्ताधाऱ्यांचा झेंडा

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

डिस्टिलरी प्रकल्पासह सहवीज प्रकल्पाशिवाय कारखान्यांना पर्याय नाही : खा. प्रा.संजय मंडलिक

mrityunjay mahanews

सावधान…. ‘लंम्पी’ चा विळखा तालुक्यात घट्ट होतोय…

mrityunjay mahanews
error: Content is protected !!