mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडाभारतमहाराष्ट्रराजकीयविदेशसामाजिकस्थानिक

सातच्या बातम्या

रविवार दि.२ नोव्हेंबर २०२५

अल्बर्ट डिसोजा यांनी दंड थोपटले…

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पेरणोली जि.प. मतदार संघातून निवडणूक लढवणार

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पेरणोली जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित दादा पवार गटातून आपण उमेदवारी करावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह असून कार्यकर्त्यांच्या या आग्रहाला सन्मान देत आपण निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे सन्मित्र समूहाचे अध्यक्ष, आजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सभापती अल्बर्ट डिसोजा यांनी स्पष्ट केले आहे.वाटंगी, गवसे येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

वाटंगी येथील बैठकीस माजी आमदार राजेश पाटील, उदय देसाई आडकूरकर यांची तर गावचे येथील बैठकीस महादेव हेब्बाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आजरा कारखान्याचे संचालक शिवाजी नांदवडेकर, महिला कार्यकर्त्या रेजीना फर्नांडिस आदींनी डिसोजा यांचा राजकीय अनुभव, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गेल्या ४० वर्षांमध्ये केलेली कामगिरी व सहकाराचा असणारा अनुभव विचारात घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी आपण ताकदीने पाठीशी राहू असे स्पष्ट केले.

माजी आमदार राजेश पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन वरिष्ठांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे सांगितले.

डिसोजा म्हणाले, बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची मते विचारात घेणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांची मानसिकताच जर आपण निवडणुकीला सामोरे जावे अशी असेल तर निश्चितच आपण निवडणुकीला सामोरे जाऊ असा विश्वास त्यांनी दिला.

यावेळी आजरा कारखान्याचे संचालक संभाजी पाटील (हात्तीवडे), माजी सरपंच भीमराव सुतार, अनिल देसाई, बाबुराव गिलबिले, विश्वास कांबळे, मिनीन डिसोजा, माजी सरपंच मधुकर जाधव, प्रभाकर सोनार संजय पोवार वसंत आडसुळे, भीमराव वांद्रे, जुजेवास डिसोजा विलास राजाराम, एलीजा रॉड्रिग्ज,मेरी डिसोजा यांच्यासह राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

इच्छुकांचा दिवस गेला अंतिम मतदार याद्या चाळण्यात…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर बहुतांशी इच्छुक मंडळींचा शनिवारचा दिवस हा मतदार याद्या चाळण्यातच गेला.

१७ प्रभागांमध्ये असणारी मतदारनिहाय संख्या थोडीफार बदलली असली तरीही बाहेर गावच्या मतदारांचा भरणा, प्रभाग बदलून सोयीनुसार इतर प्रभागात घातलेली नावे तशीच आहेत. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी मतदार याद्यांमध्ये असणारे परंतु सध्या शहराबाहेर इतर गावी स्थायिक झालेले मतदार, शासकीय बदलीवाले कर्मचारी, मयत मतदार, विवाह नंतर सासरी गेलेल्या मुली यांची नावे अद्यापही याद्यांमध्ये आहेत. त्यामुळे हरकतींच्या पार्श्वभूमीवर नेमका सर्वे कशाचा झाला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सुमारे दहा टक्के मतदार केवळ यादीवरच...

प्रसिद्ध मतदार याद्यांमध्ये तब्बल दहा ते पंधरा टक्के मतदार हे सध्या शहरांमध्ये अस्तित्वातच नाहीत. मृत मतदारांच्या नोंदी कमी झालेल्या नाहीत. तर स्थलांतरित मतदार अद्यापही यादीत आहे. अशा दहा ते पंधरा टक्के मतदारांनी याद्यांचे आकडे फुगले आहेत.

पटेल कॉलनीतील रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावा…
अन्याय निवारण समितीच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठोकला ठिय्या

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहराकरीता नगरपंचायतीमार्फत राबवल्या जाणाऱ्या नवीन जल अमृत योजनेमध्ये पटेल कॉलनी समाविष्ट नसल्याने घरफाळ्यासह इतर कर नगरपंचायतीला भरायचे आणि पाण्याची व्यवस्था मात्र बुरुडे ग्रामपंचायतीने करायची अशी विचित्र अवस्था असून नगरपंचायतीने तातडीने पटेल कॉलनी मध्ये पाण्याची व्यवस्था करावी या मागणीसाठी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर पटेल कॉलनीतील रहिवाशांनी ठिय्या आंदोलन केले.

यावेळी नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा अभियंता कदम, संजय यादव निहाल नायकवडी यांनी आंदोलकांशी चर्चा केली.अखेर १५ डिसेंबर २०२५ पर्यंत नवीन नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी परशुराम बामणे, दिनकर जाधव, जावेद पठाण, जोतिबा आजगेकर,गौरव देशपांडे, मिनीन डिसोजा यांच्यासह नवीद पटेल ,आसिफ पटेल,खलील मुजावर,जबीन आडकूरे,जावेद वाडीकर,जावेद मुजावर, सैफुल्ला पटेल, नजिम मानगावकर, आसिफ मुजावर, सलाम मुल्ला,आक्रम नेसरीकर,मोईन माणगावकर,इमरान पटेल,जिमाद हिंग्लजकर,
अताउल्ला चांद, रेहान पटेल,रमजान नदाफ, नूरमहम्मद दरवाजकर, इमरान जमादार यांच्यासह अन्याय निवारण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुमेवाडी येथे मनसे आयोजित किल्ला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

उत्तूर – मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मुमेवाडी (ता. आजरा) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित किल्ला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय परीट होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विजय पाकले उपस्थित होते.

कार्यक्रमात सौरभ वांजोळे यांनी मनोगत व्यक्त करून स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले.स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला — काटे गल्ली (तोरणा) प्रथम, हर्षवर्धन साठे (राजगड) द्वितीय, संयुक्त पाटील गल्ली (पन्हाळगड) तृतीय, तर बेलकर गल्ली (सिंधुदुर्ग) यांना प्रोत्साहन पारितोषिक देण्यात आले.या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रकाश भिऊंगडे, विनायक करंबळे, सचिन पाटील व भैरू इंगळे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमास लेखक संतोष पाटील, अशोक हरणे, रामदास साठे, हणमंत गोडसे, धोंडिबा इंगळे, तुकाराम कडाकणे, किरण भोसले, सूरज काटे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीकांत कडाकणे यांनी मानले.

संत तुकाराम व बसवण्णा यांच्यात वैचारीक साम्य : प्रविण बांदेकर

आज-यात कर्मयोगी बसवण्णा ग्रंथ प्रकाशन व चर्चासत्र उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

संत तुकारामांनी बरे झालो देवा कुणबी केले हा अभंग लिहिला. अगदी त्यालाच असे बसवण्णांनी उच्च कुळात जन्मलो नामुष्की आहे असे वचन साहित्यात म्हटले आहे. तुकाराम सांगतात तेच बसवण्णा सांगतात.त्यामुळेच बसवण्णा आणि तुकाराम यांच्यात साम्य दिसून येत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व कवी प्रविण बांदेकर यांनी केले.

येथील मृत्युंजयकार शिवाजी सावंत सभागृहात लेखक कै. राजाभाऊ शिरगुप्पे लिखित ‘कर्मयोगी बसवण्णा’ ग्रंथाचे प्रकाशन व आयोजित चर्चासत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.साधनाचे संपादक विनोद शिरसाठ प्रमुख पाहुणे होते. डॉ प्रा. शिवशंकर उपासे अध्यक्षस्थानी होते.

बांदेकर म्हणाले, बसवणांचे दैवतीकरण केले. चिकित्सकपणे मांडणी केली नाही. त्यासाठीच राजाभाऊंचे हे महत्त्वाचे पुस्तक आहे.राजाभाऊंनी बसवेश्वर हा शब्द न वापरता जाणीव पूर्वक बसवण्णा हा शब्द वापरला आहे.आठव्या शतकानंतर जातीव्यवस्था वाढायला लागली. सर्वसामान्यांची दिशाभूल पुरोहित शाहीने सुरू केली. कर्मकांडामूळे अंधश्रद्धा वाढत गेली. मुंंज करायला बसवण्णांनी विरोध केला. प्रत्येक धर्मात ईश्वर सर्वांना सारखाच आहे.वैचारिक दृष्टीकोन समजून घेण्यासाठी वचन साहित्य महत्त्वाचे आहे.

शिरसाठ म्हणाले, न पेटलेले दिवे या लेखांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. लेखांमुळे राजाभाऊ महाराष्ट्रात पोहचले. दुर्गम भागात राजाभाऊ सारखे कोणत्याही लेखकाचे नेटवर्क नाही. महाराष्ट्र आणि बिहार मधील दुर्गम भागातील परिस्थिती एकसारखीच आहे. संस्कृतीच्या ओझ्याखाली दबलेला समाज उमटला होता. तीन शोधयात्रा व न पेटलेले दिवे हा राजाभाऊंचा झंझावात होता.

डॉ. उपासे म्हणाले, बसवण्णांच्या अनुभव मंडपात विचार स्वतंत्र होते व धर्म स्वातंत्र्य होते. श्रमाला महत्त्व देणारे बसवण्णा पहिले विचारवंत होते. अनुभव मंडप जगातील पहिली संसद होती.यावेळी प्रा. मिना शिरगुप्पे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी जि प. माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, माजी पंचायत समिती सभापती अल्बर्ट डिसोझा, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, आजरा साखर कारखाना संचालक अशोक तर्डेकर, किरण आमणगी,‌ नवनाथ शिंदे, डॉ.अंजनी देशपांडे, सुभाष विभुते, संतोष जाधव आदी उपस्थित होते. काँ.संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले.मारूती डेळेकर यांनी सूत्रसंचालन केले. संजय घाटगे यांनी आभार मानले.

हणमंतराव देसाई यांचे निधन

तुळजाभवानी कॉलनी, आजरा येथील. हणमंतराव राजाराम देसाई (वय ९२ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
आजरा महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. मनोज हणमंतराव देसाई यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

विनायक राजयोगी व दिपाली कवठणकर यांना निरोप


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आवंडी वसाहत मध्ये जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री. विनायक राजयोगी आणि सौ. दिपाली कवठणकर या शिक्षकांचा बदली निमित्त आवंडी वसाहत शाळेमध्ये गावकरी आणि विद्यार्थी मार्फत निरोप देण्यात आला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री. परशुराम निकम आणि उपाध्यक्ष श्री. विलास अस्वले , माजी मुख्याध्यापक श्री. शामराव कुंभार, श्री. शंकर कोले, चंद्रकांत निकम, अप्पासो पाटील, संजय पाटील, रघुनाथ ठिकार, बंडु कोले, शंकर सावंत, संतोष चौगुले, तसेच शाळा अंगणवाडी सेविका सौ.वंदना ठिकार, सौ. साधना कालेकर, सौ. अलका मांगले व इतर गावकरी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

अण्णाभाऊ समूहाचा शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा जाहीर…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जिल्हा बँकेकरीता कोणी केलं शक्तिप्रदर्शन?… कोणाची होणार बिनविरोध निवड?जरूर पहा

mrityunjay mahanews
error: Content is protected !!